उद्योजकतेचे बाळकडू

विवेक मराठी    18-Sep-2017
Total Views |


 

आपल्या देशात लाखो नवउद्योजकांची (आंत्रप्रेन्युअर्सची) परिसंस्था निर्माण करायची असेल, तर निव्वळ तरुणाईला आवाहन करणे पुरेसे ठरणार नाही. पुढच्या दोन दशकांसाठी एक निश्चित स्वरूपाचा नॅशनल रोडमॅप आखला गेला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच उद्योजकतेची प्रेरणा व प्रशिक्षण देण्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. हे उद्दिष्ट निर्धारपूर्वक राबवल्यास एका तपानंतर (बारा वर्षांनी) उत्तम परिणाम दिसायला सुरुवात होईल याची मला खात्री आहे.

मी व्यवसायाचा व्याप सांभाळून अलीकडे एका गोष्टीसाठी जाणीवपूर्वक वेळ काढतो. कुठल्याही शहरात एखाद्या यजमान संस्थेने आमंत्रित केल्यास मी स्वखर्चाने तेथे जातो. उपस्थितांना माझी जीवन कहाणी ऐकवतो. उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करतो. जमलेल्या तरुणाईला बघून माझ्या डोळयात एक चमक येते. मला त्यांच्यातून नवे उद्योजक दिसू लागतात. लहानपणी गरिबीचे चटके सोसलेला, इयत्ता दहावीला गणितात पाच वेळा नापास झालेला, विशीच्या वयात दुकानात झाडू-पोछाने कारकिर्दीची सुरुवात करणारा धनंजय दातार हा तरुण पुढील आयुष्यात एका जागतिक उद्योग समूहाचा मालक कसा बनला, हा प्रवास मी त्यांना उलगडून सांगतो. अर्थात यामागे प्रसिध्दीचा किंवा स्वत:च्या कर्तृत्वाचे नगारे पिटण्याचा सोस नसून एक भाबडी आशा असते, ती म्हणजे माझ्या कहाणीतून प्रेरणा घेऊन अनेकांनी उद्यमशीलतेचे स्वप्न बघावे. त्यांच्यातून इतके कर्तबगार उद्योजक निर्माण व्हावेत की या भारताने पुन्हा एकवार प्राचीन इतिहासातल्याप्रमाणे सुवर्णभूमी, बुध्दिमंतांची खाण, जागतिक व्यापाराचे केंद्र अशी आपली ओळख प्रस्थापित करावी.

अशाच एका मार्गदर्शन कार्यक्रमात एका तरुणाने मला प्रश्न विचारला होता, ''सर! आपल्या भारतात  गरीब अधिक मध्यमवर्गीय मिळून 90 टक्के, तर श्रीमंत केवळ 10 टक्के अशी विषमता का आढळून येते?'' त्यावर मी उत्तर दिले, ''मित्रा! मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक वाक्य सांगतो. ते म्हणत, 'होय. मीसुध्दा स्वप्न बघतो, पण जागेपणी त्यांचा पाठलागही करतो.' तुझ्या प्रश्नाचे उत्तर यातच आहे. आपल्या देशात लोक शाश्वत श्रीमंतीचे स्वप्न बघत नाहीत आणि कष्टपूर्वक त्याचा पाठलागही करत नाहीत. गरिबांचे स्वप्न पोटापुरते मिळावे इतके छोटे असते, तर मध्यमवर्गीयांना उत्तम पगाराची नोकरी हवी असते. दुर्दैवाने जे श्रीमंतीचे स्वप्न बघतात त्यांनाही झटपट पैशाचे आकर्षण वाटते. फारच थोडे लोक असे असतात जे समृध्दीचा ध्यास घेऊन वर्षानुवर्षे संयमाने, कष्टाने आणि निर्धाराने त्याचा पाठपुरावा करतात. लक्ष्मी चंचल असते. तिचा पाठलाग करणाऱ्यांना ती हुलकावणी देते, पण जे उद्योगाच्या ध्येयमार्गावर अविरत चालतात, त्यांच्यामागे ती आपण होऊन जाते.''

