वारी चुकू नेदी हरी

विवेक मराठी    05-Jul-2017
Total Views |


'पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थ व्रत' असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. पिढयानपिढया पायवारीची परंपरा असणारी असंख्य वारकरी कुटुंबे महाराष्ट्रात आहेत. पंढरीची आषाढी वारी आणि सावळा विठोबा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. या संचिताने महाराष्ट्र घडवला आणि जगण्याची उमेदही दिली. युगानुयुगे विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंग परब्रह्माशी एका वारकऱ्याने केलेले हे हितगुज.

आषाढीची वारी... तुझ्या पंढरीची यात्रा. तुझ्या भक्तीचा कल्लोळ. असाही तू नेहमीच स्वतःला कोलाहलात सामावून घेणारा. सर्वात असून ही कोठेही नसणारा. निर्विकार... पायाखालच्या विटेची झीज झाली, तरीही तू अजून तेथेच उभा. युगे अठ्ठावीस एका जागी उभा राहूनही तू श्ािणला नाहीस. बाबा सांगायचे, अठ्ठावीस युग म्हणजे तरी काय? ते म्हणायचे, ''चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे व्यापून उरला तो हा हरी... पंढरीत उभा आहे, आपल्या भक्ताच्या काजासाठी कधी बाप बनून, तर कधी विठाई माउली बनून. आपल्या नेत्रातून भक्तमात्राकडे प्रेमळ कटाक्ष टाकत उभा आहे. त्याला शिणभाग नाही. तो कायम वाटेकडे डोळे लावून असतो वारकऱ्याच्या. वाखरीत वारीची पताका हलली की तो उल्हासित होते आणि मग कटीवरचे हात सोडून तोही सिध्द होतो आपल्या भक्ताची गळाभेट घेण्यासाठी.''

