लव्ह जिहाद - एक भेडसावणारे वास्तव

विवेक मराठी    01-Sep-2017
Total Views |


  भिन्नधर्मीय विवाह होऊच नयेत असे कोणीच म्हणणार नाही.. एकविसाव्या शतकात आपला जोडीदार स्वत: निवडायचा हक्क सगळयांनाच आहे. माझ्या तीन हिंदू मैत्रिणींनी स्पेशल मॅरेज ऍक्टखाली मुसलमान पुरुषांशी लग्ने केलेली आहेत. तिघींनीही त्यांचा धर्म बदललेला नाही. त्यांची मुलेही मुसलमान आणि हिंदू अशा दोन्ही धर्मपरंपरा पाळतात. मुस्लीम सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई ह्यांनीही म्हटले होते की ''आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत, पण आपापला धर्म पाळायचा दोन्ही व्यक्तींचा हक्क अबाधित ठेवून.'' अशा विवाहातून जन्मलेली मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना त्यांचा स्वत:चा धर्म निवडायचा अधिकार मिळाला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी मला फेसबुकवरून मेसेज आला. पाठवणारी मुलगी हिंदू आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका छोटया शहरात कॉलेजमध्ये शिकते. तिचा प्रश्न 'लव्ह जिहाद'बद्दल होता. तिला तिच्या कॉलेजमधला एक मुस्लीम तरुण आवडतो, पण भिन्न धर्माचा असल्यामुळे ती सध्या विचारात पडलेली आहे. तिचा प्रश्न होता की ''घटनेने कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला स्वत:ला हव्या त्या व्यक्तीशी विवाह करायचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाहाला 'लव्ह जिहाद' हे नाव देणे म्हणजे खऱ्या प्रेमाचा अपमान नाही का?'' मी तिला सांगितले की ''प्रत्येक आंतरधर्मीय विवाह हा अर्थातच 'लव्ह जिहाद' असू शकत नाही; पण बिगरमुस्लीम मुलींना पध्दतशीरपणे प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांचे आधी धर्मांतर करून मग त्यांच्याशी निकाह करणे म्हणजे 'लव्ह जिहाद.''

'लव्ह जिहाद' हा हिंदुत्ववादी संघटनांनी उभा केलेला खोटा बागुलबुवा आहे असे चित्र पारंपरिक प्रसारमाध्यमांमधून इतके दिवस रंगवले जात होते. पण आता केरळ पोलिसांनीच एका गोपनीय अहवालात हे मान्य केले आहे की केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे, आणि केवळ इतकेच नाही, तर स्वत:ला 'दावा स्क्वॉड' म्हणवून घेणारी एक इस्लामी संघटना केरळमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या कामात अग्रेसर आहे. टाइम्स नाऊ  ह्या इंग्लिश वृत्तवाहिनीने 23 जून 2017 रोजी आपल्या प्राइम टाइम शोमध्ये अशा प्रकारचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी इस्लामी संघटनांनी रेटकार्डदेखील प्रसिध्द केले आहेत, असा दावा केला होता. आता तर खुद्द केरळ पोलिसांनीदेखील हे कबूल केले आहे की केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे आणि इतकेच नव्हे, तर ज्या मुलींना सातत्याने धर्मांतरासाठी लक्ष्य केले जाते, त्यामध्येही एक सुविहित योजना दिसून येते.

