बिंबब्रह्माचे आणि वास्तुब्रह्माचे मर्मज्ञ अभ्यासक- डॉ. गो.बं. देगलूरकर

विवेक मराठी    21-Aug-2017
Total Views |


पुरातत्त्वशास्त्राला अनेक आयाम आहेत आणि यातल्या एकेका आयामासाठी, त्यातील सखोल संशोधनासाठी अवघं आयुष्य वेचणारे प्रतिभावंतही या महाराष्ट्रात आहेत. 'गाथा ऋषिमुनींची' या अनियमितपणे चाललेल्या लेखमालेतील तिसरा लेख आहे, मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी - डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्यावर. वारकरी परंपरेचा समृध्द वारसा लाभलेल्या देगलूरकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्यातल्या चिकित्सक, संशोधक वृत्तीला जोड मिळाली ती संतसाहित्याचं सिंचन झालेल्या संस्कारित मनाची आणि आध्यात्मिक वृत्तीची. यामुळे त्यांच्या संशोधनालाही एक वेगळं परिमाण लाभलं. त्यांच्या घराण्यातल्या पूर्वसुरींनी महाराष्ट्रात ईश्वरभक्तीचे मळे फुलवले, तर डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्र, मंदिरस्थापत्य यांचा अभ्यास करून इथल्या पुरातत्त्वशास्त्रात मोलाची भर घातली. मूर्तींकडे, मंदिरांकडे पाहायची नवी दृष्टी दिली. जी सर्वसामान्य माणसं ईश्वरभक्तीसाठी मूर्तिपूजेचा मार्ग चोखाळतात, त्यासाठी मंदिरात जातात त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचवण्यासाठी त्यांना समजतील अशा भाषेत त्यांनी लेख लिहिले, आकाशवाणीवरून भाषणंही दिली.

पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगातही ज्या डेक्कन कॉलेजचं नाव आदराने घेतलं जातं, त्या कॉलेजमधून डॉ. देगलूरकर यांनी पीएच.डी. केली, 1993पर्यंत तिथे अध्यापनही केलं. आणि या कॉलेजला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यावर पहिले कुलपती होण्याचा मान त्यांना मिळाला. दोन वेळा डी.लिट. ही सन्मान्य पदवी मिळवणारे ते डेक्कन कॉलेजमधले पहिले प्राध्यापक.

व्यक्ती जेवढी अधिकारी तेवढी ती विनम्र असते, असं म्हणतात. डॉ. देगलूरकर हे अशांपैकी एक! त्यांच्यातल्या चिकित्सक संशोधकाभोवती असलेलं भक्तिरसाचं आवरण त्यांच्या सहवासात आपल्याला शांतरसाची अनुभूती देतं. अशा या विद्वज्जनाशी झालेल्या संवादाची झलक वाचकांसाठी सादर करताना 'फोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही' अशी भावना आहे ...

क्तीचा, वारकरी संप्रदायाचा वारसा तुमच्या घराण्यात गेल्या 250 वर्षांपासूनचा. ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव अशा संतांच्या साहित्यावर तुमचं भरणपोषण झालं. भक्तीचं आणि आध्यात्मिक विचारांचं बाळकडू मिळालं. लाभलेल्या वंशपरंपरेने प्रवचनकार होणं हा सहजधर्म ठरला असता. मात्र असं असताना, मळलेली वाट सोडून तुम्ही संशोधक झालात. इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? तुमच्या घराने तुमच्यातल्या संशोधकाला काय दिलं?

आमच्या घराने माझ्यातल्या संशोधकाला वेगळी दृष्टी दिली, ही माझी मोठी मिळकत आहे. संतांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या विचारांचा आणि मूर्तिशास्त्र-मंदिरस्थापत्य यांचा परस्परसंबंध आहे का, हे तपासण्याची प्रेरणा मला माझ्यावर बालपणापासून झालेल्या संतसाहित्याच्या संस्कारांमुळे मिळाली. आणि त्यांच्यात परस्परसंबंध असल्याचा मला लागलेला शोध मनाला आनंद देऊन गेला.

बी.ए.ला असताना 'इतिहास' हा माझा विशेष विषय होता. एम.ए.लाही मी इतिहासाचा अभ्यास केला. पुढे नागपूर-औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात इतिहासाचं अध्यापनही केलं. मात्र तो विषय शिकवताना माझ्या असं लक्षात आलं की, हे एका अर्थाने एक ना धड भाराभर चिंध्या असं होतं आहे. म्हणजे असं की, पहिल्या तासाला भारताचा इतिहास शिकवायचा, दुसऱ्या तासाला इंग्लंडची राज्यघटना शिकवायची, तर तिसऱ्या तासाला अमेरिकेचा इतिहास शिकवायचा. एका विषयाला धरून त्याचा सखोल अभ्यास केला जात नाहीये. त्यामुळे एक प्रकारचा तोचतोपणा जाणवू लागला. आपण नवीन काही करतो आहोत असं वाटेना.

आधी उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी मी पुरातत्त्वशास्त्राकडे वळलो आणि मग या विषयात आपल्याला काही नवं संशोधन करता येईल या विचाराने अभ्यास सुरू केला. पुरातत्त्वशास्त्र घेऊन एम.ए. झालो. यामध्ये अभिलेखशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र, उत्खननशास्त्र या सगळयांचा अभ्यास होता.

डॉ. शांताराम भालचंद्र तथा शां.भा. देव हे माझे या विषयातले गुरू. त्यांनी मला सांगितलं, ''तुम्ही मूर्तिशास्त्र किंवा मंदिरस्थापत्य असे विषय एम.ए.ला शिकवायला घेत चला.'' त्यातून मग या विषयातली जास्त आवड निर्माण झाली. मुळातच वंशपरंपरेने माझी या विषयांशी नाळ जोडलेली होती, त्याविषयीची आवड रुजली होती, त्या आवडीलाच गुरूंच्या सल्ल्यामुळे खतपाणी मिळालं.

तुमच्या जडणघडणीत, तुमची दृष्टी विस्तारण्यात तुमच्या घराप्रमाणेच गुरू डॉ. शां.भा. देव यांचंही महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्याविषयी...

