एका जनार्दनी वारी करी!

विवेक मराठी    05-Jul-2017
Total Views |


*** ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे***

वैकुंठीचा देवच पंढरीनाथ बनून प्रकटला आणि वारी सुरू झाली. पंढरीनाथाच्या भक्तसंप्रदायाला 'वारकरी संप्रदाय' असेच नाव पडले. या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला असे म्हणतात. याचे कारण त्यांनी वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले. खरे तर वारी ही ज्ञानदेवपूर्वकाळातही सुरू होती, पण तिला ज्ञानेश्वरादी संत मांदियाळीने जो बहर आणला, तो अलौकिकच होय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वारकरी संप्रदायाचा जीवप्राणच आहे. संत ज्ञानेश्वरांचे आईवडीलही वारी करीत असत. त्यांच्या घरी वारीची परंपरा असल्यामुळे ते स्वतःही वारी करीत असत.

 वघ्या महाराष्ट्राचेच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या भक्तांचेही लाडके दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तीचा अनुपम व अपूर्व सोहळा म्हणजे वारी. वारी म्हणजे काय? हे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी सुस्पष्टपणे सांगितले आहे - 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!' आपले शरीर हेच पंढरपूर आहे आणि त्यात नांदणारा आत्मा हाच विठ्ठल आहे. ते पुढे सांगतात - 'देखिली पंढरी देही जनी वनी। एका जनार्दनी वारी करी!' याच पंढरीचा आपल्या देहातच आत्मानुभव घडावा आणि अंतरंग वारी घडावी, केवळ याच उद्देशाने लक्षावधी वारकरी पंढरीची वारी करतात. पंढरीची नियमित यात्रा करणारा तो वारकरी. श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्र शुध्द एकादशी यांपैकी एका एकादशीला जो नियमित पंढरीची यात्रा करतो तो पंढरीचा वारकरी. वारकरी गळयात तुळशीची माळ घालतात म्हणून त्यांना 'माळकरी' असेही म्हणतात. वारकरी ही वारी एक व्रत म्हणूनच करीत असतात आणि 'पंढरीचा वारकरी, वारी चुकू नेदी हरी' असे हे व्रत चुकू नये म्हणून जिवापाड जपत असतात, इतकी या हरिभक्तांची भावनिक गुंतवणूक झालेली असते. खरे तर पंढरीचा विठूराया या वारीच्या सूत्रानेच गावोगाव पसरलेल्या वारकऱ्यांशी जोडला गेला आहे. ही वारी दर वर्षी पुन्हा पुन्हा केली जाते. पुन्हा पुन्हा ठरावीक कालावधीनंतर ठरलेल्या तीर्थस्थळी जाणे म्हणजे वारी होय.


 

ळीने समाजमनाची नाडी ओळखून भागवत धर्माच्या ध्वजाखाली अवघा समाज एकत्र आणला. सामान्य जनांना भुक्ती-मुक्तीची ग्वाही देणारा भक्तिमार्ग अगदी सुलभ करून समजावून सांगितला. हा मार्ग म्हणजे भगवंताच्या नामसंकीर्तनाचा मार्ग. सर्वांना समान आचारसूत्राने जोडले व समाजातील जातीपातीच्या भेदभावांच्या भिंती पाडून टाकल्या. सामाजिक एकात्मता साधणारी जी क्रांती घडविली, तिचेच 'वारी' हे भव्यदिव्य रूप होय!

वैकुंठीचा देवच पंढरीनाथ बनून प्रकटला आणि वारी सुरू झाली. पंढरीनाथाच्या भक्तसंप्रदायाला 'वारकरी संप्रदाय' असेच नाव पडले. या भागवत धर्माच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला असे म्हणतात. याचे कारण त्यांनी वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले. खरे तर वारी ही ज्ञानदेवपूर्वकाळातही सुरू होती, पण तिला ज्ञानेश्वरादी संत मांदियाळीने जो बहर आणला, तो अलौकिकच होय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वारकरी संप्रदायाचा जीवप्राणच आहे. संत ज्ञानेश्वरांचे आईवडीलही वारी करीत असत. त्यांच्या घरी वारीची परंपरा असल्यामुळे ते स्वतःही वारी करीत असत. या भागवत धर्म मंदिरावर कळस चढविला तो संत तुकारामांनी. त्यांची गाथा हीसुध्दा या संप्रदायासाठी संजीवनी बनली आहे.

