इतरत्र

विवेक मराठी    28-Jul-2017
Total Views |


मधुमेहात हृदयाला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण जागरूक असतो, परंतु इतर ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्यांमध्येदेखील ब्लॉक्स तयार होतच असतात. मग हृदय राहतं बाजूला, आणि लकवा, पायाचा रक्तपुरवठा कमी होणं वगैरेंशी झुंजताना रुग्णाच्या नाकीनऊ  येतात. त्यामुळे अशा इतरत्र घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच नमूद केली पाहिजे. मधुमेहात पायाच्या रक्तवाहिन्या मोठया प्रमाणात चोंदतात. मोठया म्हणजे लांबलचक जागी. शिवाय हे चोंदणं एकाच वेळी अनेक ठिकाणी असतं.

 धुमेहात हृदयाला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण जागरूक असतो, परंतु इतर ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्यांमध्येदेखील ब्लॉक्स तयार होतच असतात. मग हृदय राहतं बाजूला, आणि लकवा, पायाचा रक्तपुरवठा कमी होणं वगैरेंशी झुंजताना रुग्णाच्या नाकीनऊ  येतात. त्यामुळे अशा इतरत्र घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

खरं तर या शरीरभरच्या रक्तवाहिन्यांमध्ये वेगळं काही घडत नसतं. हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या कारणांमुळे चोंदतात, तीच कारणं इथेही लागू असतात. ग्लुकोज जास्त झाल्यामुळे रक्ताची घनता वाढते. रक्ताचा चिकटपणा वाढतो. घन व चिकट झालेलं रक्त सहज गोठतं. आपल्याकडे जवळजवळ 98% मधुमेही टाइप टू प्रकारचे असतात. इन्श्युलीन रेझिस्टन्स हा बहुतेक टाइप टू मधुमेहींच्या गाभा असतो. त्यामुळे सगळया प्रश्नाचा आवाका वाढतो. केवळ रक्तातलं ग्लुकोज वाढणं इतकाच तो मर्यादित न राहता कोलेस्टेरॉल, रक्तदाब, एकंदरीतच रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या रसायनांचं वाढलेलं प्रमाण, सगळं एकत्र येतं आणि आपल्या रक्तवाहिन्यांचा बळी घेतं. त्यांच्या रक्तपुरवठयाच्या मुख्य कामात चांगलाच अडथळा निर्माण करतं.

ही परवड इथेच संपत नाही. रक्ताची गुठळी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्लेटलेट्स मधुमेहात उत्तेजित होतात. रक्तवाहिन्यांच्या आतल्या आवरणात बिघाड होतो. स्थानिक पातळीवर हवा तेव्हा रक्तपुरवठा वाढवता यावा, यासाठी हे आवरण नायट्रिक ऑॅक्साईड नावाचं रसायन बनवत असतं. आवरणाचा कार्यभाग व्यवस्थित नसल्याने हे रसायन बनत नाही. साहजिकच गरज पडल्यावर त्या त्या जागी रक्तपुरवठा हवा तितका वाढत नाही. इंद्रियांना पुरेसा ऑॅक्सिजन आणि पुरेशी पोषक द्रव्यं न मिळण्याने इंद्रियांची उपासमार होते. त्यांची कार्यक्षमता कमी होते. आधीच चोंदलेल्या रक्तवाहिन्यांमुळे रक्तपुरवठा कमी, त्यात हा मार. इंद्रियं कशी इतकं सहन करणार! कधीकधी तर असं वाटतं की इतके प्रश्न असतानाही, सररास प्रत्येक मधुमेही माणसाला रक्तवाहिन्यांच्या समस्या का भेडसावत नाहीत? मग मनोमन मी निसर्गाला दाद देतो. मनातच टाळया वाजवतो.

आता प्रश्न आहे तो कुठल्या कुठल्या रक्तवाहिन्यांमधला अडथळा आपल्या अधिक त्रास देऊन जाऊ शकतो, आणि या समस्या सुरू झाल्यात, हे ओळखायचं कसं?