एका अर्थाने आज मी जो आहे, तो माझ्या गुरूंमुळेच आहे, असं मी म्हणेन. त्यांनी माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लावलं. माझे गुरू पुरातत्त्वविद् होते, डेक्कन कॉलेजचे ते संचालक होते. नागपूर विद्यापीठात याच विषयाचे प्रोफेसर होते. उत्खनन हाच त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय होता. उत्खननशास्त्रावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं. नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठात त्यांनी हा विषय सुरू करून दिला. त्यांच्यामुळे मी उत्खननाकडे वळलो, त्यावर वृत्तान्त लिहिले. जैन भिक्षुसंघासंदर्भात डॉ. देवांचा एक प्रबंध आहे. जैन धर्माच्या नसलेल्या व्यक्तीने त्या धर्माविषयी इतकं विस्तृत लिहिलं की जैन मंडळी त्यांना मानू लागली.

मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीबद्दलही तुम्ही काही वेगळा विचार मांडलात...

मूर्तींचा अभ्यास करताना लक्षात आलं की काही मूर्तींचा उलगडा नीटपणे झालेला नाही. या संदर्भात आमच्या संप्रदायाशी निगडितच उदाहरण घेता येईल, ते म्हणजे विठ्ठलाचं. 'विठ्ठलाची मूर्ती कशी आहे? केव्हाची आहे?' हे प्रश्न महाराष्ट्राला सतत पडत आलेले आहेत, त्यावर चर्चाही खूप झाल्या. 'आत्ता पंढरपुरी असलेली विठ्ठलाची मूर्तीच मुळापासून आहे का? की आक्रमणाच्या काळात आणखी कुठे नेली?' यावर पुण्यात विद्वानांच्या चर्चाही झाल्या आणि मी त्या अभ्यासाकडे वळलो. या अभ्यासाच्या वेळी अध्यात्माचा पाया असल्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मला त्या विठ्ठलमूर्तीच्या अभ्यासाचा ध्यास लागला. 'ती मूर्ती कशी आहे ते उलगडायला हवं. शास्त्राच्या दृष्टीने तिचा अभ्यास करायला हवा' असं वाटायला लागलं.

दलरी नावाचे एक फ्रेंच संशोधक होते. त्यांनी 'कल्ट ऑफ विठोबा' हा पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. त्या ग्रंथाचा आधार घेऊन शं.गो. तुळपुळे आणि अन्य काही विद्वानांनी वीरगळाचा विठ्ठल झाला अशी संकल्पना मांडली. तेही मला तितकंसं रुचलं नाही. पण जर समजा ही मांडणी योग्य असेल, तर मूर्तिशास्त्राच्या आधारे ते सिध्द व्हायला हवं. आणि तसं नसेल तर मुळात काय आहे, हे पाहिलं पाहिजे. त्या संशोधनात काहीतरी त्रुटी राहिली आहे हे माझ्या लक्षात आलं. ही मंडळी मूर्तिशास्त्राचे नाही, तर साहित्याचे अभ्यासक आहेत. म्हणून मी माझ्या शास्त्राच्या आधारे शोध घ्यायचा ठरवलं.

संशोधनाअंती मी असं अनुमान काढलं की, ती विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे. योग, भोग, वीर आणि अभिचारिक हे मूर्तीचे चार प्रकार असतात. पैकी भोग मूर्ती असते, ती ऐहिक प्राप्त करून देणारी - समृध्दी देणारी असते. जशी बालाजी-व्यंकटेशाची मूर्ती. वीर मूर्तीची उपासना सामर्थ्याचे उपासक करतात, जशी मारुतीची किंवा महिषासुरमर्दिनीची मूर्ती. योग मूर्ती भारतात उपलब्ध आहेत. विष्णूच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाची मूर्तीही योगशास्त्राप्रमाणे आहे. विठ्ठलाच्या या मूर्तीला दोनच हात आहेत. एका हातात शंख आहे, तर दुसऱ्या हातात कमळ आहे. म्हणजे गदा आणि चक्र ही शस्त्रं त्याच्या हातात नाहीत. कारण तो योगी आहे. 'चित्तवृत्ति निरोध:' असं पतंजलींनी म्हटलं आहे. योग करताना, छाती, मान आणि डोकं एका ओळीत पाहिजे. तेही विठ्ठलाच्या या मूर्तीचं आहे आणि ती मूर्ती उभी आहे, म्हणून तिला स्थानक म्हणायचं.

मग मी आणखीही काही गोष्टींवर विचार करायला लागलो. 'संतांची दृष्टी केवढी मोठी! पण कुठल्याच अभंगात याला योगमूर्ती म्हटलेलं नाही, मग तुम्हीच कसं म्हणता?' असं विचारायला लोकांनी सुरुवात केली. त्या दृष्टीने मी अभंग शोधायला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वरांच्या एका अभंगात तसा उल्लेख सापडला. ते म्हणतात,

ऐसा हा योगिराजु, तो विठ्ठल मज उजु

उजु म्हणजे आवडणे. हा योगिराज आहे म्हणून मला आवडतो, असं कोणी म्हणावं? तर स्वत: योगी असलेल्या ज्ञानदेवांनी. याशिवाय आणखी काय पुरावे सापडतात असा शोध घेताना, शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकामध्ये

महा योगपीठे, तटे भीमरथ्याम

वरं पुंडरिकाय धातुमुनिंद्रै

अशी सुरुवात आहे. म्हणजे, हे महायोगपीठ आहे. तिथे हा योगी विठ्ठल आहे. ज्ञानेश्वरही त्याला योगी म्हणतात. मग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. म्हणूनच विठ्ठलाचे परमभक्त हे निरिच्छ, संपत्तीचा मागे नसलेले, निर्मोही योगी आहेत असं आपल्याला दिसतं.

मंदिर म्हणजे समूहाने श्रध्दा प्रकट करण्याचं एक धार्मिक स्थळ, असं आपण मानतो. देवाचं दर्शन घेणं याला आपल्या दृष्टीने महत्त्व आहे. पण सर्वसामान्य माणसाच्या मनात दर्शन घेणं म्हणजे मूर्ती पाहणं, इतकाच मर्यादित अर्थ असतो..