पंढरीच्या वारीची परंपरा तुकाराम महाराजांच्या घरात पिढयान्पिढया चालू होती. त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबाबा हे दर पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरीस जात असत. तुकोबारायांचे वडील बोल्होबा यांनीही चाळीस वर्षे वारी केली. नंतर तुकोबाराय पंढरीची वारी करू लागले. संत तुकाराम स्वतः वारी करीतच, तसेच आपल्यासोबत अन्य भक्तांनाही येण्याचा आग्रह करीत. त्यांच्या दिंडीत चौदाशे टाळकरी होते. यातूनच या वारीला दिंडी सोहळयाचे स्वरूप आले. पुढे तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा आणि पुत्र नारायण महाराज यांनी या दिंडी सोहळयाची परंपरा पुढे चालवीत नेली.

ज्येष्ठ वद्य नवमीला पालखी देहूहून निघत असे व आळंदीला मुक्काम करीत असे. आळंदीहून पुढे दशमीला पंढरीच्या दिशेने पालखी मार्गस्थ होत असे. ही प्रथा साधारणपणे इ.स. 1680पासून 1861पर्यंत चालू राहिली. पण 1831च्या दरम्यान संत तुकोबारायांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून आणि सेवेच्या प्रश्नावरून वाद सुरू झाला. याचा परिणाम म्हणून निस्सीम ज्ञानेश्वरभक्त हैबतबाबा आरफळकर यांनी 1831पासून ज्ञानोबांची पालखी स्वतंत्रपणे आळंदीहून नेण्यास सुरुवात केली.

हैबतबाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या सेवेत होते. ते सातपुडयातून प्रवास करीत असताना भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती लुटली व त्यांना गुहेत कोंडून ठेवले. आता केवळ पंढरीनाथच आपला आधार आहे अशा भावनेने हैबतबाबांनी अखंड हरिपाठ पठण सुरू केले. योगायोगाने एकविसाव्या दिवशी भिल्लनायकाच्या पत्नीस पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि त्या आनंदात भिल्लनायकाने हैबतबाबांना मुक्त करून त्यांची पाठवणी केली. हैबतबाबा मग माउली ज्ञानोबारायांची सेवा करीत आळंदीतच राहिले. वारकरी भजनात प्रथम 'रूप पाहता लोचनी' हा अभंग आणि शेवटी ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या आरत्या म्हणाव्यात हा नियम त्यांनीच घालून दिला आहे.

संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून, तर संत तुकारामांची पालखी देहूहून पंढरीकडे मार्गस्थ होते. ज्येष्ठ वद्य सप्तमी या दिवशी तुकाराम महाराजांच्या पालखीचे, तर वद्य अष्टमी या दिवशी ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे प्रस्थान होते. आळंदी येथे संस्थानच्या वतीने पूजा-आरती होते व टाळमृदुंगाच्या गजरात देवळाला आतून प्रदक्षिणा घालून महाद्वारातून पालखी बाहेर पडते आणि शेजारील गांधी वाडयात सूर्यास्ताच्या सुमारास पोहोचते. हे माउलींचे 'आजोळघर' होय. रात्री पालखीचा मुक्काम तेथेच असतो. नवमीला पालखी सकाळी निघते, तेव्हा आळंदीच्या पुलाच्या पलीकडे धाकटया पादुकांपर्यंत गावकरी पालखी पोहोचविण्यास येतात. पुढे थोरल्या पादुकांना उजवी घालून कळसच्या ओढयाजवळ भोजनासाठी मुक्काम होतो. नंतर येरवडा, होळकर पूल, पुणे-मुंबई रस्ता आणि वाकडेवाडी अशा मार्गाने पालखी पुण्यात दाखल होते. तिचा मुक्काम भवानी पेठेत बरडी पुलाकडे असतो.  तुकाराम महाराजांची पालखी आधीच पुण्यात दाखल झालेली असते. ती नाना पेठेत निवडुंगा विठोबाच्या देवळात मुक्कामाला असते. पुण्यात दोन्ही पालख्यांचा मुक्काम नवमी आणि दशमी असा दोन दिवस असतो. एकादशीला पहाटे पूजा झाल्यानंतर दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. हडपसरपर्यंत दोन्ही पालख्या एकामागोमाग वाटचाल करतात. यानंतर माउलींची पालखी सासवड, जेजुरी, फलटण, माळशिरस, वाखरीमार्गे पंढरपूरला जाते, तर तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, लोणी-काळभोर, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरीमार्गे पंढरपूरला जाते.

