मध्यपूर्व रक्तरंजित का?

विवेक मराठी    26-Jul-2017
Total Views |


सध्या रोजच्या वर्तमानपत्रात, प्रसारमाध्यमांत मध्यपूर्वेतील अरब देशांत जे संघर्ष चालू आहेत, त्याच्या बातम्या वारंवार ऐकायला/वाचायला मिळतात. पाहायला गेले तर हे सर्व अरब देश इस्लामी आहेत, इस्लाम धर्म मानणारे आहेत. इस्लाम हा विस्तारवादी धर्म आहे. इस्लाममध्ये धर्म आणि राज्य यांची फारकत करता येत नाही. इस्लाम धर्म कुराणाच्या आज्ञेप्रमाणे चालणारा धर्म. एक ईश्वर, एक प्रेषित, एक ग्रंथ, असा सेमेटिक धर्म असूनदेखील आपआपसात संघर्ष का? कुराणाच्या आज्ञेप्रमाणे धर्मबांधवांना मारू नये, मग आपआपसात या कत्तली का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सा. विवेक प्रकाशित रमेश पतंगे लिखित 'रक्तरंजित मध्यपूर्व' या पुस्तकात ऐतिहासिक संदर्भासहित वाचकांना वाचायला मिळतील. हे लेख म्हणजे पुस्तकातील प्रकरण नसून पुस्तकाची माहिती करून देणारे स्वतंत्र लेख आहेत. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.

"सध्या कोणत्या विषयावरच्या लेखनाचे काम चालू आहे?' असा प्रश्न मला ओळखणारे कोणी भेटले की हमखास विचारतात. त्यांना मी सांगतो की, सध्या मध्यपूर्वेतील अरब देशांत ज्या लढाया आणि रक्तपात चालू आहे, हा विषय मी पुस्तकासाठी घेतलेला आहे. विषय सांगून  ऐकणाऱ्याला योग्य तो अर्थबोध होतोच असे नाही. म्हणजे पुस्तकात मी लढायांची वर्णने, कत्तलींची वर्णने, दहशतवादी संघटनांच्या कारवाइची वर्णने, वगैरे लिहिणार आहे का? असेही काही जणांना वाटू शकते. इराक, सीरिया, लेबेनॉन, लिबिया या देशांत अंतर्गत बंडाळी चालू आहे. म्हणून या बंडाळींचे वर्णन या पुस्तकात येणार आहे का? असाही काही जणांचा समज होऊ शकतो. म्हणून प्रारंभीच सांगून टाकले पाहिजे की, हे पुस्तक लढायांच्या वर्णनाचे नाही किंवा बंडाळीच्या भीषणतेची कहाणी सांगणारे नाही.

आपल्याला मध्यपूर्वेतील देशांची अत्यंत जुजबी माहिती असते. भारतातून फार मोठया संख्येने कामधंद्यासाठी आखाती देशांत अनेक लोक जातात. दुबई, अबुधाबी या ठिकाणी लाखो भारतीय आहेत. यामुळे अरब देश म्हटले की या देशांची नावे आपल्या पुढे येतात. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या प्रदेशात तशी शांतता आहे. तिथे रक्ताचे पाट वाहताना दिसत नाहीत. इराक, इराण, सीरिया, जॉर्डन, लिबिया, पॅलेस्टाइन आदी देश नकाशात नेमके कुठे आहेत, आणि त्यांच्या सीमा कशा आहेत, याची माहिती आपल्याला फारशी नसते. भारतावर जी मुस्लीम आक्रमणे झाली, ती या सर्व प्रदेशांतून झाली. अरब, तुर्क, इराणी, अफगाणी, मोगल यांच्या टोळयांमधून टोळया भारतावर आक्रमण करीत राहिल्या. आज हा सर्व प्रदेश अशांततेच्या आगीत भाजून निघत आहे. तिथे घडणाऱ्या घटनांचे लगेचचेच परिणाम आपल्या देशावर होणारे नसले, तरीही एकेकाळी आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांची भूमी आहे आणि भविष्यात सगळे जग व्यापून टाकण्याची महत्त्वाकांक्षा या प्रदेशांनी सोडलेली नाही, हे लक्षात घेतले तर तिथे काय चालले आहे, हे जाणून घेणे फार आवश्यक आहे.

