संपत्तीतून उग्रवाद

विवेक मराठी    11-Sep-2017
Total Views |

 साठा आखाती देशांत आहे. त्यातही सर्वात अधिक तेलसाठे सौदी अरेबिया, इराक, आणि इराणमध्ये आहेत. यातील सौदी अरेबिया सुन्नी राजवटीचा देश आहे आणि इराण शिया राजवटीचा देश आहे. दोन्ही देशांकडे तेलविक्रीतून अफाट पैसा येतो. सौदी अरेबिया 1.25 कोटी बॅरल तेल दर वर्षी काढते. एक बॅरल म्हणजे सुमारे 164 लीटर इतके असते. या तेलाला 'क्रूड ऑईल' म्हणतात.

 

मानापमान नाटकात 'धनराशी ज़ाता मूढापाशी, सुखवी तुला, दुखवी मला' हे अत्यंत गाजलेले पद आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलेले असते. या नाटकातील लक्ष्मीधर या सरदाराकडे अफाट संपत्ती असते, पण तो महामूर्ख असतो. त्याला उद्देशून नाटकाची नायिका भामिनी हे पद म्हणते. हे पद आठवण्याचे कारण असे की, आखाती देशातील ज्यांच्याकडे तेलांचे अमर्याद साठे आहेत, त्यांना अमर्याद संपत्ती मिळाली आहे त्यांना या पदातील अर्थ तंतोतंत लागू पडतो. धनराशी जाता मूढापाशी.....अशी या देशांची अवस्था आहे. शब्दशः पाण्यासारखा पैसा आला, त्याचे करायचे काय? याची फारशी अक्कल नसल्यामुळे पैसा हाच अरब-मुस्लीम देशांच्या अनेक प्रकारच्या संकटांचे कारण झालेला आहे.

जगातील 65% तेलसाठा आखाती देशांत आहे. त्यातही सर्वात अधिक तेलसाठे सौदी अरेबिया, इराक, आणि इराणमध्ये आहेत. यातील सौदी अरेबिया सुन्नी राजवटीचा देश आहे आणि इराण शिया राजवटीचा देश आहे. दोन्ही देशांकडे तेलविक्रीतून अफाट पैसा येतो. सौदी अरेबिया दर दिवशी 1.25 कोटी बॅरल तेल दर वर्षी काढते. एक बॅरल म्हणजे सुमारे 164 लीटर इतके असते. या तेलाला 'क्रूड ऑईल' म्हणतात. त्यामध्ये असंख्य पदार्थ दडलेले असतात. ते सगळे बाहेर काढून त्यापासून पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन, घासलेट वेगळे केले जाते. प्लॅस्टिक आणि डांबरही त्यातून निघते. आपल्या देशात तेल असणे म्हणजे जमिनीखाली सतत पैसा देणारी बँक असण्यासारखे आहे. इराकमध्ये दरमहा उत्पादन 43 लाख बॅरल इतके आहे. बहुतेक तेल सगळे निर्यात होते. इराणचे दरदिवसाचे तेल उत्पादन 730,000 डॉलर्स इतके आहे. सध्या इराण रोज 26 लाख बॅरल तेल निर्यात करते. प्रत्येक बॅरल तेलाचा भाव सध्या 49 ते 52 डॉलर्सच्या आसपास असतो. (हा लेख मे महिन्यात लिहिला आहे, तेव्हाचे हे भाव आहेत.)

1990 सालापासून तेलाच्या किमती वाढत वाढत गेल्या. खासकरून 2010 ते 2014 या काळात प्रतिबॅरल तेल कधी 80 तर कधी 106 डॉलर्सने विकले गेले. आज त्याच्या किमती निम्म्याहून कमी झालेल्या आहेत. जेव्हा या किमती 80 ते 100च्या आसपास होत्या, तेव्हा तेल उत्पादक अरब देशांकडे आणि इराणकडे शब्दशः पैशांच्या नद्या वाहत होत्या. एवढा अफाट पैसा आल्यानंतर तो शेती सुधारणा, कारखाने, शिक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती, अशा अनेक कामांवर खर्च करता येतो. यातून लोकविकास होतो, अर्थव्यवस्था सुधारते. लोकांची प्रगती होते. तेल काही जन्मभर पुरणार नाही, आज ना उद्या हे तेलसाठे संपतील, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? याचा विचार करून आताच काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

इराक, सीरिया, लिबिया, सौदी अरेबिया या देशांनी नेमके याच्या उलटे केले. त्यांनी लोकांवर अत्यंत निदर्यीपणे राज्य करण्यासाठी सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज केले. ही आधुनिक शस्त्रे कोणत्याही अरब देशात तयार होत नाहीत. लढाऊ विमाने, आधुनिक तोफा, आधुनिक बंदुका, रॉकेट्स, मिसाइल्स, युध्दनौका एकाही अरब देशात तयार होत नाही. इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, अमेरिका, रशिया या देशांत ही आधुनिक शस्त्रे तयार होतात. तेलाच्या किमती वाढवून त्यांना तेल विकले जाते आणि त्याच्या बदल्यात या देशांकडून युध्दसामग्री घेतली जाते. एका जेट फायटरची किंमत किती? आम्ही सांगू ती, अशी स्थिती असते आणि ही स्थिती खरेदी करणाऱ्या प्रत्येक शस्त्राबाबत असते. शस्त्रे विक्रीत स्पर्धा जरी असली, तरी शस्त्रे विकणारा कोणताही देश शस्त्रांच्या किमती पाडून त्या विकत नाहीत. एका हाताने तेलासाठी पैसा द्यायचा आणि दुसऱ्या हाताने शस्त्रे विकून तो परत घ्यायचा. या शस्त्रउद्योगावर वर दिलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था अतिशय भरभराटीस आलेल्या आहेत.

