पावित्र्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे - जी.एस.बी. मंडळ, वडाळा

विवेक मराठी    22-Aug-2017
Total Views |

 

गणपती ही बुध्दीची देवता आहे, पण याचे कुणाला भानच राहिलेले नाही असे वातावरण बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळते. हे जरी खरे असले, तरी काही मंडळे अजूनही मूळ उद्देश आणि गणेशाचे पावित्र्य यांची सांगड घालताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, वडाळा. राम मंदिर वडाळा येथे साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी समितीचे अध्यक्ष उल्हास कामत यांच्याशी साधलेला हा संवाद.

 ब्रिटिश राजवटीच्या प्रभावामुळे हिंदूंच्या मनात निर्माण होऊ घातलेले न्यूनगंडाचे संकट, तर दुसरीकडे त्यांच्या मनातील गुलामगिरीची भावना नष्ट करून स्वातंत्र्यप्राप्तीच्या भावनेची ज्योत चेतविण्याचे आव्हान अशी दोन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याची परंपरा सुरू करण्याचे ठरविले. देव आणि धार्मिक भावना यांचा भारतीय जनमानसाच्या मनावर एवढा जबरदस्त पगडा आहे की, धार्मिक कार्यासाठी आपापसातील हेवेदावे आणि वैर विसरून ते एकत्र येतात. हिंदूंच्या या स्वभाववैशिष्टयामध्ये टिळकांना विखुरलेल्या जनतेला एकत्र बांधण्यासाठी आशेचा किरण दिसला. धार्मिक कारणासाठी लोकांच्या एकत्र येण्याला ब्रिटिश सरकार विरोध करू शकणार नाही, हे लोकमान्य टिळकांनी ओळखले आणि त्यातूनच गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप द्यायची कल्पना त्यांच्या मनात आली. उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र जमत असत आणि त्यामुळे त्यांचे प्रबोधन करणे सहज शक्य होत असे.

गेल्या काही वर्षांत मात्र सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. उत्सवाचा मूळ उद्देश विसरून भपकेबाजपणा, दिखाऊपणा, तद्दन धंदेवाईक स्वरूप, स्पर्धा, गल्लोगल्लीतल्या राजांमध्ये लागलेली चढाआोढ हे चित्र पाहायला मिळते. ध्वनिप्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. गणपती ही बुध्दीची देवता आहे, पण याचे कुणाला भानच राहिलेले नाही असे वातावरण बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळते. हे जरी खरे असले, तरी काही मंडळे अजूनही मूळ उद्देश आणि गणेशाचे पावित्र्य यांची सांगड घालताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, वडाळा. राम मंदिर वडाळा येथे साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव. याविषयी समितीचे अध्यक्ष उल्हास कामत यांच्याशी साधलेला हा संवाद.

श्रीमत् द्वारकानाथ तीर्थ स्वामीजी यांनी 1955 साली वडाळा येथे राम मंदिराची आणि गणशोत्सवाची स्थापना केली. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्व उत्सवांचा मेरुमणी आहे. भारतातील थोर नेते लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, तीच प्रबोधनाची प्रेरणा घेऊन राम मंदिर वडाळा येथे श्रीमत् द्वारकानाथ तीर्थ स्वामीजी यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. यंदाचे या गणेशोत्सवाचे 63वे वर्ष असून गणेशाची सेवा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश जपण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. जात-धर्मासारखी कोणतीही बंधने न मानता हा सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक ऋणानुबंध प्रस्थापित करत आहे, असे समितीचे अध्यक्ष उल्हास कामत यांनी सांगितले. समाजाने एकत्र येऊन देशहिताचे काम करावे हे द्वारकानाथ स्वामीजींचे लक्ष्य होते. याच दृष्टीकोनातून त्यांनी भारतात 33 मठांची स्थापना केली. द्वारकानाथ स्वामीजींनी समाधी घेतल्यानंतर 50 वर्षे स्वामीजींची दीक्षा घेतेलेले, आताचे श्रीमत् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांनी हे सर्व मठ ऊर्जितावस्थेत आणले.

राम मंदिर वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने अकरा दिवस गणेशोत्सव मोठया भक्तिभावाने आणि दिमाखदार पध्दतीने साजरा केला जातो. जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या गणेशाचे स्थान जागृत आहे. येथे पारंपरिक पध्दतीने (होम-हवन, आरती, पूजा इ.) गणेशाचे पूजन केले जाते, त्याची सात्त्वि कंपने येथील वातावरणात तयार होतात, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. येथे देवाला सर्वोच्च स्थान आहे, माणसाला नाही. गणेशोत्सवात काम करणारे सर्व स्वयंसेवक उच्चपदस्थ, उच्चशिक्षित (वकील, सी.ए, डॉक्टर, बिल्डर अशा विविध क्षेत्रांतील) आहेत, पण काम करताना स्वतःचे पद विसरून एकदिलाने काम करत असतात. समर्पित होऊन सेवा करताना आपण भाग्यशाली आहोत असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो, असे जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष उल्हास कामत यांनी सांगितले.

राम मंदिर वडाळा येथे होणारे वार्षिक कार्यक्रम आणि जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैशिष्टय काय आहे? असा प्रश्न उल्हास कामत यांना विचारला असता, ते म्हणाले, ''आज भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असून भारतीय मूळ परंपरेचा ऱ्हास होताना दिसत आहे. तरुण पिढीला आपली भारतीय परंपरा, संस्कृती याचा विसर पडू नये, म्हणून राम मंदिर वडाळा येथे आपल्या भारतीय परंपरेनुसार सण-उत्सव मोठया आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात साजरे होतात. श्रावणी शुक्रवारी (तिसऱ्या) होणारी वरदलक्ष्मी पूजा येथे साजरी होत असते आणि या पूजेत हजारो महिला सहभागी होतात. तसेच जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवदेखील मूळ परंपरेनेनुसारच साजरा केला जातो. सकाळी सातपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध पूजा गणेशास अर्पण केल्या जातात. गणहोम, मूडागणपती, अप्पम नैवेद्य, मोदक नैवेद्य, महापूजा, महाप्रसाद, शांतिपाठ, रंगपूजा, पुष्पपूजा, रात्रीपूजा असे पूजेचे स्वरूप असते.

यातील मूडागणपती आणि रंगपूजा हे जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैशिष्टय आहे. रंगपूजा इतकी प्रसन्न असते की ती पाहायला लोक लांबून येतात. मूडागणपती पूजेत गणपतीप्रिय अशा सर्व वस्तू पूजेत समाविष्ट केल्या जातात. 108 विडयाची पाने, 108 पत्री, 108 दूर्वा, 108 वेलची केळी, मध्यभागी पोहे-गूळ ठेवून त्यावर सोवळे नेसवून त्यावर नारळ व दूर्वा ठेवल्या जातात, समोर गणेशाची चांदीची मूर्ती ठेवून पूजा केली जाते. ही पूजा सामूहिक नसून प्रत्येक जोडप्याला स्वतंत्र पूजा करता येते. या पूजेसाठी आधीपासून नोंदणी स्वीकारली जाते.


जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवातर्फे गणेशोत्सव काळात अनेक सामाजिक/सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शिष्यवृत्ती, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना फळे/औषधे वाटप. जनसेवा हीच जनार्दन सेवा आहे हा भाव जागृत ठेवूनच समितीतर्फे अनेक सामाजिक उपक्रम केले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात सुदृढ बालक स्पर्धा, गीता श्लोक पठण स्पर्धा, मोफत वैद्यकीय तपासणी/सल्ला शिबिर आयोजित केले आहेत. तसेच जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे विवाह मंडळ, योगाभ्यास, भजन असे उपक्रमही चालविले जातात. मठाधिपती विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल येथे शांतिकुंज सेवाश्रमदेखील आहे. समाजाला नैसर्गिक आणि अनैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो, त्या वेळेस जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे समाजाचे ऋण म्हणून खारीचा वाटा नक्कीच उचलला जातो.

जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे अकरा दिवस मनोभावे भक्तिमय वातावरणात मोठया उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. आज-काल सार्वजनिक गणेशोत्सवाला जी स्पर्धेची मोठी झालर पाहायला मिळते, त्याचा लवलेशही समितीच्या गणेशोत्सवात कुठेही दिसत नाही. सेलिब्रिटींना निमंत्रण, ध्वनिप्रदूषण, राजांच्या रांगेतील चढाओढ, 20-25 फुटाची भव्य मूर्ती, लांबच-लाब रांगा - त्यासाठी व्ही.आय.पी. पास या व्यावसायिकतेचा येथे स्पर्शही नाही. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी गणेशोत्सवाला भेट दिली आहे आणि या समितीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पावित्र्याचा, सात्त्वितेचा अनुभव घेतला आहे. गणेशोत्सव काळातील वातावरण तर प्रसन्न असतेच, तर विसर्जनाच्या दिवशीचे वातावरण अगदी भावुक असते. गणेशोत्सव राम मंदिराच्या आवारातच असतो. विसर्जनाच्या वेळी होणारी राम-गणेशाची भेट ही उपस्थितांना अतिशय भावुक करते. राम-गणेश एकमेकांशी संवाद करत आहेत अशी भावना  होऊन आनंद आणि दुःखाच्या संमिश्र वातावरणाने भाविकांचे डोळे पाणावलेले असतात, हे सांगताना समितीचे चेअरमन उल्हास कामत यांचे डोळे पाणावलेले होते आणि अंगावर काटा उभा राहिला होता.

खरेच, मुंबईतील झगमगत्या स्पर्धेच्या दुनियेत जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सवाने आपले पावित्र्य जपले आहे. समितीच्या गणेशोत्सवाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या प्रसिध्दीचे श्रेय तन-मन-धनाने सेवा करणाऱ्या भक्तांना आहे. एखाद्या गतिमान यंत्रालाही लाजवेल इतक्या जलद गतीने स्वयंसेवक ही गणेशाची सेवा करत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला गणेशाचे दर्शन मनापासून प्राप्त व्हावे, हीच यामागील भावना असते. राम मंदिरात होणारे कार्यक्रम आणि गणेशोत्सव साजरा करताना येणारी स्वयंसेवकांमधील ऊर्जा ही श्रीमत् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांच्या आशीर्वादामुळेच शक्य आहे.

9594961859