इतर पैलू

विवेक मराठी    19-Jul-2017
Total Views |

मधुमेहात हृदयरोग होतो म्हणजे हार्ट ऍटॅकचं प्रमाण वाढतं, रक्तवाहिन्या चोंदतात हे सत्य असलं, तरी मधुमेहाने होणारा त्रास केवळ यापुरता मर्यादित नाही. त्याचे इतर अनेक पैलू आहेत.

साधारणत: मधुमेह आणि रक्तदाब ही एकत्र नांदणारी जोडगोळी असते. वाढलेल्या रक्तदाबावर मात करून आपलं काम सुरळीत करताना हृदयाची दमछाक होते. हृदयाच्या श्रमात थोडा हातभार लागावा, हृदयाचे कष्ट कमी व्हावेत यासाठी हृदयाच्या स्नायूंमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न शरीर करतं. हृदयाच्या भिंती जाड होतात. पण इथे एक अडचण होते. जन्मजात जसं हृदय बनतं, तसं होत नाही. जन्मत: मिळालेल्या हृदयात स्नायूंखेरीज इतर घटक असतात. त्यात हृदयाला आकुंचन पाव असा संदेश देणारे, तो संदेश वाहून नेणारे मज्जातंतूदेखील असतात. हृदयाच्या भिंतीत रक्तदाबामुळे झालेल्या वाढीत स्नायू बनतात, परंतु त्या प्रमाणात हे मज्जातंतू बनत नाहीत. साहजिकच संदेशवहनात तितकीशी सुसूत्रता येत नाही. या गोष्टीचा प्रसंगी फार मोठा परिणाम होऊ शकतो.

स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणातली सुसूत्रता ही हृदय उत्तम रितीने काम करण्यातली सगळयात महत्त्वाची बाब असते. जशी एकसंध मूठ मजबुतीने प्रतिकार करायला उपयोगी पडते, तसाच हा प्रकार आहे. हृदयाचे वेगवेगळे भाग आपल्याच तारेत वेगवेगळया वेळी आणि वाट्टेल तसे काम करायला लागले, म्हणजे हृदय शरीराला आवश्यक तो रक्तपुरवठा करू शकत नाही. यालाच आपण 'हार्ट फेल्युअर' म्हणतो आणि वेडयावाकडया मार्गाने जाणाऱ्या संदेशांना 'ऍरिदमिया'.

बरं, हे नुसतं रक्तदाबामुळे होतं असंही नाही. मधुमेहात वाढलेलं ग्लुकोज मज्जातंतूच्या एकंदर कामात दखल देतंच. शेवटी हृदयाला आकुंचन पावण्याचा संदेश कुठेतरी पहिल्यांदा तयार होतच असेल की नाही? हृदयाच्या कर्णिकेमध्ये एका विशिष्ट ठिकाणी हा संदेश सर्वात प्रथम बनतो. वैद्यक याला 'पेस मेकर' म्हणतं. थोडक्यात, आकुंचनाला लागणारा विद्युत संदेश उत्पन्न होतो ती जागा. त्या जागी अर्थातच मज्जासंस्थेशी सदृश पेशी असतात. मधुमेहाने त्या पेशींवर परिणाम होतो. म्हणजे त्या नेमस्त काम करू शकत नाहीत. त्यांच्याकडून वेडेवाकडे संदेश बाहेर पडतात. हृदयाच्या आकुंचनाची सुसूत्रता संपते. त्यांचा ताल किंवा रिदम संपतो, ऍरिदमिया होतो. हार्ट फेल्युअरची शक्यता वाढते. व्यवस्थित सूचना आल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण हृदय एक इंद्रिय म्हणून आकुंचन पावतं आणि आपल्याकडे आलेलं रक्त पूर्ण ताकदीनिशी शरीरभर पोहोचवतं, तसं होत नाही. मिळमिळीत हृदय कुठली ताकद लावणार व रक्त कितीशा जोमाने पुढे ढकलणार!

मज्जातंतूंच्या बाबतीत मधुमेहात काही गोष्टी घडत असतात. मधुमेहाने मज्जासंस्थेला त्रास व्हायला सुरुवात झाली की आपण त्याला 'न्यूरोपॅथी' म्हणतो. मज्जासंस्थेचे वेगवेगळे घटक याला बळी पडतात. हृदय हा मेंदूच्या पूर्ण कह्यात नसलेला अवयव. म्हणजे त्याच्या कामासाठी त्याला मेंदूकडून संदेश यायला पाहिजेच असं नाही. स्नायूंसारख्या इतर इंद्रियांच्या बाबतीत प्रकार वेगळा असतो. त्यांना आपलं प्रत्येक काम, दरेक हालचाल करताना मेंदूच्या संदेशाची वाट पाहावी लागते. तिथून संदेश मिळाला तरच ती काही करू शकतात. हृदयाला त्या बाबतीत मोकळीक असते. दिवस असो की रात्र, माणूस जागा असो की निद्रिस्त, सतत धडधडत राहायचं हेच त्याचं काम असल्याने, हृदयाला मेंदूच्या मांडलिकत्वाचा विचार करणं योग्यही नसतं.