जेव्हा हैबतबाबा आरफळकरांनी वारीला संरक्षण आणि भव्य रूप मिळावे म्हणून शिंदे संस्थानकडे राजाश्रयाची मागणी केली, तेव्हा त्यांनी बेळगावच्या शितोळे सरकारांना ही व्यवस्था करण्यास सांगितले. शितोळे सरकारांनी मोठया आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली व पालखी सोहळयास हत्ती, घोडे, तंबू व जरीपटका देऊन नैवेद्याचीही सोय केली. आजही माउलीस शितोळे सरकारांचा नैवेद्य असतो. ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका वाहून नेण्यासाठी एक अश्व आणि एक स्वाराचा अश्व असे दोन्ही अश्व शितोळे सरकारांनीच दिले होते आणि त्यांची पुढची पिढी हा वारसा चालवत आहे.

 माउलींचे अश्व आळंदीला इंद्रायणीच्या पुलापाशी येताच पालखी सोहळयाचे मालक, चोपदार व हैबतबाबांची दिंडी त्याला आणण्यासाठी जाते. अश्वाची पूजा करून त्याला वाजतगाजत मंदिर परिसरात आणले जाते. माउलींच्या पादुकांना वंदन करून ते देवळाच्या आतील भागास प्रदक्षिणा घालते. माउलींच्या पालखी सोहळयात सर्वांत पुढे माउलींचा अश्व चालतो. या अश्वावर कोणी स्वार होत नाही. या अश्वाच्या पाठीवर गादी ठेवून त्यावर माउलींच्या पादुका ठेवण्यात येतात. आळंदी ते पंढरपूर असा या अश्वाचा प्रवास होतो. रिंगण सोहळयात स्वाराच्या अश्वाबरोबर माउलींचे अश्व रिंगण पूर्ण करून माउलींच्या पादुकांचे दर्शन घेते. रिंगण सोहळयात स्वाराच्या अश्वाबरोबर माउलींचे अश्व रिंगण पूर्ण करून माउलींच्या पादुकांचे दर्शन घेते. रिंगण सोहळा पूर्ण झाल्यावर भाविक माउलींच्या अश्वाच्या टापाखालची माती प्रसाद म्हणून आपल्या भाळी लावतात.


शितोळे सरकारांनी जरीपटक्याचा मान पालखी सोहळयाला दिला, कारण त्यावरून राजाश्रयाचा बोध होतो. त्या काळात चोर, दरोडेखोर यांचा वाटसरूंना मोठा उपद्रव होत असे. वाटसरूंना ते अडवून लूटमार करीत असत. पूर्वी जरीपटक्याचा मान हा राजालाच असे. शितोळे सरकारांनी जरीपटका देऊन या सोहळयाला राजाश्रय दिला. यामुळे स्वार अश्वावर जरीपटका घेऊन बसतो.