केरळ पोलिसांच्या अहवालानुसार 'दावा स्क्वॉड'चे लोक साधारण 18-28 ह्या वयोगटातल्या, फारशा आर्थिक सुस्थितीत नसलेल्या कुटुंबातल्या पदवीधर मुलींना हेरतात. ह्या मुली बहुधा कम्युनिस्ट विचारांच्या कुटुंबातून आलेल्या असतात. त्यांच्यावर लहानपणापासून सहसा कुठलेही हिंदू धार्मिक संस्कार झालेले नसतात आणि शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ह्या मुली बरेचदा घरापासून दूर राहत असतात. ह्या मुलींना जाळयात अडकवायची पध्दतही ठरलेली असते. त्या शिक्षणासाठी ज्या शहरात राहतात, त्या ठिकाणी 'दावा स्क्वॉड'च्या युवती त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री करतात. त्यांची सर्व सुखदु:खे वाटून घेतात. त्यांच्या पालकांशी कधी मुलींचे संघर्ष झाले, तर ह्या 'दावा स्क्वॉड'च्या युवती पूर्णपणे हिंदू मुलींचीच बाजू घेऊन त्यांचे आई-वडीलच कसे जुलमी आहेत हे त्यांना पटवून देतात. हळूहळू मग त्यांच्यावर इस्लामी तत्त्वज्ञानाची महती सांगणाऱ्या पुस्तिकांचा मारा सुरू होतो. इस्लाम कसा मुलींची बाजू उचलून धरणारा धर्म आहे वगैरे गोष्टी त्यांना सतत सांगितल्या जातात. मग मुलगी आपल्या प्रभावाखाली येते आहे असे वाटले की कुणा मुसलमान मुलाशी त्या मुलीची ओळख करून दिली जाते. तो आपला भाऊ, मित्र आहे वगैरे नाते सांगितले जाते. तो मुलगा मग ह्या हिंदू मुलीला पध्दतशीरपणे आपल्या जाळयात ओढतो. दोघांची ओळख करून देणारी 'दावा स्क्वॉड'ची युवती त्यांना जास्तीत जास्त वेळ एकत्र कसा घालवता येईल ह्याच्याकडे लक्ष देते. मुलगी कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे हे जमवून आणणे सोपे जाते. प्रेम ह्या संकल्पनेवरच प्रेम करण्याच्या वयातली स्वप्नाळू मुलगी मग ह्या जाळयात जास्त जास्त अडकत जाते. तिच्या हिंदू कुटुंबाबरोबरचा तिचा संवाद कमी कमी होत जातो आणि ती इस्लामी कट्टरतावाद्यांच्या पूर्ण आहारी जाते.

केरळमध्ये सध्या गाजत असलेल्या आथिरा उर्फ हदियाच्या प्रकरणात नेमके हेच घडलेय. आथिराच्या घरी तिची आई हिंदू रितीरिवाज पाळणारी, पण तिचे वडील साम्यवादी विचारांचे. आईच्या धर्मभावनांची मुलीच्या देखत 'अंधश्रध्दा' म्हणून टिंगल उडवणारे. शिक्षणासाठी आथिरा तिच्या गावापासून दूर कोझीकोडला येऊन राहिली होती. तिथे तिच्या वसतिगृहात सैनाबा ह्या पीएफआय ह्या इस्लामी संघटनेच्या कार्यकर्तीशी तिची गाठ पडली. ह्या सैनाबाने स्वत: मानसोपदेशक असल्याचे भासवून आथिराशी मैत्री केली आणि हळूहळू तिच्या कुटुंबाविषयी तिचे मन कलुषित केले. आथिरा आणि तिच्या आई-वडील यांच्यामधला संवाद तुटल्यानंतर तिचे पध्दतशीरपणे इस्लाम धर्माबद्दल ब्रेनवॉशिंग करण्यात आले. तिला धर्मांतराला तयार करण्यात आले आणि नंतर शफीन जहाँ ह्या मुसलमान तरुणाशी तिची गाठ घालून देण्यात आली. त्याचा व तिचा घाईत निकाह करण्यात आला. ह्यादरम्यान तिच्या आई-वडिलांना ह्या प्रकारची कुणकुण लागताच आथिराला कोझीकोडहून घरी नेण्यासाठी ते आले असता सैनाबा आणि तिच्या सहकारी लोकांनी आथिराला वेगवेगळया ठिकाणी हलवून तिच्या आई-वडिलांपासून दडवून ठेवले. शेवटी तिच्या वडिलांनी कोर्टात हिबियस कॉर्पसचा दावा करून आथिराचा ठावठिकाणा शोधून काढला व फसवून केलेले असल्यामुळे हे लग्न रद्द करावे अशी कोर्टापुढे मांडणी केली. सर्व साक्षी-पुरावे पडताळून बघितल्यानंतर केरळ हायकोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करून शफिन जहा व आथिरा यांचे लग्न रद्द करून आथिराचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे दिला. ह्या निकालाच्या विरोधात शफिन जहाँ सर्वोच्च न्यायालयात गेला. ह्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची बाजू मांडताना ही केवळ आंतरधर्मीय विवाहाची केस नसून हिंदू तरुणींना फूस लावून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याचा पध्दतशीर प्रयत्न केरळमध्ये होतोय आणि ह्या धर्मांतराची पाळेमुळे थेट इस्लामी दहशतवादापर्यंत पोहोचतात, असे प्रतिपादन एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात केले. ह्या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला केरळमध्ये ह्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.


