काल दुर्गापूर, आज बशिरहाट... उद्या?

विवेक मराठी    17-Jul-2017
Total Views |

एक काळ असा होता की स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे हे कमीपणाचे आणि प्रतिगामीपणाचे वाटण्याची पराभूत मनोवृत्ती जनमानसात निर्माण केली गेली. बंगालचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर बंगालमध्ये घुसखोरी सतत वाढते आहे असे दिसत असतानासुध्दा, प्रथम काँग्रेसला व नंतर साम्यवाद्यांना जनमताचा कौल देऊन आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, हे सर्वसामान्य हिंदूंच्या लक्षातच आले नाही. आता सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये घुसखोर मुस्लीम बहुसंख्य झाले आहेत. ते मतांच्या बळावर आपल्यासमोर वाकणारे सरकार आणू शकतात.


कीकडे बंगाली भाषा शिकणे आवश्यक करण्याच्या प्रश्नावरून बंगालच्या उत्तरी जिल्ह्यांमध्ये गुरखा जमातीच्या लोकांनी आंदोलन उग्र करून गोरखालँडचा प्रश्न धसास लावला असतानाच बंगालच्या दक्षिणेस दिनाजपूर जिल्ह्यात एका दुसऱ्याच घटनेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बांगला देशाच्या सरहद्दीवर असलेल्या दिनाजपूरसारख्या जिल्ह्यांमधून बांगला देशी घुसखोरांचा वावर मोठया प्रमाणावर असणे ही आताची गोष्ट नाही. स्थानिक मुस्लिमांच्या सहकार्याने या भागातून बांगला देशात नदी पात्रातून जनावरांची तस्करी मोठया प्रमाणावर होत असे. मध्यंतरी या तस्करीला आळा घालण्यासाठी कधी नव्हे ते स्थानिक पोलीस सक्रिय झाले. त्यांनी काही तस्करांना मुद्देमालासकट पकडले. त्यामुळे तस्करीवर आळा बसला. परिणामत: बांगला देशात मांसाचे भाव वाढले. मागच्या वर्षी बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आल्या असताना हा प्रश्न विचारात घेतला, असे प्रसिध्द झाले होते. बांगला देशात गुरांची तस्करी होत असे. पण ती गुरे बहुधा रितसर भारताच्या इतर प्रांतांमधून ट्रक भरून विकत घेऊन नेली जात. गोरक्षक जथ्यांच्या टेहळणीतून त्याला आळा बसला. गुरे जाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तस्करांनी दुसरा पर्याय शोधला. त्यांनी स्थानिक हिंदूंची गुरे पळविण्यास सुरुवात केली. त्याबाबत स्थानिक हिंदू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन जात, तेव्हा त्यांच्या तक्रारींची नोंद करून घेण्यास पोलीस नकार देत. याचे कारण स्पष्ट होते. मुसलमानांच्या मतांवर निवडून आलेले ममता सरकार मुसलमानांविषयी ममता दाखविण्यास उतावळे असल्याने, लालू, मुलायम यांच्या कारकिर्दीदरम्यान यादव आणि मुस्लीम यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून न घेण्याचा जसा अलिखित शिरस्ता होता, तसाच अलिखित शिरस्ता बंगालमध्ये आहे. स्थानिक हिंदूंची गुरे पळविण्याचे प्रमाण वाढत जात होते. त्यांची अस्वस्थता वाढत होती. अशा जवळपास पन्नास घटना घडूनही पोलिसांनी गुरेचोरांना अटक केली नव्हती. शेवटी तर पोलिसांनीच त्यांना सांगितले की त्यांना येता जाता त्रास देऊ नये, त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे, असे इंडियन एक्स्प्रेसच्या दि. 28 जूनच्या बातमीत होते. त्यामुळे स्थानिकांनी मग स्वत:च रात्री गस्ती घालण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे एक दिवस रात्री अतुलचंद्र वसूच्या मुलांच्या समूहाच्या हातात म. नसिरुद्दीन, म. शमसुद्दीन आणि निसिरुल हक असे तीन गुरेचोर सापडले. त्यातच कृष्णपाद सिकदर या 80 वर्षांच्या माणसाच्या प्रत्येकी 30,000 रुपये किमतीच्या दोन गाई पूर्वी पळविल्या गेल्या होत्या. त्यामुळे ह्या तीन गाईचोरांना चोप देण्यात दोन तरुण मुलगे असीत आणि असीम बसू हे अर्थातच आघाडीवर होते. त्याच्याच घराजवळ हे चोर पकडले गेले. त्या वेळी झालेल्या मारहाणीत त्या तिघांचा मृत्यू झाला. नंतर त्यासाठी जबाबदार म्हणून असीत व असीम यांच्याबरोबरच कृष्णा पोद्दार यांना अटक झाली. या दरम्यान ती बातमी पसरल्याने जवळपास हजार लोक त्या ठिकाणी जमले. या भागात हिंदूंचे बाहुल्य आहे. या भागात तसेही मागच्या वर्षी ईद व रथयात्रा उत्सवापासून वातावरण तापलेले होते. ते तीन चोर पकडले गेल्यानंतर पोलिसांना बोलाविल्याचे तृणमूलचा स्थानिक कार्यकर्ता माखन सरकार याने सांगितले. पोलीस चार तासांनी उगवले. स्थानिकांच्या भावना तीव्र होत्या. तोवर सर्व काही घडून गेले. ही घटना घडण्यासाठी पोलीस जबाबदार होते, असे स्थानिक भाजपा आणि तृणमूल कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. पुन्हा चोरीचा प्रयत्न झाला, तर आम्ही परत चोरांची गय करणार नाही, असे स्थानिकांनी सांगितले. ही घटना घडल्यावर माझ्या मनात पाल चुकचुकली. या घटनेचा बदला घेण्याचा मुस्लीम लोक प्रयत्न करतील, हे निश्चित होते.


