वृषभसूक्त

विवेक मराठी    31-Jul-2017
Total Views |

नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून मोठया प्रमाणात धान्याचे उत्पादन व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खऱ्या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला, संगीत व इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. पोटाची भूक मिटवल्यामुळे मेंदूची वाढ सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.


शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला. मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरुवात झाली, असे मानण्यात येते. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला, या नांगराला ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आले आणि मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणीच मिळाली. कारण नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून मोठया प्रमाणात धान्याचे उत्पादन व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खऱ्या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला, संगीत व इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. पोटाची भूक मिटवल्यामुळे मेंदूची वाढ सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.

अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला असतो. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला, तर मराठवाडा-विदर्भात श्रावण अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो.

पाच हजार वर्षांपूर्वीच्या ॠग्वेदात कृषी सूक्त आहे. त्यात गायींचा, बैलांचा आदराने उल्लेख आढळतो. विश्वनाथ खैरे यांनी 'वेदांतील गाणी' म्हणून जे पुस्तक प्रसिध्द केलेय, त्यात या कृषी सूक्ताचा मराठी अनुवाद दिला आहे.

कल्याण बैलांचे तसे माणसांचे

कल्याण करो या शेताचे नांगर

कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत

कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ

नांगऱ्ये चालोत बैलांच्या संगती

कल्याण पाऊस बरसो पाण्याने

आम्हीं सुख द्यावे, शेताजी-सीतेने ॥

बैल-नांगर-माणूस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. ॠग्वेदात गायीचे जे गोडवे गायले जातात, त्याला इतर कारणांबरोबरच ती शेतीसाठी बैल देते म्हणूनही शेती करणाऱ्या समाजाला तिचे कौतुक राहिलेले आहे.

रामायणात भूमिकन्या सीता ही शेतीचे प्रतीक मानली गेली आहे. भूमी नांगरताना जनकाला सीता सापडली, असे मानले जाते. गीत रामायणात ग.दि. माडगूळकर लिहितात, तसे

आकाशाशी जडले नाते धरती मातेचे

स्वयंवर झाले सीतेचे

हे गाणे केवळ राम-सीतेच्या स्वयंवराचे नाही. धरती आणि आभाळ यांच्या मिलनातून शेतीला सुरुवात झाली. राम-सीतेचे स्वयंवर हे त्या कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे.

कवी विठ्ठल वाघ यांचा 'वृषभसूक्त' याच नावाचा कवितासंग्रह आहे. विलक्षण अशा 'भूदेव' शब्दांत विठ्ठल वाघांनी बैलाचे वर्णन केले आहे.

बैल आभाळाची कृपा बैल धरतीचा जप

काळया मातीची पुण्याई बैल फळलेले तप

बैल घामाची प्रतिमा बैल श्रमाचे प्रतीक

बैल माझ्या शिवारात काढी हिरवे स्वस्तिक

इतक्या सुंदर पध्दतीने वाघांनी बैलाची प्रतिमा रंगवली आहे.

जात्यावरच्या ओव्यांमधूनही बैलापोटी असलेली कृतज्ञता, आस्था प्रकट झाली आहे. शेतात पिकले ते सगळे बैलांच्या श्रमामुळे, याची जाणीव जात्यावरच्या ओव्यांत दिसते

पिकलं पिकलं। पिकल्याचं नवल काई। नंदी राबलेत बाई॥

पिकलं पिकलं। जन बोलत कुठं कुठं। नंदी आलेत गुडघीमेट॥

पण एका ठिकाणी बैलाची ओवी अतिशय काव्यात्मक झाली आहे.

काळया वावरात बईलाचा घाम जिरे।

गच्च भरलंय रान कणसाचे तुरे॥

बैलाच्या घामाने रानात पीक आले आणि कणसाचे तुरे मोठया डौलात शेतात डुलताना दिसत आहेत.

गायीचे वासरू रानभर हुंदडत असते. त्यामागे फिरणारा बाल गुराखी, तोही त्याच्या खेळात हरखून गेलेला असतो. असे हुंदडणारे वासरू जेव्हा बैल होऊ पाहते, त्यासोबतच तो बाल गुराखीही अंगापिंडाने मजबूत असा शेतकरी होऊ पाहत असतो. इंद्रजीत भालेराव यांच्या 'दूर राहिला गाव' या कवितासंग्रहात वासराचा बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पध्दतीने आली आहे.

माझ्या वासराने हुंगुनिया माती

जुवाच्या जोत्याला भिडविली छाती

माझ्या वासराने हुंगले आभाळ

आणि धरणीही कापे चळचळ

गायीच्या पोटी आलेले वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो. त्याला मोठे करतो. हे घरचे वासरू शेतात काम करण्याजोगते झाले की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्यासोबत हा मोठा झालेला शेतकरीही राबतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची - विशेषत: पावसाची साथ मिळाली, तर घरात लक्ष्मी येते अशी सगळया शेतकरी समाजाची श्रध्दा आहे.

कवी विठ्ठल वाघ हे चित्रकारही आहेत. आपल्या कित्येक मित्रांच्या घरात बांगडयांच्या तुकडयांतून त्यांनी भिंतीवर चित्रे साकारली आहेत. त्यांनी काढलेल्या मोराइतकाच त्यांचा बैलही प्रसिध्द आहे.

हाच बैल जेव्हा म्हातारा होतो, तेव्हा त्याचा अंत जवळ आला की शेतकऱ्याला अतिशय दु:ख होते. विठ्ठल वाघांनी शेतकऱ्याच्या मृत्यूवर ज्या ओळी लिहिल्या आहेत, त्या अप्रतिम आहेत. बैलावर इतके काही लिहिले गेलेय, पण बैलाचा मृत्यू मात्र फारच थोडया ठिकाणी उमटला आहे.

बैल गेला तेव्हा किती रडरडली दमणी

ओले पडद्यात डोळे किती पुसायचे कोणी

झाले वावर हळवे अन आखर व्याकूळ

कृष्णावाचून गाईचं गेलं मौनात गोकुळ

गेला जिवाचा पोशिंदा अशी माउलीची गत

पापण्यात उचंबळे तिच्या डोळयातली मोट

कुंकू पुसलं मातीचं अन् टिचले बिल्वर

जिथं हरवलं बीज गर्भी कुठले अंकुर?

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

9422878575