निंबाळकरांच्या रूपाने जळगावात स्वच्छतादूत

विवेक मराठी    26-Jul-2017
Total Views |


जिल्हाधिकारी निंबाळकरांनी आयुक्ताच्या प्रभारी कार्यभाराच्या काळात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे जळगावातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. महापालिका स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या कारभारातील भोंगळपणा उपसला होता. त्याचे परिणाम म्हणजे अनेक दिग्गजांना जेलच्या वाऱ्या कराव्या लागल्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेतूनही नक्कीच काहीतरी निघू शकेल. एकूण जळगावातील या मोहिमेमुळे जिल्हाधिकारी निंबाळकर जळगावकरांसाठी स्वच्छतादूत ठरत आहेत, हे मात्र नक्की.

प्रशासकीय यंत्रणेला आपल्या आवतीभोवती लोटांगण घालायला लावून त्यांना हतबल करणाऱ्या राजकीय संस्कृतीला वळण लावण्याचा प्रयत्न जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. 'जगातील सगळयात मोठी मुतारी' अशी ओळख बनलेले गोलाणी मार्केट चार दिवस बंद ठेवून त्यांनी मार्केट चकाचक करून टाकले. सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या महापालिका आयुक्तांना जे जमले नाही, ते आपल्या प्रभारीपदाच्या काळात जिल्हाधिकारी निंबाळकरांनी करून दाखविल्याने जळगावात त्यांच्याविषयी आता आदरयुक्त भीती निर्माण होऊ लागली आहे.

महापालिकेच्या कर्जाचा बोजाचे व्याज देण्याची व्यवस्था कशी करायची, विविध कामांचे ठेके कोणाकडे जातील ह्याची देखरेख ठेवायची, ही सत्ताधाऱ्यांना सांभाळणारी कामे करणारी व्यक्ती म्हणजे महापालिकेचे आयुक्त अशी जळगावातल्या आयुक्ताची ओळख होऊन गेली आहे. त्यामुळे जळगावात जो कोणी आयुक्त येतो, तो या तंत्रात गुरफटून जातो असे झाले आहे. त्यातूनच जळगावात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. मग वाहतुकीची कोंडी असो अगर अस्वच्छता, सर्वत्र साचलेपणा निर्माण झाला आहे. ही कोंडी फोडण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविल्याने येणाऱ्या आयुक्तांला तीच कार्यसंस्कृती पुढे नेण्यास सोपे जाणार आहे.

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर सध्या महापालिकेचे प्रभारी आयुक्त आहेत. गोलाणी मार्केट जसे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, तसे तेथे रहिवासी घरेदेखील आहेत. मार्केटच्या तळमजल्यात भाजीपाल्याचे ओटे आहेत. या मार्केटमध्ये बहुतांश मोबाइल विक्रीची दुकाने असल्याने दिवसभर वर्दळ असते. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे आहेत. परंतु सगळीकडे अस्वच्छता माजली आहे, स्वच्छतागृहे तुंबल्याने दुर्गंधी पसरलेली असते, असे अनेक वर्षांपासूनचे चित्र आहे. जळगावात सहा महिन्यांचे मानाचे महापौरपद व उपमहापौरपद असते. ते कामासाठी असते असे अद्याप ठरलेले नसल्याने महापौर जनतेसाठी स्वच्छता मोहीम राबवतील अशी अपेक्षा जनता कधी करीत नाही. त्यामुळेच गोलाणी मार्केटमधील रहिवाशांनी सरळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच समस्येचे गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकाऱ्यांकडे अनायसे महापालिकेचे प्रभारी आयुक्तपद असल्याने त्यांनी गोलाणीसह जळगावच्या स्वच्छतेची मोहीम छेडली आहे.

गोलाणी चार दिवस बंद

गोलाणी मार्केट अस्वच्छतेचा प्रश्न इतका गंभीर बनला होता की मार्केट स्वच्छ करण्यासाठी ते चार दिवस बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. नुसता आदेश काढून ते थांबले नाहीत, तर स्वच्छता मोहिमेच्या काळात ते स्वत: उपस्थित राहिले. दोन दिवसांत तब्बल 150 टन कचरा काढण्यात आला. या वेळी त्यांनी कोणत्याही वस्तू दुकानासमोर न ठेवण्याची सूचना गाळेधारकांना केली.