अर्थात त्यावर काहीतरी नियंत्रण लागणारच. हृदयाचं स्वैर वागणं निसर्गनियमाच्या विरुध्द आहेच. निसर्गाने त्यावर एक मस्त तोडगा काढला. अराजकही नको आणि काटेकोर नियंत्रणही नको असा मधला मार्ग निसर्गाने शोधला. एखादं विद्यापीठ स्वायत्त असावं, परंतु सरकारच्या थोडयाशा हस्तक्षेपाला त्याची हरकत नसावी, तसं काहीसं हे आहे. वैद्यक त्याला 'ऑॅटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम' म्हणतं. मूळ मज्जासंस्थेचाच हा भाग, पण बऱ्यापैकी स्वतंत्र, स्वायत्त. हृदयाचं आकुंचन-प्रसरण अशा ऑॅटोनॉमिक नर्व्हस सिस्टिमच्या आधिपत्याखाली असतं.

मधुमेहाला त्याचं काय? तो इतर अवयवांना जसा उपद्रव करतो, त्याचप्रमाणे या ऑॅटोनॉमिक नर्व्हस सिस्टिमलाही करतो. हृदयाच्या आकुंचन-प्रसरणात प्रश्न निर्माण व्हायला लागतात. साहजिकच मधुमेहामुळे असं काही घडलंय हे ओळखायचं कसं? हा विचार मनात येणारच. त्याचं उत्तर सोपं आहे. हृदय धडधडायचं थांबत नाही. पण जेव्हा तुम्ही-आम्ही आराम करत असतो, तेव्हा शरीराची रक्ताची गरज कमी झालेली असते. त्या वेळी अर्थातच हृदयाला कमी काम असतं. त्याचे ठोके अंमळ कमी झालेले असतात. कमी काम करणं हीच हृदयासाठी विश्रांती असते. गरजेनुसार हृदयाचे ठोके कमी-जास्त करण्याचं नियंत्रण ऑॅटोनॉमिक नर्व्हस सिस्टिमकडे असतं. मधुमेहाने यावर घाला घातला की हृदय त्याचे ठोके गरजेप्रमाणे कमीअधिक करण्याची क्षमता गमावून बसतं. मग तुम्ही आराम करत असा की धावत असा, हृदय एकाच वेगाने धडधडत राहतं. आपली नाडी त्याच वेगाने धावत राहते. डॉक्टर काय करतात - तुम्ही निवांत बसलेले असताना तुमची नाडी बघतात. ती मिनिटाला शंभरपेक्षा जास्त गतीनं दौडत असेल, तर हृदयाचे ठोके वाढवणारं इतर कुठलं कारण नाही याची खातरजमा करतात आणि ऑॅटोनॉमिक न्यूरोपॅथी झाल्याचा निष्कर्ष काढतात.

ठीक आहे, हृदय जरुरीप्रमाणे आपले ठोके जुळवून घेऊ शकत नसेल, पण त्याने काय बिघडतं? साधं आहे - हृदयाला जराही विश्रांती मिळाली नाही, तर हृदय लवकर थकणार नाही का!

मधुमेहातली हृदयाची परवड इथेच संपत नाही. हृदयाला वेदनेचे मज्जातंतू असतात. हृदयरोग झाल्यावर छातीत जोरात येणारी कळ या वेदनेच्या मज्जातंतूमुळे जाणवते. मधुमेहात हे मज्जातंतू बिघडतात. सुन्न पडतात. म्हणजे प्रत्यक्ष हृदयरोग झाला, हार्ट ऍटॅक आला तरी वेदना होणार नाही. सायलेंट हार्ट ऍटॅक यालाच म्हणतात. काहीतरी बिघडलंय, हृदयाला कसला तरी धोका आहे ही सूचना देणारी वेदना बंद असताना पेशंट निर्धास्त राहणार. योग्य वेळेत हॉस्पिटल गाठून स्वत:वर उपचार करून घेणार नाही. म्हणजे जीव जाण्याचा धोका कितीतरी वाढला.  रात्री एखादी व्यक्ती झोपली आणि सकाळी उठलीच नाही, तर तिला सायलेंट हार्ट ऍटॅक झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह अनियंत्रित राहिला, तर पंधरा-वीस वर्षांनी असं होण्याची भीती अधिक असते.

