मध्य प्रदेशातील चैतन्याचा जागर..!

विवेक मराठी    22-Aug-2017
Total Views |


आज महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप काहीसे बदलले असेलही. पण मध्य प्रदेशातील मराठी मंडळी ते पारंपरिक स्वरूप बऱ्याच प्रमाणात टिकवून आहेत. इंदूर, जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे तर मराठी गणेशोत्सवांची मोठी ठिकाणे. पण मध्य प्रदेशात जिथे म्हणून शंभरपेक्षा जास्त मराठी कुटुंबे राहतात, तिथे तिथे सार्वजनिक गणेशोत्सव हमखास साजरा होतोच.

ध्य प्रदेशातून प्रेरणा घेतलेला श्री गणरायांचा हा दहा दिवसांचा उत्सव आता साऱ्या भारतभर उत्साहाने साजरा होतोय. सन 1891मध्ये पुण्याचे वैद्य खाजगीवाले हे कामाने ग्वाल्हेरला आले होते. तिथे त्यांनी गणरायाच्या उत्सवाचे शिंदेशाही स्वरूप बघितले. राजाश्रयाने साजरा होणारा, पण लोकसहभागातून साकारलेला गणेशोत्सव त्यांना खूप भावला.

पुण्यात परतल्यावर त्यांनी ह्या ग्वाल्हेरच्या उत्सवासंबंधीची माहिती श्रीमंत दगडू हलवाई आणि भाऊ रंगारी यांना सांगितली. पुण्यातही अशाच प्रकारचा गणेशोत्सव सुरू करावा असा विचार झाला अन त्यानुसार 1892मध्ये पहिले तीन सार्वजनिक गणपती बसविण्यात आले. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला लोकमान्य टिळकांना बोलाविण्यात आले. लोकमान्यांनी लोकांच्या उत्साहाचा तो आविष्कार बघितला आणि म्हटले, ''हे तर आमचे राष्ट्रीय उत्सव.'' पुढच्याच वर्षी, अर्थात 1893मध्ये लोकमान्यांनी, ते राहत असलेल्या विंचूरकर वाडयात गणपती बसविला आणि स्वातंत्र्यचळवळीसाठी भाषणाचे काही कार्यक्रम आणि मेळयाचे कार्यक्रम ठेवले.

आज महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप काहीसे बदलले असेलही. पण मध्य प्रदेशातील मराठी मंडळी ते पारंपरिक स्वरूप बऱ्याच प्रमाणात टिकवून आहेत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळांत भाषणाचे कार्यक्रम होतात. यंदा इंदूरला महाराष्ट्र समाज, राजेंद्र नगर येथील आणि तरुण मंचाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात 31 ऑॅगस्टला दिल्लीचे प्रसिध्द पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे याचे भाषण आहे.

गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या मराठी माणसांचा सर्वात मोठा उत्सव. एक सळसळते चैतन्य या दिवसांत मराठी समाजात दिसते. श्रावणाची चाहूल लागण्याच्या आधीच वेगवेगळया मराठी मंडळांत हालचाली सुरू झालेल्या असतात. पावसाने तृप्त झालेली, हिरवाकंच शालू ल्यालेली धरित्री या उत्साहाला हातभार लावत असते. कार्यक्रम ठरत असतात. पत्रिका छापण्याची लगबग असते. त्यासाठी जाहिराती गोळा करणे हा एक मोठा कार्यक्रम असतो. मग रोज संध्याकाळी/रात्री कोणाच्या तरी घरी जमणे किंवा संस्थेच्या आवारात गप्पांचा फड रंगविणे... यात दिवस आणि रात्री कशा जातात ते कळतही नाही. या गप्पांमध्ये समाजातले प्रतिष्ठित जसे असतात, तसे नवसे-गवसे, तरुण मुले वगैरे सर्वच असतात. हे दहा दिवस फक्त मराठी म्हणून ही सर्व मंडळी एकत्र येतात. म्हणूनच यांच्यात वयाची किंवा आर्थिक परिस्थितीची कुठलीही भिंत उभी नसते.

आजही येथील गणेशोत्सवांमध्ये भजनाचा कार्यक्रम असतोच. एखादे नाटक, नाटुकले किंवा एकांकिका होतेच. भाषणाचा किंवा वादविवादाचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी असतो. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात अनेक हौसे-गवसे-नवसे यांना चांगले व्यासपीठ मिळते आणि यापैकी ज्यांच्याजवळ प्रतिभा असते, ते मग पुढेही जातात.

