किशोर मासिकाच्या निमित्ताने

विवेक मराठी    26-Jul-2017
Total Views |

चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, वॉल्ट डिस्नेचे 'विचित्र वाडी', चाचा चौधरी ही सगळी चित्रमय मासिके कॉमिक्स कालबाह्य झाली, हा एक भ्रम आपण करून घेतला आहे. आजही दर्जेदार चित्रांचे पुस्तक मुलांसमोर ठेवा, मुले गुंगून जातात की नाही ते बघा. अजूनही माधुरी पुरंदरे यांचे व्हॅन गॉगचे चरित्र तुमच्या 14 वर्षांच्या, चित्रात गोडी असणाऱ्या मुलाच्या हातात पडू द्या. बघा, तो रात्रभर जागून वाचतो की नाही! परिकथाच काय, जी.एं.नी अनुवादित केलेली 'शेव्हिंग ऑॅफ शॅगपट' ही कादंबरी द्या मुलीच्या हातात. बघा ती दोन दिवस त्यात पागल होते की नाही. राम पटवर्धनांनी मार्जोरी रोलिंग्जचा केलेला अनुवाद - 'पाडस' - कसा दीर्घ प्रभाव टाकतो मुलांवर, ते त्यांच्या हाती देऊन अनुभवा.


शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. मुलांना पाठयेतर वाचायला काय द्यावे? हा प्रश्न काही पालक आवर्जून विचारतात. ल.म.कडू यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि कुमारांसाठीच्या वाङ्मयाची चर्चा सुरू झाली. लहान मुलांचे साहित्य आणि त्यातही विशेषत: कुमारवयीन मुलांचे साहित्य मराठीत फारसे नाही, म्हणून टीका करत असताना जे उपलब्ध आहे त्याचे काय? यावर आपण बोलतच नाही.

उदा. बालभारतीच्या वतीने गेली 46 वर्षे 'किशोर' मासिक चालू आहे. गेली दोन वर्षे औरंगाबादला आम्ही हे मासिक उपलब्ध करून देतो आहोत. एका मोठया लेखकाला जेव्हा याबाबत सांगितले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती, ''म्हणजे अजून किशोर चालू आहे? मला वाटले बंद पडले.'' आणखी एका चांगल्या लेखकाची बऱ्यापैकी वाचकाची प्रतिक्रिया तर मोठी विचित्र - ''त्यात काय वाचण्यासारखं? आजकाल दर्जा नाही राहिला त्यांचा.'' आम्ही त्याला खोदून खोदून विचारलं की तुम्ही अशातले किती अंक वाचले आहेत? मग त्याने कबूल केले की अशात त्याने किशोर बघितलेही नाही. वाचायचा तर प्रश्नच नाही.

ज्या किशोर मासिकाचा वर उल्लेख केला, त्याची किंमत केवळ 7 रुपये आहे. 52 पानांचा ए-4 आकाराचा संपूर्ण रंगीत मजकूर केवळ 7 रुपयांत उपलब्ध आहे. दर महिन्याला प्रकाशित होतो आहे. मग आपण त्याला किती प्रतिसाद देतो? शासकीय पातळीवर याची जी काही वितरणाची व्यवस्था आहे, त्याच्या पलीकडे एक सामान्य वाचक म्हणून आपण काय करतो?

जर मोठया प्रमाणावर या मासिकाचे वाचक वाढले, त्यांच्या प्रतिक्रिया नियमित जायला लागल्या, तर याचा दबाव संपादकांवर वाढेल. मग स्वाभाविकच मजकुराच्या बाबतीत एक जागरूकता निर्माण होईल. लहान वाचकांच्या प्रतिक्रिया या मासिकात नियमित अगदी फोटोसह प्रसिध्द होतात. मग आपण आपल्या घरातील मुलांना हे मासिक वाचायला लावून त्यावरच्या प्रतिक्रिया पाठवायला प्रोत्साहित करतो का?

'किशोर' मासिकच नाही, तर बालभारतीच्या वतीने पाठयेतर वाचनासाठी इतरही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाजी महाराजांवरचा अतिशय चांगला 'स्मृतिग्रंथ' बालभारतीने प्रकाशित केलाय. तो तर केवळ कुमार वाचकांसाठीच नाही, तर सर्वांसाठीच उपयुक्त आहे. विशेषत: जेव्हा शिवचरित्राबद्दल नको ते वाद उपस्थित केले जातात, अशा वेळी महाराजांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम बालभारती करते आणि आपण त्याची योग्य ती दखलही घेत नाही, याला काय म्हणायचे? डॉ. आ.ह. साळुंखे, न्या. महादेव गोविंद रानडे, कृष्ण अर्जुन केळुस्कर, सर जदुनाथ सरकार, शेजवलकर, बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. अ.रा. कुलकर्णी, नरहर कुरुंदकर आदी मान्यवरांचे लेख या ग्रंथात आहेत.

इतरही काही अतिशय चांगली पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.

केवळ बालभारतीच नव्हे, तर इतरही प्रकाशकांनी कुमारवयीन मुलांसाठी अतिशय चांगली पुस्तके प्रकाशित केली आहेत. मग ही उपलब्ध पुस्तके आपण मुलांपर्यंत का नाही पोहोचवत?

