अन्सारींमधील 'मुसलमान' जेव्हा बोलतो...

विवेक मराठी    21-Aug-2017
Total Views |


उपराष्ट्रपतिपदावरून निवृत्त होताना मोहम्मद हमीद अन्सारी  यांच्यातील  'मुसलमान' जागृत झाला असे दिसते, त्यांना सहिष्णुतेची आठवण झाली, ''उत्तेजित राष्ट्रवादाने असुरक्षिततेची भावना मुसलमानांच्या मनात निर्माण होत चालली आहे'' असे विधान करून त्यांनी पुन्हा त्याच वादाला जन्म दिला आहे. या उलट त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवायला पाहिजे होता. तुम्ही मुसलमानांचे उपराष्ट्रपती नव्हता, हिंदूंचेही नव्हता, तुम्ही देशाचे उच्च राष्ट्रपती होता. ज्या देशात -तुमच्याच भाषेत सांगायचे, तर सर्व धर्मांचे लोक राहतात त्या सर्वांच्या वतीने तुम्हाला बोलायला पाहिजे होते.

राष्ट्रीय चर्चेत जर सध्या राहायचे असेल, तर त्याचा सोपा उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करा, मुसलमानांचा पक्ष घ्या, मुसलमानांबरोबर दलितांचे प्रश्न घ्या, केंद्रातील भाजपा शासन कसे असहिष्णू आहे, लोकशाहीविरोधी आहे, याची मुसलमान आणि ख्रिश्चन, दलित यांना घेऊन मांडणी करा, म्हणजे तुम्ही बातम्यांचे सुपर हिरो होता, जसे आता मोहम्मद हमीद अन्सारी झालेले आहेत. गेली दहा वर्षे - पुन्हा सांगतो, गेली दहा वर्षे ते उपराष्ट्रपती आहेत, परंतु ते राहत असलेल्या दिल्लीतील भटक्या कुत्र्यालादेखील ते उपराष्ट्रपती आहेत याची माहिती नसावी. 10 ऑगस्ट रोजी ते निवृत्त झाले. त्यांचे सर्वमान्य निवृत्ती भाषण झाले असते, तर कुणी त्याची दखलही घेतली नसती. पण जाता जाता भाजपा सरकारला जितक्या लाथा मारता येतील तितक्या ते मारून गेले आहेत. गाढव नीट चालले तर बातमी होत नाही, पण ते वाटेत जाता येता चावायला लागले की बातमीच बातमी तयार होते. मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या बाबतीत हेच घडलेले आहे.

राज्यसभेतील निरोपाचे भाषण, त्याच्या अगोदर बंगळुरूला नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी येथे त्यांनी केलेले भाषण आणि राज्यसभा टीव्हीवर करण थापरला दिलेली दीर्घ मुलाखत, अशा तीन प्रसंगी मोहम्मद हमीद अन्सारी जे बोलले, त्याच्या बातम्या झाल्या. पहिले भाषण बंगळुरूला झाले, या भाषणात त्यांना सहिष्णुतेची आठवण झाली आणि विवेकानंद आठवले. दुसरे भाषण राज्यसभेत झाले आणि तेथे त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन आठवले. करण थापरच्या मुलाखतीत महात्मा गांधीजींची आठवण काढायला पाहिजे होती, पण ती त्यांनी काढली नाही. ते काय बोलले ते आपण सर्वप्रथम पाहू या.

राज्यसभेच्या निरोपाच्या भाषणात त्यांनी बहुमताच्या जुलूमशाहीचा उल्लेख केला. आपला मुद्दा मांडताना त्यांनी राधाकृष्णन यांना उद्धृत केले, ''जर विरोधी गटाला सरकारच्या धोरणांवर, विधायक आणि स्वतंत्र टीका करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर लोकशाही जुलूमशाहीत परावर्तित होण्याचा धोका असतो.'' पुढे अन्सारी म्हणाले, ''अल्पसंख्याकांना संरक्षण दिल्यामुळेच लोकशाही वेगळया प्रकारची राजयंत्रणा ठरते. त्याच वेळी अल्पसंख्याकांच्यादेखील काही जबाबदाऱ्या असतात. हे सभागृह राज्यघटनेने निर्माण केलेले आहे, ज्यात घटनाकारांच्या शहाणपणाचे आणि दूरदृष्टीचे दर्शन घडते.''

