पायाची काळजी - 2

विवेक मराठी    08-Aug-2017
Total Views |


पायाला मुंग्या येत असतील, तळवे जळत असतील, त्यांची आग होत असेल, पायाखाली गादी ठेवल्याचा किंवा गालिच्यावरून चालल्याचा भास होत असेल, तर त्याचा नीट तपास व्हायला हवा. नायलॉनची एक लहानशी काडी वापरून डॉक्टर तुमच्या पायाला धोका किती हे सहज सांगू शकतील. याला 'मोनोफिलामेंट टेस्ट' म्हणतात. टोचल्यावर 10 ग्रॅम इतका दबाव टाकणारी ही इवलीशी काडी पाय वाचवण्याच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावते. मग पायाला धोका आहे की नाही हे कळण्यासाठी कुठल्याच महागडया तपासणीची गरज उरत नाही. जवळपास फुकट तुमचं निदान होतं.

धुमेहात पायाचे प्रश्न का होतात हे कळल्यानंतर आपले पाय कापले जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणं आलं. दुर्दैव असं की बहुतेक वेळेला रुग्ण आणि डॉक्टर यांचं पायाकडे दुर्लक्ष होतं. कित्येकदा बूट, पायमोजे काढून पायांकडे एक साधी नजरदेखील टाकली जात नाही. जरी इतर कोणी पाहिलं नाही, तरी स्वत:च स्वत:च्या पायाकडे रोज पाहणं कुणालाही अशक्य नाही. त्यासाठी पैसेदेखील लागत नाहीत. केवळ पायासाठी काय करता येईल याच्या यादीकडे दृष्टिक्षेप टाकला, तरी आपले पाय सांभाळणं किती सोपं आहे, याची खात्री पटेल.

फक्त खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही हो किंवा नाही इतकीच द्यायची आहेत. काही प्रश्न तुम्हाला आपोआपच विचार करायला लावतील.

  1. पूर्वी कधी तुम्हाला पायाला जखम झाली आहे काय? असल्यास ती बरी व्हायला दोन आठवडयांहून अधिक वेळ लागला आहे का?
  2. पायाच्या तळव्याला कधी जखम झाली होती का?
  3. तुमच्या पायाचा एखादा भाग - उदा. बोट वगैरे कधी कापण्याची पाळी आली होती का?
  4. आता तुमच्या पायाला जखम वा फोड झाला आहे का?
  5. तुम्ही पायमोजे काढल्यावर त्याला रक्त किंवा पू लागलेलं दिसलं आहे का?
  6. तळपायाच्या त्वचेचा कुठलाही भाग जाडसर आणि घट्ट झालेला आहे का? पायाला भोवरी आहे का?
  7. तुमच्या पायाला कधी मुंग्या येतात का? कधी टोचल्यासारखं होतं का? पाय सुन्न पडतात का? पायाच्या खालच्या भागाला सतत कंड सुटतो का? पायाच्या खाली गाडी ठेवल्यासारखं किंवा तुम्ही गालिच्यावर चालताहात असं वाटतं का?
  8. पाय किंवा पोटऱ्या जाड, जड होतात का? चालताना त्यात खेचल्यासारखं वाटतं का?
  9. तुम्ही आपल्या पायांचे तळवे कधी निरखून पाहिले आहेत का? असल्यास किती वेळा? रोज? आठवडयातून दोन/चार वेळा? आठवडयातून एकदा? गरज पडली तर? अजून कधीच नाही?
  10. आपल्या पायाची काळजी तुम्ही कशी घेता? प्रत्येक वेळी बाहेरून आल्यावर धुता? साबण लावता? फक्त आंघोळीच्या वेळी साफ करता?
  11. धुवून झाल्यावर पायाच्या बोटांमधली जागा पूर्ण कोरडी करता का?
  12. तुम्ही पायाच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावता का? आंघोळीनंतर अंगाला तेल लावण्याची सवय आहे का?
  13. तुम्ही स्वत:ची नखं स्वत: काढता का? की कुणाची तरी मदत घेता? मॅनिक्युअर करता का?
  14. तुम्ही कशा प्रकारची पादत्राणं घालता? पुढे टोकदार असलेली? सँडल्स? चामडयाचे बूट? कॅनव्हासचे बूट? बाजारात तयार मिळणारे की खास बनवून घेतलेले बूट व चप्पल? स्लीपर्स? स्पोर्ट्स शूज? उंच टाचेचे? वेल्क्रो लावलेले, सहज कमी-जास्त टाइट करता येणारे सँडल्स? प्लास्टिक्सचे?
  15. तुमचे बूट पायात घातल्यावर तुम्हाला टोचतात? चावतात? दुखतात का?
  16. तुम्ही कुठल्या प्रकारचे पायमोजे वापरता? सुती? नायलॉन? उली-वूलनचे? मधुमेहींसाठी खास मिळणारे? इलॅस्टिक नसलेले/असलेले? इतर कुठल्या प्रकारचे?
  17. तुमच्या पायाची जडणघडण इतरांच्या पायांपेक्षा वेगळी आहे का? एखादं बोट आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वळलेलं किंवा मधला भाग अवास्तव उंच किंवा बोटं एकमेकांवर चढलेली आहेत का?
  18. तुम्ही कधी पाण्यात पाय बुडवता का? कधी पायांना गरम पाण्याचा शेक घेता का? असल्यास प्रत्येक वेळी पाण्याचं तापमान किती आहे याचा हाताने अंदाज घेता किंवा कसं?
  19. तुम्ही कधी कॉर्न कॅप लावल्यात अथवा स्वत:च पायाची भोवरी काढण्याचा प्रयत्न केलाय का?
  20. तुम्ही कधी अनवाणी चालता का? भर उन्हात? गरम रस्त्यावर? उष्ण फरशीवर?
  21. तुम्ही कधी पायमोज्यांशिवाय बूट घालता का?
  22. तुम्ही कधी दीर्घकाळ पाय दुमडून वा एकमेकांवर घेऊन बसता का?
  23. पायात सरकवण्यापूर्वी तुम्ही आपल्या बुटात काही लपलेलं नाही याचा अंदाज घेता का?
  24. तुम्ही धूम्रपान अथवा इतर कुठल्याही प्रकारे तंबाखूचा वापर करता का?
  25. तुमचे डॉक्टर तुमचा पाय तपासून पाहतात का? तसा तुम्ही कधी आग्रह धरला आहे का?
  26. मधुमेहात स्वत:च्या पायाची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्ही कधी वाचन/गूगलवरून/डॉक्टरांशी चर्चा करून/पोडियाट्रिस्टकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय का?
  27. तुमच्या घरातील अथवा ओळखीच्या कोणा व्यक्तीचे पाय किंवा पायाचा भाग मधुमेहामुळे कापावा लागलाय का?
  28. बराच काळ पलंगावर अथवा खुर्चीवर बसून राहिल्यानंतर तुमची पावलं पांढरी, निस्तेज दिसतात का?