खरे तर हे 'लव्ह जिहाद' प्रकरण तसे नवे नाहीच. 2010मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन ह्यांनीही कडव्या इस्लामी संघटना 'मॅरेज ऍंड मनी' म्हणजे 'लग्न आणि पैसा' ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. केरळची चर्च आणि हिंदू संघटना ह्यांनीही कधी नव्हे ते एकत्र येऊन ह्या आरोपाला पुष्टी दिली होती. काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरदेखील 'लव्ह जिहाद' हे सत्य आहे आणि त्यासाठी कडव्या मुस्लीम संघटना पध्दतशीरपणे प्रयत्न करत आहेत असा खळबळजनक आरोप पुराव्यानिशी करण्यात आला होता. केरळ पोलिसांच्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत केरळमध्ये जवळजवळ दोनशे मुलींनी हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला आहे आणि तोसुध्दा निकाह करण्यासाठी म्हणून. खुद्द केरळचे पोलीस प्रमुख लोकनाथ बेहेरा ह्यांनीच वार्ताहरांशी बोलताना सांगितले आहे की ''इस्लामी कट्टरतावाद केरळमध्ये फोफावत आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणून हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे.''

केरळमधील 'लव्ह जिहाद'चे हे प्रकरण आता केरळ पोलिसांच्याच कबुलीमुळे चव्हाटयावर तरी आले आहे. पण हा प्रश्न केवळ केरळपुरताच सीमित नाही. पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ह्यासारख्या राज्यांमधूनदेखील 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे वाढत आहेत आणि ह्याची पाळेमुळे थेट इस्लामी दहशतवादापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. तथाकथित 'प्रागतिक' विचारसरणीच्या लोकांचा ह्यावरचा युक्तिवाद म्हणजे, प्रेम हे धर्मातीत असते, त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे. कायदेशीरदृष्टया हे बरोबरच आहे; पण असे विवाह करणाऱ्या मुली कुठल्या कुटुंबांतून येतात, विवाह करताना त्यांची मानसिक स्थिती काय असते, त्या मुसलमान होणार म्हणजे नक्की काय करणार, त्या एका निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काय फरक पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्यांना असते का? हे सगळे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. मुद्दा दोन भिन्नधर्मीय लोकांनी प्रेमात पडण्याचा नाही किंवा लग्न करण्याचाही नाही. मुद्दा आहे तो लग्नाआधी एक गरज म्हणून जबरदस्तीने मुलीचे धर्मांतर करवून घेण्याचा.

भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता 'स्पेशल मॅरेज ऍक्ट'खाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. प्रसंगी पतीबरोबर न पटल्यास तिला कोर्टात जाऊन घटस्फोट घेण्याचा, पोटगी मागण्याचा आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नी म्हणून अधिकार सांगण्याचा हक्क आहे. स्पेशल मॅरेज ऍक्टखाली विवाह करणारी जोडपी कुठल्याही धार्मिक कायद्याच्या कक्षेखाली येत नाहीत. पण ज्या स्त्रिया लग्नापूर्वी धर्मांतर करून इस्लामी शरिया कायद्याखाली निकाह करतात, त्यांना मात्र त्यांच्या सगळया अधिकारांवर पाणी सोडावे लागते. मुसलमान पुरुषाला शरिया कायद्यानुसार चार वेळेला विवाह करायचा अधिकार आहे. त्याला पत्नीला आवाजी घटस्फोट द्यायचा अधिकार आहे, जो अधिकार स्त्रीला नाही. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने इन्स्टंट ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांसाठी बंदी आणलेली आहे, पण तीन महिन्यांत दिलेला इस्लामी आवाजी तलाक आजही ग्राह्य आहे. मुद्दा हा आहे की लग्नासाठी धर्मांतर करणाऱ्या मुलींना ह्या सगळयाची योग्य कल्पना असते का? 

