रक्तरंजित मध्यपूर्व - इतिहास आणि वर्तमान शिया - सुन्नी संघर्ष     

विवेक मराठी    08-Aug-2017
Total Views |


शिया मुसलमानांच्या मते शेवटचे खलिफा अली इब्न अबू तलिब हेच खरे खलिफा मानले पाहिजेत. कारण ते प्रेषितांच्या घरातील होते. या चार खलिफांपैकी तीन खलिफांच्या हत्या झाल्या. अबू तालिबचीदेखील हत्या झाली. यानंतर खलिफा ही गादी मक्केहून सीरियात गेली आणि उमाय्यद खिलाफतीची स्थापना झाली. या खिलाफतीला अलीच्या मुलांचा विरोध होता. हुसेन आणि हसन अशी या दोन मुलांची नावे आहेत. यापैकी हसन याचा मक्केत संशयास्पद मृत्यू झाला. तर हुसेनची कत्तल झाली. उमाय्यद खलिफा याझिदने ही कत्तल घडवून आणली. हुसेन आणि त्याच्या काफिल्याला कसे घेरले गेले, त्यांचे पाणी कसे तोडले गेले, शेवटी अत्यंत विषम लढाई करण्यास त्यांना कसे भाग पाडले गेले आणि त्यात सर्वांच्या निर्दय कत्तली कशा झाल्या, हा हृदयद्रावक इतिहास आहे. त्यातील थोडासा भाग पुस्तकात वाचायला मिळेल.

ध्यपूर्वेतील संघर्षाला जशी ख्रिश्चानिटी विरुध्द इस्लाम अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तशी शिया विरुध्द सुन्नी अशी इस्लामी पार्श्वभूमी आहे. आज सीरिया, इराक आणि आजूबाजूच्या प्रदेशात मुसलमानांच्या कत्तली मुसलमानांकडूनच केल्या जात आहेत आणि शिया सुन्नींना मारतात आणि सुन्नी शियांना मारतात, अशा प्रकारच्या या कत्तली आहेत.

शिया आणि सुन्नी हे दोघेही मुसलमान आहेत. दोघांनाही कुराण, प्रेषित मुहम्मद, एक अल्ला, हदिद यांच्यावर सारख्याच श्रध्दा आहेत. जगात अल्लाचे राज्य आले पाहिजे, कुराणाचा अंमल सुरू झाला पाहिजे असे दोघांनाही वाटते. अल्ला, कुराण आणि प्रेषित मुहम्मद यांना न मानणारे काफिर आहेत असे दोघांचेही मत आहे. काफिरांच्या राज्यात राहता कामा नये, काफिरांच्या कोणत्याही गोष्टींचे अनुसरण करता कामा नये, काफिरांच्या राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था नरकात नेणाऱ्या आहेत, म्हणून त्या स्वीकारू नयेत असे दोघांचे मत आहे.

एवढी प्रचंड समानता असताना शिया-सुन्नी झगडा कशासाठी? असा प्रश्न कुणालाही पडेल. पाकिस्तानची निर्मिती करणारा जिना शिया होता. पण सुन्नी मुसलमानांनी आश्चर्यकारकरित्या त्याचे नेतृत्व मान्य केले. ते त्याच्या मागे उभे राहिले. तेव्हा त्यांनी घोषणा केली - 'पाकिस्तान का मतलब क्या - ला इलाही इल्लीला' म्हणजे काफिरांविरुध्द जेव्हा लढायचे असेल, तर शिया आणि सुन्नी एक होतात. प्रेषित मुहम्मदांचा आदेश आहे की मुसलमानांनी मुसलमानाविरुध्द लढू नये. मुस्लीम राज्यसत्तेविरुध्द गैरमुस्लीम राजवटीला मदत करू नये. असे करणे पाप आहे. आपण मध्यपूर्वेतील जो संघर्ष पाहतो, त्यात या सगळया गोष्टी गुंडाळून ठेवल्या आहेत असे लक्षात येते.