शितोळे सरकारांच्या पालखी सोहळयातील सहभागामुळे वारीमध्ये रिंगण सोहळयाची सुरुवात झाली. देहू आणि आळंदी येथून निघालेले वारकरी पंढरीत दाखल होतात. शेवटी हा सर्व पायी प्रवास असतो. भाविकांना विरंगुळा व माउलींच्या दर्शनाची संधी आणि अश्वांना दौडण्याची संधी या रिंगण सोहळयात लाभते. या पायवारीत सात-आठ ठिकाणी रिंगण सोहळा होतो. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे यांचे दोन प्रकार असतात.

रिंगण लावण्याचे काम चोपदार करतात. एकेक दिंडी रिंगणात सामील होते. पखवाजाचा ठेका आणि टाळाचा ताल धरून 'ज्ञानोबा तुकाराम' असा नामघोष सुरू होतो. याच नामघोषात माउलींचा रथ रिंगणाची प्रदक्षिणा पूर्ण करतो. मग पालखी रथातून उचलून रिंगणाच्या मध्यभागी चबुतऱ्यावर ठेवण्यात येते. भोपळे दिंडीला जरीपटक्याचा मान असल्यामुळे ती दिंडी प्रथम रिंगणातून पताका घेऊन धावते. मग 'पुंडलिक वरदा' गजर झाल्यावर पताका घेतलेले झेंडेकरी धावतात आणि पाठोपाठ तुळस व हंडा डोईवर घेतलेल्या महिला रिंगणात धावतात. मग रिंगणातून माउलींचा व स्वाराचा अश्व धावतो. स्वाराच्या अश्वाला माउलींचा अश्व शिवल्यानंतर अश्वांच्या टापाखालची माती कपाळाला लावण्यासाठी भाविकांची झुंबडच उडते. वारकरी झिम्मा, फुगडी, मनोरे, हमामा, हुतूतू असे खेळ सुरू करतात, तर भाविकांची रिंगण प्रदक्षिणा घालण्याची गडबड उसळते. सर्व आसमंत नामघोषाने दुमदुमत असतानाच चोपदाराने इशारा केल्यावर सर्वत्र एकदम शांतता पसरते.

उभे रिंगण करण्याचा सोहळासुध्दा असाच दृष्ट लागण्याजोगता असतो. चांदीच्या रथातून माउलींच्या पालखीचे आगमन होते. वारकऱ्यांमध्ये रिंगणासाठी गडबड उसळते. चोपदारांनी हातातील चोप उंच धरल्यावर सर्वत्र शांतता पसरते. समस्त वारकरी व भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होतात. मानकरी अश्वाला दौडण्यासाठी रिंगणाचा मार्ग मोकळा करतात. रिंगण लावल्यानंतर रिंगणापुढील सत्तावीस दिंडयांमधून माउलींचा अश्व दौडत आणला जातो. माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर मागच्या वीस दिंडयांपर्यंत जाऊन अश्व माघारी पळत येतो. माउलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर त्याला विश्वस्त व पुजारी पुष्पहार घालतात व खारीक-खोबरे खाऊ घालतात. नंतर माउलीच्या अश्वाच्या मागे स्वाराचा अश्व अशी दौड होते आणि तीन ते पाच फेऱ्यांनंतर अश्वाचे रिंगण पूर्ण होते.

माउली ज्ञानोबाराय आणि जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळयाचे मार्ग वेगवेगळे असतात. या दोन्ही पालखी सोहळयामध्ये एकूण तीन उभी व चार गोल रिंगणे होतात. माउलींच्या पालखी सोहळयाचे रिंगण तरडगाव (चांदोबाचा लिंब), माळशिरस (सदाशिवनगर आणि खुडूस), उघडेवाडी (ठाकूरबुवा रिंगण) या ठिकाणी होते. भंडीशेगावच्या विस्तृत मैदानात माउलींचे उभे आणि अखेरचे गोल रिंगण होते.

