क्रिसेंट विरुध्द क्रॉस

विवेक मराठी    01-Aug-2017
Total Views |


भाग - 2

क्रिसेंट विरुध्द क्रॉस हा संघर्ष पूर्वीच्या भाषेत सांगायचे तर, क्रुसेड्स विरुध्द जिहाद असा झालेला आहे. जे देश मुस्लीमबहुल आहेत, त्या देशांत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नाटो संघटनेचे अन्य देश काही ना काही निमित्त शोधतात आणि कधी लिबियावर, तर कधी सीरियावर, तर कधी इराकवर आकाशातून आगवर्षाव करतात. त्याचा बदला घेण्यासाठी आत्मघातकी जिहादी युरोपच्या भूमीवर जाऊन हल्ले करतात.

ध्यपूर्वेतील इस्लामी देशांतील संघर्षाला तीन आयाम आहेत. पहिला आयाम ख्रिश्चनिटी विरुध्द इस्लाम असा आहे. दुसरा आयाम शिया विरुध्द सुन्नी असा आहे आणि तिसरा आयाम युरोप, अमेरिका यांच्याकडून मध्यपूर्वेतील देशात आपल्याला अनुकूल सत्ताधीश बसविण्यासाठी कटकारस्थाने केली जातात याविरुध्दचा आहे. या लेखात पहिल्या आयामाचा थोडा धावता परिचय करून द्यायचा आहे. पुस्तकात वेगळया प्रकरणात त्याची तपशीलवार माहिती वाचकांना वाचायला मिळेल.

मध्यपूर्वेतील जेरुसलेम हे ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान या तिघांचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक शहर आहे. मुसलमानांसाठी मक्का-मदिना ही दुसरी दोन शहरे आहेत. जगभरातील ख्रिश्चन आणि ज्यू जमातीसाठी जेरुसलेम एकमेव आहे. भारतीय धर्मात जे स्थान काशीचे (वाराणसीचे), ते स्थान सेमेटिक धर्मात जेरुसलेमचे आहे. या जेरुसलेमवर आपला ताबा राहावा, असा तिन्ही धर्मीयांचा प्रयत्न असतो. इस्लामी खिलाफतीच्या काळात जेरुसलेम मुसलमानांच्या ताब्यात गेले. ते परत मिळविण्यासाठी युरोपमधील ख्रिश्चन सत्तांनी क्रुसेड्स काढली. कु्रसेड म्हणजे धर्मयुध्द. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविण्यात आले, त्या जागी चर्च आहे. जगातील सर्व ख्रिश्चन या चर्चमध्ये धार्मिक यात्रेसाठी जातात. महम्मद पैगंबर यांना देवदूताने एका रात्री स्वर्गात नेऊन परत आणले. ज्या स्थानावरून महम्मद पैगंबर स्वर्गात गेले, ते स्थानही तिथेच आहे. ज्यू धर्मीयांचे प्राचीन मंदिरही तिथेच आहे. ते उद्ध्वस्त झालेले आहे. त्याची मोठी भिंत तिथे उभी आहे. तिला 'दु:खाची भिंत' असे म्हणतात. ज्यूदेखील या भिंतीच्या दर्शनासाठी जातात. आज  जेरुसलेम ज्यूंच्या ताब्यात आहे, म्हणजे इस्रायलच्या ताब्यात आहे आणि ती इस्रायलची राजधानी आहे. जगातील अनेक देशांनी या राजधानीला मान्यता दिलेली नाही. जेरुसलेम परत मिळविणे हा अरबस्थानातील अरबांचा ध्यास आहे.

इतिहासात मागे गेले असता मुसलमानांच्या तावडीतून जेरुसलेम मुक्त करण्यासाठी एकूण बाराहून अधिक क्रुसेड्स झाली. त्यातील पहिली चार क्रुसेड्स अत्यंत महत्त्वाची समजली जातात. युरोपातून ख्रिश्चन सेना भूमध्य समुद्र पार करून जेरुसलेम जिंकण्यासाठी येत. प्रदेश जिंकण्याची ही मोहीम अनेक वर्षे चाले. त्यात आजचा सीरिया, इजिप्त, लेबनॉन असे सर्व भू-प्रदेश येतात. प्रदेश जिंकला की ख्रिश्चनांची जनसंख्या वाढत जाई. मुस्लीम सत्तांनी या कु्रसेड्सविरुध्द जिहाद पुकारला. त्यांची सत्ता जेव्हा येई, तेव्हा मुसलमानांची संख्या वाढत जाई. हा संघर्ष 12व्या शतकापर्यंत चालला. नंतर युरोपने तो सोडून दिला. या युध्दात आपली शक्ती वाया घालविण्याऐवजी त्यांनी समाजसुधारणा, राजकीय सुधारणा, वैज्ञानिक प्रगती, नवीन भू-प्रदेश शोधून काढणे, वसाहती निर्माण करणे यावर आपले लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. परंतु इतिहासातील क्रुसेड्स विरुध्द जिहाद याच्या आठवणी लोक काही विसरले नाहीत. आजही जो संघर्ष चालू आहे, त्याचे वर्णन करताना पाश्चात्त्य विचारवंत शब्दप्रयोग करतात - 'क्रिसेंट विरुध्द क्रॉस'. क्रिसेंटचा अर्थ होतो चंद्रकोर आणि क्रॉसचा अर्थ सर्वांना माहीत आहे.