इंदूर, जबलपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे तर मराठी गणेशोत्सवांची मोठी ठिकाणे. पण मध्य प्रदेशात जिथे म्हणून शंभरपेक्षा जास्त मराठी कुटुंबे राहतात, तिथे तिथे सार्वजनिक गणेशोत्सव हमखास साजरा होतोच. धार, देवास, बैतुल, हरदा, सतना, सागर, रीवा, छिंदवाडा, रतलाम, बऱ्हाणपूर, छतरपूर, गुना, गंजबासौदा, इटारसी, खंडवा, खरगोन, महू, मंडलेश्वर, नागदा, राजगढ, टिमरणी, शाजापूर... किती नावे घ्यावी..? या सर्व ठिकाणी मराठी माणसे अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात.

मध्य प्रदेशात हा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे मराठी माणसांची असलेली संख्या आणि पूर्वीच्या काळी मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात असलेली मराठी संस्थाने. सन 1985पर्यंत मध्य प्रदेशाची दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा (second language) मराठी होती, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. मात्र 1985 साली अर्जुनसिंह मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी उर्दू ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा घोषित केली आणि हळूहळू सरकार दरबारी मराठीची पीछेहाट सुरू झाली. मात्र मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यावर मराठीला जरा बरे दिवस आले. 'मराठी ऍकॅडमी'ची स्थापना झाली. त्या निमित्ताने मध्य प्रदेशात मराठीचे कार्यक्रम होऊ लागले. ऍकॅडमीचे वर्तमान संचालक अश्विन खरे यांनी सध्या या कामाला चांगलीच गती दिलेली आहे.

मध्य प्रदेशात सर्वात जास्त 'मराठी' गणेशोत्सव साजरे होतात ते इंदूरला. तेथे किमान वीसपेक्षा जास्त ठिकाणी मराठी माणसे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. राजेंद्र नगर परिसरातला गणेशोत्सव हा तसा उत्साहाने सळसळता असतो, कारण 'तरुण मंचाचा' त्यात सहभाग असतो. अगदी शिस्तबध्द रितीने गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात येते. पुढले दहाही दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. प्रशांत बडवे, सुनील धर्माधिकारी, उल्हास देशपांडे ही सर्व उत्साही मंडळी नवनवीन कल्पना राबवीत असतात.

इंदूरमधलाच 'सुखालिया मराठी मंडळाचा'ही उत्सव दिमाखदार असतो. लोकमान्य नगर, वासुदेव नगर आणि रामबाग हे पूर्वीपासूनचे मराठी 'मोहल्ले'. या तिन्ही ठिकाणचा उत्सव प्रेक्षणीय असतो. याशिवाय 'मेघदूत महाराष्ट्र मंडळ', समर्थ मठ संस्थानात आणि समर्थ रामदास सेवा मंडळात साजरा होणारा उत्सवही आगळावेगळा असतो. दत्त मंदिर संस्थान, परस्पर नगर, नारायण बाग, जेल रोड येथील मराठी गणेशोत्सवही गाजत राहतात.

भोपाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून मराठी मंडळांचे वेगवेगळे कार्यक्रम जोमाने साजरे होताहेत. येथील गिरीश जोशी हे या मंडळांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आजकाल येथेही 'मराठी' गणेशोत्सवाची धमाल असते. तुलसी नगर आणि दत्त मंदिर परिसरातले गणेशोत्सव हे तसे जुने. मात्र त्याचबरोबर आदर्श नगर, पिपलानी, गौतम नगर, कोलार येथेही महाराष्ट्र मंडळांद्वारे हा उत्सव दणक्यात साजरा होतो. लोणारी कुणबी समाजाचा बरखेडामधील लालबाग गणेश उत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.


जबलपूरच्या महाराष्ट्र समाजाचा गणेशोत्सव हा फार जुना. यंदा त्याचे 118वे वर्ष आहे. सुनील परांजपे या स्थानिक मूर्तिकाराने बनविलेली अत्यंत भव्य मूर्ती, दर्जेदार कार्यक्रम आणि अनेक स्पर्धा यांनी रंगलेला हा उत्सव, महाराष्ट्र विद्यालयात साजरा होतो. यंदा पुण्याच्या अमोल शेवडेंचा 'सुंदर मी होणार' हा एकपात्री कार्यक्रम, मराठी गीत संध्या आणि नीरजा बोधनकर यांच्या समूहाचे 'नदी गाथा' हे नृत्य-नाटय हे कार्यक्रम प्रामुख्याने होणार आहेत. येथील गोलबाजारातील दत्त मंदिरात साजरा होणाऱ्या 'बाल तरुण समाजाच्या' उत्सवाचे हे 51वे वर्ष आहे. यंदाच्या भरगच्च कार्यक्रमात 'वैदर्भीय गीत गंगा' हा विदर्भातील कवी आणि संगीतकार यांच्या रचनेवर आधारित कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय विजय नगर परिसरातील 'मराठी संस्कृती मंडळ' आणि गढा क्षेत्रात राहणारी मंडळीही गणेशोत्सव धडाक्याने साजरा करतात.