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (बंगळुरू) या भाषणातील पहिल्या भागात त्यांनी आपली राज्यघटना आणि राज्यघटनेचे प्रिएम्बल याचा उल्लेख करून आपला समाज अनेक धर्म, वर्ग गटांचा बांधला आहे. इंग्लिशमधला शब्द असतो 'प्लूरॅलिटी' (बहुविधता) यावर आधारित आपली लोकशाही आहे. दुसऱ्या भागात सेक्युलॅरिझम हा आमचा मार्ग आहे. राज्याचा कोणताही उपासना धर्म नसावा आणि राज्य तटस्थ असावे, धार्मिक सहिष्णुता असावी, बंधुभाव असावा हे विषय मांडले. तिसऱ्या भागात त्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. एकात्मता याचा अर्थ आपले अस्तित्व मिटवून एकसारखे होणे नव्हे हे त्यांनी सांगितले. या भाषणात विषारी फूत्कार मारण्यापूर्वी मोहम्मद हमीद अन्सारी यांनी त्या फूत्काराची एक सैध्दान्तिक बाजू बांधीत आणली. भारतातील डाव्या आणि सेक्युलर विचारवंताचे एक खास वैशिष्टय असते. तू नीच आणि नालायक आहेस असे म्हटले तर शिवी होते, पण ते म्हणण्यापूर्वी त्याची सैध्दान्तिक बैठक तयार केल्यास तो वैचारिक विवाद होतो.

मोहम्मद हमीद अन्सारी विद्वान आहेत. ते अलिगढ मुस्लीम विद्यापीठात होते. मुस्लीम मायनॉरिटी कमिशनमध्ये होते. दीर्घकाळ मध्यपूर्वेतील देशात भारताचे राजदूत होते. आपले वाचन किती अफाट आहे, याचा प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी बंगळुरूच्या भाषणात जॉन लॉक, पाचवा हेन्री, बम्बल, जॉन रॉलस्, असा सर्वांचा उल्लेख केलेला आहे. जॉन रॉलस् याचे सामाजिक न्यायावरचे पुस्तक आहे आणि ते न्याय संकल्पनेवरील उत्तम पुस्तक समजले जाते. अशी सर्व पार्श्वभूमी तयार करून मोहम्मद हमीद अन्सारी यांनी म्हटले की, नवीन सरकार आल्यापासून दलित, मुस्लीम, ख्रिश्चन यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.  पुढे ते म्हणतात की, आताचा राष्ट्रवाद आक्रमक राष्ट्रवाद झालेला आहे. त्यांचे इंग्रजी वाक्यच देतो, ''Hyper-nationalism and the closing of the mind is also a manifestation of insecurity about ones place in the world.'' उत्तेजित राष्ट्रवादाने असुरक्षिततेची भावना मुसलमानांच्या मनात निर्माण होत चालली आहे, असे त्यांना सुचवायचे आहे. आपल्याला सहिष्णुता आणि बहुविधता याचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सहिष्णुतेच्या पुढे जाऊन स्वीकृतीकडे आपण गेले पाहिजे, असेही अन्सारी यांनी म्हटले. विवेकानंदाना त्यांनी अशा प्रकारे उद्धृत केले. दुसऱ्या धर्माबद्दल केवळ सहिष्णू असू नका तर सकारात्मक रितीने त्याचा स्वीकार करा. सत्य हा सर्व धर्माचा पाया आहे.

मोहम्मद हमीद अन्सारी यांना सहिष्णुता आणि स्वीकार्यता याची आठवण झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ते जवळजवळ दहा वर्षे मध्यपूर्वेत होते. मध्यपूर्वेत सगळया देशांत त्यांच्याच धर्माचे लोक राहतात. तेथे सहिष्णुता कशाशी खातात, हे तेथील लोकांना समजत नाही. मूर्तिपूजकांना त्या देशात तर स्थानच नाही, अल्ला मानणाऱ्या पण थोडा वेगळा विचार करणाऱ्या मुसलमानांनादेखील तेथे जिवंत ठेवले जात नाही. विवेकानंद म्हणाले की सर्व धर्मांत सत्याचा अंश आहे आणि कुराण सांगते की, सत्य फक्त कुराणात आहे. सत्य म्हणजे अल्ला आहे, अल्ला सोडून सगळे झूठ. ते विवेकानंदांनादेखील माहीत होते. म्हणून विवेकानंद म्हणाले होते की, ''मला इस्लामी शरीर आणि वेदान्ती मेंदू याचा समाज हवा आहे.'' इस्लामी शरीरावर इस्लामी मेंदू नको असे त्यांना म्हणायचे आहे. हमीदभाईंना हे विवेकानंददेखील माहीत असतील असे मी समजतो.

मोहम्मद हमीद अन्सारीसारखे विद्वान अतिशय हुशार असतात, म्हणजे डोकेबाज असतात. हिंदूनाच सहिष्णुता शिकविणे म्हणजे गंगोत्रीला वरळीच्या गटाराचे पाणी घेऊन जाण्यासारखे आहे. हजार वर्षांत हिंदूंनी काय काय सहन केले आहे? मंदिरांचा विध्वंस सहन केला, एकाच वेळी हजारो स्त्रियांचा जोहार पाहिला, आपले लाखो ग्रंथ जळताना बघितले, लेण्यांच्या मूर्तींची तोडफोड बघितली, लहान मुले, स्त्रिया, वृध्द यांच्या कत्तली बघितल्या, पंजाब-सिंध-बलुचिस्तान-पूर्व बंगाल प्रांतातील 1947 सालच्या हिंदू कत्तली बघितल्या. नव्वदच्या दशकातील काश्मीरमधील काश्मिरी पंडितांचे स्थलांतर आणि कत्तली बघितल्या, साबरमती एक्स्प्रेसमधल्या कारसेवकांना जिवंत जाळण्याचा कारनामा बघितला. मोहम्मद हमीद अन्सारी साहेब! जगात एवढी सहनशीलता दाखविणारा कुठला समाज आहे का? तुमची वटवट हिंदू समाज मोकाट सहन करतो, ही काही कमी सहिष्णुता झाली काय?