मध्यपूर्वेतील सर्व देश इस्लाम देश आहेत. भौगोलिकदृष्टया त्याचे दोन भाग होतात. एक भाग अरेबियाचा आहे, त्याला अरेबियन आखात म्हणतात. या भागात येमेन, ओमान, कतार, बहारिन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराकचा दक्षिणेकडील भाग, जॉर्डन. दुसऱ्या भागात आफ्रिका खंडातील इजिप्त, लिबिया, मोरोक्को, सीरिया इत्यादी देश येतात. अरेबियातील सर्व लोक अरब वंशाचे आहेत. आफ्रिकेच्या उत्तर भागातील देशातील लोक मुसलमान असले, तरी सगळेच अरब वंशाचे नाहीत. त्यांच्यात वांशिक भेद आहेत.

वेगवेगळया टोळयांत राहणे हा अरबांचा इतिहासकाळापासूनचा स्वभाव आहे. टोळीप्रमुखाला राज्यप्रमुखासारखा मान असतो. टोळीचा सन्मान सगळयात महत्त्वाचा समजला जातो. अपमानाचा बदला अपमानाने आणि हत्येचा बदला हत्येने घेण्याची प्राचीन परंपरा आहे. टोळीच्या सामुदायिक हिताला बाधा येईल असे कोणी काम केल्यास त्याला जिवंत ठेवले जात नाही. प्रमुखाच्या आज्ञेत राहण्याचा आणि तो सांगेल ते करण्याचा हजारो वर्षांपासूनचा अरबाचा स्वभाव आहे. राज्यकर्तादेखील राज्य करताना आपल्या टोळीतील लोकांना प्रमुख स्थानी बसवितो. आपल्या टोळीतील लोक आपला विश्वासघात करणात नाहीत, याची त्याला खात्री असते. मग इराणचा सद्दाम असो की सीरियाचा हाफिज असाद असो की सौदी अरेबियाचा इब्न सौद असो, प्रत्येक जण आपल्या टोळीतील लोकांवर अवलंबून असतो.

इराक, सीरिया, लेबनॉन, जॉर्डन, इस्रायल, तुर्कस्थान हे सारे देश पहिल्या महायुध्दापूर्वी अस्तित्वात नव्हते. पहिल्या महायुध्दापूर्वी हे सर्व देश ऑटोमन खिलाफतीचा भाग होते. पहिल्या महायुध्दात ऑटोमन साम्राज्य जर्मनीच्या बाजूने युध्दात उतरले. कालांतराने अमेरिका इंग्लडच्या बाजूने युध्दात उतरली. 1914 साली युध्द सुरू झाले आणि पुढे 1916ला जर्मनी युध्द हरणार, असे लक्षात येऊ लागले. जर्मनी युध्द हरल्यानंतर जर्मन प्रदेश आणि ऑटोमन साम्राज्याचा प्रदेश आपापसात वाटून घ्यायचा, असे फ्रान्स आणि ब्रिटन यांनी ठरविले. ऑटोमन साम्राज्याचे भाग पाडण्यासाठी इंग्लंडच्या राजाचा प्रतिनिधी सायकस आणि फ्रान्सचा प्रतिनिधी पिकॉट एकत्र बसले. अनेक दिवस त्यांनी चर्चा केल्या. ऑटोमन साम्राज्याचा नकाशा त्यांनी घेतला आणि त्यावर उभ्या-आडव्या रेषा मारून वर दिलेले देश तयार केले.

