समरसता - राष्ट्रपती भवनात!

विवेक मराठी    29-Jul-2017
Total Views |

 

पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघेही समरसता चळवळीतील कार्यकर्ते आहेत. एकविसाव्या शतकात 'समरसता म्हणजे काय?' हे त्यांना उत्तम समजते. शासकीय धोरणे व निर्णय समरसतेला पूरक कसे असावेत याचे दोघांनाही उत्तम आणि सूक्ष्म ज्ञान आहे. म्हणून 'राष्ट्रपती भवनात समरसता' हा केवळ शब्दालंकार नाही, तर ती या काळाची वास्तविक शब्दस्थिती आहे. समरस भारत ही समर्थ भारत उभा राहण्याची पूर्वअट आहे. या पूर्वअटीच्या पूर्ततेच्या दिशेने देश वाटचाल करतो आहे. समरसतेच्या सर्व पथिकांना आनंद देणारी ही घटना आहे.

रामनाथ कोविंद यांच्या रूपाने 'समरसता' राष्ट्रपती भवनात विराजमान झाली आहे, हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे. 'हे राष्ट्रपतिपद प्राप्त करणे हे माझ्या जीवनाचे कधीच लक्ष्य नव्हते आणि त्याचा मी कधीही विचारसुध्दा केला नव्हता.' या काळात श्री रामनाथ कोविंद यांनी आपले मत व्यक्त केले ते पूर्णत: खरे यासाठी आहे की, संघसंबंधित कोणताही कार्यकर्ता पदप्राप्तीच्या प्रेरणेने कधीही काम करीत नाही. समाजाची सेवा, मातृभूमीची सेवा हीच त्याच्या कार्याची प्रेरणा असते. सातत्याने काम करता करता पदे आपोआपच येत जातात, ती मागावी लागत नाहीत. आपण होऊन ती येतात आणि त्यांचा स्वीकार करावा लागतो.

रामनाथ कोविंद 1977 सालापासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत. दोन वेळा ते खासदार राहिले आहेत. अनुसचित जाती आणि जमाती समितीचे ते सदस्य होते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विधी आणि न्याय समितीचेदेखील ते सभासद होते. राज्यसभा हाउसिंग समितीचे चेअरमन होते.2015पासून बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते. ही पदे त्यांना त्यांच्या क्षमतेमुळे, गुणवत्तेमुळे प्राप्त झाली. अत्यंत मृदुभाषी, मितभाषी आणि नम्र ही त्यांच्या व्यक्तित्वाची खास वैशिष्टये आहेत. त्यांच्या रूपाने सौजन्य आणि नम्रताच राष्ट्रपती भवनात स्थानापन्न झाली आहे.


राष्ट्रपतिपदासाठी त्यांची निवड तीव्र संघर्षातून झाली असे नाही. भाजपाचे लोकसभेत बहुमत आहे. तेरा राज्यांत सत्ता आहे, अनेक मित्रपक्ष साथीला आहेत, त्यामुळे मतांची बेरीज रामनाथ यांना विजयी करणारीच होती. एका अर्थाने हा सहजसाध्य विजय होता. परंतु ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात, त्या विचारधारेला जीवघेण्या संघर्षातून जावे लागले आहे. प्रदीर्घ जीवघेण्या संघर्षातून प्राप्त केलेला हा अनन्यसाधारण विजय आहे. स्वातंत्र्य प्राप्त होताच संघाची विचारधारा चिरडून, गाडून टाकण्याचा धूर्त डाव सत्ताधाऱ्यांनी खेळला. संघ विचारधारेशी संबंधित लोक सामाजिक, सांस्कृतिक, शासकीयदृष्टया 'अस्पृश्य' झाले. शब्दांच्या नवीन व्याख्या झाल्या. जो संघविरोधी तो उदारमतवादी, तोच प्रागतिक, तोच लोकशाहीवादी, तोच सहिष्णुतावादी तोच मानवतावादी, तोच समतावादी ठरविण्यात आला. संघ विचार ठरला जातीयवादी, सांप्रदायिक, देशाच्या सर्वसमावेशक संस्कृतीत घातक, म्हणून तो उपेक्षा आणि मारण्याच्या लायकीचा ठरविण्यात आला. हा दोन वैचारिक आणि दोन मानसिकतांचा संघर्ष होता. संघरूपी 'राम' विरथी (रथहीन) होता, तर विरोधी रावण 'रथारूढ' होता. संघ धर्मासाठी म्हणजे सत्य आणि न्याय यासाठी लढत होता.

