समस्येच्या मुळावर इलाज हवा

विवेक मराठी    05-Aug-2017
Total Views |


डयाळाच्या काटयाबरोबर स्पर्धा करणाऱ्या आजच्या जगात, सोय म्हणून आणि अन्यही कारणांमुळे घरांचा आकार लहान झाला. एकत्र कुटुंब ते संयुक्त कुटुंब असा हा प्रवास झाला. या छोटया कुटुंबाचे फायदे चटकन डोळयात भरण्याजोगे होते. व्यक्तिस्वातंत्र्याचा लाभ लहान घरातल्या प्रत्येकाला घेण्याची संधी मिळाली. त्यातून आजवर न साधलेला व्यक्तिविकासही घडून आला. इथवर सगळं ठीक होतं. मात्र मिळालेल्या स्वातंत्र्याचा हळूहळू अतिरेक होत गेला. 'स्व'च्या पलीकडचं जग धूसर होऊ  लागलं. आत्मकेंद्रिततेच्या दिशेने माणसांचा प्रवास होऊ  लागला. कुटुंबांचा मर्यादित आकार आणि सर्वांची हौसमौज हौऊ शकेल इतपत गाठीशी पैसा, असं चित्र शहरी मध्यमवर्गीय घरांमध्ये दिसू लागलं.

दूरदर्शनच्या आगमनाने घराघरांतले संवाद कमी झाल्याला काळ लोटला होता. काही घरांमध्ये त्यात भर पडत गेली ती प्रत्येक बेडरूममधील स्वतंत्र दूरचित्रवाणी संचाची. अर्थात हा बदल मोजक्या घरांपर्यंत मर्यादित होता. मात्र इंटरनेटच्या लाटेत घरातल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आणि प्रत्येकाच्या भोवती अलिप्ततेचा एक नवा कोश विणला गेला. परस्परसंवादाची भूकच नाहीशी झाली. जो काही संवाद असेल, तो हातातल्या यंत्राने जोडल्या गेलेल्या आभासी जगाशी.

हे सर्व बदल नवीन असताना त्यांचं अप्रूप वाटणं स्वाभाविक होतं. स्मार्ट फोन हा स्टेटस सिंबॉल बनून गेला. या स्मार्ट फोनच्या आणि एकूणच इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून माणसाच्या व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवनात जी पडझड होऊ  लागली, ती जाणवायला बराच काळ लागला. 'स्लो पॉयझनिंग'चं काम या मोबाइलनी आणि अत्याधुनिक गॅजेट्सनी चोख केलं. 

त्यातच एक ठरावीक आर्थिक स्तर आणि ओघाने लाभणारा ऐशआराम मिळवायचा, तर जीवनात अमुक इतकं यश मिळायलाच हवं, असा एक अलिखित सामाजिक नियम होऊन गेला. सगळी स्पर्धा या नियमानुसार होऊ  लागली.

पाठयपुस्तकी अभ्यासाला आणि त्यात मिळणाऱ्या यशाला मिळत चाललेलं अतिरेकी महत्त्व, त्यात यश संपादण्यासाठी चालू झालेली जीवघेणी स्पर्धा, त्यातून मैदानी खेळांकडे फिरवली गेलेली पाठ आणि सर्व प्रकारच्या ताणांवरचा उपाय म्हणून विविध इंटरनेट/व्हिडिओ गेम्सच्या तसंच सोशल मीडियाच्या मायाजालात गुरफटून जाणं, हे सुरू झालं.

भूमिती श्रेणीने वाढत चाललेल्या लोकसंख्येत आज सगळयात कशाची उणीव असेल, तर ज्याच्याजवळ मनमोकळं बोलता येईल अशा माणसांची.

ज्या भयकारी, शब्दश: जीवघेण्या 'ब्ल्यू व्हेल गेम'चं लोण आज भारतातही पसरत आहे, त्या गेमवर बंदी घालून मुख्य समस्या संपेल का? हा रामबाण उपाय असू शकतो का? दररोज नवनवीन शोध लागणाऱ्या आजच्या जगात ब्ल्यू व्हेलपेक्षाही काही भयकारी निर्माण होईल, याची कल्पना आपल्याला आहे ना? मग मुख्य समस्येकडे कानाडोळा का केला जातोय?