ऑटोमन खिलाफतीच्या अंतर्गत येणारे हे भूभाग होते. 'आमचा स्वतंत्र देश पाहिजे' अशी या भूभागातील लोकांची कधी मागणी नव्हती. मक्का आणि मदिनाचा जो प्रदेश आहे, त्याला हेझाज म्हणतात. त्या प्रदेशाचा प्रमुख होता हुसेन बिन अली. त्याची मागणी होती की, महायुध्द संपल्यानंतर संपूर्ण अरेबिया त्याला मिळावा. इंग्रजांनी त्याच्याशी तसा करार केला. एका बाजूला इंग्रजांनी ऑटोमन साम्राज्याचे तुकडे करण्याचा करार केला आणि दुसऱ्या बाजूला हुसेनला संपूर्ण अरेबिया देण्याचा हुसेनशी करार केला. त्या बदल्यात त्याने तुर्कांविरुध्द लढावे, असे ठरले. अरबांना तुर्कांचे साम्राज्य नको होते. त्यांना अरबी साम्राज्य हवे होते. तुर्कांना आपल्या देशात अरब नको होते, म्हणून तुर्कांनी तुर्कस्थानमधून अरबी पोषाख, रितीरिवाज हद्दपार केले. हुसेन याला अरबस्थान काही मिळाले नाही. इब्न सौद याने आजचा सौदी अरेबिया उभा केला. तो उभा करण्यासाठी त्याला इस्लामच्या वहाबी पंथाने सर्व प्रकारची मदत केली.

हुसेन बिन अली याच्या मुलांना मात्र इंग्रजांनी नव्याने निर्माण केलेल्या इराक, जॉर्डन आणि इजिप्तची राजगादी दिली. या देशात ज्या राजेशाही पहिल्या महायुध्दानंतर आल्या, त्या स्थानिक राजेशाही नव्हत्या. इंग्रजांनी बसविलेले हे राजे होते. राज्य असे उभे राहत नाही. राज्य उभे राहण्यासाठी राजसत्तेला विशिष्ट प्रमाणात जनसमर्थन लागते. जनसमर्थन नसेल, तर राजवट अस्थिर राहते. सैन्यशक्तीच्या आधारे आणि राज्याची दहशत निर्माण करून राज्य करता येते, परंतु असे राज्य कायम राहत नाही. दोन प्रकारची अस्थिरता राज्यात निर्माण होते. संधिसाधू लष्करी अधिकारी उठाव करतात आणि राज्य ताब्यात घेतात. ते काम त्या मानाने सोपे असते. पंतप्रधानांचे किंवा राष्ट्राध्यक्षाचे घर अथवा कार्यालय ताब्यात घेणे, त्याला कैद करणे किंवा ठार मारणे किंवा संचारमाध्यमे - म्हणजे आकाशवाणी, दूरचित्रवाणी ताब्यात घेणे. देशातील मुख्य बँका ताब्यात घेणे. ज्या राजवटींना जनसमर्थन नसते, त्या राजवटीत जनता उठावाविरुध्द बंड करीत नाहीत. सोम्या गेला आणि गोम्या आला एवढाच त्यांना फरक पडतो. दुसऱ्या प्रकारची अस्थिरता लोकचळवळीतून निर्माण होते. राज्यकर्ते निरंतरपणे बळाचा वापर करतात. ते कोणालाच जबाबदार नसल्यामुळे भ्रष्ट होतात. एका सीमेपलीकडे लोक अन्याय सहन करीत नाहीत आणि मग बंड होते. याला 'अरब स्प्रिंग' (अरबी वसंत) असे म्हटले गेले, त्याची पार्श्वभूमी अशी आहे. 2011मध्ये टयुनीशियात लोकउठाव झाला. नंतर तो इजिप्तमध्ये, सीरियात आणि लिबियात झाला. त्याचे आजचे परिणाम म्हणजे मध्यपूर्वेतील रक्तपात होय. पुस्तकातील वेगवेगळया प्रकरणांत याची माहिती वाचायला मिळेल.

vivekedit@gmail.com