सर्वात पहिल्यांदा आपण मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा विचार केला पाहिजे. कारण यात होणारं नुकसान खूप त्रासदायक आणि आयुष्यावर मोठा परिणाम करणारं असतं. अर्थात नेमकी कुठली रक्तवाहिनी बंद झालीय यावर हे सगळं अवलंबून असतं. जर मेंदूच्या, स्नायूंवर नियंत्रण करणाऱ्या भागाला रक्तपुरवठा करणारी मोठी रक्तवाहिनी बंद झाली, तर आपल्या एका बाजूला लकवा होणार. परंतु तेच अगदी चिंटुकली एखादी रक्तवाहिनी चोंदली की मेंदूचा फारच अल्प भाग कामातून गेल्यामुळे आपलं फारसं नुकसान होणार नाही. कित्येकदा आणि कित्येक लोकांना असं झाल्याचं जाणवतसुध्दा नाही. मग कधीतरी कुठल्यातरी कारणासाठी सीटी स्कॅन करायला गेल्यावर, रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे सुकलेले मेंदूचे हे भाग दिसतात. ज्याला डॉक्टर ट्रान्झियंट इस्केमिक ऍटॅक असं म्हणतात, ते होतं. आपण त्यासाठी 'भोवळ येणं' हा साधा शब्द वापरतो. रुग्ण अचानक कोसळतो, केवळ काही सेकंदांसाठी बेशुध्द होतो. पुन्हा झोपेतून जागा झाल्यासारखा उठतो आणि काही झालंच नाही असं वागायला लागतो.

क्वचित असा ऍटॅक लांबतो. सेकंदात किंवा मिनिटात बरा न होता, बरा व्हायला चोवीस तास घेतो. चोवीस तासापेक्षा अधिक वेळ घेतला, तर तो ट्रान्झियंट इस्केमिक ऍटॅक राहत नाही. चोवीस तासांऐवजी जर बहात्तर तास लागले, तर त्याला RIND म्हणतात. हा एक प्रकारे मिनी लकवाच असतो. मधुमेहामध्ये अशा चिन्हांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कारण मधुमेही जर वयस्कर पुरुष असेल, नियमित धूम्रपान करत असेल आणि वर त्याला रक्तदाबदेखील असेल, तर असे छोटेछोटे धक्के हे पुढे येऊ घातलेल्या मोठया संकटांची नांदी असते. यातली लक्षणं नोंद घेण्यासारखी असतात. कधीकधी अक्षरश: लकवा झाल्यासारखी शरीराची एक बाजू हलेनाशी होते, तर कधी एखाद्या डोळयाने अकस्मात दिसतच नाही. डोळे चोळेपर्यंत सगळं आलबेल झालेलं असतं. केवळ काही काळासाठी वाचाही जाऊ शकते. वयस्करांमध्ये मन गोंधळून जाणं हेसुध्दा मेंदूच्या विशिष्ट ठिकाणाचा रक्तपुरवठा बंद झाल्याचं लक्षण असू शकतं. डोळयाच्या पडद्याला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तशी खूप लहान असते. त्यामुळे ती लवकर चोंदते. म्हणून अचानक नजरेवर परिणाम झाल्याचं दिसल्यास त्याकडे 'काणाडोळा' करू नये.

पायाच्या रक्तवाहिन्या ही मधुमेहातली कळीची बाब समजली जाते. या रक्तवाहिन्या चोंदल्यामुळे कित्येक पाय कापले जाताहेत हे समजून घ्यायला हवं. यातलं प्रमुख लक्षण असतं चालताना पोटऱ्या जड होणं, पोटऱ्यांमध्ये कळ येणं आणि अल्प काळासाठी उभं राहिलं की ती कळ बंद होऊन पुन्हा चालणं शक्य होणं. वैद्यकीय परिभाषेत याला 'इंटरमिटंट क्लॉडिकेशन सिंड्रोम' असं म्हणतात. हृदयरोगात चालल्यावर छातीत दुखतं, उभं राहिल्यावर किंवा विश्रांती घेतल्यावर ते थांबतं त्याचीच ही पायाची आवृत्ती. काही वेळा रात्री झोपल्यावर पाय वळायला लागतात. त्यामागेदेखील पायाच्या रक्तपुरवठयात कमतरता हे कारण असू शकतं. कारण आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने पायांना रक्त मिळतं. आपण आडवे झाल्यावर आपल्याला हा गुरुत्वाकर्षणाचा फायदा मिळत नाही. मग पाय रक्तपुरवठयासाठी तडफडतात, कुरकुर करायला लागतात.