आळंदी ते पंढरपूर मार्गातील माउलींच्या पालखी सोहळयाचे अठरा दिवसांचे स्वरूप ढोबळमानाने असे आहे. पालखी मुक्काम स्थळाहून निघण्यापूर्वी रोज पहाटे माउलींच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा केली जाते. पंचामृत स्नान व अभिषेक केला जातो. नैवेद्य दाखविल्यानंतर आरती करण्यात येते. त्यानंतर 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु' ही प्रार्थना व शेवटी पसायदान होऊन शितोळे सरकारांचा नैवेद्य दाखविला जातो. माउलींचा अश्व व स्वाराचा अश्व यांनी नमस्कार केल्यानंतर पालखी निघण्याची वेळ होते. ते सर्व वारकऱ्यांना कळावे यासाठी दहा मिनिटांच्या अंतराने एक असे तीन कर्णे होतात. पहिला कर्णा झाला की वारकरी निघण्यासाठी आवराआवर करतात. दुसरा कर्णा झाला की ते आपापल्या दिंडीत सामील होतात. तिसरा कर्णा झाल्यावर पालखी सोहळा मार्गस्थ होतो.

पालखी सोहळयातील प्रत्येक दिंडीला क्रमांक दिलेले असतात. काही दिंडयांना रथाच्या पुढचे, तर काही दिंडयांना रथाच्या मागचे क्रमांक असतात. या सर्व दिंडया आपापल्या क्रमांकानुसार शिस्तीने पालखी सोहळयात वाटचाल करीत असतात. प्रत्येक दिंडीत अग्रभागी पताकाधारी झेंडेकरी, त्यांच्यामागून टाळकरी, दिंडीच्या मध्यभागी मृदुंगवादक, नंतर वीणेकरी व त्यांच्यापाठीमागून तुळशी वृंदावन अथवा पाण्याचा हंडा घेऊन महिला चालत असतात. या दिंडीतील सर्व जण स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन करतात.

मार्गाने वाटचाल करताना दिंडीत म्हणावयाच्या अभंगांचाही क्रम ठरलेला असतो. ज्ञानोबा-तुकाराम अशा गजरात वीणेकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीच्या वाटचालीला सुरुवात होते. यानंतर वीणेकरी 'जय जय रामकृष्णहरी' हे भजन म्हणतात. मग 'रूप पाहता लोचनी' हा अभंग घेतला जातो. मंगलाचरणाचे अभंग, काकड आरतीचे अभंग, भूपाळया, वासुदेव, आंधळे, पांगळे, जोगी, बाळछंद, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी दिंडीत म्हटले जातात.

साधारणपणे चार-पाच किलोमीटर अंतर कापल्यानंतर दिंडी पहिला विसावा घेते. सुमारे अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा चार-पाच किलोमीटर अंतर कापल्यावर भोजनासाठी पालखी सोहळा थांबतो. माउलींना नैवेद्य दाखविल्यानंतर वारकऱ्यांचे भोजन होते. मग थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी सोहळयाची पुढची वाटचाल सुरू होते. या भोजनानंतरच्या वाटचालीत म्हणावयाचे अभंगदेखील ठरलेले असतात. गुरुपरंपरेचे अभंग, प्रत्येक वारांचे अभंग, मालिकेतील निवडक अभंग या वेळी म्हटले जातात. प्रत्येक फडाची भजनी मालिका ठरलेली असते. या मालिकांप्रमाणेच अभंग आणि भजन दिंडीत घेतले जातात. मुक्काम गाठण्यापूर्वी माउलींचा हरिपाठ घेतला जातो. 'ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान। समाधी संजीवन हरिपाठ॥' हा चरण झाल्यानंतर वारकरी भूमीला स्पर्श करून माउलीला वंदन करतात आणि मग दिंडयांची पालखी तळाकडे वाटचाल होते. पालखी तळावर सायंकाळी समाज आरती होते. आरतीसाठी सर्व दिंडया वर्तुळाकार रचनेत उभ्या राहतात. मग 'ज्ञानोबा-तुकाराम' हे भजन होते. जेव्हा पालखी तळावर माउलींची पालखी येते, तेव्हा चोपदार आपला चांदीचा चोप उंच करून 'होऽऽ' अशी ललकारी देतो आणि मग सर्वत्र शांतता पसरते. मात्र एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल, तर ती दिंडी आपले टाळ थांबवीत नाही. मग चोपदार त्या दिंडीजवळ जातात व त्या तक्रारीचे यथायोग्य निवारण करतात.