बहुतेक मुली खूप कोवळया वयात भावनेच्या भरात त्यांच्या प्रियकरांच्या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितले जाते की फक्त 'निकाहपुरता' धर्म बदलायचा आहे. एकदा लग्न झाले की मग ती मुलगी आपापल्या मूळ धर्माच्या चालीरिती पाळू शकते. त्या वेळेला मुलीची मन:स्थिती खूप नाजूक असते. एकतर ती प्रेमाच्या धुंदीत इतकी आकंठ बुडालेली असते की सारासार विचार करण्याची तिची शक्तीच नष्ट झालेली असते. त्यात तिच्या घरून तर अशा लग्नाला बहुधा कट्टर विरोध असतो. त्यामुळे पळून जाऊन लग्न करणे वगैरे आततायी निर्णय तिने घेतला की माहेरचा उरलासुरला आधारही तिच्यासाठी नष्ट होतो. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा उपायच नसतो. माझ्या ओळखीच्या एका हिंदू मुलीने असाच वयाच्या अठराव्या वर्षी पळून जाऊन धर्मांतर करून एका मुसलमान मुलाशी निकाह केला. पण काही महिन्यांतच त्या माणसाचे खरे स्वरूप तिला कळून चुकले. तो माणूस तिला मारहाण करायला लागला. तिला आपल्या कुटुंबीयांच्या करडया नजरेच्या पहाऱ्यात कोंडून ठेवायला लागला. तिच्या सुदैवाने तिथल्याच एका सहृदय मुसलमान शेजारणीने तिला तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधायला मदत केली. त्यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. तिने मग रीतसर विधिपूर्वक परत हिंदू धर्म स्वीकारला, वकिलीचा अभ्यास पूर्ण केला आणि आज ती हैदराबादमध्ये प्रॅक्टिस करते. तिच्या बहुतेक पक्षकार आहेत ट्रिपल तलाकने पीडित मुसलमान महिला. ती मुलगी नशीबवान, म्हणून तिला तिच्या माहेरचा भरभक्कम आधार मिळाला आणि त्या सापळयातून तिला बाहेर पडता आले. पण बरेच वेळेला धर्मांतर केलेल्या मुलींचा माहेरचा आधार तुटल्यामुळे त्यांना आहे त्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत घेत मग ती मुलगी हळूहळू स्वत:च कडवी इस्लाम धर्माभिमानी बनत जाते. प्रख्यात कन्नड साहित्यिक एस.एल. भैरप्पा ह्यांच्या 'आवरण' ह्या कादंबरीत हा लव्ह जिहाद कसा होतो, ह्याचे फार प्रत्ययकारी वर्णन आहे. प्रत्येक तरुण मुलीने हे पुस्तक जरूर वाचावे.

ह्या संबंधात अशा दबावाला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींच्या संदर्भात काम करणाऱ्या 'अग्निवीर' ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी मी बोलले. त्यांचे म्हणणे होते की लव्ह जिहादच्या बहुतेक केसेसमध्ये जोपर्यंत मुलीच्या आई-वडिलांपर्यंत ही माहिती पोहोचलेली असते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. मुलगी धर्मांतराचा आणि लग्नाचा निर्णय घेते, त्याआधीच तिचे आणि त्या मुलाचे शरीरसंबंध आलेले असतात आणि ती पूर्णपणे त्याच्या कह्यात गेलेली असते. तिच्या आई-वडिलांचा हिंदू धर्म हा कसा वाईट आहे, अंधश्रध्दाळू आहे हे तिला सतत सांगितले गेलेले असते. बहुतेक केसेसमध्ये अशा मुलींवर हिंदू धर्माचे काहीही संस्कार मुळात झालेले नसतात. त्यामुळे त्या अशा सांगण्यावर पटकन विश्वास ठेवतात. जेव्हा अशा मुलींना कुणी समजवायला जाते, तेव्हा त्यांनी द्यायची उत्तरे त्यांना आधीच पढवून ठेवलेली असतात, त्यामुळे मुलगी, ''मी आता सज्ञान आहे. माझे भले-बुरे मी ठरवू शकते'', ''आमचे प्रेम खरे आहे आहे आणि प्रेमाला धर्म नसतो. प्रेम हाच धर्म आहे'', ''इस्लाम स्त्रियांचा आदर करतो. बाकी  मुसलमान पुरुष स्त्रियांवर अन्याय करत असले, तरी माझा प्रियकर तसा नाही'' वगैरे युक्तिवाद सहजपणे करते. त्या कार्यकर्त्याचे असे म्हणणे होते की ह्या प्रकरणात आपल्या मुलींनी बळी पडू नये असे जर पालकांना वाटत असेल, तर त्यांनी मुले लहान असल्यापासूनच ह्या विषयावर त्यांच्याशी सतत संवाद साधणे सुरू करावे. 'तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल, तर माझ्यासाठी आधी मुसलमान हो, मग आपण निकाह करू' असा लंगडा युक्तिवाद करणाऱ्या मुलाला मुलीला विचारता आले पाहिजे की 'जर खऱ्या प्रेमाला धर्म नसतो, तर मग मी माझा धर्म का बदलावा?' जर प्रेम खरे असेल, तर स्पेशल मॅरेज ऍक्टखाली विवाह करायला मुलगा किंवा मुलगी, दोघांपैकी कुणाचीच हरकत नसली पाहिजे.