मी मंदिराला सामाजिक संस्था मानतो. पूजेकरता, देवाचं मूर्त स्वरूप पाहण्याकरता आपण मंदिरात जातो हे तर खरंच आहे. कुठे निघालात? असं विचारल्यावर माणसं 'दर्शनाला' असं सहजपणे म्हणतात. हे दर्शन म्हणजे जी षट्दर्शनं सांगितली आहेत यापैकी एका दर्शनाचा मी पडताळा घ्यायला जातोय, असं मी मानतो. दर्शन शब्दाचा तो अर्थ अभिप्रेत आहे. ही षट्दर्शनं म्हणजे वेगवेगळया मार्गाने तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाणारी तत्त्वज्ञानं आहेत. तेव्हा तुम्ही मंदिरात जाता म्हणजे, त्या मूर्तीच्या द्वारे कोणत्या तरी एका प्रकारचं दर्शन तुम्हाला होणार असतं. म्हणून दर्शनाला जाणार असं म्हणतात.

काही उदाहरणं देतो. खजुराहोची मंदिरं म्हणजे संपरिपूर्ण परिष्कृतता म्हणजे रिफाईन्ड कम्प्लीटनेस असलेली अशी आहेत. त्या मंदिरांचं स्थापत्य वैशिष्टयपूर्ण आहे. अत्यंत प्रगतावस्थेतली ती मंदिरं आहेत. मंदिरांमध्ये जाताना पायऱ्या चढून जावं लागतं. या पायऱ्यांच्या बाजूला ज्या ओटयाच्या भिंती असतात, त्या भिंतींवर मनुष्य दिवसरात्र जितक्या क्रिया करतो, त्या सगळया कोरलेल्या आहेत. ही सगळी संसाराची चित्रं आहेत, ती सोडून वर जाता, म्हणजेच पायऱ्या चढून जाताना तुम्ही संसार सोडून पुढे जाता. पुढे गेलात की तुम्ही महामंडपामध्ये जाता. त्या मंडपामध्ये मायनर गॉड्स - ज्याला आम्ही शूद्र देवता (subordinate deities) म्हणतो - त्या असतात. तुम्ही संसार सोडून आला आहात तर टप्प्याटप्प्याने उन्नत अवस्थेकडे जाता. आणखी पुढे गेलात की तुम्ही अंतराळात जाता. अंतराळ म्हणजे सभामंडप आणि गाभारा यांना जोडणारं एक दालन. म्हणजे तुम्ही ना संसारात आहात ना परमार्थात... मध्यात पोहोचला आहात. आणखी पुढे गेल्यावर, गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गंगा-यमुना दिसतात. गंगा ही पावित्र्याची देवता, तर यमुना भक्तीची देवता आहे. थोडक्यात, देवाचं दर्शन घ्यायचं झालं तर तुम्हांला या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. ते जर तुमच्याजवळ असेल आणि तुम्ही त्या योग्यतेचे ठरलात, तर तुम्हाला देव दिसतो. देव दिसतो म्हणजे काय होतं? तर मूर्ती पाहून तुम्ही म्हणता, 'सोऽहम्'... म्हणजे 'मी तोच आहे'. त्या मूर्तीलाही माझ्यासारखेच कान, नाक, डोळे, हात, पाय आहेत. ही मूर्ती म्हणजे माझ्यासाठी सगुण साकार झालेलं ब्रह्म आहे. मी ते आहे, ते ब्रह्म आहे, म्हणजे मीही ब्रह्म आहे. एवढं ज्ञान झालं की 'तत्त्वमसि' ही अवस्था येते. 'आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत याची जाणीव करून देणं' हे देवळाच्या स्थापनेमागचं महत्त्वाचं एक कारण आहे.

खजुराहोच्या मंदिरांचा विषय निघाला आहे म्हणून एक प्रश्न विचारते. खजुराहोच्या मंदिरांमध्ये मिथुनक्रीडेत मग्न असलेली शिल्प§ आहेत, त्याचा अर्थ काय?

मी मघाशीच म्हटलं की मंदिर ही एक सामाजिक संस्था आहे. ज्या काळात ही शिल्पं निर्माण झाली त्या काळातील लोकांचं या संदर्भात शिक्षण व्हावं हा हेतू त्यामागे असू शकतो. स्त्रीपुरुषाचं मिलन हे आपल्याकडे निषिध्द मानलं गेलेलं नाही किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अतिशय मोकळा होता. आज समाजात शालेय स्तरावर मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जावं हा जो विचार पुढे येतो आहे, तो त्या काळात केला जात होता असं मानता येईल.

स्त्रीपुरुषांच्या मीलनाकडे ज्ञानेश्वरांनी अद्वैताचे प्रतीक म्हणून पाहिलं आहे, याची खजुराहोची मिथुनशिल्पं बघताना आठवण होते. ज्ञानेश्वर म्हणतात,

इये आलिंगनमेळी । आपोआप होय कवळी ।

जेथ जल जसे जळी । वेगळेची न दिसे ॥

म्हणजे, स्त्रीपुरुषांच्या मिलनाइतकं सहजपणे भक्त आणि देवांनी एकरूप व्हावं, म्हणजेच दोघांमध्ये अद्वैत निर्माण व्हावं हा विचार इथे व्यक्त केला आहे.

सुरसुंदरी हा तुमचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. विविध विभ्रम करणाऱ्या स्त्रियांची जी शिल्पं देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर आहेत, त्यामागे असलेला विचार तुम्ही उलगडून दाखवला आहे. मुळात सुरसुंदरीचा अर्थ काय?

सुरसुंदरी म्हणजे अप्सरा. देवळाच्या बाहेर त्या दाखवल्या आहेत, कारण लोकांना देवळापर्यंत आणायचं काम त्या करतात. त्या तुम्हाला मोहात पाडण्यासाठी नाहीत, तर मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. क्षिरार्णव तसंच शिल्पशास्त्र या ग्रंथात सुरसुंदरींचे प्रकार वर्णिले आहेत. त्यांचा अभ्यास करायला लागलो आणि अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

देवाकडे वा गुरूकडे जाताना तुम्ही रिक्तहस्ते जायचं नाही, अर्पण करण्यासाठी काहीतरी घेऊन जायला पाहिजे, अशी आपल्याकडे धारणा आहे. झाडाचं पान न्या, फूल न्या, फळ न्या... आणि हे काहीच मिळालं नाही तर पाणी तरी न्या, असं आपण म्हणतो. काही सुरसुंदरी अशा आहेत, पद्मगंधा - जिच्या हातात पुष्प आहे, जया - जिच्या हातात पाण्याचा कुंभ आहे, दालमलिका - झाडाचं पान वाहून नेणारी सुरसुंदरी आहे. देवळात गेल्यावर काय कराल, हे त्या सुरसुंदरी सुचवतात.