शहर स्वच्छ ठेवण्याचे ठेके घेऊनही काम न करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांनी येत्या काळात मोबदला घ्याल तर काम करावेच लागेल असा इशारा दिला आहे.

जळगावातील सफाईचे ठेके घेण्यामागे मोठे अर्थकारण दडलेले असते. बहुतांश ठेके नगरसेवकांनी अगर त्यांच्या संबंधितांनी घेतलेले असतात. त्यामुळे सफाई न करताच बिले काढली जातात. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शहरात दौरे सुरू केले. तरीही सफाईकडे ठेकेदारांसह अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. निर्ढावलेल्या या यंत्रणेसाठी मग त्यांनी कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर मात्र सगळीकडे हालचाल सुरू झाली.

स्वत: दुकानदारही अस्वच्छतेला जबाबदार

स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर जळगावात अस्वच्छता किती माजली आहे व तिकडे लक्ष दिले पाहिजे हे सामान्यांच्याही लक्षात आले. कारण, ज्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत, ते स्वत:च आपल्या दुकानातील कचरा आवतीभोवती टाकतात. उदाहरण गोलाणीचे घ्या, येथील दुकानदार मालाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, प्लास्टिक कागद आवारातच टाकून देतात. ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी आपली आहे असे दुकानदारांना वाटतच नाही. मागच्या सहा महिन्यांपासून दुकानांच्या समोर कचरा टाकण्यासाठी मोठमोठया बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. या बादल्यांमध्ये कचरा कसा टाकावा, याचेदेखील भान दुकानदारांना नव्हते. बादल्या रिकाम्या व कचरा आवतीभोवती, असे दृश्य होते.

अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाइ©

निंबाळकरांनी मनपा अधिकाऱ्यांसह याच मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या एका सभागृहाची पाहणी केली, त्या वेळी सभागृहाचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात असल्याचे आढळले. येथून तब्बल 12 ट्रॅक्टर ट्रॉल्या कचरा काढण्यात आला.

स्वच्छता मोहीम राबविताना जनतेचे काही कर्तव्य असते याची जाणीवही त्यांनी या काळात लोकांना करून दिली. रविवारी सकाळी 7 वाजताच त्यांनी शहरात दौरा काढला. भूषण कॉलनी व गुरुकुल सोसायटीजवळच्या दुकानांसमोर अस्वच्छता आढळून आल्याने तेथील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.

गाळा बळकावलेल्यांचे गौडबंगाल बाहेर येणार?

जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्केटमध्ये आता गाळेनिहाय तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या गाळा बळकावलेले कोण? याचा उलगडा होणार आहे. त्यानंतर हे गाळे ताब्यात घेण्यात यावेत असा आदेश त्यांनी  दिलेला आहे.

शहरातील विविध व्यापारी संकुलांतील सुमारे 2175 गाळे रिकामे करून, रेडी रेकनरच्या दराने त्यांचा पुन्हा लिलाव करून गाळे भाडयाने देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर या गाळेधारकांचे धाबे दणाणलेच आहे, त्यात आता या बेकायदा गाळे बळकावलेल्यांचा समावेश झाल्याने जळगावात स्वच्छतेसह आर्थिक शिस्तीचेही दिवस आल्याचे जाणवू लागले आहे.

जिल्हाधिकारी निंबाळकरांनी आयुक्ताच्या प्रभारी कार्यभाराच्या काळात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे जळगावातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. महापालिका स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या कारभारातील भोंगळपणा उपसला होता. त्याचे परिणाम म्हणजे अनेक दिग्गजांना जेलच्या वाऱ्या कराव्या लागल्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेतूनही नक्कीच काहीतरी निघू शकेल. एकूण जळगावातील या मोहिमेमुळे जिल्हाधिकारी निंबाळकर जळगावकरांसाठी स्वच्छतादूत ठरत आहेत, हे मात्र नक्की.

8805221372