रात्रीच्या जेवणानंतर तळावर माउलींच्या पालखीसमोर कीर्तन असते. या कीर्तनाचा मान वेगवेगळया फडांकडे असतो. रोज ठरलेल्या फडकऱ्यांचे कीर्तन होते. कीर्तन संपल्यावर माउलींच्या पादुकांची पूजा आरती होते. कीर्तनानंतर रात्रौ तळावर जागर असतो. वेगवेगळया फडातील मानकरी अगदी पहाटेपर्यंत हा जागर घालतात. त्यांची ही जबाबदारी ठरलेलीच असते.  मग दुसऱ्या दिवशीसुध्दा असाच नित्यक्रम असतो.

 पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून सातारा जिल्ह्यात पालखीचा प्रवेश होतो. नीरा नदी येथे आल्यावर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येते. हा सोहळा अगदी आनंदमय असतो व परतीच्या वाटेवरही माउलींना हे नीरा स्नान घातले जाते. सातारा जिल्हा म्हणजे हैबतबाबांची भूमी होय. त्यामुळे माउलीला येथे पुरणपोळीचा पाहुणचार करण्यात येतो. वाजतगाजत पुरणपोळीचा नैवेद्य माउलींना दाखविण्यात येतो. फलटण येथे आगमन झाल्यावर अगदी शाही थाटात माउलींचे स्वागत केले जाते व तोफांची सलामी देण्यात येते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असतात आणि रस्त्यांवर सुंदर रांगोळयाही काढलेल्या असतात. पुष्पवृष्टी करून व गुलाबपाण्याचा शिडकावा करून माउलींचे स्वागत केले जाते. नंतर माउलींची पालखी खेळविण्याचा कार्यक्रम येथे होतो. वारकऱ्यांच्या आनंदाला उधाणच येते आणि टाळमृदुंगाच्या साथीने त्यांचे विविध खेळ येथे रंगतात. माउलींच्या विसाव्यासाठी येथे भव्य शामियाना उभारलेला असतो. पालखी वेळापूरच्या अलीकडे अाल्यावर पालखी सोहळयातील रथाच्या पुढील तिसऱ्या क्रमांकाच्या शेंडगे दिंडीला भारूड सादर करण्याचा मान दिला जातो. भारूड हे प्रबोधनाचे अस्त्र आहे. अगदी हसतखेळत विनोदी टिप्पणी करीत या भारुडातून समाजजागृती केली जाते. या माळावर ठिकठिकाणी अनेक कलाकार भारूड, जोगवा, गोंधळ आदी लोककलांचे सादरीकरण करतात. या लोककलांतून अनिष्ट प्रथा आणि अंधश्रध्दा यांच्यावर कठोर प्रहार केले जातात व निर्मळ भक्तीचा झरा फुलविला जातो.

वेळापूरपासून पंढरपूरचे अंतर अवघे 45 किलोमीटर आहे. जेव्हा तुकाराम महाराजांना पंढरीरायाचा कळस दिसला, तेव्हा ते विठ्ठलाच्या ओढीने मंदिराकडे धावतच निघाले होते. हीच परंपरा जपत आज वारकरीसुध्दा येथील उतारावरून पंढरीच्या दिशेने धावा करतात.