काही सुंदरी वाद्यं वाजवणाऱ्या आहेत. नृत्य करण्यात मग्न आहेत. यांचं प्रयोजन काय? देवळाच्या सभामंडपात गोलाकार जमीन असते, तिला रंगशिला म्हणतात. देवाची अंगभोग आणि रंगभोग अशी दोन प्रकारची पूजा करायची असते. अंगभोग म्हणजे आंघोळ घालणं, कपडे-दागिने घालणं, नेवैद्य दाखवणं. रंगभोग म्हणजे प्रवचन-कीर्तन-नर्तन-गायन हे देवाला अर्पण करणं. ही रंगशिला त्यासाठी असते. त्यावर उभं राहून या गोष्टी सादर करायच्या असतात. टाळ वाजवणारी, पखवाज वाजवणारी, नृत्य करणारी, बासरी वाजवणारी अशा या सुरसुंदरी आहेत. या कला देवाला अर्पण करण्यासाठी असतात, हे समजावं हे देवळावर असणाऱ्या या सुरसुंदरीचं प्रयोजन आहे. देवळात कसं जायचं, तिथे जाताना मनोवृत्ती कशी असावी हे काही सुरसुंदरी तुम्हाला सांगतात. त्या सुरसुंदरीला 'शुभगमना' म्हणतो. ती पायातला काटा काढत असताना दाखवली आहे. तुमच्या मनात जे विकार उत्पन्न होतात, ते काटा काढून टाकल्यासारखे मनातून काढून टाकून देवळात जायचं, असा त्यामागचा अर्थ आहे. एक शत्रुमर्दिनी आहे. तिच्या हातात एक तुटलेलं मुंडकं आणि एका हातात कटयार आहे. मनातले विकार तुटत नाहीत, ते तोडले पाहिजेत, मग देवळात जावं, असं ती सुचवते.

पुत्रवल्लभा म्हणून एक सुरसुंदरी आहे, जिला मातृमूर्ती म्हटलं जातं. तिच्या काखेत मूल असतं. देव आणि भक्त यांच्यात आई आणि मुलाचं नातं असतं, असं ती सुचवते.

त्यांच्यात एक पत्रलेखिका आहे. त्यामुळे ही अष्टनायिकांची शिल्पं आहेत की काय असं काहींना वाटतं. त्यावर माझं म्हणणं असं की, देवळावर अष्टनायिका असणार नाहीत. तुम्हाला ज्या गोष्टीकडे जायचं आहे, त्या गोष्टीला अनुरूपच तुमची दृष्टी असायला हवी. अष्टनायिकांमधल्या पत्रलेखिकेला 'विरहोत्कंठिता' म्हणतात. मात्र देवळातील पत्रलेखिका त्या प्रकारची विरहोत्कंठिता नाही; तर ज्ञानेश्वर विरहिणीमध्ये भक्ताची जी विरहावस्था दाखवतात, ती इथे अभिप्रेत आहे.

वास्तुब्रह्म आणि बिंबब्रह्म अशा दोन संकल्पना तुम्ही मंदिरं आणि मूर्तींच्या संदर्भात बोलताना मांडता. काय आहे त्यांचा अर्थ?

ज्या वास्तूत गेल्यावर ब्रह्माचं आकलन होतं, त्या वास्तूला मी 'वास्तुब्रह्म' म्हणतो. मंदिरांची वास्तुरचनाच अशी असते की ती तुम्हांला 'अहं ब्रह्मास्मि'पर्यंतचा प्रवास करायला लावते. आणि चरम प्रकारची म्हणजे उन्नत अवस्थेतली मूर्ती म्हणजे बिंबब्रह्म. बिंब म्हणजे मूर्ती. ब्रह्माचं ज्या मूर्तीमुळे आकलन होतं, अशी मूर्ती.

आम्हांला शिवाची चार पायांची एक मूर्ती मिळाली. याला आम्ही 'विलक्षण चतुष्पाद सदाशिव' असं म्हणतो. कारण तोंडं जास्त आहेत. त्याने दोन पाय सोडलेले आहेत आणि दोन पाय पद्मासनात आहेत.

दहाव्या शतकात शैव सिध्दान्ताचं अनुकरण करणारी माणसं मध्य प्रदेशात मोठया प्रमाणावर होती. शैव सिध्दान्त चार प्रमेयांवर आधारलेला असतो. चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद या चार पायांवर तो सिध्दान्त उभा आहे. मग त्यांना उपासना करण्यासाठी मूर्ती पाहिजे, म्हणून या मूर्तीची निर्मिती झाली. त्या काळातले मार्गदर्शक आणि मूर्ती घडवणारे शिल्पकार हे विलक्षण प्रतिभेचे लोक होते. त्यांनी पाद या शब्दाचा श्लेष करून मूर्तीला चार पाय दाखवले. आणि त्यावर शिवाची मूर्ती, म्हणजे चार प्रमेयांवर शैवसिध्दान्त आहे, असं सांगणारी ती मूर्ती आहे. हे म्हणजे अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान समूर्त करणं झालं. 'अतींद्रिय ते भोगवीन इंद्रियांकरवी', अर्थात 'जे अमूर्त आहे ते मी तुम्हाला इंद्रियांना जाणवेल असं दाखवतो,' असं ज्ञानेश्वर अध्यात्माच्या संदर्भात म्हणतात, तेच मी मूर्तिशास्त्राच्या संदर्भात म्हणतो. 'ब्रह्म अनादी, अनंत, अविभाजनीय असं असलं तरी त्याला मूर्तीच्या द्वारे आम्ही दृश्य करतो' हे तत्त्वज्ञान आपल्याला मूर्तीत आणता येतं.

शैव सिध्दान्त जे सांगतो, त्याचं जर तुम्ही अनुसरण केलंत तर तुम्हाला मोक्षप्राप्ती आहे. मी असं म्हणतो की ही मूर्ती म्हणजे शैव सिध्दान्ताचा फर्ॉम्युला आहे. तुम्ही या मूर्तीचं दर्शन घ्यायला गेलात की तुम्हाला शैवसिध्दान्त आठवतो आणि त्याचं अनुकरण करण्याची प्रेरणा मिळते. मी अशा मूर्तींना बिंबब्रह्म म्हणतो.