मधुमेहात हृदयाच्या स्नायूंना थेट इजाही होते. ते कमकुवत होतात. त्यात जर दारू पिण्याची सवय किंवा अनियंत्रित रक्तदाब असेल, तर त्याचा मार अधिक पडतो. कमजोर स्नायू आपलं नेमून दिलेलं आकुंचन-प्रसरणाचं काम नीट बजावू शकत नाहीत. वैद्यक ज्याला 'कार्डियोमायोपॅथी' म्हणतं, ती व्याधी सुरू होते.

पाहा, मधुमेहात किती वेगवेगळे प्रश्न आहेत. हार्ट ऍटॅक आलेला कळतही नाही. म्हणून मधुमेही माणसांना काही सूचना कराव्याशा वाटतात. प्रथम मधुमेह झालेला कळल्यावर हृदयरोगाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला काहीच होणार नाही अशा वल्गनेत राहून चालणार नाही. मधुमेह निर्दयी आजार आहे. त्याची परिणती अचानक आलेल्या हार्ट ऍटॅकमध्ये होणार नाही, याची काळजी घेणं कुणालाही शक्य आहे. त्यासाठी मधुमेह झाल्या झाल्या कार्डियोग्रॅम काढून घ्यायला हवा. म्हणजे देव न करो, पण भविष्यात काही प्रश्न झालाच तर तुलना करायला सोपं पडतं. तुमच्या कार्डियोग्रॅममध्ये झालेला बारीकसा बदलदेखील डॉक्टरांच्या नजरेतून सुटत नाही. हल्ली बहुतेक कार्डियोग्रॅम मशीन्स थर्मल कागद वापरतात. या कागदावर आलेली शाई कालांतराने पुसट होते. आलेख दिसेनासा होतो. म्हणून त्याची झेरॉक्स प्रत काढून ठेवणं आवश्यक आहे.

तितकीच चांगली गोष्ट म्हणजे टू-डी इको किंवा हृदयाची सोनोग्राफी काढून ठेवणं. यात हृदयाच्या भिंतींमध्ये झालेले बदल, हृदय किती प्रमाणात काम करतंय, आलेल्या रक्ताच्या किती टक्के रक्त शरीराकडे पुढे ढकलतंय (याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतात, हा पन्नास टक्क्याच्या वर हवा), हृदयाच्या झडपा खराब झाल्यात किंवा कसं, अशी खूप माहिती मिळते.

शिवाय तुम्ही तुमची नाडी मोजण्याचं तंत्र शिकून घ्या. तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला ते सहज शिकवतील. सकाळी उठल्या उठल्या तुमची नाडी फार जलद चालत असल्यास त्वरित ती गोष्ट डॉक्टरांच्या नजरेला आणून द्या. व्यायाम करायला सुरुवात करण्यापूर्वी, करताना आणि करून झाल्यावर नाडी पाहा. व्यायाम सुरू करण्यापूर्वीचे हृदयाचे ठोके 100-125 वगैरे असतील, तर व्यायाम करणं टाळा आणि व्यायाम संपल्यावर किती वेळात ते ठोके पूर्ववत होतात याचीही नोंद घ्या. जेव्हा ठोके पूर्ववत व्हायला नेहेमीपेक्षा जास्त वेळ लागतो, तेव्हा हृदय तुम्हाला काहीतरी पूर्वसूचना देत असतं. त्या सूचना दुर्लक्षू नका. आणि मुख्य म्हणजे जरा जरी संशय आला तरी त्याची शहानिशा करा. बरेच जण एक चूक करतात. छातीत अस्वस्थपणा जाणवायला लागला की त्याला गॅस म्हणून सोडून देतात. मुळात ती हृदयरोगाची पूर्वसूचना असते. गॅस किंवा ऍसिडिटी जेवणानंतर काही वेळात होईल. रात्री जेवला आणि सकाळी अपचन झालं असं सहसा होत नाही.

शेवटची गोष्ट, ज्या पुरुषांना लिंग ताठरता येण्यात अडचण आहे, त्यांनी आपलं हृदय नक्कीच तपासून घ्यायला हवं. हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळे आल्याचं ते सर्वात पहिलं लक्षण असू शकतं. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियमित तपासून त्याची औषधं सांगितल्याप्रमाणे सुरू ठेवा. ऍस्पिरिनसारखं अत्यंत स्वस्त व उपयुक्त औषध कारणाशिवाय बंद करू नका.

'मधुमेह होणं म्हणजेच हृदयरोग झाल्यासारखं आहे' हे वाक्य मनावर कोरून ठेवा.   & 9892245272