शिया आणि सुन्नी असे दोन पंथ प्रेषित मुहम्मद यांच्या मृत्यूनंतर लगेचच उदयाला आले. प्रेषित मुहम्मद गेल्यानंतर त्यांचा वारस कोण? असा प्रश्न निर्माण झाला. एका गटाचे म्हणणे असे की, जो कुणी वारस होईल तो प्रेषितांच्या कुटुंबातीलच हवा, प्रेषितांच्या रक्तसंबंधातील हवा. अली तालिब हे प्रेषितांचे जावई होते आणि अगदी सुरुवातीपासून ते प्रेषितांशी एकनिष्ठ राहून अनेक जीवघेण्या लढायांत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनाच प्रेषितांचे वारस करावे असे एका गटाचे म्हणणे पडले. या गटाला अलीचे चाहते किंवा पक्षकार असे नाव पडले, अरबी शब्द झाला शिया. दुसऱ्या गटाचे म्हणणे असे पडले की खलिफाची निवड पारंपरिक पध्दतीने सुन्नाच्या मदतीने करावी, म्हणजे निवड करणारे जाणकारांचे मंडळ असावे आणि त्यांनी खलिफाची निवड करावी. दुसऱ्या गटाचे म्हणणे भारी पडले आणि त्या गटाने पहिले खलिफा म्हणून अबू बकर यांची नियुक्ती केली. ज्यांना हे मान्य झाले नाही, ते वेगळे पडले, त्यांचा गट वेगळा झाला आणि इस्लामच्या संघटनेत शिया आणि सुन्नी हे दोन भाग झाले.

अबू बकर यांच्यानंतर उमर इब्न अल खताब, उस्मान इब्न अफान, अली इब्न अबू तालिब हे खलिफा झाले. या चार खलिफांना 'रशिदून खलिफा' असे म्हणतात. रशिदून याचा अर्थ सत्याच्या मार्गावरून चालणारा खलिफा. हे खलिफा सर्वोच्च धर्मगुरू जसे होते, तसे ते दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इस्लामी साम्राज्याचे प्रमुखदेखील होते. त्यांना सुलतान किंवा शहेनशहा असे म्हटले जात नाही. ते फक्त खलिफा होते. इस्लामी धर्मशास्त्राचे तज्ज्ञ आणि इस्लामी धर्म जगणारे अशी त्यांची ख्याती होती. यामुळे मुस्लीम जगतात त्यांना अतिशय मानाचे स्थान आहे.

असे असले, तरी शिया मुसलमानांच्या मते शेवटचे खलिफा अली इब्न अबू तलिब हेच खरे खलिफा मानले पाहिजेत. कारण ते प्रेषितांच्या घरातील होते. या चार खलिफांपैकी तीन खलिफांच्या हत्या झाल्या. अबू तालिबचीदेखील हत्या झाली. यानंतर खलिफा ही गादी मक्केहून सीरियात गेली आणि उमाय्यद खिलाफतीची स्थापना झाली. या खिलाफतीला अलीच्या मुलांचा विरोध होता. हुसेन आणि हसन अशी या दोन मुलांची नावे आहेत. यापैकी हसन याचा मक्केत संशयास्पद मृत्यू झाला. तो उमय्याद खलिफाने केला असा संशय आहे आणि इराकमधील करबाला या गावी हुसेन आणि त्याच्या परिवारातील 72 जणांची कत्तल झाली. उमाय्यद खलिफा याझिदने ही कत्तल घडवून आणली. हुसेन आणि त्याच्या काफिल्याला कसे घेरले गेले, त्यांचे पाणी कसे तोडले गेले, शेवटी अत्यंत विषम लढाई करण्यास त्यांना कसे भाग पाडले गेले आणि त्यात सर्वांच्या निर्दय कत्तली कशा झाल्या, हा हृदयद्रावक इतिहास आहे. त्यातील थोडासा भाग पुस्तकात वाचायला मिळेल.