हिंदू खासदार, हिंदू वकील, बहुसंख्य हिंदू श्रोते यांना लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय, सहिष्णुता, बहुसंख्याची जुलूमशाही, बहुविधता, सर्वधर्मसमभाव याबद्दल प्रवचने देणे फार सोपे असते. परंपरेने हिंदू माणूस या संकल्पना जशा जगतो, तसा तो आपल्या हिताच्या बाबतीत झोपलेला आणि बावळट असतो. त्याच्या बावळटपणाचा फायदा भारतात आलेल्या मोहम्मद हमीद अन्सारींच्या पूर्वज आक्रमकांनी घेतला. गुजरातवर हल्ला करताना आघाडीवर त्यांनी गायीचे कळप ठेवले. हिंदू माणूस गाय पवित्र मानतो, मग गायीला कसे कापायचे? गायीला वाचविण्याच्या नादात हिंदूच कापला गेला. आताही हिंदूंना सामाजिक न्याय, सहिष्णुता, लोकशाही मूल्ये यांच्या गायी पाठवून गाफिल ठेवता येईल, असे जर मोहम्मद हमीद अन्सारी यांना वाटत असेल, तर ते चूक करीत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. गांधीहिंदूचा कालखंड आता संपलेला आहे. आता शिवाजीहिंदूचा कालखंड सुरू झालेला आहे. यामुळेच हमीदभाई, आपले वक्तव्य आल्यावरच सोशल मीडियावर ज्याला जसे जमेल तसे त्याने ठोकले आहे.

उपराष्ट्रपती म्हणून निरोप घेताना तुम्ही डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवायला पाहिजे होता. तुम्ही मुसलमानांचे उपराष्ट्रपती नव्हता, हिंदूंचेही नव्हता, तुम्ही देशाचे उच्च राष्ट्रपती होता. ज्या देशात तुमच्याच भाषेत सांगायचे, तर सर्व धर्मांचे लोक राहतात त्या सर्वांच्या वतीने तुम्हाला बोलायला पाहिजे होते. जर तुम्हाला हा देश समजला असता आणि खरोखरच तुमच्या मनात हिंदू-मुसलमान यांच्या मनोमिलनाची गोष्ट असती, तर तुम्ही म्हणाला असता - बाबराने श्रीरामाचे मंदिर पाडले त्यावर आपला हक्क काही नाही. आपण एक समाज म्हणून राहण्यासाठी रामजन्मभूमीवर रामाचे मंदिर बांधण्यासाठी हातात हात घालून काम करायला पाहिजे. मोहम्मद हमीद अन्सारी, जर तुम्ही असे बोलला असता, तर आजवर जेवढी मोठी बातमी झाली नव्हती, तेवढी मोठी ही बातमी झाली असती. पण तुम्हाला उपराष्ट्रपतिपद सोडताना 'मी मुसलमान आहे आणि मुसलमानांच्या कल्पित विषयांना घेऊन मी बोललो पाहिजे, काँग्रेस पक्षाची ती लाइन आहे ती मी सोडता कामा नये' हे विसरता आले नाही. वेंकय्या नायडू म्हणाले तेच खरे, की तुमचे भाषण राजकीय भाषण आहे.

ज्याचे घराणे खिलाफत आंदोलनात गुंतले होते, त्या घराण्याच्या वारशाकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी कशी करता येणार? खिलाफत आंदोलन 1920 साली सुरू झाले. या आंदोलनाने मुसलमानांना पाकिस्तानी बनविले. म्हणून या आंदोलनाला 'आफत' आंदोलन असे म्हटले जाते. मुसलमानांना देशबाह्य निष्ठा शिकविण्याचे काम या आंदोलनाने केले. मोहम्मद हमीद अन्सारी यांचे घराणे या आंदोलनात सक्रिय होते. त्यांना हिंदूंकडून 1920 सालची सहिष्णुता हवी आहे. 1920चा हिंदू वैकुंठवासी झाला आहे आणि आता नव्या पिढीचा हिंदू इतिहासाचे हिशोब चुकते करण्याच्या मनःस्थितीत उभा आहे. हे परिवर्तन त्यांना पचत नाही आणि त्यांची पचनसंस्था आपण काही सुधारू शकत नाही.

vivekedit@gmail.com