पत्रकार सुनीला सोवनी ह्यांनी 'लव्ह जिहाद'च्या प्रत्यक्ष केसेसमध्ये अडकलेल्या तरुणी, त्यांचे आई-वडील, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि मानसोपचारतज्ज्ञ वगैरे लोकांशी बोलून, त्यांच्या मुलाखती घेऊन, विभिन्न घटकांमधल्या, विविध राज्यांमधल्या तरुणींना भेटून 'लव्ह जिहाद - दबलेले भयानक वास्तव' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे. ते वाचले म्हणजे ह्या प्रकरणांमधली सुसूत्रता लक्षात येते. एक म्हणजे ह्या लव्ह जिहाद प्रकरणात ज्या मुली प्रामुख्याने फसतात, त्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अभाव असतो. कधी आई-वडिलांबरोबर संवादाचा अभाव, कधी घरात सतत होणारी भांडणे, कधी भीषण गरिबी, तर कधी मुळातच मुलीचा चंचल, बाह्य झगमगाटाला भुलणारा स्वभाव. सुनीला सोवनींच्या मते लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या बहुसंख्य मुली कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावे ह्यासाठी इतक्या आसुसलेल्या असतात की कुणीतरी रोज आपल्याकडे बघतो, त्याचे हसणे अगदी आमिर खानसारखे आहे इथपासून ते त्याच्याकडे मस्त मोटरबाइक आहे इथपर्यंतचे कुठलेही कारण त्यांच्यासाठी प्रेमात पडायला पुरेसे होते. एकदा मुलगी मुलाकडे आकर्षित झाल्यावर मुलाकडून तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात येतो. अगदी नेलपेंट, लिपस्टिकपासून ते महागडया परफ्यूमपर्यंत भेटवस्तू दिल्या जातात. पुढचा टप्पा म्हणजे मुलगा मुलीला फोन घेऊन देतो व घरच्यांना ह्या फोनबद्दल सांगू नको असे बजावतो. अशा रितीने मुलीच्या घरच्या लोकांना कळू न देता त्यांचा संपर्क बिनबोभाट सुरू होतो. त्यात मुलगी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहत असली, तर प्रकरण आणखीनच सोपे होते. केरळमध्ये आपापली गावे सोडून शिक्षणासाठी म्हणून राहिलेल्या मुली मोठया प्रमाणात अशा प्रेमप्रकरणांच्या शिकार होताना दिसतात.

एकदा 'प्रेम'प्रकरण सुरू झाले की दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक संबंध. सुनीला सोवनींच्या मते हा सगळयात धोकादायक टप्पा आहे. प्रेम सिध्द करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रियकराबरोबर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मित्राच्या घरी राहणे. असे करण्यास नकार देणाऱ्या मुलींवर भावनिक दबाव आणला जातो. शारीरिक भूक तर त्या अडनिडया वयात असतेच, त्यामुळे मुलगी प्रियकराबरोबर एकत्र राहायला फार पटकन तयार होते. लग्नाचे वचन तर त्याने दिलेलेच असते. एकदा शारीरिक संबंध आल्यानंतर मग मुलगी पुरतीच फशी पडते. काही वेळेला तिचे चित्रीकरण वगैरेही केले जाते. त्यामुळे ती बाहेर पडायचे मनात आले, तरी ह्या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाही. ह्याच दरम्यान निकाहची पूर्वतयारी म्हणून मुलीला इस्लामी रितीरिवाज पाळायचा आग्रह केला जातो. मुलगी घरी आपल्या आई-वडिलांबरोबर जरी राहत असली, तरी तिला आई-वडिलांपासून लपवून नमाजपठण वगैरे करायला सांगितले जाते. वाचायला पुस्तके दिली जातात.

