पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका...

विवेक मराठी    02-Sep-2017
Total Views |


दुबईतील सुप्रसिध्द अल अदिल या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा धनंजय दातार यांचं नाव माहित नाही, अशी व्यक्ती विरळाच असावी. 'शून्यातून विश्व उभं करणं' म्हणजे काय याचा अर्थ  त्यांचा इथवरचा प्रवास समजून घेतला तर नेमकेपणाने कळतो. विवेकच्या वाचकांना उद्योजकतेचा मूलमंत्र देण्यास धनंजय दातार तयार झाले ही खरोखरच वाचकांसाठी पर्वणी आहे. अनेकांना स्वत:चा व्यवसाय उभारण्याची इच्छा असते, स्वप्नं असतं पण ते वास्तवात कसं उतरवायचं याविषयी खात्रीशीर मार्गदर्शन करू शकेल अशी व्यक्ती आसपास नसते. हे सदर ही उणीव भरून काढेल असा विश्वास आहे. 'स्टार्ट अप'च्या माध्यमातून व्यवसायात पाऊल टाकायची इच्छा असेलल्यांना आणि नव उद्योजकांनाही हे सदर प्रेरणा देईल, दिशादर्शक ठरेल. या प्रवासातले खाचखळगेही दाखवेल आणि त्यावर मात करण्याचा मार्गही सांगेल. या सदरातील हा पहिला लेख. त्याचं  शीर्षकही निश्चयाची दृढता किती महत्त्वाची असते, हे अधोरेखित करतं.

 साप्ताहिक विवेकच्या सुजाण वाचकवर्गाला माझे स्नेहादरपूर्ण अभिवादन. या सदरातून पुढील काळात आपण नियमित भेटणार आहोत. मी जिद्द, कष्ट व प्रामाणिकपणा इतक्याच शिदोरीवर उद्योजक झालो आहे. जीवनात ठेचकाळत पुढे जाताना केलेल्या चुका, सोसलेले अपमान आणि घेतलेल्या अनुभवांतून जे शिकलो तेच तुमच्यापुढे मांडू इच्छितो.

 उद्योगाचे सूत्र सांगणारे एक सुभाषित आहे.

 उद्यमेन हि सिध्द्यन्ती कार्याणि न मनोरथे।

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रवीशन्ती मुखे मृगा:॥

 (अर्थ - केवळ मनोरथ करुन नव्हे, तर प्रत्यक्ष उद्यमशीलतेनेच कार्ये साध्ये होतात. सिंह प्राण्यांचा राजा असला तरी त्यालाही स्वत:ची शिकार प्रयत्नानेच मिळवावी लागते. गुहेत बसून राहिल्याने हरणे त्याच्याकडे आपोआप चालत जात नाहीत.)

हाच उपदेश आपल्या संतांनीही केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे या वचनातून केलेला आहे.

एकेकाळी भारत हा सुवर्णभूमी होता, असे आपण इतिहासात वाचतो आणि त्याचा अभिमानही बाळगतो. प्राचीन काळापासून इथला समाज समृध्द होता, येथे विवीध उद्योगांत कुशल असणाऱ्या जातींचे आणि कारागीरांचे संघ होते. भारतीय व्यापारी व्यापारानिमित्त जगभर मुशाफिरी करत असत. भारतीय उत्पादने त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि सौंदर्?ासाठी जगभर नावाजली जात. पण मग एकदम असे काय झाले असावे, की भारतातून या उद्यमशीलतेचा लोप झाला. मला जे जाणवते ते असे की वारंवारच्या आक'मणांमुळे आणि विध्वंसामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेतून भारतीय समाजानेच एक बचावात्मक मनोवृत्ती स्वीकारली आणि परकी आक'मक येथे सत्ताधीश झाल्यानंतर त्या मनोवृत्तीचा परिपाक गुलामी स्वीकारण्यात आणि परिस्थितीला शरण जाण्यात झाला. उद्योगापेक्षा नोकरी बरी वाटू लागली.

 आपल्याला ही स्थिती बदलायची असेल तर धाडसी वृत्ती अंगात बाणवलीच पाहिजे. व्यवसायात जोखीम आहे म्हणून ते क्षेत्र नको पत्करायला, असा बचावात्मक पवित्रा घेता कामा नये. त्याऐवजी करुन तर बघूया. फार काय होईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खा'ी, अशी थोडी बेफिकीरी अंगात रुजवायला हवी. उद्योग करण्यासाठी भांडवल, मनुष्यबळ, जागा, कौशल्य या गोष्टी गरजेच्या असतात, पण त्या नंतर येतात. सर्वात प्रथम आपल्या मनाची जिद्द आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची गरज असते. व्यवसायाचे नुसते स्वप्न बघून चालत नाही. त्या दिशेने पहिले पाऊल उचलावे लागते. एक चिनी म्हण आहे. तुम्ही हजारो मैलांचा प्रवास करु शकाल, गरज फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची आहे. हे पहिले पाऊल एकदा उचलले, की आपला पुढचा प्रवास आपोआप सुरु होतो. उद्योजकतेबाबतही ते तेवढेच खरे आहे आणि मला स्वत:लाही त्याचा पडताळा आला आहे.