अशा अनेक मूर्ती आहेत. उदाहरणार्थ - अर्धनारीश्वराची मूर्ती आहे. आपण म्हणतो की ती स्त्री-पुरुषाची मूर्ती आहे, पण मी त्याला प्रकृती-पुरुषाची मूर्ती म्हणतो. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि पुरुष म्हणजे चैतन्य. निसर्ग आणि चैतन्य यांच्यामुळे चराचराची निर्मिती झाल्याचं दिसतं. अर्धनारीश्वराची मूर्ती ही त्याची मूर्ती आहे. काही जण याला अद्वैत तत्त्वज्ञानाची मूर्ती मानतात. मी आतापर्यंत 4/5 मूर्ती अशा पाहिल्या की ज्यातून तुमचं तत्त्वज्ञान समूर्त केलंआहे. अशा मूर्तींना मूर्तिशास्त्राचा अंतिम टप्पा मानतो.

आधी मूर्ती घडवल्या त्या अनेक हातांच्या, अनेक तोंडांच्या. त्यानंतर आम्ही तत्त्वज्ञान मूर्तीत आणलं. याहून पुढचा टप्पा नाही गाठता येणार, म्हणून यांना बिंबब्रह्म म्हणतो.

अशा मूर्ती हे आपल्या देशाचं वैशिष्टय आहे का?

हे इतकं महत्त्वाचं वैशिष्टय आहे याची अनेकांना कल्पना नाही. भारतीय संस्कृती ही अक्षुण्ण आहे, अखंड आहे. आपल्या संस्कृतीच्या प्राचीन काळापर्यंत तुम्ही गेलात, तर त्या संस्कृतीच्या थोडया आधी किंवा त्याच कालखंडात जगात इतरत्रही संस्कृती झाल्या. इजिप्तची संस्कृती आहे, इराकची मेसापोटेमिया संस्कृती आहे, ऍसिरियाची आहे. पण काळाच्या ओघात त्या लुप्त झाल्या आणि टिकली ती भारतीय संस्कृती. तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर पिरॅमिड्स आहेत, ममीज आहेत. तिथले लोक तुम्हाला त्याविषयी नीट समजावूनही सांगतील. पण आजच्या तिथल्या लोकांचं त्या पिरॅमिड्सशी काही नातं नाही. कारण ज्या काळात या गोष्टी घडल्या, त्यापेक्षा तिथल्या आजच्या मंडळींचा धर्म, चालीरीती वेगळया आहेत.

आपल्याकडे तुम्ही हिमालयात जा वा कन्याकुमारीला जा. त्या पुरातन संस्कृतीचे स्रोत आजही तुम्हाला आढळतील. ते लुप्त झालेले नाहीत. कोणत्याही प्रांतात गेलात तरी संस्कृत जाणणारी माणसं आहेत. कुठेही जा - शिव, विष्णू तेच आहेत. वेद मानणारे लोक आहेत. या संस्कृतीच्या अक्षुण्णतेचं किंवा अखंडतेचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे मंदिरस्थापत्य शास्त्र.

इटली, इजिप्त किंवा ग्रीसमध्ये प्राचीन काळी मूर्तिपूजा होती. पण आज ती कुठेही राहिलेली नाही. त्याचे पुरावे तुम्हाला त्यांच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील.

भारतात मूर्तिशास्त्र किंवा मूर्तिपूजा निर्माण झाली आणि ती अव्याहतपणे चालू आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीची ठळक वैशिष्टयं सांगताना तुम्हाला इथली मंदिरं आणि मूर्ती यांचा विचार करावाच लागतो.

वेरूळच्या लेण्यांवर तुम्ही लिहिलेला मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे 'वेरूळ दर्शन'. ही लेणी तुमच्या विशेष जिव्हाळयाची आहेत. एका अखंड पाषाणात कोरलेलं हे शिल्पवैभव देशातलंच नाही, तर जगातलं एकमेवाद्वितीय असं काम आहे.

 संत एकनाथांनी त्याचं वर्णन असं केलं आहे - 'चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले, आधी कळस मग पाया रे' आधी कळस कोरला आणि मग पायापर्यंत कोरत गेले. त्यांनी वेरूळच्या कैलासचं रूपक जरी अध्यात्माला जोडलेलं असलं, तरी ही कल्पना सुचायचं कारण हेच की त्यांनी हे वेरूळच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहिलेलं असणार. संत ज्ञानेश्वर असं म्हणाले आहेत, 'देव देऊळ परिवारु, किजो कोरून डोंगरु । ऐसा भक्तीचा वेव्हारू, का न व्हावा ॥' म्हणजे, एका दगडामध्ये देऊळ कोरलं, भक्त कोरले, सगळा परिवार कोरला. एका दगडामध्ये जर एकात्मता दाखवता येते, तर प्रत्यक्ष जीवनात द्वैत-अद्वैत हा भाव का उरावा? सगळं अद्वैतच का होऊ नये? ज्ञानेश्वरांनीही अद्वैत तत्त्वज्ञान उलगडून दाखवताना कैलास लेण्याचा आधार घेतला.

या गोष्टी ध्यानात ठेवून जर आपण कैलासचं निरीक्षण केलं, तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. एक तर कला म्हणून कैलास लेणं अद्वितीय आहे. स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण आणि मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने परिष्कृत असं हे लेणं आहे. प्राचीन कलातज्ज्ञांनी या सगळया गोष्टींचा विचार नक्की केलेला असेल असं वाटतं. त्याचं कारण सांगतो. 'हे शिल्प कोणी कोरलं असेल? याचे मार्गदर्शक कोण असतील?' या प्रश्नाचं उत्तर प्रवेशद्वाराशीच मिळतं. एका बाजूला शुक्र ऋषी आहेत आणि दुसऱ्या बाजूला भृगू ऋषी आहेत. हे ऋषी मोठे स्थपती होते असं त्यांचं शास्त्रामध्ये वर्णन आहे. हे ऋषी दाखवलेत म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं, असं त्यातून सूचित होतं. हा देऊळवाडा असला तरी त्याची भव्यता एखाद्या राजवाडयासारखीच आहे. थोडं आत गेलात की शंखनिधी आणि पद्मनिधी बसलेले आहेत. समोर गजलक्ष्मी आहे. जणू लक्ष्मीचाच तुम्हाला आशीर्वाद आहे. ज्या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत हे काम झालं, त्याने या कामासाठी सढळ हस्ते संपत्ती देऊ केली होती. ही जी रचना आहे यामागे काही सूत्र आहे.