यातल्या प्रत्येक प्रश्नाला पाय सांभाळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. काही प्रश्न पायाला जखम न होण्याच्या दिशेने, तर काही चुका सुधारण्यासाठी योजलेले आहेत, तर शेवटचा प्रश्न रक्तपुरवठयाबद्दलचा आहे. पायांची काळजी घेण्याबाबत Prevention Is Better Than Cure ही म्हण बोलकी आहे. मधुमेहात साध्या वाटणाऱ्या जखमा पुढे जडवतात आणि गंभीर स्वरूप धारण करतात, म्हणून हे सांगणं आलं.

आता मुख्य प्रश्न आला तो हा की रोजच्या जीवनात मधुमेहींनी पाय खराब होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? छोटया छोटया गोष्टी करून हे सहज साध्य करता येऊ शकेल. पहिली म्हणजे आपलं ग्लुकोज नेहेमी नियंत्रणात ठेवावं. ग्लुकोज नियंत्रणात असेल, तर कित्येक वर्षं न्यूरोपॅथी होणार नाही, रक्तवाहिन्या शाबूत राहतील आणि पायाच्या स्नायूंना इजा न झाल्याने पायाच्या रचनेत बदल होणार नाही. म्हणजे एक प्रकारे पायाला धोका निर्माण करणाऱ्या सगळयाच प्रश्नांना पायबंद झाल्यासारखंच. अर्थात रक्तवाहिन्यांचं चोंदणं निव्वळ मधुमेहावर अवलंबून नाही. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब काबूत राखणं या गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून रक्तातलं ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि सोबत ब्लड प्रेशर या त्रिकूटाला आपल्या कह्यात ठेवायलाच हवं.

मधुमेहींना सुचवायची दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी धूम्रपान किंवा तंबाखूचा वापर त्वरित थांबवावा. तंबाखू आणि मधुमेह ही जोडी फारच जहाल आहे. त्यामुळे तंबाखूशी फारकत घेण्याचा निर्णय त्यांना खूप फायद्याचा ठरेल.

तिसरी आणि तितकीच महत्त्वाची बाब आपल्याला होणाऱ्या त्रासाची शहानिशा करण्याची. पायाला मुंग्या येत असतील, तळवे जळत असतील, त्यांची आग होत असेल, पायाखाली गादी ठेवल्याचा किंवा गालिच्यावरून चालल्याचा भास होत असेल, तर त्याचा नीट तपास व्हायला हवा. नायलॉनची एक लहानशी काडी वापरून डॉक्टर तुमच्या पायाला धोका किती हे सहज सांगू शकतील. याला 'मोनोफिलामेंट टेस्ट' म्हणतात. टोचल्यावर 10 ग्रॅम इतका दबाव टाकणारी ही इवलीशी काडी पाय वाचवण्याच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाची भूमिका बजावते. मग पायाला धोका आहे की नाही हे कळण्यासाठी कुठल्याच महागडया तपासणीची गरज उरत नाही. जवळपास फुकट तुमचं निदान होतं. म्हणून किमान वर्षातून एकदा ही तपासणी करण्याचा आग्रह तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे धरा.

मधुमेहात पायाला जखमा होतात त्या संवेदना संपल्यामुळे. जेव्हा संवेदना संपल्याचं कळतं, तेव्हा पायाकडे रोजच्या रोज पाहणं फारच महत्त्वाचं ठरतं. पाय म्हणजे पायाचा तळवा. तो नीट निरखून पाहणं शक्य नसल्यास प्रसंगी पायाखाली आरसा धरायला हवा. कुठेही जराही जखम दिसल्यास ताबडतोब ती गोष्ट डॉक्टरांच्या नजरेला आणून द्यायला हवी. नुसती जखम पाहून काम भागणार नाही, पायाच्या कानाकोपऱ्यात कुठे भोवरी दिसते का? कुठे त्वचा जाड झालीय का? हे नीट निरखून पाहून ती ती बाब डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यायला हवी. भोवरी अथवा जाड झालेली त्वचा काढून टाकायला हवी. तुम्ही म्हणाल, खरंच हे इतकं करायला हवं का? त्याचं उत्तर ठासून 'हो' असंच आहे. कारण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचे पाय अशा अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या जखमा जडावूनच कापले जाताहेत. An Ounce Of Prevention Is Better Than A Ton Of Cure हे इंग्लिश वचन पायाच्या बाबतीत अक्षरश: खरं आहे. 

9892245272