पायाची काळजी  - 4

विवेक मराठी    22-Sep-2017
Total Views |

 

कित्येकदा वर अत्यंत लहानशी वाटणारी जखम आतपर्यंत खोल पसरलेली असते. दुखत नसल्याने लोक त्यावरच  चालत राहतात. शेवटी पाय कापावा लागतो, इतकं  त्याचं नुकसान झालेलं असतं. यासाठीच एक वेळ चेहरा आरशात पहिला नाही तरी चालेल, पण पायाकडे मात्र रोजच्या रोज निरखून पाहावं, हे बरं. एकंदरीतच मधुमेहात पायाची काळजी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एक वेळ ग्लुकोज तपासणं पुढे-मागे झालं तरी हरकत नाही, परंतु पाय मात्र रोजच्या रोज तपासले गेले पाहिजेत, हे नक्की.

पण पायाची तितकीशी काळजी घेतली नाही किंवा घेऊनही पायाला जखम झालीच, तर पुढे काय करायचं? कशामुळे आपला पाय अथवा पायाचा भाग कापला जाणार नाही, हे लक्षात घेणं जरुरीचं आहे.

प्रथम पायाची जखम कुठल्या बाजूला आहे ते पाहायला हवं. साधारण तळपायाला होणाऱ्या जखमा न्यूरोपॅथीमुळे - अर्थात मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे असतात. प्रत्येक मधुमेही व्यक्ती अशा जखमा सहज टाळू शकतो. दुर्दैवाने हे टाळता आलं नाही आणि जखम झाल्यावर लक्षात आलं, तर सगळयात आधी करायची गोष्ट म्हणजे त्या पायावर चालू नका. आपल्याकडे लोक मधुमेहात दिवसाला किमान 45 मिनिटं चालायला सांगतात. मधुमेह कह्यात ठेवण्याच्या दृष्टीने आणि मधुमेहापासून हृदयाचं रक्षण करण्याच्या विचाराने चालणं महत्त्वाचं आहे. पण तळपायाला जखम झाली की याउलट वागायला हवं.जखमेवर शरीराचं वजन, शरीराचा बोजा जराही पडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.

कारण सुस्पष्ट आहे. हे नीट कळावं म्हणून एक काम करा. आपलं कुठलंही बोट दुसऱ्या बोटाने दाबून पाहा. ते अल्प काळ पांढरं पडलेलं दिसेल. याचाच अर्थ तिथे असलेलं रक्त थोडया काळासाठी बाजूला, इतर भागात गेलं आहे. तुम्ही बोटावरचा दाब काढलात की ते पुन्हा पूर्ववत होईल. तुमचं बोट पुन्हा लालबुंद दिसू लागेल. आपण चालताना सतत हे होत असतं. शरीराचं वजन पावलांच्या त्वचेवर प्रत्येक पावलागणिक दाब देत असतं. काही काळासाठी त्या त्या भागातलं रक्त आसपास जात असतं आणि सेकंदाच्या काही भागासाठी त्वचेची रक्त पुरवठयाच्या दृष्टीने उपासमार होत असते. जेव्हा आपण पाऊल वर उचलतो, तेव्हा दाब नाहीसा होतो. रक्तपुरवठा वाढतो. त्वचा रक्तात न्हाऊन निघते. त्वचा ताजीतवानी होते. झालेली झीज भरून काढते. मधुमेहींमध्ये हे सगळं थंडावलेलं असतं. अशा वेळी कमी झालेल्या रक्तपुरवठयात हे जखम भरून निघण्याचं काम थोडं हळू होतं. म्हणूनच जखम झाल्यावर त्यावर दाब ना पडणं खूपच महत्त्वाचं मानलं जातं. केवळ ही एकच खबरदारी न घेतल्याने कित्येक दिवस जखम भरून येत नाही. तरीही बरेच जण आपल्याला सांगितलेल्या सूचना तंतोतंत पाळत नाहीत. पायाला जखम असतानादेखील त्यावरच चालत राहतात. मग जखम महिनोन्महिने बरी होत नाही. म्हणून प्रथम चालणं थांबवायला हवं. तरच मलमपट्टी कामाला येईल. जखम योग्य काळात बरी होईल. प्रसंग पडला तर पायाला फ़्रॅक्चर झाल्यावर लावतात तसं प्लास्टर लावून, कुबडया वापरून किंवा पाय जमिनीवर टेकणार नाहीत असं बँडेज बांधून जखम लवकर बरी करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पाय जमिनीवर न टेकू देण्याला वैद्यकीय भाषेत 'प्रेशर ऑॅफ लोडिंग' म्हणतात. यासाठी प्रत्येक जखमेप्रमाणे वेगवेगळी पध्दत वापरली जाते.

