श्रेयवादाची धुळवड

विवेक मराठी    22-Aug-2017
Total Views |


श्रीगणेशाच्या आगमनाने आपण आनंदी होणार आहोत. 'पुढच्या वर्षी लवकर या' असा निरोप देत आपण पुन्हा नव्याने गणेश आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि मराठी मनाचा सांस्कृतिक स्वभाव आहे. या स्वभावाला सार्वजनिक स्वरूप दिले गेले ते पारतंत्र्याच्या काळात. परदास्यात आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या हिंदू समाजात स्वराज्य आणि राष्ट्रीय भाव रुजवण्याचे काम याच सार्वजनिक गणेशोत्सवाने केले. सत्त्वहीन, पीडित समाजाला एकत्र आणून त्यांच्यात प्राण फुंकत एक धगधगती राष्ट्रचेतना प्रकट करण्यात याच उत्सवाचा खूप मोठा वाटा आहे. राष्ट्रजीवनात व समाजजीवनात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या अशा या उत्सवाचे हे सव्वाशेवे वर्ष आहे. गेली सव्वाशे वषर्े जनमानसात घट्ट रुजलेला आणि अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असणारा हा उत्सव अनेक अंगांनी विस्तारत गेला आहे. समाजजीवनातील बदलाचे पडसाद या उत्सवावर उमटलेले आपण अनुभवले आहे. तर अशा या मंगलमय आणि प्रेरणादायी उत्सवाचा आपण शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहोत ही आनंददायी बाब आहे. पण या आनंदात मिठाचा खडा टाकून काही मंडळी आपली तुंबडी भरू पाहत आहेत. ज्या उत्सवाने समाजाला एका सूत्रात बांधले, त्याच उत्सवाचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचे आणि त्याला जातीय रंग देण्याचे उद्योग जोरात चालू आहेत. या उद्योगाचा मूळ उद्देश हा इतिहास संशोधन नसून जातिद्वेष हा आहे व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हे या द्वेषाचे लक्ष्य झालेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून 'सार्वजनिक गणेशोत्सवाचे उद्गाते कोण? टिळक की रंगारी?' या प्रश्नावर जोरदार चर्चा चालू असून सोशल मीडियावर अनेक स्वयंघोषित इतिहासतज्ज्ञ भरभरून व्यक्त होत आहेत. टिळक पक्ष आणि रंगारी पक्ष अशी जातीय फाळणी माध्यमातून दिसून येते आहे. ही श्रेयवादाची जातीय लढाई आहे. 1893 साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब रंगारी, खाजगीवाले, घोटवडेकर अशा अनेक मंडळींनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. स्वत: भाऊसाहेब रंगारी हे जहालमतवादी, म्हणजे टिळकपंथाचे अनुयायी होते. लोकमान्य टिळकांनी 'केसरी'तून या उत्सवाची दखल घेतली होती आणि पुढच्या वर्षी स्वत: विंचूरकर वाडयात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. पुढे हे लोण महाराष्ट्रभर पोहोचले ते लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व आणि प्रयत्न यामुळेच. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनचेतना जागवली. राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्याचे एक माध्यम म्हणून या उत्सवाचा वापर केला. हा झाला इतिहास. तो समजून न घेता काही मंडळी आज समाजात द्वेष पसरवत आहेत. हिंदू समाज एकसंघ व्हावा या उद्देशाने टिळक, रंगारी आणि अन्य मंडळींनी सुरू केलेला हा उत्सव आज समाजात दुफळी निर्माण करण्याचे साधन म्हणून वापरला जात आहे, हे आपले दुर्दैव म्हटले पाहिजे.

कोणत्याही महापुरुषाचे विचार, कार्य यामागचा कार्यकारणभाव विसरला गेला की श्रेयवाद आणि जातीची मक्तेदारी सुरू होते. कार्यकारणभावाचा विसर म्हणजे मूळ ध्येय आणि दिशा यांच्यापासून फारकत घेणे. सार्वजनिक गणेशोत्सवही लोकमान्य टिळकांचा कार्यकारणभाव विसरला आहे. संपूर्ण समाजाला कवेत घेऊन उत्कर्षाकडे जाऊ पाहणारा हा उत्सव आज जातवाद आणि समाजविघातक शक्तीचे लक्ष्य झाला आहे का? हे आपण तपासून घ्यायला हवे. लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने जातीय आघाडया उघडून श्रेयवादाची धुळवड खेळणाऱ्यांना समाजहितैषी मंडळींनी या दोन्ही महापुरुषांचा कार्यकारणभाव शिकवायला हवा.