असेही तू जगाचा बाप म्हणून मान्य झाला आहेस. जन्मदात्या बापाशी जे गुज करता येत नाही, ते सारे गुज तुला न सांगताही कळते, असा पूर्वसुरींचा अनुभव. तुझ्यापुढे यावे, मनाची घालमेल मांडावी आणि मंदिराच्या बाहेर पडता पडता वेगळी तकाकी मिळावी, दिशा दिसावी, अशी कोणती जादू आहे तुझ्याजवळ? कोणते चेटूक आहे आत्मसात तुला की साऱ्यांना पडावी भुरळ? आणि तहानभूक हरपून ओढ लागावी पंढरीची? तुझ्या ध्यास तनामनात रुजावा आणि मग पावले पडावीत वारीच्या मार्गावर, अशी कोणती चुंबकीय शक्ती आहे तुझ्या ठायी? तुझ्या या चुंबकीय शक्तीचे वर्णन नाथबाबांनी केले आहे - 'भूत जबर मोठं ग बाई!' तू झपाटतोस साऱ्यांना आणि लागून राहतो तुझ्या नावाचा टकळा. जणू तूच करत असतोस सहज संवाद आणि जगत असतोस झपाटलेल्या झाडातून. तुझ्या अशा बाधेमुळे देव आणि भक्त यांच्यातील सीमारेषाच पार पुसून जाते आणि मग तू तू उरत नाहीस आणि भक्त भक्त उरत काही. 'ऐसा समरस झालो, तेथे देवच होऊनी ठेलो'. किती समरस होतोस आपल्या भक्ताशी. बडव्यांनी चोखोबाच्या पाठीवर लाठया चालवल्या, पण वळ मात्र तुझ्या पाठीवर उठले. सावता माळयाशी तू इतका समरस झालास की नामदेवालाही शोधून सापडला नाहीस. जनाईचे दळण दळताना तू श्रमला नाहीस की गोरोबासंगे चिखल तुडवताना तू दमला नाहीस. ही भावस्थिती कशामुळे येते? केवळ तुझ्या स्मरणाने, की चराचरात तुझा शोध घेतल्याने? असेही तू असतोस आणि नसतोस पंढरीत. तू तर जन्मजात भटका. जिथे वैष्णवाचा मेळा, तिथे तू. म्हणूनच असे म्हणतात की आषाढीच्या वारीत तू नसतोस मंदिरात; फिरत असतोस वारकऱ्यांच्या फडातून. गात असतोस तुझेच भजन तल्लीन होऊन आणि ऐकतोस कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात. तुझी वारी - जन्मोजन्मीच्या पुण्याईचे प्रतीक. 'पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थ व्रत' अशी ग्वाही संतांनी दिली ती तुझ्यावरच्या दृढविश्वासामुळेच 'एकची निधान पांडुरंग' अशा विश्वासाला अधिक सुदृढ करण्याचे काम करत असते तुझी वारी. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री एकादशी म्हणजे तुझ्या भक्तांचा कुंभमेळा. लाखो भक्त येतात आणि तुझ्या दर्शनमात्रे सुखी होतात. भवतापाचा विसर पडतो तो केवळ तुझे गोजिरे रूप नजरेस पडल्यामुळेच. 'शीण गेला भाग गेला, तुझे पाहता विठ्ठला' अशी अनुभूती लाभते ती तुझ्या सान्निध्यातच. तू चराचरात व्यापून उरला आहेत, म्हणूनच की काय, तुझ्या सहवासासाठी संतसंगाची अपेक्षा केली जाते. वारीत हा संग मिळतो आणि तुझ्यासोबत चालल्याचा आनंदही मिळतो. 'पायी हळूहळू चाला मुखाने हरीनाम बोला' असे जरी वारकरी म्हणत असले, तरी त्यांनाही तुझ्याइतकीच अनावर ओढ असते भेटीची. वारीच्या प्रत्येक मुक्कामानंतर तू आता लवकर भेटणार आणि तुला डोळे भरून पाहता येणार, तुझ्या चरणाच्या अबीर-बुक्का भाळी लावता येणार ही आस मनात ठेवून वारकरी चालतात. मुखात तुझे नाम आणि पायात गती यांचा मेळ साधत वारी चालत राहते.

संतांनी तुला 'लावण्याचा पुतळा' म्हटले, 'राजस सुकुमार' म्हटले, 'कैवल्यनिधान' म्हटले, 'चैतन्याचा गाभा' म्हटले... किती वर्णन केले तुझे? तरीही तू या साऱ्या वर्णनापलीकडचा आहेस. खऱ्या अर्थाने तू शब्दात सापडत नाहीस, निसटून जातोस शब्दात मांडण्याआधीच. तरीही मोह होतोच तुला शब्दात बांधण्याचा अनेकांना. तूही आपली लडिवाळ रूपे दाखवून भक्ताला भुरळ घालतोसच की. 'सावळया हरीचे वेड मला भारी' हे वेडच तुला साकार करण्यास भाग पाडते. खरे तर तू भावभक्तीचा भुकेला. तुला नवस नाही, सायास नाही, पूजा नाही, प्रसाद नाही. फक्त तुझ्या गाभाऱ्यात येऊन तुला डोळे भरून पाहायचे आणि डोळयावाटे तुला अंतःकरणात साठवून घ्यायचे, एवढेच एक नित्यकर्म आणि हाच तुझ्या भक्ताचा कुळधर्म. तुला मनापासून नमस्कार केला, तरी तू प्रसन्न होतोस. 'सुखे येतो घरा नारायण' हा निर्वाळा यामुळेच मिळाला आहे. भावभक्तीने तू प्रसन्न होतोस आणि भक्ताचे कल्याण करतोस. भक्तासाठी श्रमतोस.