संपूर्ण पाय प्लास्टर मध्ये ठेवणं म्हणजे 'टोटल काँटॅक्ट कास्ट' (TCC).  हे मधुमेहातल्या पायाच्या जखमा बऱ्या करण्याच्या उपचारांमधलं सर्वात अमोघ शस्त्र मानलं जातं. गमतीची गोष्ट म्हणजे हे तंत्र भारतातच प्रथम वापरलं गेलं. महारोगात न भरणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी एका ऑॅस्ट्रेलियन डॉक्टरनी ते इथे वापरलं. जर महारोग्यांच्या दुर्धर जखमा बऱ्या होतात, तर मधुमेहींच्या का होऊ  नयेत? या विचाराने ते पहिल्यांदा वापरलं गेलं आणि त्याने चक्क जादू केली. पाय कापण्याची गरज कितीतरी कमी झाली.

आपल्या सुदैवाने आता अशी बरीच शस्त्रं उपलब्ध झालेली आहेत. व्हॅक्युम असिस्टेड क्लोझर  (व्हॅक -Vaccum Assisted Closure) हा नवा प्रकार खूपच छान आहे. यात करतात काय, तर जखमेच्या आसपास त्वचेला घट्ट धरून ठेवणारी एक प्लास्टिक फिल्म लावतात आणि त्याला एक नळी जोडतात. नळीच्या दुसऱ्या टोकाला पंप जोडलेला असतो. पंप त्या फिल्मच्या आत निर्वात पोकळी बनवतो. पोकळीच्या दाबाने जखमेत तयार झालेल्या पू वगैरे नकोशा गोष्टी पंपाच्या दिशेने खेचल्या जातात व त्या पंप आणि पोकळी यामध्ये असलेल्या एका डबडयात जमा होतात. जखमेवर साठलेला पू, घाण निघून गेल्यामुळे ती बरी व्हायला फारसा वेळ लागत नाही.

पायाच्या बोटांच्या टोकाला अथवा पायाच्या वरच्या भागात झालेल्या जखमा बहुधा रक्तपुरवठा कमी असल्याने झालेल्या असतात. रक्तपुरवठा पूर्ववत झाल्याशिवाय अशा जखमा बऱ्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधायला हवी. डॉक्टर पायाच्या नाडया तपासून रक्तपुरवठयाचा अंदाज बांधू शकतातच असं नाही. कधीकधी पायाची ऍंजिओग्राफीदेखील करावी लागते आणि प्रसंगी ऍंजिओप्लास्टी वा रक्तपुरवठा वाढवण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. त्याशिवाय जखम सुकणार नाही. रक्तपुरवठाच नसला, तर जखम बरी कशी होणार म्हणा! दुसरं म्हणजे तो भाग काळा पडलेला असेल, तर रक्तपुरवठा कमी आहे हेदेखील नक्की. तो वाढवणं हेच जखम भरून निघण्याचं गमक असतं.

मधुमेहाची जखम अचानक कधी गंभीर रूप धारण करील याचा नेम नसतो. बहुधा त्यामागे इन्फेक्शन हे मूळ कारण असतं. रात्री फारसं मनावर घेण्यासारखी न वाटणारी जखम सकाळी उठताना एकदम पायभर पसरलेली दिसणारच नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणून नियम म्हणून पायाची त्वचा लालसर दिसायला लागली तर त्याची ताबडतोब नोंद घ्यायला हवी आणि योग्य त्या प्रकारची ