बिछडे सभी बारी बारी...

विवेक मराठी    29-Jul-2017
Total Views |


काँग्रेसच्या आजच्या अध:पतनाचं वर्णन करायला याहून योग्य शब्द नाहीत. 'प्राणपणाने मोदीविरोध' हा एकच ध्यास समोर ठेवून काँग्रेसने 2014ची लोकसभा निवडणूक लढली आणि त्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधून 'महागठबंधन' केलं. हे महागठबंधन म्हणजे अर्थातच संयुक्त पुरोगामी आघाडी. मात्र देशभरातले हे सगळे पुरोगामी विचारवंत पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंतही एकत्र राहू शकत नाहीत, हे गेल्या 3 वर्षांतच क्रमाक्रमाने सिध्द झालं आहे. महागठबंधन नामक ही मोळी सैल होऊ लागली होतीच, बिहारमधल्या राजकीय नाटयाने तर ती पुरती विसकळीत होण्याच्या मार्गावर आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींसमोर उभे करता येण्याजोगी एकमेव व्यक्ती - नितीशकुमार, तूर्तास राज्यापुरते का होईना पुन्हा भाजपाच्या जवळ आले आहेत.

पंतप्रधानपदाच्याच मुद्दयावरून 2014 साली ते रालोआतून वेगळे झाले होते आणि त्या वेळी काँग्रेसच्या मदतीने आपण मोदींचा पाडाव करू शकू, अशी स्वप्नं त्यांनी पाहिली होती. ती स्वप्नं हवेतच विरली. जिच्यावर ते विसंबले, ती काँग्रेस फुटीच्या वाळवीने पार पोखरून गेली होती आणि काही मोजके अपवाद वगळता बहुतेक राज्यांतही भाजपाचं सरकार निवडून येऊ लागलं होतं. बिहारची विधानसभा निवडणूक नितीशकुमारांनी राजद आणि काँग्रेस यांच्या मदतीने जिंकली असली, तरी ही युतीच मुळात अभद्र युती होती. सर्वाधिक जागा जिंकूनही लालूंनी नितीशकुमारांना राज्याभिषेक होऊ दिला, यात त्यांचा मोठा त्याग वगैरे नव्हता. असलाच तर निव्वळ कपटी धूर्तपणा होता. भ्रष्टाचारात अवघं कुटुंब बरबटून निघालेलं असताना सत्तेच्या उपभोगाचा लालूंचा मोह काही सुटलेला नव्हता. आज गांधीजींची आठवण काढून गळा काढणाऱ्या लालूंना गाधींजींनीच सांगितलेला 'गरज आणि हाव' यातला फरक जर आतापर्यंत कळला असता, तर त्यांच्यावर आज ही वेळ येती ना. आपल्या तेजस्वी मुलाला उपमुख्यमंत्रिपद द्यायला लावून त्यांनी नितीशकुमारांवर अंकुश ठेवण्याचाही प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न शेवटी त्यांच्यातल्या दुफळीला कारणीभूत ठरला. अन्य राज्यांमध्ये भाजपाची चाललेली घोडदौडही लालूंनी फारशी मनावर घेतली नाही किंवा भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या संपत्तीचा त्यांचा माजही उतरला नाही, त्यामुळे अप्रत्यक्षपणे लालूंनीच नितीशकुमारांसमोर भाजपाबरोबर जाण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. पण झाल्या प्रकारानंतर, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने असा काही ऊर बडवला की ज्याचं नाव ते. त्यांनी इतकं आकांडतांडव करूनही विधानसभेत नितीशकुमारांनी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकलाच. 