शेवटचा टप्पा म्हणजे पध्दतशीर धर्मांतर करवून निकाहनामा करणे. बहुसंख्य मुली आपल्या कायदेशीर हक्कांविषयी अगदीच अनभिज्ञ असतात. त्यामुळे, धर्मांतर केल्यामुळे आपण कुठल्या हक्कांवर पाणी सोडतोय ते त्यांना मुळात कळतच नाही. त्यातही एखाद्या शिकलेल्या, जागरूक मुलीने स्पेशल मॅरेज ऍक्टखाली विवाह करायची गोष्ट काढलीच, तर 'मला धर्माचे काही नाही, पण माझ्या आई-वडिलांच्या खुशीसाठी तू एवढेही करू शकत नाहीस का? हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम?' वगैरे भावनिक ब्लॅकमेल करून मुलीला निकाहनामा करण्यासाठी राजी केले जाते. एव्हाना मुलगी मुलामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्टया इतकी गुंतलेली असते की ती सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेली असते. मुलीच्या आईवडिलांना कळलेच, तर बरेचदा तेही 'ती आणि तिचे नशीब' असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवतात, त्यामुळे तिच्यापुढे दुसरा काही पर्यायही राहिलेला नसतो. आपल्या मुलीच्या भल्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घेणारे आथिराच्या वडिलांसारखे पिता विरळाच.

जरी एखाद्या केसमध्ये मुलीने धर्मांतर केले नाही, तरी ह्या विवाहातून होणारी मुले मात्र इस्लाम धर्मीयच असतील, असा अलिखित करार असतो. एव्हाना ब्रेनवॉश झालेल्या मुली हे सगळे मान्यही करतात. ह्या सगळयासाठी आखाती देशांमधून प्रचंड प्रमाणात पैसे येतो, असे एनआयएचे म्हणणे आहे. धर्मांतर झालेल्या अशा कित्येक युवती केरळमधून आयसिसच्या 'धर्मयुध्दात' सामील होण्यासाठी सीरियाला गेल्याच्या केसेस केरळ पोलिसांकडे आहेत.

भिन्नधर्मीय विवाह होऊच नयेत असे कोणीच म्हणणार नाही. एकविसाव्या शतकात आपला जोडीदार स्वत: निवडायचा हक्क सगळयांनाच आहे. माझ्या तीन हिंदू मैत्रिणींनी स्पेशल मॅरेज ऍक्टखाली मुसलमान पुरुषांशी लग्ने केलेली आहेत. तिघींनीही त्यांचा धर्म बदललेला नाही. त्यांची मुलेही मुसलमान आणि हिंदू अशा दोन्ही धर्मपरंपरा पाळतात. मुस्लीम सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई ह्यांनीही म्हटले होते की ''आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत, पण आपापला धर्म पाळायचा दोन्ही व्यक्तींचा हक्क अबाधित ठेवून.'' अशा विवाहातून जन्मलेली मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना त्यांचा स्वत:चा धर्म निवडायचा अधिकार मिळाला पाहिजे असेही दलवाईंचे मत होते.

'लव्ह जिहाद' म्हणजे नुसता प्रेमविवाह नव्हे. आपण धर्मांतर करतोय म्हणजे काय करतोय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना असते का, हा खरा प्रश्न आहे. अशा विवाहांमागे पैशाची मोठया प्रमाणात देवाणघेवाण होते. असे विवाह करणाऱ्या मुलींचे पुढे काय होते? नवऱ्याने तलाक देऊन हाकलून दिले, तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो? ह्या सगळया गोष्टींची चौकशी करणे देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींच्या विवाहापुरतेच मर्यादित राहत नाही.

shefv@hotmail.com