घराण्याची गुलामगिरी आणि विचारसरणीचा प्रभाव

विवेक मराठी    22-Jul-2017
Total Views |

 

राष्ट्रपतिपदावर रामनाथ कोविंद यांची निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांतून व सोशल मीडियातून संघाचे स्वयंसेवक दोन सर्वोच्च घटनात्मक पदांवर निवडून आल्यासंबंधात चर्चा सुरू आहे. काही दिवसातच व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतील, तेव्हा पुन्हा एकदा या चर्चेला उकळी फुटेल. वास्तविक पाहता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्यांना लोकांचा पाठिंबा असतो, ते राज्यकर्ते बनतात ही स्वाभाविक गोष्ट आहे. केंद्रात व अनेक राज्यांत भारतीय जनता पक्षाचे जनप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. इतर राजकीय पक्षांना रा.स्व. संघाची विचारधारा अस्पृश्य वाटते, तशी भाजपाला वाटत नाही. त्यामुळे तत्त्वत: संघाचा स्वयंसेवक कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ  शकत असला, तरी आपल्या विचारधारेशी व कार्यप्रणालीशी सुसंगत असा त्याला भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष वाटतो. त्यामुळे रा.स्व. संघ व भारतीय जनता पक्ष यांचे एक नाते निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मुखवटयाखाली संघ काम करतो असे वातावरण निर्माण करण्याची सवय प्रसारमाध्यमे व स्वयंघोषित विचारवंत यांच्यात निर्माण झाली आहे. कम्युनिस्ट चळवळीला असे आपले हस्तक निर्माण करण्याची सवय पडलेली आहे. कम्युनिस्ट कार्यपध्दतीत व्यक्ती ही विचारसरणीचा गुलाम म्हणून काम करते. तिला स्वतंत्र वैचारिक अस्तित्व नसते. त्यामुळेच या विचारसरणीला एका विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक प्रभाव निर्माण करता आला नाही. रशिया आणि चीन या दोन्ही महासत्ता एकेकाळी कम्युनिस्ट होत्या व पूर्व युरोपीय देशांमध्येही कम्युनिस्टांची सत्ता होती; परंतु आज जगात कम्युनिझमचा वारसा सांगणारे अपवादात्मक देश राहिले आहेत. परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्याच कार्यपध्दतीप्रमाणे विचार करण्याची सवय कम्युनिस्ट व अर्धकम्युनिस्ट विचारवंतांनी भारतातील प्रसारमाध्यमांना लावली. त्यातून अजूनही त्यांची मुक्तता झालेली नाही.

लोकशाही प्रक्रियेत समाजात ज्या विविध सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहांचा प्रभाव पडत असतो, त्याचा परिणाम राजकीय परिवर्तनात होत असतो. त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदांवर संघाचे स्वयंसेवक आले असतील, तर ज्या संघटनेवर म. गांधींच्या हत्येचा आरोप केला गेला, ज्या विचारधारेला सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रातून हद्दपार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला, ती विचारधारा लोकांना स्वीकारार्ह कशी बनली? यावर खरे तर विचारमंथन व्हायला हवे. स्वातंत्र्योत्तर काळात संघाच्या चळवळीने एक पर्यायी विचारधारा निर्माण केली व विद्यमान घटनात्मक चौकटीचे सर्व निकष पाळत त्या विचारधारेचा वारसा मानणारा पक्ष एकामागून एक राजकीय विजय मिळवीत आहे, या प्रक्रियेचे खरे तर तटस्थ विश्लेषण व्हायला हवे. पण ते न करता जणू काही संघ समाजाची सर्व क्षेत्रे ताब्यात घेत चालला आहे, असे जाणीवपूर्वक वातावरण उत्पन्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो शिळया कढीला नवा ऊत आणण्याचा प्रकार आहे. अगदी ग्रामपंचायतीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढविण्याचे आवाहन पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. जर लोकांनी भाजपाला पाठिंबा दिला, तरच ते शक्य होणार आहे. एक पक्ष म्हणून आपला प्रभाव वाढविण्याचे अध्यक्षांनी आवाहन करणे स्वाभाविकच आहे. पण यावर पक्षाची एकाधिकारशाही निर्माण केल्याचा आरोप करणे निरर्थक असते. कारण लोकशाही प्रक्रियेत अशी एकाधिकारशाही निर्माण होऊ द्यायची की नाही, हे लोकांनी ठरवायचे असते. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा स्वातंत्र्य मिळविण्यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका असल्याने सर्व घटनात्मक राजकीय पदांवर काँग्रेसजनच निवडून येत व त्याचा निर्णय प्रारंभी नेहरू व पटेल घेत व नंतर फक्त नेहरू घेत. त्या वेळी ती जशी स्वाभाविक गोष्ट होती, तशीच ही स्वाभाविक गोष्ट आहे.

ही गोष्ट स्वाभाविक न वाटण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष व कम्युनिस्ट पक्ष वगळता इतर सर्व पक्ष हे कोणत्या ना कोणत्या घराण्याचे गुलाम बनलेले आहेत. एका घराण्याची गुलामगिरी करत काहीही करून सत्तेवर राहण्याचा प्रयत्न करणे यापलीकडे काँग्रेसपाशी कोणते धोरण उरले आहे? दलित व अल्पसंख्याक यांचे आपण रक्षणकर्ते आहोत असा काँग्रेसचा आव असतो. पण हिंदुत्वाला विरोध यापलीकडे काँग्रेसने या घटकांच्या प्रश्नावर कोणते विचारमंथन घडविले आहे व परिवर्तनाचा सकारात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे? तामिळनाडूमधील सामाजिक समतेच्या व द्रविड अस्मितेच्या चळवळीचे घराणेशाहीच्या लढाईत रूपांतर झाले आहे. लोहियांच्या चळवळीतून लालू व मुलायमसिंग यादव यांचे राजकीय नेतृत्व उभे राहिले. आज त्यांच्या पक्षात लोहियांचे नाव माहीत असलेल्या कार्यकर्त्यांना शोधूनच काढावे लागेल. काशीराम यांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे बहुजन समाज चळवळ उभी केली. त्याचा वारसा मायावतींना मिळाला. पण बाबासाहेबांचे पुतळे उभे करणे आणि मायावतींचे व्यक्तिमाहात्म्य वाढविणे यापलीकडे बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी बहुजन समाज पक्षाने काय केले? या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष एका व्यक्तीवर किंवा घराण्यावर अवलंबून न राहता आपल्या विचारसरणीवर अवलंबून राहिला व ही कार्यसंस्कृती त्या पक्षाला संघाकडून मिळाली. त्यामुळे जोवर भाजपाला मिळालेला लोकांचा पाठिंबा कायम राहील, तोवर ज्या कार्यसंस्कृतीतून भाजपा वाढला आहे, त्या संस्कृतीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व राहणे स्वाभाविकच आहे. आजवरच्या नियुक्त्या एका घराण्याच्या मर्जीवरून होत, तेव्हा ज्यांना त्याची चर्चा करावीशी वाटली नाही, तेच लोक आता ही चर्चा उत्साहाने करीत आहेत. सल्ले देण्याचा एवढाच उत्साह असेल, तर संघाच्या नावे बोटे मोडण्यापेक्षा घराणेशाहीच्या रोगाने जे पक्ष जर्जर झाले आहेत, त्यांना सल्ला देणे अधिक उपयोगी ठरेल.