हे सर्व उत्सव अत्यंत पारंपरिक पध्दतीने आणि अत्यंत उत्साहाने साजरे होतात. स्थापना करण्यासाठी श्री गजाननाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक म्हणजे कार्यक्रमांची सुरुवात असते. धोतर-कुर्ता, फेटा/पगडी या वेषात पुरुष मंडळी, तर नऊवारी साडी आणि नथ घालून अगदी तरुण मुलीही या मिरवणुकीत चालत असतात. उत्सवात रोज भजन असतेच. संध्याकाळच्या आरतीचे मानकरी ठरविले जातात आणि शहरभर, गावभर मराठी आरत्यांचे स्वर लाउडस्पीकर्सवरून निनादत असतात. आरती झाल्यावर मग निरनिराळे कार्यक्रम सुरू होतात. गाण्यांचे कार्यक्रम तर सर्वच मराठी मंडळांत हमखास होतात, तशीच नृत्य-नाटय यांचीही रेलचेल असते.

जसे सार्वजनिक, तसेच मध्य प्रदेशात घरोघरीही गणराय विराजित झालेले असतात. यासाठी अनेक घरांमधून गणपतीसाठी विशेष आरास केली जाते. मध्यंतरी गणपतीपूजेसाठी गुरुजी मिळण्याची थोडी समस्या होती. मात्र गेल्या काही वर्षांत तरुण पिढीने भिक्षुकीच्या कामात प्रवेश केला आहे. नोकरीची शाश्वती नाही आणि व्यवसाय जमत नाही, ही अनेक मराठी तरुणांची स्थिती आहे. मात्र भिक्षुकीच्या कार्याला आजकाल चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे बरेच मराठी तरुण या क्षेत्राकडे वळले आणि श्रींच्या स्थापनेसाठी घरोघर षोडषोपचारे, मंत्रोच्चारांनी पूजा करणारे ब्राह्मण उपलब्ध झाले.

विदर्भ जवळ असल्याने आणि पूर्वी एकाच प्रांताचा हिस्सा असणारा मध्य प्रदेशाचा महाकोशल हा भाग 'महालक्ष्मी' सण जोमाने साजरा करतो. साऱ्या कुटुंबाचा हा उत्सव असतो आणि दूरदूरचे पाहुणे-रावळे या सणासाठी खास सुट्टी काढून येतात. मुखवटयांच्या ज्येष्ठा-कनिष्ठा आणि त्यांची ती दोन लोभस बाळे त्या दोन दिवसात जीव लावतात. हा सण पूर्ण मध्य प्रदेशातच कमी-अधिक प्रमाणात साजरा होतो. मात्र महाराष्ट्राप्रमाणे गौरींबरोबर गणपतीचे विसर्जन होत नाही. गणपती, काही मोजक्या घरात दीड दिवसांचे तर काही ठिकाणी पाच दिवसांचे असतात. मात्र जवळपास सर्व मराठी उत्सवांमध्ये आणि अधिकांश मराठी घरांमध्ये दहा दिवसांचे गणपती असतात.


गणपतींच्या विसर्जनाचाही सोहळा असतो. अगदी वाजतगाजत गणरायाला निरोप दिला जातो. जबलपूरसारख्या ठिकाणी महाराष्ट्र समाज आणि बाल तरुण समाज एकत्र येऊन संयुक्तपणे गणेश विसर्जनाची शोभायात्रा अगदी पारंपरिक मराठी पध्दतीने काढतात.

मध्य प्रदेशातला गणेशोत्सव हा असा आहे. अजूनही बराचसा पारंपरिक पध्दतीला चिकटून राहणारा. सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असलेला. काही अंशी समाजप्रबोधनाचा वारसा जपणारा आणि मराठी चैतन्याने रसरसलेला..!

9425155551

telemat@airtelmail.in