जेथे धर्म म्हणजे सत्य, न्याय असतो, आणि त्यासाठी वाटेल तो त्याग, बलिदान करणारे कार्यकर्ते असतात, तेथे धर्माचा विजय अपरिहार्य असतो. जेथे धर्म तेथे जय. जय मिळविण्यास वेळ लागतो. उदंड कष्ट पडतात, दम उखडून काढणारी ही लढाई असते. कितीतरी 'रामनाथांनी' ही लढाई जीवनभर लढली - पदासाठी, सन्मानासाठी नाही, तर सत्याची प्रस्थापना करण्यासाठी. त्यांतील एक 'रामनाथ' या सर्वांचा प्रतिनिधी बनून राष्ट्रपती भवनात देशाचा प्रथम नागरिक, संविधानाचा सर्वोच्च अधिकारी, राष्ट्राचे प्रतीक म्हणून स्थानापन्न होत आहे. त्यांचा विजय जसा पक्षाचा विजय आहे, तसाच तो सत्य, न्याय म्हणजे धर्म विचारधारेचा विजय आहे. हा अगणित कार्यकर्त्यांच्या त्याग, तपस्या, बलिदानाचा विजय आहे.

हा विजय आपल्या समाजातील 'मूकनायकांचा' विजय आहे. विजय घोषित झाल्यानंतर रामनाथ कोविंद भावुक होऊन म्हणाले, ''आज पाऊस पडतो आहे, खेडया-पाडयातून, शेतातून कितीतरी 'रामनाथ' भिजत असतील. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की, परौंख गावचा हा रामनाथ, तुमचा प्रतिनिधी बनून राष्ट्रपती भवनात जात आहे.'' किती सुंदर भावना आहे ही! प्रत्येक शब्द म्हणजे समरसता दर्शनच आहे. भव्य विजयाच्या क्षणी जेव्हा व्यक्तीस आपल्या आत्मीय बंधू-भगिनींची आठवण होते, तेव्हा त्याचे मानस समरसता मानस झालेले असते. विवेकानंद वारंवार सांगत की खरा भारत झोपडयांत आहे, खेडयांत आहे, गरिबांत आहे. दरिद्र देवो भव! तो सत्शील आहे. ईश्वरभक्त आहे, जीवनमूल्ये जगणारा आहे, गरिबीतही आनंदी आहे, क्षमाशील आहे आणि सर्वात सहनशील आहे, तो जागा करा. तो जागा झाला की भारत जागा होईल. त्याला शिक्षित करा. तो शिक्षित झाला की भारत शिक्षित होईल. स्वामीजी सांगत की हा वर्ग अशा रक्तबीजांचा आहे की, मूठभर सत्तू खाऊन तो साऱ्या विश्वाला आव्हान देण्याचे सामर्थ्य राखू शकतो. डॉ. बाबासाहेबांनी याच वर्गाला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र देऊन जागृत केले. रामनाथ कोविंद याच वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. त्या वर्गातूनच ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुख-दु:खांचे अनुभव त्यांनी आपल्या जीवनात घेतलेले आहेत. शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाशी सुख-दुःखाने समरस झालेत, त्यांचाच चेहरा आज राष्ट्रपती भवनात सर्वांना पाहायला मिळणार आहे.