 

माती ओली असतानाच आकार द्या...

      आपल्याही घरातून उद्योजक निर्माण व्हावा असे खरोखर वाटत असेल, तर आपण स्वत: ते स्वप्न बघावे किंवा ते शक्य न झाल्यास आपल्या मुलांमध्ये लहानपणापासून रुजवावे. शाळांमधून मुलांच्या कलागुणांना, क्रीडापटुत्वाला, स्पर्धात्मकतेला उत्तेजन मिळते. त्यात आता उद्यम विकासाची भर पडायला हवी. मला आठवते, मुंबईत मित्राच्या घरी गेलो असताना आम्ही दोघे बोलत होतो. तेवढयात त्या मित्राचा शाळेत शिकणारा मुलगा एक पावती पुस्तक घेऊन आला आणि उत्साहाने म्हणाला, ''बाबा! आमच्या शाळेने इमारत निधी जमवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला हे पावती पुस्तक दिले आहे. तुम्ही स्वत: एक पावती फाडा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांकडूनही निधी जमवायला मला मदत करा.'' हे ऐकताच माझा मित्र नाराज झाला. मुलाच्या अंगावर खेकसून म्हणाला, ''काही गरज नाही लोकांकडे भीक मागायची. त्या सगळया पावत्या माझ्या नावाने फाड आणि पैसे शाळेत नेऊन दे.'' मुलगा बिचारा हिरमुसला आणि निघून गेला.

       माझा मित्र माझ्याकडे वळून म्हणाला, ''बघितलीस या शाळांची तऱ्हा? यांना पैसे पाहिजेत तर थेट पालकांकडून मागावेत. मुलांना कशाला दारोदार हिंडवतात?'' त्यावर मी त्याला समजावले, ''अरे! तू चुकीचा विचार करतोयस. हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे. या पावती पुस्तकाच्या माध्यमातून शाळा आपल्या विद्यार्थ्यांकडून विक्रीकलेची आणि जनसंपर्काची पूर्वतयारी करून घेत आहे. या पुस्तकात 50 पावत्या आहेत. तुझ्या मुलाला ओळखीच्या-अनोळखी अशा 50 घरांमध्ये जाऊ देत. काही लोक कौतुकाने पैसे देतील. काही लोक 'यात आमचा फायदा काय?' असे विचारून स्पष्ट नकार देतील. काही उर्मटपणाने बोलून त्याला वाटेला लावतील, तर काही जण 'नंतर बघू' असे सांगून टोलवतील. पण हे विविध अनुभव त्याला शाळकरी वयापासूनच घेऊ दे. व्यवसायासाठी विक्रीकला गरजेची असते, तसे विक्रेत्यासाठी हे अनुभव महत्त्वाचे. संयम, गोड बोलणे, चिकाटीने प्रयत्न करणे, मुद्दा पटवून देणे अशी अनेक कौशल्ये त्यातून लाभतात. माती ओली असतानाच तिला मनासारखा आकार देता येतो.''

मी स्वत: दारोदार हिंडून विक्रीचे हे अनुभव घेतले आहेत. लहान वयात मी वडिलांच्या नकळत गृहिणींना आणि शाळकरी मुलींना चिंचा-बोरांचे वाटे विकत होतो. इयत्ता दहावीनंतरची दोन वर्षे मी मुंबईत फिनेल आणि इन्स्टंट मिक्सेस विकायचो. मला विक्रीसाठी किंवा व्यवसायासाठी घरून कधी प्रोत्साहन मिळण्याचा प्रश्नच आला नव्हता, कारण वडिलांकडचे दातार घराणे काय किंवा आईकडचे कुरळकर घराणे काय, सगळे नोकरदारच होते. अगदी माझ्या वडिलांनीही निवृत्तीच्या वयापर्यंत नोकऱ्याच केल्या. त्यामुळे माझे विक्रीकलेचे शिक्षण एकलव्यासारखे झाले. पण मी व्यवसायात रुळल्यावर माझ्या मुलांना अगदी लहान वयापासून नेहमीच उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन दिले.

