सारेच कसे शांत शांत

विवेक मराठी    24-Aug-2017
Total Views |


दोन हजार सोळाचा जानेवारी महिना गाजला तो हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या रोहित वेमुला याच्या आत्महत्येमुळे. रोहितच्या मृत्यूला जबाबदार धरून विद्यापीठ व्यवस्थापन, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, भाजपा नेते बंडारू दत्तात्रेय यांना सर्व स्तरांतून लक्ष्य केले गेले होते. दलित असणाऱ्या रोहितच्या आत्महत्येचा आधार घेऊन केंद्र सरकारवर आणि हिंदुत्वावर टीकेची झोड उठवली होती. रोहित दलित आहे हे जाहीर करत त्याला हुतात्मा ठरवणाऱ्यांची होड लागली होती. हैदराबाद विद्यापीठाच्या रणभूमीवर समतेची लढाई लढता लढता हुतात्मा झाला असे सांगत सोशल मीडिया पंडितांपासून ते तथाकथित उच्चभ्रू पुरोगामी विचारवंत यांच्यासाठी रोहित अल्ला झाला होता. त्याच्या नावाने समतेची लढाई, डॉ. आंबेडकरांच्या विचाराची लढाई, दलितांच्या न्याय्य हक्कांची लढाई असे वेगवेगळे ताबूत नाचवले गेले. प्रसारमाध्यमे आणि माध्यमकर्मी यांनी या काळात रोहित वेमुलाच्या आत्महत्येला इतकी हवा दिली की तोच एकमेव विषय चर्चेत राहिला. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांना आणि तीच झूल ज्यांच्या अस्तित्वाचा आधार आहे असे मानणाऱ्यांना तर रोहित वेमुलाची आत्महत्या पर्वणी ठरली.

 माणसाचे मरण हे वाईटच. आत्महत्या तर त्याहून वाईट. पण कोणाच्या मरणाला हत्यार बनवून आपल्या सुप्त इच्छा-आकांक्षा पुऱ्या करू पाहणारी ही मंडळी गेले काही दिवस कुठेतरी अदृश्य झाली आहेत आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या तंबूत स्मशानशांतता नांदताना दिसत आहे. एरवी सुतावरून स्वर्ग गाठणारी मंडळी आता अचानक मौनात जाण्यामागचे काय रहस्य आहे? रोहित वेमुलाच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी न्या. ए.के. रूपनवाल यांची एकसदस्यीय कमिटी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमली होती. या कमिटीने 15 ऑगस्ट रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालातून जे सत्य समोर आले, ते पाहून रोहितला शहीद करणाऱ्यांवर शहामृगासारखी वाळूत मान खुपसून घेण्याची वेळ आली का? रोहित वेमुलाच्या आत्महत्येची चौकशी करणाऱ्या कमिटीने निष्कर्ष काढला आहे की, हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाच्या त्रासामुळे, प्रशासनाच्या दबावामुळे रोहित वेमुला याने आत्महत्या केली नाही. त्याच्या सुसाइड नोटमध्येही तसा उल्लेख नाही. रोहित वेमुलाची आत्महत्या ही त्याच्या वैयक्तिक अडचणीच्या कारणातून केली असून तो लहानपणापासून एकटेपणाचा अनुभव घेत होता. वैयक्तिक अडचणी आणि दुःख यांचा सामना न करता आल्याने त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात माध्यमपंडितांनी आणि पुरोगामी गणंगांनी स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रेय यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. न्या. ए.के. रूपनवाल यांच्या कमिटीने या दोघावरचे बालंटही दूर केले आहे. त्याचप्रमाणे रोहित वेमुला हा दलित आहे म्हणून त्याच्याशी असा निंदनीय व्यवहार केला गेला अशी आवई उठवली होती, त्यातीलही हवा या कमिटीने काढून घेतली आहे. रोहित वेमुला दलित नव्हता, हे सिध्द झाले आहे. एकूणच काय, तर गेल्या वर्षी माध्यमे, तथाकथित पुरोगामी आणि डावे विचारवंत यांनी गाजवलेली रोहित वेमुलाची हौतात्म्यकथा मिठाच्या बाहुलीसारखी विरघळू लागली आहे आणि त्यातून एक भयानक शांतता पुरोगामी छावणीत पसरली आहे. अशा संवेदनशील विषयावर जेव्हा न्यायालयीन समित्यांचे अहवाल येतात, तेव्हा याच छावणीतून सर्वात आधी संशयाचे बोट उगारले जाते. अहवाल आणि अहवालकर्ते यांच्या हेतूबाबत शंका घेतली जाते. पण रोहित वेमुला प्रकरणात सारे कसे शांत शांत आहे.

रोहित वेमुला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत होता आणि त्यांचा समतेचा आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत होता, असे त्या वेळी माध्यमे जोरजोरात सांगत होते. पण रोहित वेमुलाच्या तणावग्रस्ततेचा आणि एकाकीपणाचा विचार करता त्याला खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळले नव्हते असे म्हणायला खूप वाव आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अशा कुमकुवत मनःस्थितीच्या युवकाचे आदर्श असू शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सनदशीर मार्गाचा अंगीकार करत परिवर्तन घडवून आणले. या प्रवासात त्यांनी वैयक्तिक जीवनातील दुःख, वेदना आणि संघर्ष यांच्यावर मात करून परिवर्तन घडवून आणले. रोहित वेमुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा मार्ग माहीत नव्हता की तो तथाकथित पुरोगाम्यांच्या हातचे बाहुले बनला होता? आपली सदसद्विवेकबुध्दी हरवून डाव्या गणंगांच्या तालावर नाचणारे प्यादे झाला होता? की आपला मोदीद्वेष व्यक्त करण्यासाठी डाव्यांनी व पुरोगाम्यांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा राजकीय वापर करून घेतला? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि या प्रश्नांची उत्तरे पुरोगामी छावणी आणि डावे मंडळी यांच्याकडे नसल्यामुळे तर ही शांतता नाही ना?

कोणाच्या मरणाचा वापर करून आपल्या स्वार्थ साधणारा वर्ग मागील काही वर्षांत प्रबळ होऊ पाहत आहे. मृत व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय यांच्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते. ज्याप्रमाणे केजरीवालांच्या सभेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याशी केजरीवालांना काहीही घेणे देणे नव्हते, तसेच रोहित वेमुलाशीही डाव्यांचा आणि पुरोगाम्यांचा काहीही संबंध नव्हता. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी रोहितचा बळीचा बकरा केला आणि आता त्याच्या आत्महत्येचा चौकशी अहवाल आल्यावर मात्र स्मशानशांतता पसरली आहे.