अरब देश या शस्त्रांचे करतात काय? मुस्लीम कायद्यांप्रमाणे एका मुस्लीम देशाने दुसऱ्या मुस्लीम देशावर आक्रमण करता कामा नये. सगळेच मुसलमान असल्यामुळे एकमेकांपासून कुणाला धोका नाही अशी स्थिती असायला पाहिजे, पण तसे नसते. इराक कुवेतवर आक्रमण करतो आणि कुवेत आपल्या ताब्यात घेतो. इराक शस्त्रे जमा करून इराणवर हल्ला करतो आणि हे युध्द आठ वर्षे चालते. त्यात दोन्ही देशांचे जवळजवळ 5 लाख लोक ठार झाले. दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांना मेलेल्या मुसलमानांसंबंधी काहीही सोयर-सुतक नसते. दोन्ही देशांचे मुसलमान इस्लामसाठी मरतात. इजिप्तदेखील जॉर्डनमधील बंडाळी मोडण्यासाठी सैन्य पाठवितो. बंडाळी मुसलमानांची आपआपसातीलच असते. सीरियाला ते सहन होत नाही, म्हणून सीरिया बंडखोर पॅलेस्टिनींच्या रक्षणासाठी सैन्य पाठवितो. कुवेतमधून इराकला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैन्य जमा होते. सीरिया, इराकविरुध्दच्या लढाईत सहभागी होते. मुस्लीम देशाविरुध्द दुसरा मुस्लीम देश सैन्य पाठवितो.

ज्या अरब आणि इराणकडे तेलाचे अफाट साठे आहेत आणि त्यामुळे देशाचे सकल घरेलू उत्पादन अफाट आहे. इराकचे 223.5 बिलियन डॉलर्स, इराणचे 5383 बिलियन डॉलर्स, आणि सौदी अरेबियाचे 707.379 बिलियन डॉलर्स आहेत. या तिन्ही देशांपैकी कुठल्याही देशाची लोकसंख्या आपल्या देशातील एका राज्याइतकीदेखील नाही. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या या तिन्ही देशांपेक्षाही जास्त आहे. म्हणून या देशाचे दरडोई उत्पन्नदेखील असेच अफाट आहे. परंतु जगातील सर्वाधिक दुःख या सर्व क्षेत्रात आहे. सौदी अरेबियात खुनाखुनी, बाँबस्फोट आज होत नाही, आणखीन काही वर्षात ते होणारच नाहीत, हे कुणीही सांगू शकत नाही. इराणमध्ये मरण केव्हा भेटेल, हे सांगता येत नाही. इराणमध्ये कसलेही स्वातंत्र्य नसल्यामुळे आयातुल्ला आणि इमाम जे सांगतील त्याप्रमाणे वागायचे असते, प्रश्न विचारायचा नसतो. राज्यकर्त्यांना आव्हान द्यायचे नसते. कुणी तसे धाडस केले तर त्याचे काय होईल? हे सांगता येणे कठीण आहे.

अरब देशात पैशाने सुखसोयी मिळविता येतात, परंतु शांतीचे सुख, प्रगतीचे सुख, सुसंस्कृतपणाचे सुख, लोकशाहीचे सुख, या सर्व गोष्टी तेथे नाहीत. प्रत्येक देशातील राजवट कुणाला जबाबदार नसते. जेथे राजेशाही आहे, तेथे घराणेशाही आहे. इराणसारख्या देशात मुल्लाशाही आहे आणि इराक, सीरियामध्ये शियाशाही आहे. सामान्य माणसाला राज्यकारभारात कसलेच स्थान नसते.

तेलावर ताबा मिळविण्यासाठी युरोपातील आणि अमेरिकेतील महासत्तांनी आखाती देशातील तेल वाटून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट एकदा म्हणाले होते की, इराणचे तेल ब्रिटनचे आहे, इराकचे तेल आपल्या दोघांचे आहे आणि सौदी अरेबियाचे तेल आमचे आहे. इराणमध्ये 1913पासून तेल काढायला सुरुवात झाली. इंग्रजांनी त्यासाठी कंपनी स्थापन केली. तेलाचा पट्टा मिळविण्यासाठी (तो कैक लाख किलोमीटरचा आहे) तेव्हाच्या इराण सरकारला वीस हजार पौंड आणि तेल उत्पादनात 16.5% रॉयल्टी देण्याचे ठरले. 1952 साली इराणी पंतप्रधान मोसादेक याने इंग्रज तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. इंग्रज आणि ब्रिटिशांनी काही लष्करी अधिकाऱ्यांना फितवून आणि पैसे देऊन मोसादेक यांचे सरकार पाडले. रेझा शहा पेहलवी याला राजसिंहासनावर बसविले. त्याने सेवाक नावाच्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून भय निर्माण करून राज्य निर्माण केले. अमेरिकेने तेलासाठी सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी करार केला होता. अमेरिकेचे सैन्यतळ सौदी अरेबियात आहे. तेलासाठी अमेरिकेने सद्दामशी मैत्री केली होती आणि त्याला शस्त्रसज्ज केले होते.

तेल कारखाने चालविते, विमाने चालविते, गाडया चालविते, पण अरब देशांना हेच तेल एकमेकांचा गळा घोटण्यास चालविण्यास भाग पाडते.

vivekedit@gmail.com