ज्योत्स्ना प्रकाशनाने सातत्याने लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. माधुरी पुरंदरे यांनी तर एखादे व्रत घ्यावे, वसा घ्यावा तसा लहान मुलांसाठीच्या लेखनाचा प्रपंच मांडला आहे. त्यांना यापूर्वी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

त्यांनी संपादित केलेली 'वाचू आनंदे' या नावाने चार पुस्तके अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकांमध्ये चित्रांचाही समावेश होता. त्यांना आम्ही एकदा विचारले की ''हे इतके महत्त्वाचे काम आहे, तर मग ही सगळी चित्रे त्यांच्या मूळ रूपात - म्हणजे बहुरंगी का नाही छापली गेली?'' त्यांनी अडचणींचा जो पाढा वाचला, त्याने आम्हाला धक्काच बसला. मराठीत मुलांच्या वाचनासाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प प्रकाशित होतो आणि आपण त्यासाठी किमान निधी उभा करू शकत नाहीत? आठवीपर्यंतच्या मुलांना अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत वाटली जातात. ज्या पालकांची खरेदी करायची क्षमता आहे, त्यालाही ही पुस्तके गरज नसताना फुकट मिळतात. मग अशा वेळी या पालकांनीही आपले हे वाचलेले पैसे मोठया मनाने 'वाचू आनंदे'सारख्या प्रकल्पांवर खर्च करून याला हातभार का लावू नये?

नवनीत प्रकाशनाने कुमारांपेक्षा लहान गटासाठी गोष्टींची पुस्तके बहुरंगी स्वरूपात अतिशय देखणी अशी प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पाठयपुस्तकांच्या विक्रीसारखी यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी वेगळे विक्री प्रतिनिधी नेमले आहेत. मग हे सगळे इतर प्रकाशकांनी का करू नये? आणि या पुस्तकांना पालकांनी का प्रतिसाद देऊ नये?

मराठीत विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, बाबा भांड, डॉ. अनिल अवचट, अलीकडच्या काळातले उदाहरण म्हणजे कवी दासू वैद्य, कविता महाजन, रेणू पाचपोर यांसारख्या प्रौढ लिखाण करणाऱ्या साहित्यिकांनी आवर्जून लहान मुलांसाठी लिहिले आहे.

भा.रा. भागवतांसारख्यांनी तर कुमारवयीन मुलांसाठी जे आणि जेवढे लिहून ठेवले, ते अजूनही कुणाला जमलेले नाही. त्यांचा फास्टर फेणे आजही त्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवतो. दिलीप प्रभावळकरांनी नेटाने 'बोक्या सातबंडे'ची दहा पुस्तके लिहिली. वीणा गवाणकरांचे 'एक होता कार्व्हर' संस्कारक्षम कुमारवयीन मुलांना आजही भावून जाते. ल.म. कडू, राजीव तांबे, राजा मंगळवेढेकर अशासारख्यांनी नेटाने मुलांसाठी लिहिले.

आता छपाईचे तंत्र सोपे झाले आहे. बहुरंगी छपाई उत्तम दर्जाची करता येते. इंद्रजित भालेराव यांचे 'गावाकडं' हे बालकवितांचे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. प्रसिध्द चित्रकार चंद्रमोहन यांच्या चित्रांनी हे पुस्तक सजले आहे.

नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके मजकुरापेक्षाही त्यांच्या चित्रांमुळे फार महत्त्वाची आहेत. मुलांमध्ये चित्रांचा संस्कार घडवण्यासाठी ही पुस्तके उत्तम आहेत. ही प्रकाशन संस्था शासकीयच आहे.

डॉ. जयंत नारळीकरांसारख्या मोठया विज्ञान लेखकाने कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लिहिले आहे. साहित्य अकादमी या आणखी एका शासकीय प्रकाशन संस्थेने नारळीकरांचे बालसाहित्य प्रकाशित केले आहे. तेही आपण अजून नीटपणे मुलांपर्यंत पोहोचवू शकलेलो नाही.

चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, वॉल्ट डिस्नेचे 'विचित्र वाडी', चाचा चौधरी ही सगळी चित्रमय मासिके कॉमिक्स कालबाह्य झाली, हा एक भ्रम आपण करून घेतला आहे. आजही दर्जेदार चित्रांचे पुस्तक मुलांसमोर ठेवा, मुले गुंगून जातात की नाही ते बघा. अजूनही माधुरी पुरंदरे यांचे व्हॅन गॉगचे चरित्र तुमच्या 14 वर्षांच्या, चित्रात गोडी असणाऱ्या मुलाच्या हातात पडू द्या. बघा, तो रात्रभर जागून वाचतो की नाही! परिकथाच काय, जी.एं.नी अनुवादित केलेली 'शेव्हिंग ऑॅफ शॅगपट' ही कादंबरी द्या मुलीच्या हातात. बघा ती दोन दिवस त्यात पागल होते की नाही. राम पटवर्धनांनी मार्जोरी रोलिंग्जचा केलेला अनुवाद - 'पाडस' - कसा दीर्घ प्रभाव टाकतो मुलांवर, ते त्यांच्या हाता देऊन अनुभवा. कुमारवयीन मुलांच्या हातात प्रकाश नारायण संतांची 'लंपन' मालिकेतील चारही पुस्तके ठेवून बघा ती 'मॅड' होतात की नाही. इतकं कशाला, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या 'डोह'मधील मुलगा-बाप संबंधातील हळवे अनुबंध कुठल्याही कुमारवयीन मुलाला भारून टाकतात.   

कुमारवयीन मुलांसाठी नवीन पुस्तके यायला हवी, यात काही वादच नाही. पण आधी जी पुस्तके आहेत, ती तरी सर्वत्र पोहोचायला हवीत आणि मुलांसाठी आग्रहाने ही पुस्तके का पोहोचवायची, तर हीच मुले भविष्यातले चांगले वाचक आहेत. आत्ता जे प्रौढ आहेत, त्यांना वाचनाबद्दल कितीही सांगितले तरी फार परिणाम होईल ही शक्यता नाही.                       

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

9422878575