निमित्त मिळाले

जेमतेम एक आठवडा लोटत नाही, तोच बदल्यासाठी निमित्त मिळाले. दहावीत शिकणाऱ्या एका हिंदू विद्यार्थ्याने रविवार, दि. 1 मे रोजी पै. महंमद आणि काबा मशिदीसंदर्भात काही मजकूर फेसबुकवर टाकला. तो बऱ्याच मोठया प्रमाणावर वितरित झाला. तो वाचून त्या भागातील मुस्लिमांचे पित्त खवळले. 24 परगणा या जिल्ह्यातील बदुरिया येथे प्रथम व नंतर बशीरहाट या दुसऱ्या गावी मुस्लीम समाजातील लोक शेकडोंच्या संख्येने गोळा झाले. त्यांनी ठरवून हिंदूंची दुकाने प्रथम जाळली. हिंदू कुटुंबांना त्याची झळ पोहोचली. ज्या मुलाच्या फेसबुकवरून तो मजकूर घातला गेला होता, त्याला लगेच अटक करण्यात आली, तरी हिंसाचार थांबला नव्हता. मुस्लीम जमाव थव्याथव्याने तीन दिवस या दोन गावात थैमान घालत होता. इथेही पोलीस चार दिवसानंतर उगवले. दरम्यान हिंदूंनी प्रतिकार करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी भीतीपोटी घरात दडून राहिलेल्या महिलासुध्दा दोन दिवसांनी घरातले खराटे आणि काठया इ. घेऊन रस्त्यावर उतरल्या. हिंदू प्रतिकार करण्यास सज्ज होत आहेत हे पाहताच पोलीस आणि स्थानिक तृणमूल आमदार दीपेन्दु बिस्वास हा गावात आला. दि. 8 जुलैच्या इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीप्रमाणे तो पक्का जयचंद निघाला. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने तृणमूलचा कार्यकर्ता इद्रीस अली याची भेट घेतली. स्थानिक हिंदूंच्या मतांवर निवडून आला असला, तरी ममताजींच्या धोरणांना अनुसरून त्याने मुस्लिमांना अभय देऊन फक्त हिंदू युवकांना पकडून घेण्याचे सत्र आरंभले. स्थानिकांच्या तक्रारी होत्या की जेव्हा मुस्लीम जमाव हिंसाचार करत होता, त्या वेळी पोलिसांनी निष्क्रियता दाखविली आणि जेव्हा हिंदू एकत्रित होऊ लागले, तेव्हा त्यांना नामोहरम करण्यासाठी पोलीस आणि तृणमूलचे आमदार पुढे सरसावले. मुस्लीम गुंड सीमेपार बांगला देशातून शस्त्रास्त्रे सरसहा आणतात. दंग्यांदरम्यान इकडून तिकडे निर्वेधपणे जाणाऱ्या रुग्णवाहिन्यांमधून शस्त्रास्त्रांची ने-आण होते, तेव्हा पूर्ण माहिती असूनसुध्दा पोलीस तिकडे कानाडोळा करतात, अशी स्थानिक हिंदू, सुमंतो सरकारची तीव्र प्रतिक्रिया होती. ''हे पोलीस मुस्लिमांच्या बाजूने राहून आमच्या मुलांना फक्त पकडतात. मी मागच्या निवडणुकीत तृणमूलच्या बिस्वासला मत दिले होते, यापुढे कधीही देणार नाही.''