करबालाच्या घटनेवर इस्लामी अभ्यासक डॉ. नाझीर अहमद म्हणतात, ''करबाला इस्लामी श्रध्देचा शेवटचा श्वास ठरला आहे. मुस्लिमांच्या समाजशास्त्रावर फारच थोडया ऐतिहासिक घटनांचा प्रभाव पडला आहे. करबालाच्या घटनेने त्यांच्या भाषेवर, संस्कृतीवर आणि राजकारणावर प्रभाव पाडला आहे. हजार वर्षांनंतर जन्मलेल्या स्वाहिली आणि उर्दू भाषा करबालाच्या घटनेवर, ही घटना कालच घडली अशा प्रकारे भाष्य करताना दिसतात. कौलालंपूरचा मजूर असो की लाहोरचा कल्लाळ अथवा शिकागोचा प्राध्यापक असो, सगळेच करबाला घटनेवर भावुक होतात. करबाला एकाच वेळी नाम, विशेषण आणि क्रियापद झालेले आहे. इस्लामी इतिहासात करबाला मैलाचा दगड ठरलेला आहे.'' (संदर्भ - डॉ. नाझीर अहमद, हिस्टरी ऑफ इस्लाम.)

शिया लोक मोहरम साजरा करून करबालाच्या घटनेची आठवण करतात. सार्वजनिकरित्या शोक करतात. सुन्नींना ते आवडत नाही आणि म्हणून भारतातदेखील मोहरमच्या काळात शिया-सुन्नी झगडे होतात. शिया खलिफा मानत नाहीत, ते इमाम मानतात. शियांचा इमाम आणि सुन्नींचा इमाम शब्द एक असला, तरी अर्थांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. शियांचा इमाम हा सर्वोच्च धर्मगुरू असतो आणि तो प्रेषितांची प्रतिकृतीअसतो, त्यांच्या आज्ञेत राहायचे, त्याला आदर्श मानून आपले जीवन घडवायचे. बारा इमाम मानणारा शियांचा पंथ आहे. बारावा इमाम मुहम्मद अल महदी (जन्म 1868) हा अदृश्य झाला, तो गुप्त रूपाने आपल्याला मार्गदर्शन करतो आहे असे शिया मानतात. इमाम खोमेनी हे बाराव्या इमामाचे प्रतीक आहेत अशी अनेकांची श्रध्दा आहे.

शियांना सुन्नी राजवट चालत नाही - म्हणजे सुन्नी सुलतान, पातशहा चालत नाही आणि सुन्नींना शिया राजवट चालत नाही. इराकमध्ये शियांची बहुसंख्या आहे. सद्दाम हुसेन सुन्नी होता. अरब कोणत्या ना कोणत्या टोळीतील असतो. सद्दाम हुसेन यांनी आपल्या टोळीतील लोकांना सैन्यातील अधिकारपदे आणि प्रशासनातील अधिकारपदे दिली. अल्पसंख्य सुन्नी बहुसंख्य शियांवर राज्य करू लागले. अमेरिकेनेसद्दामची राजवट उलथून पाडल्यानंतर शियांना राजगादीवर आणले. शियांना राजगादीवर आणल्यामुळे बरखास्त झालेले सुन्नी सैनिक इसिसमध्ये सामील झाले आणि मग इसिस काय करते याच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो. हे सुन्नी शियांना निर्दयपणे ठार मारतात. लहान मुले, स्त्रिया, वृध्द, अपंग कुणावरही दया करीत नाहीत. पिंजऱ्यात कोंडून त्याच्याभोवती आग लावून त्यांना भाजून ठार मारतात. हेच काम शियादेखील करतात. इराक ते सीरिया एवढया सगळया भूभागात हा संघर्ष पसरलेला आहे. सीरियातून चाळीस लाख मुसलमान निर्वासित झाले आहेत, बहुसंख्य सुन्नी आहेत, राजवट शिया असादची आहे आणि इराक-सीरिया यादवीत काही नाही तरी तीन लाख लोक ठार झाले आहेत. मरणाऱ्यांत ख्रिश्चन अल्पसंख्य आहेत, मुसलमान बहुसंख्य आहेत.

(हे पुस्तकातील प्रकरण नाही,

काही प्रकरणांचा हा सारांश आहे.)

vivekedit@gmail.com