कैलासच्या उत्तरेकडे महाभारत कोरलेलं आहे. कारण महाभारतातल्या सगळया महत्त्वाच्या घटना या उत्तरेकडे घडलेल्या आहेत. आणि कैलासच्या दक्षिण भिंतीवर रामायण कोरलेलं आहे. राम जरी अयोध्येचे असले, तरी रामायण सगळं घडलं ते दक्षिणेत. कैलास लेणी खोदण्याचं काम जवळजवळ 60/70 वर्षं चालू होतं. तरी ते एकसंध आहे. कुठेही ठिगळ लावल्यासारखं वाटत नाही. पिढयानपिढया या कामात होत्या, तरी घेतलेला विषय एकसंधपणे कोरण्यात आला आहे. इथल्या एकेका देवतेचा अभ्यास करायला लागलो की लक्षात येतं - मूर्तिशास्त्र आणि तत्त्वज्ञान त्यात पुरेपूर भरलेलं तुम्हाला दाखवता येईल.

एका मूर्तीविषयी सांगतो... शिव-पार्वती बसलेले आहेत आणि दोघांच्या हातात मिळून एक शिवलिंग आहे. मग प्रश्न असा पडतो की हे असं कसं असेल? हे परब्रह्म असेल का? पण परब्रह्म हे अविभाज्य आहे. मग हे काय असेल? तर हे परशिव आहे. परशिव दुभंगलं की प्रकृती आणि पुरुष निर्माण होतात. म्हणून शिव-पार्वती दाखवले आहेत. त्यांच्यापासून सृष्टी निर्माण होणार. पण मानवी व्यवहारानुसार निर्मिती ही पती-पत्नी यांनी केली पाहिजे. मग शिव-पार्वतीचा विवाह व्हायला पाहिजे. म्हणून तिथेच जवळ त्या दोघांच्या लग्नाचा प्रसंग दाखवला आहे. लग्नाचा प्रसंग दाखवून झाल्यावर, 'those are eternally together' म्हणजे शाश्वतपणे ते एकत्र आहेत हे दाखवण्यासाठी ही अर्धनारीश्वराची मूर्ती आहे. अशा पध्दतीने त्या मूर्तींचा विचार करत गेलात तर अध्यात्माचाही उलगडा होतो. कलेच्या दृष्टीनेही या मूर्ती लक्षवेधी आहेत. शिव-पार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगात उभी असलेली पार्वती ही अधोवदना, सलज्ज्ािता, सविनया अशी दाखवली आहे. लग्नाला वधू कशी उभी राहते याचं सुरेख दर्शन त्या मूर्तीतून होतं. ते कलाकार अतिशय निष्णात आणि कुशल होते, असंच म्हणावं लागेल.

आपल्याला जसं हे कैलास लेणं अभूतपूर्व, अलौकिक, अप्रतिम, अद्वितीय असं वाटतं, तसंच त्याच्या कर्त्यालाही वाटल्याचा पुरावा ताम्रपटात सापडतो. ताम्रपटात जे त्याचं वर्णन आहे त्यात शेवटी, 'याचा जो कर्ता आहे तोच आश्चर्यचकित झाला की, हे मी कसं निर्माण केलं असेन?'अशा आशयाचा श्लोक आहे.

विष्णुमूर्तींचाही तुमचा विशेष अभ्यास आहे. त्यावर 'विष्णुमूर्ते नमस्तुभ्यं' हे पुस्तकही लिहिलं आहे. वैकुंठाची मूर्ती म्हणजेच विष्णुमूर्तीचाच एक प्रकार, असं तुम्ही म्हटलं आहे. मुळात वैकुंठाची मूर्ती असते का? आणि विष्णुमूर्तीची वैशिष्टयं काय असतात?

मूर्तिशास्त्र शिकताना अभंगांमध्ये संतांनी मांडलेले विचार आणि मूर्तिशास्त्र यांच्यातल्या परस्परसंबंधांचा शोध घेत होतो.

ज्ञानदेव म्हणे हरि हा वैकुंठ

भरला घनदाट चहुदिशे

हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगात असलेल्या या ओळींचा विचार करताना असं वाटायला लागलं की, वैकुंठ हे विष्णूचं निवासस्थान असं आपण म्हणतो. पण ज्ञानदेव 'हरि हाच वैकुंठ' म्हणतात, त्या ओळींचा अर्थ काय आहे नेमका?

त्यावर विचार करत असताना मला कळलं की, वैकुंठाची मूर्ती असते. खजुराहोला एका देवळाच्या गाभाऱ्यात वैकुंठाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. भारतात उत्तरेकडे वैकुंठाच्या बऱ्याच मूर्ती पाहायला मिळतात. पण महाराष्ट्रात फक्त एका ठिकाणी, मेथी या गावी वैकुंठाची मूर्ती पाहायला मिळाली.

वैकुंठाची मूर्ती हा विष्णुमूर्तीचाच एक प्रकार आहे. या मूर्तीच्या द्वारे जे प्रसिध्द पांचरात्र वैष्णव तत्त्वज्ञान आहे, ते समूर्त झालं आहे. या मूर्तीमध्ये संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुध्द या चार मूर्ती एकत्र केलेल्या असतात. कधी त्यांना चार हात, तर कधी आठ हात असतात. वेदांतही या मूर्तींचा उल्लेख केलेला आढळतो. पण त्याचा अभ्यास कोणी केलेला नव्हता. मी मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला आणि लक्षात आलं की अशा पध्दतीने त्याचा विचार करता येतो.

सामान्य लोकांपर्यंत हे शास्त्र न गेल्याने त्या शास्त्राबद्दल खूप अपसमज असतात. साधी गोष्ट सांगायची तर आपण 33 कोटी देव म्हणतो, पण देव कधी 33 कोटी नसतात. तर कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव असतात. तसा अर्थ लावत गेलो तर लक्षात येतं की या शास्त्राबद्दल अज्ञानच खूप आहे. मूर्तीची पूजा तर आपण रोज करतो. पण मूर्तीकडे पाहण्याची दृष्टी अजून विकसित झालेली नाही.