तुझ्याएवढाच तुझ्या पंढरीचा महिमा अगाध. तिचा महिमा काय सांगावा? जेव्हा चराचर नव्हते, तेव्हा पंढरपूर होते. जेव्हा गंगा-गोदा नव्हत्या, तेव्हा चंद्रभागा भक्ताची तहान भागवत होती. इतके पुरातन माहात्म्य तुझ्या पंढरीचे. तू रुसलेल्या रखमाईला शोधायला द्वारकेतून दिंडीरवनात आलास आणि पुंडलिकाच्या सेवाभक्तीला भुललास. त्याच्या भेटीसाठी आतुर झालास. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर तू तेव्हापासून उभा. आपल्या भक्ताची वाट पाहत. 'भावभक्तीचा भुकेला' असे तुझे वर्णन साधुसंतांनी केले आहे. भक्ताच्या भेटीची तुला अनावर भूक आहे आणि त्यासाठी तू कधी कधी मंदिरातून फरार होऊन भक्तात रमतोस, अशा कथाही प्रसिध्द आहेत तुझ्या नावावर. पंढरी... चंद्रभागा वाळवंट... गोपाळपुरा या साऱ्याच ठिकाणी तू असतोस आपल्या भक्तासोबत रमलेला. ज्याचा जसा भाव, त्याचा तसा देव हे तू दाखवून दिलेस नरहरी सोनाराला शिवरूपात दर्शन देऊन. असेही तुला संतांनी 'खेळिया' म्हटलेच आहे. गोकुळातील बाललीला तू पंढरीतही करतोस आणि गोपाळपुऱ्यात दहीहंडीचा काला करतोस आणि दहीभाताची उंडी एकमेकांच्या तोंडी भरवताना समतेचा गजर करतोस. अवघी पंढरी समतापीठ होऊन जाते. भेदविरहित जगण्याचा आदर्श तुझ्या पंढरीतून प्रसृत होतो. 'या रे या रे लहान थोर' अशी हाकाटी पिटत तू उभा आहेस. तुझ्या चरणाशी जसा कोणताही भेदभाव नाही, तसा तुझ्या पंढरीतही नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्ताला सामावून घेण्यास पंढरी नेहमीच तयार असते. चंद्रभागेच्या वाळवंटात विसावलेली वैष्णवाची मांदियाळी याणि भगव्या पताकाची रीघ पाहून तूही तृप्त होतोस.

वाखरीत पालख्या आल्या की मंदिरातील विठू शिखरावर चढून पालख्यांची वाट पाहतो, असे म्हणतात. तुझ्या बाबतीत ते खरे असेल. तसा तू नेहमीच आतुर असतोस भक्ताच्या भेटीला आणि भक्तही तुझ्या भेटीसाठी आतुर. असे असले, तरी काही अवखळ भक्त तुझ्या गाभाऱ्यात येत नाहीत. शिखर दर्शन आणि नगर प्रदक्षिणा झाली की पुरे. त्यांना तुझे मुखदर्शन नको असते. कारण तू असतोस त्यांच्या अंतरंगात वास करून. सदासर्वदा ज्याची साथसोबत आहे, त्याला कशाला भेटायला हवे, नाही का? तर असा तुझा वारी सोहळा, जो शब्दात मांडता येत नाही. तो तर केवळ अनुभूती घेण्याचा, जगण्याचा विषय. तुझा ज्याला लळा लागतो तो तुझ्यासाठी वेडापिसा होतो. तुझ्यासारखाच तू नाही का वेडा होत भक्तासाठी? तुझेच लागीर झालेले असते भक्ताला. आणि म्हणूनच तो वारीत नाचतो, गातो आणि स्वतःला विसरून जातो. मात्र एक गोष्ट तो कधीच विसरत नाही, ती म्हणजे 'पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी' हाच भाव मनात ठेवून तो वारीत येतो आणि तुझ्या चरणी वारीत खंड पडू न देण्याचे मागणे मागतो. बाकी त्याला काही नको असते. तूही मुखावर स्मितहास्य आणून 'तथास्तु' म्हणतोस.

9594961860