पुढे ठाकूरबुवांच्या समाधीजवळ रंगणारा उडीचा खेळ वारीतील अत्यंत रोमहर्षक प्रसंग असतो. मध्यभागी पालखी ठेवल्यानंतर भोवती मानाच्या दिंडीतील टाळकरी, मृदुंगवादक आणि विणेकरी जमतात. टाळ, मृदुंग आणि वीणा या तिन्ही वाद्यांची येथे अनोखी जुगलबंदीच सादर होते. या खेळात चोपदार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या इशाऱ्यावरच विविध वादकांचे वादन होत असते. येथे रंगणारा उडीचा खेळ वारीत ओतले जाणारे चैतन्यच होय. एकात्मता आणि सामरस्याचा भक्तिभाव येथे दृष्टीस पडतो.

तोंडले बोंडले येथे वारकऱ्यांना विविध धान्यांची भाकरी, जवसाची चटणी, शेंगदाण्यांची चटणी, ठेचा, पिठले अशी अनोखी मेजवानी देण्याची प्रथा आहे. वाटचालीत देहाला जे काही परिश्रम होतात ते अशा प्रेमळ पाहुणचाराने विसरायला होतात व ही चटणी-भाकरी मेव्यापेक्षाही गोड लागते. याच तोंडले बोंडलेच्या पुढच्या टप्प्यात संत ज्ञानेश्वर माउली आणि संत सोपानदेव यांच्या पालखीची बंधुभेट होते. दोन्ही पालख्यांच्या सोबत असलेले वारकरी एकमेकांची गळाभेट घेतात, एकमेकांना मानाचा नारळ देतात. ही बंधुभावाची प्रथा या पालखी सोहळयात जोपासली जाते.

संत नामदेव महाराज वाखरीत येऊन तेथे जमलेल्या सर्व संतमहंतांना आषाढी एकादशीसाठी पंढरीत येण्यासाठी प्रेमाचे निमंत्रण देत असत. नामदेव महाराजांच्या पालखीच्या वतीने तीच परंपरा जपली जाते व महाराजांचे वंशज सर्व संतांच्या पालख्यांचे स्वागत करून त्यांना प्रेमादराचे निमंत्रण देतात. वाखरीचा पूल ओलांडला की भाटे यांच्या फुलांनी सजविलेल्या लाकडी रथात माउलींची पालखी विराजमान होते. हा रथ ओढून नेण्याचा मान वडार समाजाला मिळालेला आहे. माउलींच्या जागी कोणताच भेदभाव नसल्याचा संदेश या निमित्ताने दिला जातो. पंढरपूरजवळील इसबावीपासून पंढरीपर्यंत माउलींच्या पादुका गळयात मिरवत घेऊन जाण्याचा मान या सोहळयाला राजाश्रय देणाऱ्या श्रीमंत शितोळे सरकारांच्या घराण्याला मिळालेला आहे. त्यांचे वंशज ही प्रथा आजही मोठया भक्तिभावाने पार पाडतात.

एवढा मोठया संख्येने समाज एकत्र येणार म्हणजे मलमूत्रविसर्जनाची समस्याही निर्माण होणारच! अलीकडे 'निर्मल वारी' उपक्रमातून या समस्येचीही सोडवणूक होताना दिसते. उघडयावर शौच करण्याऐवजी बंदिस्त संडासांची सोय निर्मल वारी उपक्रमातून करून दिली जात आहे.

सर्वच दिंडयांचे आणि पालख्यांचे मुक्काम पंढरपुरात आषाढ शुध्द दशमी ते चतुर्दशीपर्यंत असतात. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात काला करून दिंडया परतीच्या वाटेला लागतात. मात्र बहुतांश वारकरी द्वादशीच्याच दिवशी आपापल्या गावच्या वाटेने निघतात. पण वीणेकरी आणि काही टाळकरी परतीच्या वाटचालीत सहभागी होतात. आषाढ शुध्द पौर्णिमा ते आषाढ वद्य दशमीपर्यंत परतीची वारी असते. ज्याला ही वारी घडली तो प्रत्येक वारकरी पांडुरंगाजवळ एकच मागणे मागतो -

हेचि व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास॥

पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥

संतसंगे सर्वकाळ। अखंड प्रेमाचा सुकाळ॥

चंद्रभागे स्नान। तुका मागे हेचि दान॥

9594961864