'खूप देव' असं आपण म्हणतो, त्या एकाच देवाच्या निरनिराळया अवस्था आहेत. ब्रह्मन् किंवा ब्रह्म असं आपण  म्हणतो, तीच मूळ कल्पना आहे. त्याच्यातून शिवाच्या, ब्रह्माच्या, विष्णूच्या विविध मूर्ती आल्या.

उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रुपकल्पना:

चिन्मयस्या द्वितीयस्य निष्कलस्या शरिरीणाम्

हे ब्रह्म कसं आहे? चिन्मय आहे, निष्कल आहे, अशरीरी आहे. मग मूर्ती कुठून आली? तर, उपासक आपलं कार्य सिध्दीला जाण्याकरिता ब्रह्माला विविध रूपं देतो. मूर्ती घडवतो. त्यांची पूजा करतो.

पंचरात्राबद्दल मी बोलत होतो. हे तत्त्वज्ञान एकच देव मानतं. प्रद्युम्न, अनिरुध्द, संकर्षण आणि वासुदेव हे एकच आहेत हे कशावरून? तर कालियादमनाच्या वेळी त्याच्या वधाआधी त्याच्या स्त्रियांनी विष्णूची प्रार्थना केली. त्यांनी असं म्हटलं,

नमो रामाय कृष्णाय वासुदेव सुताय च

प्रद्युम्नाय अनिरुध्दाय सात्वतां पतये नम:

सात्वत, पतय हे शब्द एकवचनी आहेत. याचा अर्थ असा की चार देव असं जरी म्हटलं असलं तरी ते एकच आहेत.

आणखी एक त्यात असा विचार आहे की, केशव, नारायण, माधव, गोविंद अशी विष्णूची चोवीस नावं आहेत. ही कशी ओळखायची? तर विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म या चार गोष्टी असतात. या परम्युटेशन-काँबिनेशनने बदलत गेल्या. गदा, पद्म, चक्र, शंख अशी त्यांची स्थानं बदलली की नाव बदलतं. केशवाची मूर्ती घेतली तर पद्म, शंख, चक्र आणि गदा. असा बदल होत गेला की नावं बदलतात, त्यावरून मूर्ती ओळखता येते.

याहून वेगळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की, केशव-नारायण-माधव या मूर्तींच्या वेगवेगळया शक्ती आहेत. केशवाची कीर्ती, नारायणाची कांती, गोविंदाची तुष्टी, प्रद्युम्नाची प्रीती अशा चोवीस शक्ती आहेत. भारतात एकच देऊळ असं आहे. अजंठाला जाताना अन्वं नावाचं एक गाव आहे. त्या गावी विष्णूचं एक अत्यंत उत्तम देऊळ आहे. त्याला महादेवाचं देऊळ म्हटलं जातं, पण ते खरं नाही. या देवळाचं फर्ग्यसनसारख्या पाश्चात्त्य माणसाने वर्णन केलं, 'जेम इन टेंपल आर्किटेक्चर' - त्या देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर या शक्ती कोरलेल्या आहेत. मात्र या शक्ती म्हणजे त्या देवांच्या पत्नी नव्हेत. केशव कशामुळे प्रसिध्द आहे, तर कीर्तिमान म्हणून प्रसिध्द आहे.

देऊळ नेमकं कोणत्या देवाचं हे कळावं यासाठी मूर्तिशास्त्राच्या आधारे मी वेगळे निकष लावले. महाराष्ट्रातल्या देवळांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की काही देवळं शिवाची म्हणून ओळखली जात असली, गाभाऱ्यात शिवलिंग असलं तरी ती शिवाची देवळं नाहीत. अन्वं गावातल्या महादेवाच्या या देवळातही आत शिवलिंग असले तरी देवळावर अन्यत्र शिवाची मूर्तीच नाही असं लक्षात आलं. आहेत त्या सगळया विष्णूच्या मूर्ती आहेत. आक्रमकांमुळे असेल किंवा दुर्लक्षामुळे असेल किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तींमुळे असेल, पण देवळातली मूळ मूर्ती नाहीशी झाली, तर त्या काळी खेडयात पुन्हा मूर्ती घडवू शकेल असा मूर्तिकार मिळणं अवघड असणार. तिथे तर मूर्ती ठेवायला हवी, मग अशा वेळी गावातला पाथरवट शिवलिंग करू शकतो. अशा रीतीने मूळ विष्णूचं देऊळ महादेवाचं झालं. अशा निकषांच्या आधारे अभ्यास केला तर देऊळ नेमकं कोणाचं हे शोधता येतं.

शिव आणि शिल्प यांचं काही नातं आहे का? शिवाची मंदिरं जिथे आहेत, तिथे शिल्पांचं प्रमाण जास्त आहे असं दिसतं का?

सगळया देवांमध्ये शिव हा एक असा देव आहे की ज्याच्या अनंत प्रकारच्या मूर्ती आहेत. आम्ही शिवाच्या मूर्तींचा जो अभ्यास करतो, त्यात केवल मूर्ती आणि विशेष मूर्ती येतात. केवल मूर्तीमध्ये शिव आहे, उमा-महेश्वर आहे, सोमस्कंद मूर्ती आहे, वृषवाहनशिव मूर्ती आहे. विशेष मूर्ती म्हटलं की अनुग्रह मूर्ती, संहार मूर्ती, दक्षिणा मूर्ती, नृत्य मूर्ती हे प्रकार येतात. अनुग्रह मूर्तीतही पुन्हा अर्जुन अनुग्रह मूर्ती, रावण अनुग्रह मूर्ती, मार्कंडेय अनुग्रह मूर्ती अशा येतात. संहार मूर्तीमध्ये अंधकासुर वध मूर्ती, गजासुर वध मूर्ती हे प्रकार येतात. दक्षिणा मूर्तीमध्ये व्याख्यान दक्षिणा मूर्ती, वीणाधर दक्षिणा मूर्ती तर नृत्य मूर्ती म्हटलं की ललित, चतुर, तलसंस्फुटित,ऊर्ध्वजानू अशा 108 प्रकारच्या नृत्यमूर्ती येतात. त्यातही पुन्हा प्रदोष, तांडव, उमातांडव अशा 9 प्रकारच्या मूर्ती येतात. इतकं वैविध्य शिवमूर्तींमध्ये आहे. याशिवाय सदाशिवाची मूर्ती आहे, जिला चार किंवापाच तोंडं असतात. त्याहून अधिक तोंडाची मूर्ती असेल तर त्याला महासदाशिव म्हणतात. घारापुरीची मूर्ती आहे ती सदाशिवाची मूर्ती आहे. तिला त्रिमूर्ती म्हणत असले तरी ती सदाशिवाची मूर्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं ते समूर्तीकरण आहे.