गेल्या काही महिन्यांपासून यादव कुटुंबीयांतील सदस्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यातून सुटका तर लांबच, मात्र शिक्षेचे फास अधिकाधिक आवळण्याची शक्यता निर्माण झाल्यावरही यादव पितापुत्रांचे 'तेवर' बदलेनात. ज्या मोदींना विरोध करत नितीशकुमारांनी लालूंशी सोयरीक जुळवली होती, त्या नितीशकुमारांना भाजपाची घोडदौड दिसत होती आणि त्यांनी त्यातून योग्य तो बोध घेतला होता. म्हणूनच केंद्राची जी धोरणं, जे निर्णय पटतील त्यांचं खुलेआम समर्थन करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. काँग्रेस आणि राजदमधील श्रेष्ठींच्या मताची पर्वा न करता ते केंद्राच्या निर्णयाचं समर्थन करत होते. अशा वेळी युतीला असलेला संभाव्य धोका वा बदलू शकणारी समीकरणं ओळखून लालू वा सोनियांनी नितीशकुमारांशी वर्तन सुधारायला हवं होतं. पण ते दोघांकडूनही झालं नाही.

अर्थात त्या दोघांकडून ही अपेक्षाही अवाजवी आहे. त्यातून या दोघांचेही वारसदारही कर्तृत्ववान. त्यातही गांधी कुलोत्पन्न तर मिळेल तिथे स्वपक्षाचं नाक कापायची संधी साधणारे. आताही नितीशकुमार यांनी काडीमोड घेतल्यावर, राहुल गांधी यांनी ''मला याचा सुगावा 3-4 महिन्यांपूर्वीच लागला होता'' असं वक्तव्य करून स्वत:च्या आणि पक्षाच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. जर इतकी पक्की खबर होती, तर तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी काय पावलं उचलली? कोणती रणनीती आखली? अर्थात आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना....

कुलदीपकाच्या या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यानेच शतायुषी काँग्रेस मरणपंथाला लागली आहे, याचं भान सोनियांना नाही. सासूबाईंसारखं राजकारण त्यांना जमत नाही आणि केवळ पूर्वपुण्याई पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी नाही.

त्यासाठी मोदीविरोधाच्या पलीकडे जे सकारात्मक राजकारण करायला हवं, ते सोनियांनी कधी केलं नाही. बहुधा ती गोष्ट त्यांच्या क्षमतेपलीकडची असावी. म्हणूनच राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार निवडतानाही त्यांनी संपुआतल्या अन्य पक्षीयांचा विचार घेण्याऐवजी स्वत:ने निवडलेला उमेदवार सर्वांवर लादला. खरं तर नितीशकुमार आणि त्यांच्यात बेबनावाची मोठी काडी तिथेच पडली. रालोआच्या उमेदवाराला जाहीर केलेल्या पाठिंब्यावर ते ठाम राहिले आणि तसे वागलेही.

या विषयात नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काँग्रेस व जदयुमधले संबंध सुधारण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत. राजद तर अंतर्बाह्य भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष. आपण कोणाबरोबर राहायची चूक केली आहे, हे लक्षात आलेल्या नितीशकुमारांनी ती सुधारायचं ठरवलं आणि सुधारलीही. नंतर उठलेलं वादळ तर सर्वांसमोर आहेच.

प्रश्न फक्त बिहारपुरता मर्यादित नाही. एकेका राज्यातून काँग्रेसची पीछेहाट होणं, एकेका नेत्यांनी पक्षाशी काडीमोड घेणं यातून त्या पक्षाचे प्रमुख कोणताही धडा घेत नाहीत आणि आपल्या विनाशाचं खापर भाजपावर फोडून मोकळे होत आहेत.

निरोगी लोकशाहीसाठी विरोधी पक्ष हवाच... पण गलितगात्र झालेला विरोधी पक्ष काय कामाचा? त्याची कारणं त्यांनी स्वत:हून शोधली, तर परिस्थिती बदलण्याची थोडीफार शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आत्मवंचनेच्या ग्लानीतून बाहेर यावं लागेल. बिहारमधलं राजकीय नाटय काँग्रेसला शहाणपण देतं की आणखी गर्तेत नेतं, ते येणारा काळच ठरवेल.