तृणमूलच्या नेतृत्वाने स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पोलिसांची निष्क्रियता याबरोबरच बाहेरून आलेल्या गुंडांवर या सर्व जाळपोळीचे आणि हिंसाचाराचे खापर फोडले. स्थानिक मुस्लीम नेत्याने सांगितले की पूर्वीपासून येथे हिंदू-मुस्लीम पिढयानपिढया गुण्यागोविंदाने राहात आहेत. पण त्यांच्यात विभक्तपणाचे बीज रोवले. कधी नव्हे ते या भागात रा.स्व. संघाच्या शाखा सुरू झाल्या. ज्या मुलाने फेसबुकवर मजकूर टाकला होता, त्याला रविवारी दि. 1 मेला संध्याकाळीच लगेच पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याने असे केल्याचे नाकारलेले होते. त्याची शहानिशा करणे शक्य होते. ते बाहेर आलेले नाही. पोलिसांनी तृणमूलच्या नेत्याच्या संगनमताने प्रकरण चिघळू दिले. त्यात 65 वर्षांच्या कार्तिकचंद्र घोष या वृध्दाला सुरा भोसकून त्यांचा खून करण्यात आला. त्याच्या शरीरावर भोसकल्याच्या अनेक खुणा होत्या. पण पोलीस अधीक्षकांनी मृत्यूचे जे कारण दिले, त्याप्रमाणे - दंगलीत झालेल्या हिंसाचाराने झाले की नाही याबाबत सांगता येणार नाही, ते शवाच्या तपासणीचा अहवाल आल्यावरच सांगता येईल. तो अहवाल सरकारी घोळात उशिरा देता येऊ शकतो.

या दरम्यान प्रथम स्थानिक भाजपा कार्यकर्ते घोष कुटुबीयांना भेटण्यास गेले असता त्यांना स्थानिक तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भेटू दिले नाही. नंतर भाजपामधून व केंद्रातून त्यांना भेटण्यासाठी काही वरिष्ठ नेते आले. राज्य सरकारने त्यांना विमानतळावरूनच परत पाठविले. त्यानंतर कोलकात्यात हिंदूंनी निषेधार्थ मोर्चा काढला. इतर वेळी तोंडाला पट्टया बांधून मोर्चे काढणाऱ्या सेक्युलरांनी मात्र त्याला वाळीत टाकले.

भोट हिंदू

स्वातंत्र्य मिळविताना प्राणांची बाजी लावून नि:शस्त्र लढा देणाऱ्या हिंदूंना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला जपण्यासाठी त्याची किंमत मोजावी लागते, हे विसरले. त्यातून 1962चा नामुश्कीचा पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी जागे होऊन आधुनिक आणि शस्त्रसज्ज होऊन सीमेवर पाकिस्तानवर विजय मिळविणारे भारतीय, त्याच वेळी अंतर्गत धोका ओळखण्यास मात्र विसरले. आसाम, बंगाल, त्रिपुरा या भागात घुसखोरी होते आहे, ती बिच्चाऱ्या गरीब बांगला देशीयांची आहे असा सूर अनेक विचारवंत आणि नेते आळवीत होते. एक काळ असा होता की स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे हे कमीपणाचे आणि प्रतिगामीपणाचे वाटण्याची पराभूत मनोवृत्ती जनमानसात निर्माण केली गेली. बंगालचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर बंगालमध्ये घुसखोरी सतत वाढते आहे असे दिसत असतानासुध्दा, प्रथम काँग्रेसला व नंतर साम्यवाद्यांना जनमताचा कौल देऊन आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, हे सर्वसामान्य हिंदूंच्या लक्षातच आले नाही. आता सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये घुसखोर मुस्लीम बहुसंख्य झाले आहेत. ते मतांच्या बळावर आपल्यासमोर वाकणारे सरकार आणू शकतात. त्यामुळे त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी एकेकाळी बंगालची वाघीण वाटणाऱ्या ममताजी त्यांच्यामागे भिकेची झोळी घेऊन फिरत आहेत, मुल्लांसमोर पदर डोक्यावर घेतात, मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना करतात, उर्दू ही राज्यभाषा करतात आणि ज्या मदरश्यांमधून खुलेआम जिहादी शिकवण दिली जाते, तेथे काम करणाऱ्या इमामांना मासिक वेतन देऊन पोसतात... हे सर्व बंगाली निमूटपणे पाहतो आणि सहन करतो. त्याच ममताजींच्या पावलावर पाऊल ठेवून स्थानिक आमदार दीपेन्दु बिस्वास जर हिंदू तरुणांना पोलीस कोठडीत टाकून पुढच्या निवडणुकीत मुस्लीम मते पक्की करत असेल, तर त्याला आता हिंदूंनी 'आम्ही तुला मत देणार नाही' असे सांगून काहीही उपयोग नाही. आसामच्या हिंदूंनी कमीतकमी घुसखोरांविरोधात मोठे आंदोलन करून इंदिराजींविरोधात बहुमताने सरकार स्थापन केले होते. नंतर आसाम गणसंग्राम परिषद एकाच निवडणुकीत धुळीस मिळाली. त्या वेळी भाजपाकडे त्यांनी ढुंकून पाहिले नव्हते. त्याचे कारण तीच हिंदुत्वाची अनास्था आणि हिंदूंना प्रतिगामी समजण्याची मनोवृत्ती होती. आता या वेळी सत्तापालट झाला आहे. त्याचे सुपरिणाम दिसायला वर्षे जाणार आहेत.

