ज्याचा त्याचा विठ्ठल...

विवेक मराठी    03-Jul-2017
Total Views |


पंढरीची वारी. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा खूप प्राचीन आहे. वारीचा शोध घेतला तर असे लक्षात येते की संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी वारी केली होती. म्हणजे त्याच्याही आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरची वारी प्रचलित होती. वारी कुणी चालू केली, तिचा प्रणेता कोण हे जरी आज आपल्याला ज्ञात नसले तरी पंढरपूरच्या वारीमुळे महाराष्ट्र घडला हे मान्य करावेच लागते. सावळया विठ्ठलावर दृढभाव ठेऊन शेकडो मैल अंतर पायी चालत जायचे आणि विठ्ठलाच्या क्षणभराच्या दर्शनाने जन्मोजन्मीचे पुण्य पदरी बांधून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायचे. आषाढी वारीच्या माध्यमातून गेली कित्येक शतके हीच प्रथा पाळली जात आहे आणि पुढेही ती अशीच अबाधित राहील.

पंढरीची वारी तशी पाहिली तर आध्यात्मिक. आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनाचा हा सोहळा. पण संत मंडळाने त्याला समतेची जोड दिली आणि नाचत-गात विठ्ठल चरणी जाताना सामाजिक समरसतेचे कीर्तन केले. सामाजिक जीवनात ज्यांना बहिष्कृत म्हणवले जात होते त्यांना उराउरी भेटण्याची प्रेरणा याच वारीने जागवली आणि चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचे रिंगण धरून भेदाभेद अमंगळ अशी ग्वाही दिली. जातिभेद, अस्पृश्यता आणि सर्व प्रकारच्या विटाळ कल्पना यापासून दूर जात 'नर तो नारायण' अशी भावजागृती करण्यात संतपरंपरेचे खूप मोठे योगदान आहे. संतांनी समाज एकरस करण्यासाठी मार्ग दाखवला. जो मार्ग सामाजिक समतेचा आहे आणि सामाजिकदृष्टया, सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्राच्या हिताचाही आहे. जातिभेद, जातीय विद्वेष आणि जातीय अंहकार यांचा लोप करून समतायुक्त समाज निर्माण करण्याची प्रेरणा संत आणि वारीने दिली आणि महाराष्ट्रात समतेचा विठ्ठल दृढ केला.

पण मागील काही वर्षापासून सामाजिक विद्वेष हाच काही मंडळीचा विठ्ठल झाला आहे. संत, महापुरुष आणि आपला गौरवशाली इतिहास यांना जातीय दृष्टीकोनातून मांडून विद्वेषाचे रिंगण घातले जाते. सामाजिक अस्थिरता आणि जातीय ताणतणाव हाच ज्यांचा जगण्याचा आधार आहे, त्यांचा विद्वेषाचा विठ्ठल सरसकट समाजात स्वीकारला जात नसला तरी समाज जीवनात खळबळ निर्माण करतो. यंदाच्या वारी पर्वात हा विद्वेषाचा विठोबा पुण्यातून पुजला गेला आणि त्यावर उलटसुलट चर्चाही घडली. एका बाजूला समतेचा उद्घोष आणि दुसऱ्या बाजूला अशी विद्वेषाची गरळ अशा वास्तवात समतेचा आवाज बुलंद करण्याची आणि संतांच्या मार्गावर ठाम राहण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडायला हवी. 'पंढरीची वारी आहे, माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत' अशा भावस्थितीत जगणारा माणूस म्हणजे वारकरी. वारकऱ्याचे सामाजिक आणि आध्यात्मिक भरणपोषण वारी करत असते. शतकानुशतके चालू असणारी वारी जशी पारंपरिक आहे, तशी ती आधुनिकही आहे आणि म्हणूनच आधुनिक व्यवस्थापन तज्ज्ञही वारीच्या प्रेमात पडतात आणि वारी समजून घेण्यात, तिचा एक घटक बनण्याचा प्रयत्न करतात. वारीची शिस्त, व्यवस्थापन, आणि एकमेकांशी असणारे बंध यांचा नव्या दृष्टीने अभ्यास होतो आहे, हीदेखील आनंदाची बाब आहे आणि यातूनच वारी वैश्विक पातळीवर पोहोचत आहे.

संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी पांडुरंग परब्रह्म कुठे भेटेल याचा मार्ग सांगितला आहे आणि या मार्गाला सेवाभक्तीची जोड दिली आहे. आपण ज्याची सेवा करणार आहोत तोच पांडुरंग, विठ्ठल आहे असे समजून सेवा करा असा संताचा संदेश आहे. हा संदेश आपल्या कृतीतून साकार करण्यात अनेकांना आनंद वाटतो. विठ्ठल जसा नाना रूपात भक्ताशी गुज करता, तसेच आता विठ्ठलाच्या भक्तीलाही नाना रूपेलाभली आहेत. कुणी त्याला निर्मळ वारी म्हणते, कुणी त्याला हरित वारी म्हणते, कुणी आरोग्य वारी म्हणते, कोणी त्याला पर्यावरण जागृती वारी म्हणते तर कुणी त्याला आयटी वारी म्हणते. या साऱ्या दिंडया आपापल्या ठिकाणाहून निघतात आणि मुख्य वारी सोहळयात सामील होतात आणि आपआपल्या विठ्ठल मनोभावे सेवा करतात. 'जसा भाव तसा त्याचा देव' या उक्तीची अनुभूती या काळात मिळत असते. देहू-आळंदी ते पंढरपूर हा वारीमार्ग आणि तीनही तीर्थस्थळे यात्रा काळात निर्मळ रहातील यासाठी गेले तीन वर्षे कष्ट करणारा एक मोठा समूह उभा राहिला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रेरणेने समाजहितैषी तरुण या कामात गुंतले आहे. या तरुणांना त्यांचा विठ्ठल कळला, तो म्हणजे वारी मार्गावरची आणि पालखी तळावरची शौचालय व्यवस्था आणि स्वच्छता. या विठ्ठलाची सेवा करण्यासाठी दरवर्षी शकडो तरुण या उपक्रमात सहभागाी होत आहेत. गेल्या तीन वर्षांचा अनुभव पहाता वारी मार्गावर अमूलाग्र बदल दिसून येत आहेत. विठ्ठल दर्शनाला जाताना तो मार्ग आणि परिसर स्वच्छ आणि आरोग्याला उपकारक पर्यावरणपूरक असावा असा ध्यास घेऊन विठ्ठल सेवा करणाऱ्याची संख्या ज्या वेगाने वाढत आहे आणि वारीमार्ग स्वच्छ होताना दिसत आहे, त्याच वेगाने महाराष्ट्रात समतेच्या विठ्ठलाची प्रस्थापना व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. जातीय विद्वेष संपवण्यासाठी आपल्या कृतीने आणि विचाराने समतेची रुजवणूक करून विद्वेषासमोर समता आणि समरसतेची मोठी रेघ काढली पाहिजे. आपला अशा प्रकारचा व्यवहार हा समतेच्या विठ्ठलाचा गजर असेल... आषाढीच्या समता वारीतून आपण हाच संदेश घेतला पाहिजे.