एकीकडे शंकराला आपण लयाचं प्रतीक मानतो आणि मूर्तीचं वैविध्यही शंकरातच आहे. त्याचं एक कारण असं आहे की, शिवाच्या नृत्यात स्थिरोभाव नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे गुप्त किंवा लुप्त करण्याची शक्ती. शिव एक पिढी लुप्त करतो आणि पुन्हा ती निर्माण करतो. त्याने पूर्ण संहारच केला तर हे जग निर्माण कसं करणार? तो हे जीव लुप्त करतो त्यांना पुन्हा नवं जीवन देण्याकरिता, अशी स्थिरोभावाची कल्पना आहे. म्हणूनच अध्यात्माची जोड दिल्याशिवाय हे शास्त्र पूर्ण होत नाही. नीट अन्वयार्थ लावता येत नाही.

मंदिरशास्त्र आणि मूर्तिशास्त्र यांच्या अभ्यासाबरोबरच तुम्ही महत्त्वपूर्ण उत्खननही केलं आहे. त्याविषयी...

 विदर्भात अनेक ठिकाणी मी आणि डॉ. देव यांनी मिळून, तर काही ठिकाणी मी स्वतंत्रपणे उत्खनन केलं.

मोठमोठया अनघड शिळा वर्तुळाकार रचलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये दफन केलेलं असतं. इ.स. पूर्व सातव्या-आठव्या शतकातल्या या गोष्टी आहेत. मृत्यूनंतर जी माणसं दफन केलेली असतात, त्यांचे सापळे या उत्खननांमध्ये मिळतात. त्यावरून कालमान काढता येतं. पण त्याहीपेक्षा दफन करताना त्यांच्या जवळ ज्या वस्तू ठेवलेल्या असत, त्यांचा अभ्यास करता येतो. त्यामध्ये काही मडकी असतात, संसारपयोगी अन्य वस्तू मिळतात. गेलेली व्यक्ती जर घोडा वापरत असेल, तर त्या घोडयाचा लगाम, त्याचे दागिने त्या सापळयाभोवती सापडतात. एकदा आम्हाला तलवार सापडली. तिचं पातं लोखंडाचं आणि मूठ तांब्याची होती. हे त्यांना त्या वेळी कसं जुळवता आलं असेल असा विचार केला. तांब्याच्या काही कढया मिळाल्या. त्यांची झाकणं वैशिष्टयपूर्ण होती. त्या झाकणांवर चार पक्षी बसलेले दाखवलेले होते. त्यावरून अमुक एका कालखंडात माणसं कशा प्रकारच्या वस्तू वापरत होती, संस्कृतीच्या कोणत्या टप्प्यावर ती होती, याविषयी अनुमान काढता येतं.   

आणि ज्याला आम्ही मेगॅलिथिक कल्चर म्हणतो - म्हणजे मोठया दगडांच्या वर आधारलेली संस्कृती - त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. नुसतेच माती आणि गोटे वापरून ढीग केलेला असतो. त्याला केर्न म्हणतात. वर्तुळ सापडलं तर त्याला मेगॅलिथिक सर्कल म्हणतात. थोडा माणसाचा आकार असलेला दगडाचा खांब उभा केलेला असेल तर त्याला मेनहिर म्हणतात. हे सगळे प्रकार बृहदाश्मी संस्कृती युगातील आहेत. त्यात लोखंडाच्या वस्तू मिळाल्या. म्हणजे भारतात लोखंड मिळायला लागल्यानंतरची ही संस्कृती आहे, हे उघड आहे. दगडाचा वापर ते वर्तुळ बनवण्यापुरता, बाकी आत दगडाचा उपयोग नाही.

जसं पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधुसंस्कृतीला आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतो. त्यानंतर लोखंड मिळतं तो संस्कृतीचा पुढचा टप्पा म्हणावा लागेल.

डेक्कन कॉलेज ही तुमची कर्मभूमी. त्यातल्या तुमच्या योगदानाविषयी...

आमच्या पूर्वसुरींनी - म्हणजे डॉ. सांकलिया, डॉ. घाटगे, डॉ. मेहेंदळे, डॉ. देव यांनी डेक्कन कॉलेजची कीर्ती वाढवली. आज आम्ही जे ओळखले जातो, ते डेक्कन कॉलेजचे म्हणून ओळखले जातो. तर आमच्या पूर्वसुरींमुळे डेक्कन कॉलेज ओळखलं गेलं. डॉ. सांकलियांचं किंवा डॉ. शां.भा. देवांचं डेक्कन कॉलेज असं म्हटलं जातं.

जिथे मी अध्ययन आणि अध्यापनही केलं, त्या डेक्कन कॉलेजचं अभिमत विद्यापीठ झाल्यावर पहिला कुलपती होण्याचं भाग्य मला लाभलं, याचा आनंद आहे.

कुलपती झाल्यानंतर आम्ही महत्त्वाची काही कामं केली. 'स्टेट ऑफ दि आर्ट' शोभेल असं उत्तम वस्तुसंग्रहालय बांधलं. 'आर्किऑलॉजिकल पार्क' ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणतो आहोत. आर्किऑलॉजीच्या सगळया गोष्टी सामान्यांपर्यंत जाव्यात, म्हणून हा प्रयत्न आहे. 15/20 एकर जागेवर याची उभारणी चालू आहे.

हे ज्ञान अनेक वाटांनी लोकांपर्यंत जावं यासाठी संस्कार भारतीसारख्या संघटनेच्या माध्यमातूनही मी प्रयत्नशील आहे.

सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या वैभवशाली संस्कृतीचा परिचय झाला, तर माझ्यापाशी असलेल्या ज्ञानाचं सार्थक झालं असं मला वाटेल. 9594961865

 ( १२ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख पुनःप्रकाशित करीत आहोत.)