प्रतापभानू मेहता हे जुने-जाणते इंग्लिश माध्यमातील पत्रकार आणि सध्या अशोक विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू आहेत. त्यांनी बंगाली मनोवृत्तीच्या दुटप्पीपणाचे आणि संघटितपणे केलेले धार्मिक उन्मादाचे व ते स्वीकारणाऱ्या मनोवृत्तीचे विश्लेषण इंडियन एक्स्प्रेसच्या 8 जुलैच्या अंकात केले आहे. हे संघटित हिंसाचारी लोक जनमताचा कानोसा लक्षात घेऊन, सरसकट सत्तेकडे आपल्या निष्ठा फिरवतात असे मेहता लिहितात. आताही ते जेव्हा साम्यवादी पक्षाकडून तृणमूलकडे गेले, तेव्हा तृणमूल सत्तेवर आली, असे त्यांचे विश्लेषण आहे. प्रतापभानू स्वत: हे सांगायला विसरतात की या संघटितपणे हिंसाचार करणाऱ्यांमध्ये  मुस्लीम मुखंडांचे आणि गुंडांचे प्राबल्य आहे. त्यांच्याच वर्चस्वामुळे बंगालमध्ये घुसखोरांविरोधात जनमत संघटित होऊ शकले नाही. जोवर ममताजी निवडून येण्याची लक्षणे आहेत, तोवर ते संघटित हिंसाचारी त्यांच्या पाठीशी राहतील. ममताजींचा प्रभाव कमी झाला हे दिसू लागले की हेच संघटित हिंसाचारी भाजपच्या कळपात शिरायला उत्सुक असतील. आज प्रतापभानू मेहतांना जाणवते आहे की, बंगालमधील सुशिक्षितांना सेक्युलरपणाचा झेंडा मिरविताना, व्यक्तिस्वातंत्र्य आणि उदारमतवाद हा धर्मातीत असतो याबाबत ठाम भूमिका घेता येत नाही आहे. आजवर रा.स्व. संघाच्या शाखांना जेथे उभारी धरता आली नाही, तेथे त्या सीमावर्ती भागात आज संघाच्या शाखा भरताना दिसत आहेत. मुस्लिमांमध्ये सौदी अरेबियाच्या डॉलर्सनी पोसला गेलेला वहाबी अलगतावाद डोक्यावरून वाहू लागला, असे जाणवते आहे.