 मी स्वत: ठरवून धंद्यात पडलो नाही. व्यवसाय करणे, हे माझे स्वप्न नव्हते. माझे बाबा दुबईला नोकरीला गेले होते आणि मी, माझी आई व धाकटा भाऊ मुंबईत कलिन्याला राहात होतो. तिथले अनेक मुस्लिम व ख्रिश्चन लोक आखाती देशांत नोकरीसाठी जायचे आणि दोन वर्षांनी परतल्यावर त्यांच्या अंगावर सोन्याचे गोफ दिसायचे, त्यांच्या घरात नवलाईच्या वस्तू दिसायच्या. ते बघून मला आखाती देश म्हणजे जणू सोन्याची खाणच वाटायला लागले. किशोरवयीन पोरकटपणातून मीही दुबईला नोकरीसाठी जायचा आणि श्रीमंत बनण्याचा ध्यास घेतला. नोकरीसाठी काही अनुभव आवश्यक असल्याचे आईने लक्षात आणून दिले म्हणून मुंबईत घरोघर जाऊन फिनेल, इन्स्टंट मिक्सेस अशा गोष्टी विकू लागलो. नेमके त्याच काळात माझ्या वडिलांची नोकरी संपुष्टात आली. भारतात परतण्याच्या विचारात असताना त्यांच्यापुढेच उद्योगाची संधी उभी राहिली.

 दुबईतील भारतीयांना त्यांच्या आवडीचे मसाले, पापड, लोणची सहजतेने मिळत नाहीत, हे लक्षात आल्यावर माझ्या बाबांनी बार दुबई भागात एक लहानसे किराणामालाचे दुकान थाटले. नोकरीत साठवलेली सगळी पुंजी त्यात घातली. हळूहळू त्या दुकानात ग'ाहक वाढू लागले. बाबांचा व्याप वाढू लागला आणि त्यांना घरचे कुणीतरी मदतीला असावे, अशी गरज वाटू लागली. त्यामुळे त्यांनी अनिच्छेनेच मला दुबईला येण्याची परवानगी दिली. मी खुशीची गाजरे खात दुबईला गेलो खरा, पण 'घी देखा, लेकिन बडगा नही देखा' ही म्हण माझ्याबाबत खरी व्हायची होती.

 आमच्या दुकानाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही हिशेब मांडला तेव्हा लक्षात आले, की आमच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. उत्साहाच्या भरात आम्ही लोकांना उधारीवर माल दिला होता आणि त्यांनी आमचे नवशिकेपण हेरुन चक्क उधारी चुकती करायला नकार दिला. आधीच वडिलांची सगळी पुंजी दुकान थाटण्यात आणि माल भरण्यात खर्च झाली होती. त्यातून त्यांचा आणि माझा दुबईतील खर्च. धाकटा भाऊ मुंबईत शिकत होता. त्याला आणि आईला घर चालवायला पैसे पाठवणार कुठून. आम्ही प्रचंड मोठया कोंडीत सापडलो होतो. वडीलांनी लष्करात (हवाईदलात) नोकरी केलेली असल्याने ते तसे कणखर आणि संयमी होते, पण माझे वय विशी-बाविशीचे. मला हा नुकसानीचा धक्का सहन होत नव्हता. दुबईत उमेदीने आलो खरा, पण वर्षभरातच गाशा गुंडाळून भारतात परतण्याची वेळ आली होती. तो निर्णय घेण्यापूर्वी वडिलांनी धंद्यासाठी जी छोटी छोटी कर्जे घेतली होती ती चुकवायची होती. अखेर मनावर दगड ठेऊन वडिलांनी आईला पत्र पाठवले. अंगावरचे सर्व दागिने आणि घरातील फर्निचरसकट सर्व वस्तू विकून ते पैसे पाठवण्यास कळवले. आईने गळयातील सोन्याच्या मंगळसूत्रासहित सर्व दागिने, इतकेच काय पण तिचा स्वयंपाकघरातील मदतनीस असलेला मिक्सर आणि इतर वस्तू विकून ती रक्कम बाबांना पाठवली. सोबत फक्त एक चार ओळींची चिठ्ठी होती. त्यात लिहीले होते, की सगळे दिवस एकसारखे नसतात. या रकमेतून तुम्ही तग धरा, पण एकदा धंद्यासाठी पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

 आईचे पत्र वाचताच मी हमसाहमशी रडलो. त्याक्षणी निर्धार केला, की आता कितीही कष्ट करावे लागले तरी बेहत्तर, पण आईचे दागिने तिला पूर्वीसारखे घडवून द्यायचेच. पुढची साडेतीन वर्षे मी दिवसाचे सोळा तास राबलो. खुबूस (रोटी), भात आणि पातळ भाजी खाऊन दिवस काढले. गोड बोलून खूपशी उधारी वसूल केली. साडेतीन वर्षांनंतर मुंबईला परतलो ते आईचे सगळे दागिने घडवूनच. आईने मायेने माझ्या गालावर फिरवलेला हात हे माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट बक्षीस होते. माझ्या आईचा तो सल्ला  मी आजही नवउद्योजकांना देतो.

***


दुबईत उमेदीने आलो खरा, पण वर्षभरातच गाशा गुंडाळून भारतात परतण्याची वेळ आली होती. तो निर्णय घेण्यापूर्वी वडिलांनी धंद्यासाठी जी छोटी छोटी कर्जे घेतली होती ती चुकवायची होती. अखेर मनावर दगड ठेऊन वडिलांनी आईला पत्र पाठवले. अंगावरचे सर्व दागिने आणि घरातील फर्निचरसकट सर्व वस्तू विकून ते पैसे पाठवण्यास कळवले. आईने गळयातील सोन्याच्या मंगळसूत्रासहित सर्व दागिने, इतकेच काय पण तिचा स्वयंपाकघरातील मदतनीस असलेला मिक्सर आणि इतर वस्तू विकून ती रक्कम बाबांना पाठवली. सोबत फक्त एक चार ओळींची चिठ्ठी होती. त्यात लिहीले होते, की सगळे दिवस एकसारखे नसतात. या रकमेतून तुम्ही तग धरा, पण एकदा धंद्यासाठी पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. 

 माझ्या आईचा तो सल्ला मी आजही नवउद्योजकांना देतो.