देशाचे पतन आणि उत्थान कसे होते, याचे काही त्रिकालाबाधित सिध्दान्त आहेत. जेव्हा देशातील सर्वसामान्य माणूस पददलित होतो, तो वेगवेगळया व्यवस्थांच्या वरवंटयांखाली चिरडला जातो, तेव्हा समाजाचे पतन होते. या पतनामागे मूर्खपणाच्या रूढी 'धर्म' म्हणून मान्यता पावतात, तेव्हा समाजाचे अधिकच पतन होते. म्हणून देशाला उभे करायचे असेल तर सर्वसामान्य माणसाला उभे केले पाहिजे. व्यवस्था बदल केले पाहिजेत, धर्मातील खुळचट विचार, रूढी यांना हद्दपार केले पाहिजे. आपल्या अंगभूत गुणांनी, कर्तृत्वाने मोठे होण्याची संधी प्रत्येकाला दिली पाहिजे. सामाजिक जीवनात स्वातंत्र्याची आणि समतेची अनुभूती प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे. यालाच आमूलाग्र सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती म्हणण्यात येते. तिची पायाभरणी राजा राममोहन रॉय यांनी केली, तर तिची इमारत उभी करण्याचे काम विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, राजर्षी शाहू महाराज अशा अनेक नामवंतांनी केले. डॉ. बाबासाहेबांनी त्यावर कळस चढविला. त्यांनी अशी राज्यघटना देशाला दिली की, जिच्या माध्यमातून एक चहाविक्रेता मुलगाही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि दलित जातीत, खेडयात जन्मलेला वाढलेला मुलगाही देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो. रामनाथ कोविंद ही केवळ एक व्यक्ती नसून अहिंसक सामाजिक क्रांतीचे ते एकविसाव्या शतकातील एक रूप आहे.

पित्याचे उत्तरदायित्व, गुरूचे मागदर्शन आणि मातेची वत्सलता मनात ठेवून त्यांना या पदाची कर्तव्ये पार पाडावी लागतील. राजधर्माची आपली परंपरा अतिशय प्राचीन आहे. आपला राजधर्म धर्माने, न्यायाने, नीतीने राज्य करण्याचे बंधन राज्यकर्त्यांवर टाकतो. आधुनिक काळात न्याय आणि नीतीच्या कक्षा वाढत गेल्या आहेत. न्यायाचा आताचा अर्थ होतो 'सामाजिक न्याय'. पारंपरिक व्यवस्था, रूढी, धर्मसंकल्पना यामुळे समाजातील फार मोठया वर्गावर शेकडो वर्षे सातत्याने अन्याय झालेला आहे, त्या वर्गाला न्याय हवा आहे. त्यांचाच प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च स्थानी गेला असल्याने या वर्गाच्या अपेक्षादेखील वाढतील. समरसतेच्या भावनेतून त्याची पूर्तता नवीन राष्ट्रपतींना करावी लागेल. आपल्या राज्यघटनेने राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार दिलेले नाहीत, त्यामुळे धोरणात्मक निर्णय ते करू शकणार नाहीत; परंतु कार्यपालिकेला ते धोरणात काय असावे, नसावे याच्या सूचना करू शकतात; ज्या पक्षाचे शासन आहे, त्याच पक्षाचे ते असल्याने परस्पर मनमोकळा संवाद घडण्यात कोणतीच अडचण येण्याची शक्यता वाटत नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोघेही समरसता चळवळीतील कार्यकर्ते आहेत. एकविसाव्या शतकात 'समरसता म्हणजे काय?' हे त्यांना उत्तम समजते. शासकीय धोरणे व निर्णय समरसतेला पूरक कसे असावेत याचे दोघांनाही उत्तम आणि सूक्ष्म ज्ञान आहे. म्हणून 'राष्ट्रपती भवनात समरसता' हा केवळ शब्दालंकार नाही, तर ती या काळाची वास्तविक शब्दस्थिती आहे. समरस भारत ही समर्थ भारत उभा राहण्याची पूर्वअट आहे. या पूर्वअटीच्या पूर्ततेच्या दिशेने देश वाटचाल करतो आहे. समरसतेच्या सर्व पथिकांना आनंद देणारी ही घटना आहे.

9869206101