उद्याचा बंगाल

मुस्लीम वहाबी फुटीरतावादाला राजकीय पालनपोषण मिळून त्यातून इसिसची मनोभूमिका असणारे मुस्लीम तरुण आता इसिस रसातळाला जात असली, तरी स्वत:च्याच मनाशी ठरवून जागोजागी भयंकर उत्पात घडवू शकतात. त्यांना शेजारी बांगला देशातून निर्वेधपणे शस्त्रास्त्रांची मदत मिळू शकेल. अहिरावण-महिरावणांच्या रक्ताच्या थेंबांमधून दुसरे अहिरावण-महिरावण तयार होत असत, त्या गोष्टीचा इथे प्रत्यय येतो. एकूणच गैर मुस्लीम जगतासाठी हा मोठा धोका होऊन बसला आहे. जेथे मुस्लीम लोकसंख्या वाढू लागली, तेथे स्थानिक कायदे झुगारून आपल्याला वाटतील त्याप्रमाणे शरीयाचे कायदे अंमलात आणण्याची मागणी मूळ धरते. त्याच वेळी धर्माच्या नावे जबरदस्ती करून अलिखित स्वरूपात त्या त्या वस्त्यांमधून शरीया कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होतात. मुस्लिमांमध्ये फुटीरतावादाला थोडे जरी खतपाणी घातले, तरी तो झपाटयाने फोफावतो हा जागतिक अनुभव आहे. इसिसला मोठया संख्येने येऊन मिळणाऱ्यांमध्ये युरोपातील काफिरद्वेषाने (Kafirophobiaने) भारलेल्या तरुणांचा भरणा होता. ते समजायला युरोपातील मानवतावादी भोटांना जरा वेळ लागेल, असे म्हणावेसे वाटते. बंगालला रस्त्यावरील संघर्षाचे वावडे नाही. सिध्दार्थ शंकर राय - जे इंदिराजींच्या अगदी मर्जीतले होते, त्यांनी बंगालमध्ये माक्र्सवादी कार्यकर्त्यांच्या खुनांचे सत्र सुरू करण्यासाठी संघटित हिंसाचाराचे जे बीज रोवले, ते प्रथम काँग्रेसवरच उलटले आणि साम्यवादी सत्तेत आले. त्याला ज्योती बसूंसारखा सर्वांवर वचक असणारा नेता मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी सत्तेत राहिले, पण बंगालची प्रगती झाली नाही. ज्योती बसू जाईपर्यंत या संघटित हिंसाचारी जथ्यांचे इस्लामीकरण झाले होते. त्यांच्या समोर झुकून ममताजींनी सत्ता मिळविली. आता तेच त्यांचे देणे वसूल करून घेत आहेत. एका भाजपा नेत्याने आवाहन केले की, गोध्रासारखी स्थिती बंगालमध्ये निर्माण व्हावी. ते शक्य होईल असे वाटत नाही. बंगालच्या हिंसाचारी सामाजिक व्यवस्थेत त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.

त्यावर दोन बाजूंनी विचार करावा लागेल. एका बाजूने हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. त्यात हिंदूंनी स्वत:मध्ये वसत असलेला न्यूनगंड काढून, त्यांनी बंगालमध्ये स्वत:चे अस्तित्व प्रस्थापित करावे. आपल्या देशात हा मार्ग मतपेटयांच्या मार्गाने जातो. गेल्या तीन वर्षांतील, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपासून नंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये हिंदू मतांचे एकत्रीकरण होण्याची प्रवृत्ती दिसून आली.

हिंसेने प्रश्न सुटणार नाहीत, उलट ते चिघळतील. त्याऐवजी ज्या शिकवणीमुळे मुस्लीम समाजाचे भारलेपण वाढते, त्यांच्यात काफीरद्वेषाची (Kafirophobiaची) भावना तीव्र होते, त्या मुळाचा शोध घेऊन त्यावर पर्यायी उपाय निश्चित केला पाहिजे. बंगालच्या सीमाभागात मदरशांची संख्या भयानक वाढली आहे. त्यांना मिळणारा मुबलक पैसा सौदी अरेबियातून येतो. ती रसद येन केन तोडण्याचे प्रयत्न ठरवून झाले पाहिजेत. त्या मदरशांमधून निघणाऱ्या 'बद मिजाजी दीनी बंद्यांना' वेसण घालण्यासाठी त्वरित उपाय शोधले पाहिजेत. इस्लामी रॅडिकलायझेशनचे मूळ ज्या शिकवणीत आहे, ती शिकवण आजच्या जगात कशी अनुपयुक्त आहे, मानवतेसाठी धोकादायक आहे, तिच्यात बदल घडणे कसे आवश्यक आहे, याची अनेक माध्यमांमधून खुले आम चर्चा झाली पाहिजे. केवळ बंगालमध्ये, भारतातच नव्हे, तर सर्व जगात अशी चळवळ उभारावी. इ.स. 2047पर्यंत इस्लाम बदलण्याचे या चळवळीचे ध्येय निश्चित करण्यात यावे. काय हिंदू हे आव्हान पेलू शकतील?

9975559155