तरुण वयातच जीवनेच्छा हरपणं ही आजच्या शहरी मध्यम/उच्च मध्यमवर्गातली मुख्य समस्या आहे. ती हरपल्यामुळेच, स्वत:चा जीव गमावणं ही ज्या तथाकथित खेळाची शेवटची पायरी आहे, हे माहीत असतानाही तरुण मुलं त्या खेळाकडे ओढली जाताहेत.

ज्या वयात गगनाला गवसणी घालणारी स्वप्नं पाहायची आणि तिच्या पूर्ततेसाठी रात्रीचा दिवस करायचा, स्वत:मधल्या क्षमतांचा विकास करायचा, त्या वयातली तरुण मंडळी हे त्यांच्या जिवावर उठणारं आव्हान या खेळाच्या रूपात का बरं स्वीकारत असतील? याचा विचार व्हायला हवा.

कुटुंबसंस्था हा आपल्या देशातील समाजजीवनाचा मूलाधार आहे आणि आपल्याला त्याचा यथार्थ अभिमान आहे. मात्र जागतिकीकरणाच्या तसंच अतिरेकी स्पर्धेच्या वातावरणात हा मूलाधारच विसविशीत झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले घटस्फोट, स्त्री-पुरुषांमध्ये वाढत चाललेलं व्यसनाधीनतेचं प्रमाण, आत्महत्यांची वाढलेली संख्या या सगळया बाबी कुटुंबसंस्थेच्या बिघडलेल्या घडीकडे अंगुलिनिर्देश करत आहेत. माणसामाणसांमध्ये उभ्या राहिलेल्या भिंती याला कारणीभूत आहेत. कुटुंबसंस्थेची विसकळीत झालेली घडी पुन्हा बसवायला हवी. काळानुरूप त्यात काही बदल गरजेचे असतील तर ते जरूर करायला हवेत. मात्र कुटुंबव्यवस्था टिकायला हवी, याची जाणीव अनेकांना झाली आहे.

ज्यांना ही जाणीव झाली आहे, त्यांनी यावर उपाययोजना सुरू केली आहे. 'कुटुंब प्रबोधन' हे त्याचं नाव. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यामागे काही वर्षांतील बिघडलेल्या सामाजिक स्थितीचा केलेला अभ्यास आहे. ज्या तरुण पिढीच्या हातात उद्याच्या समर्थ भारताची धुरा सोपवायची, त्या तरुण पिढीच्या आणि एकूणच समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी संघाने हे काम हाती घेतलं आहे.

व्यक्तीव्यक्तींमधली आणि घराघरांमधली संवादाची उसवलेली वीण पुन्हा घालण्यासाठी, माणसांच्या मनात बसलेल्या परस्परांबद्दलच्या निरगाठी सोडवण्यासाठी 'कुटुंब प्रबोधन'ने काम सुरू केलं आहे. कोणत्याही कारणांनी सहज संवाद लोपला असला, तरी संवाद हीच मूळ गरज आहे. तेव्हा जाणीवपूर्वक संवाद सुरू व्हायला हवा, घरांत आणि घराबाहेरही. मनुष्याला विनाशाकडे नेणारी आत्मकेंद्रितता, अलिप्तता कमी व्हायला हवी. त्यासाठी आत्मीय संवाद हवा. माणसांनी माणसांना समजून घ्यायला हवं. मनमोकळा संवाद हा अनेक मनोविकारांवरची 'थेरपी' आहे, हे लक्षात घेऊन कुटुंब प्रबोधन काम करत आहे.

मात्र असा सारासार विचार करून ज्या कामाला सुरुवात झाली आहे त्याची टिंगलटवाळी करणं, लोकांना त्यात सहभागी होण्यापासून परावृत्त करणं यातच समाजातले तथाकथित बुध्दिमंत, प्रसारमाध्यमं धन्यता मानत आहेत. यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे.

ब्ल्यू व्हेलसारख्या खेळाच्या दुष्परिणामांवर बोलताना, त्यावर बंदीची मागणी घालताना समस्येच्या मुळावर घाव घालायला हवा. जे त्यासाठी पुढे सरसावले आहेत, त्यांना साथ द्यायला हवी.