इथे एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच नमूद केली पाहिजे. मधुमेहात पायाच्या रक्तवाहिन्या मोठया प्रमाणात चोंदतात. मोठया म्हणजे लांबलचक जागी. शिवाय हे चोंदणं एकाच वेळी अनेक ठिकाणी असतं. बहुधा पावलाच्या रक्तवाहिन्या शाबूत असतात, मधल्या गुडघ्याजवळच्या रक्तवाहिन्या अधिक प्रमाणात चोंदतात. त्यामुळे केवळ पायाच्या नाडया तपासून सगळं व्यवस्थित आहे असा निष्कर्ष काढताच येत नाही. कमरेपासून पुढे रक्तवाहिन्या लहान लहान होत जातात. लांब रक्तवाहिन्यांमध्ये बायपास करायला जावं, तर बायपासला लागणारी इतकी लांब दुसरी रक्तवाहिनी कुठून मिळवायची आणि लहान रक्तवाहिनीत ऍंजियोप्लास्टी करायची, तर ते जिकिरीचं... अशा दुहेरी कात्रीत डॉक्टर सापडतात. म्हणूनच Prevention Is Better Than Cure ही इंग्लिश म्हण पायाच्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीत शब्दश: खरी ठरते.

एक सूचक गोष्ट - पायाच्या वरच्या किंवा खालच्या भागाला सोडून बोटांच्या टोकांना किंवा बाजूला जखम झालेली असेल आणि ती बराच काळ बरी होत नसेल, तर कृपया पायाच्या रक्तपुरवठयाची फेरतपासणी करून घ्या. बहुधा रक्तपुरवठा नीट नसल्याने ती जखम बरी होत नसते. नुसत्या पट्टया बांधून हे काम होणार नाही याची शंभर टक्के खात्री बाळगा.  

आणखी एक दुर्लक्षित रक्तवाहिनी म्हणजे मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणारी. ही बिचारी मुकाट सोसत असते. दुखत खुपत नाही, म्हणून तिच्याकडे कोणी फारसं लक्षदेखील देत नाही. पण मधुमेहात ती चोंदण्याचं प्रमाण विलक्षण आहे. चिन्ह जवळजवळ नसतातच. जागरूक डॉक्टर त्याकडे बारीक नजर ठेवून असतात. अचानक रक्तदाब खूप वाढणं, त्यातही तीन तीन औषधं सुरू असूनही तो ताळयावर न येणं हे सगळयात महत्त्वाचं लक्षण मानायला हवं. निदान तपासणी करून मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या चोंदलेल्या नाहीत ना, याची खात्री करून घ्यायला हवी. तपासणी ना महाग आहे, ना दुर्मीळ. अगदी लहान सहान शहरांमध्येदेखील डॉप्लर उपलब्ध असतो. तो करून घेणं चांगलं. विशेषत: तीन किंवा त्याहून अधिक औषधं सुरू असतानाही रक्तदाब कमी होत नसेल तेव्हा. इथे जर रक्तवाहिनी चोंदली असेल, तर एक साधी ऍंजियोप्लास्टी करून मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा वाढवता येतो आणि या उपायाने रक्तदाबदेखील बराच खाली येतो.

आणखी एक दुर्लक्षित रक्तवाहिनी म्हणजे आतडयांची. मधुमेहात हीसुध्दा रक्तवाहिनी चोंदण्याचं प्रमाण अधिक आहे. बहुधा वयस्करांमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. जेवल्यावर दोनेक तास पोट दुखतं. कारण त्या वेळी पचनाची क्रिया जोरात असते. त्यासाठी लागणारा रक्तपुरवठा करण्यात रक्तवाहिनी कमी पडली की आतडी कुरकुरतात, पोट दुखायला सुरुवात होते. पचनक्रिया संपली म्हणजे पोट दुखणं बंद होतं. लोक अपचन समजून त्याच्या गोळया, औषधं घेत बसतात, गुण येत नाही म्हणून निराश होत राहतात. त्यांनी पोटाच्या डॉक्टरांना दाखवून तपासून घेतलं पाहिजे.

बघा, आपण फक्त हृदयाच्या लक्षणांकडे लक्ष पुरवून इतरत्र किती अन्याय करतो ते. हे सहज टाळता येण्यासारखं आहे, हे निश्चित.

9892245272