मला आठवते की माझा मोठा मुलगा हृषीकेश दुबईत एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत असताना त्यालाही वडिलांप्रमाणे दुकानदारी करण्याची लहर आली. त्याच्या वर्गात बरीच युरोपियन-अमेरिकन मुले होती. त्यांना भारतातील एक विशिष्ट बिस्किट आवडायचे. हृषीकेश त्या बिस्किटाचे पुडे एका दुकानातून छापील किमतीला खरेदी करायचा व वाढीव किमतीला वर्गात विकायचा. एक दिवस त्याने थोडे बिचकत ही गोष्ट मला सांगितली. त्या उद्योगातून मिळालेला नफाही अभिमानाने दाखवला. मी त्याच्यावर मुळीच रागावलो नाही. उलट त्याच्या पाठीवर थाप टाकून शाबासकी दिली. मात्र त्यासोबत एक मोलाचा धडाही दिला. ''एखादी वस्तू ग्राहकाला बाजारभावापेक्षा जास्त किमतीला विकणे याला चातुर्य नव्हे, तर लोभीपणा म्हणतात. त्यापेक्षा कमीतकमी दराने खरेदी आणि प्रचलित किमतीला विक्री करून रास्त नफा कमावणे हा खरा प्रामाणिक व्यवहार असतो. तू त्या दुकानदाराशी वाटाघाटी करून घाऊक खरेदीची किंमत आकारायला सांग आणि मित्रांना किरकोळीने विकताना छापील किमतीला दे. यामुळे तुझ्यावर मित्रांचा विश्वास बसेल.'' मुलांना अभ्यासाबाहेर भरकटू न देता त्यांच्या खटपटया वृत्तीला प्रोत्साहन दिले, तर त्याचेही चांगले परिणाम दिसतात. म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलांना करिअर निवडीचे स्वातंत्र्य दिले असूनही ते आज स्वेच्छेने घरच्या व्यवसायात आले आहेत.

 

आपण ठरवले तर बऱ्याच सोप्या गोष्टींतून मुलांची उद्योजकीय जडणघडण करू शकतो. घरचा व्यवसाय असेल तर त्यात त्यांना किरकोळ मदतीला घेणे, सुटीमध्ये त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेऊन त्याचा मोबदला देणे, खरेदी-विक्रीचे छोटे व्यवहार मुद्दाम करायला लावणे, नोटांची किंमत व सुट्टयाचा हिशेब शिकवणे, प्रासंगिक विक्रीस (गणपती सजावटीचे साहित्य, दिवाळीत फराळ-उटणी-तेले-भेटकार्डे-दिवाळी अंक इ.) उत्तेजन देणे अशा गोष्टी यात येतात. शाळांनाही विद्यार्थ्यांचे गट करून उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीस प्रोत्साहन देता येईल. मुले जाणत्या वयाची झाल्यावर त्यांना मोठी औद्योगिक प्रदर्शने दाखवावीत. परवानगी काढून मोठे कारखाने दाखवावेत, उद्योग क्षेत्रातील नामवंतांचे अनुभव ऐकण्यासाठी व्याख्यानांना घेऊन जावे.

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगून मी या लेखाचा समारोप करतो. एका सुभाषितात म्हटले आहे की 'प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रे मित्रवदाचरेत' (मुला-मुलीला सोळावे वर्ष लागताच त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागावे.) आता हे वय थोडे अलीकडे आणावे लागेल. मुले माध्यमिक शाळेत असल्यापासून आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि समजूतदारपणे बोलले पाहिजे. ते उत्साहाने नव्या कल्पना मांडत असतील, तर त्या शांत व विचारी वृत्तीने ऐकून घ्याव्यात. लगोलग तिरकस बोलून त्यांना नाउमेद करू नये. त्यांच्या विचारांतील त्रुटी बोलून पटवून द्याव्यात. शांतपणा हा गुण उद्योजकतेला नेहमी पोषक ठरतो. शेवटी मुलेही आपलेच अनुकरण करून शिकत असतात.

vivekedit@gmail.com

 

 

***