शतके जशी उलटत गेली, तशी पाश्चात्त्य संस्कृती अधिक प्रगत होत गेली. युरोपने आणि अमेरिकेने बायबलच्या आधारावर लोकशाहीचा विकास जरी केलेला असला, तरी ऐहिक जीवनातून बायबल वेगळे केले. धर्मसत्ता वेगळी आणि ऐहिक सत्ता वेगळी, अशी त्यांनी एक सीमारेषा आखून घेतली. युरोपीय माणसाला धार्मिक जाचातून मोकळे केले आणि त्याच्यातील शक्तींचा विकास करण्याची त्याला पूर्ण संधी दिली. युरोपने धर्मसत्तेतून माणूस मोकळा केला. इस्लामी अरब सत्तेने किंवा खिलाफतीने धर्मसत्तेच्या आधारे माणूस चिरडून टाकला. इथूनच या दोन संस्कृतींचा संघर्ष सुरू झाला. सॅम्युएल हंटिग्टनने त्याला 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' म्हटले. तसा त्यांनी मोठा ग्रंथ लिहिला.

अरब मुस्लीम देश व त्यांतील मुस्लीम धर्मगुरू म्हणजे मुल्ला, मौलवी हे सर्व पाश्चात्त्य रितीरिवाज, पाश्चात्त्य संगीत, पाश्चात्त्य खाद्यसंस्कृती, पाश्चात्त्य शिल्पशास्त्र - थोडक्यात, जे जे पाश्चात्त्य त्याचे कडवे विरोधक झालेले आहेत. ते उघडपणे म्हणतात की, 'पाश्चात्त्य लोकशाही वेश्या आहे. तिचा आम्हाला उपयोग  नाही. सेक्युलॅरिझम अत्यंत वाईट संकल्पना आहे. मनुष्याला कायदे करण्याचा अधिकार नाही, कायदे करण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला. परमेश्वराचे कायदे कुराणात आहेत. कुराणाने सांगितलेली शासनव्यवस्था, समाजव्यवस्था हीच जगाला आदर्श व्यवस्था आहे.' मध्यपूर्वेत थैमान घालणाऱ्या इसिसचे हे थोडक्यात तत्त्वज्ञान आहे. इराणमधल्या अयातुल्ला खोमेनी याचेदेखील हेच तत्त्वज्ञान होते. अयातुल्ला खोमेनी याने 1979 साली इराणमध्ये इस्लामी क्रांती केली. इस्लामी क्रांती याचा अर्थ आम्हाला लोकशाही नको, आम्हाला सेक्युलॅरिझम नको, आम्हाला मूलभूत अधिकार नको, आम्हाला स्त्री स्वातंत्र्य नको. आम्ही आमचा देश कुराणाप्रमाणे चालवू. 1979 सालापासून आजपर्यंत इस्लाम खोमेनी मार्गाने चाललेला आहे. इराणमध्ये राजा रेझाशाह पहेलवी याने पाश्चात्त्यीकरण करण्याचा 40 वर्षे प्रयत्न केला. राजधानी तेहरानमध्ये पाश्चात्त्य धर्तीच्या इमारती बांधल्या. 1979 सालापर्यंत शहरातील इराणी स्त्रिया पाश्चात्त्य पोषाखात फिरत असत. आज या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम चालू आहे आणि स्त्रिया बुरख्यात गेल्या आहेत. इराणी लोकांनाच जर हे सर्व मान्य असेल, तर त्याविरुध्द तक्रार करणारे आपण कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो. अमेरिकेला तो पडत नाही. अमेरिका म्हणते की, 'जगातील सर्वात धोकादायी इस्लामी देश जर कोणता असेल तर तो इराण आहे.' थोडक्यात पाश्चात्त्य संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांच्यातील हा संघर्ष अतिशय रक्तरंजित आहे.

हा संघर्ष केवळ मध्यपूर्वेत चालतो असे नाही, तर तो युरोपच्या भूमीतही जाऊन पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या जिहादी बाँबहल्ल्याने सारे जग हादरले. यापूर्वी इंग्लंडवर भुयारी रेल्वे मार्गात बाँबस्फोट झालेले आहेत. फ्रान्सच्या पॅरिस शहरात जिहादी हल्ले झालेले आहेत. स्पेन, स्वीडन या देशांतील शहरांतदेखील जिहादी हल्ले झालेले आहेत. रशियात जिहादी हल्ले होतात. क्रिसेंट विरुध्द क्रॉस हा संघर्ष पूर्वीच्या भाषेत सांगायचे तर, क्रुसेड्स विरुध्द जिहाद असा झालेला आहे. जे देश मुस्लीमबहुल आहेत, त्या देशांत अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नाटो संघटनेचे अन्य देश काही ना काही निमित्त शोधतात आणि कधी लिबियावर, तर कधी सीरियावर, तर कधी इराकवर आकाशातून आगवर्षाव करतात. त्याचा बदला घेण्यासाठी आत्मघातकी जिहादी युरोपच्या भूमीवर जाऊन हल्ले करतात. दोघेही जण आजची जागतिक भाषा वापरतात - अमेरिका आणि ब्रिटन म्हणतात, 'आमचा संघर्ष इस्लामशी नाही, इस्लामचे चुकीचे पालन करणाऱ्या लोकांशी आहे.' इस्लामी लोक म्हणणार, 'आमचा संघर्ष ख्रिश्चनिटीशी नाही, त्यांच्या राजसत्तेशी आहे.' भाषा कोणतीही वापरली तरी सत्य काही लपून राहात नाही. सत्य असे आहे की, मध्यपूर्वेतील आजच्या संघर्षाला इस्लाम विरुध्द ख्रिश्चनिटी असे जे रूप आहे, ते लपवून ठेवण्यात अर्थ नाही.

या संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नीट समजून घेतल्याशिवाय संघर्षाचे स्वरूप पूर्णपणे लक्षात येत नाही. क्रुसेड्स आणि जिहाद यामागचे तत्त्वज्ञान यासाठी जाणून घ्यावे लागते.

vivekedit@gmail.com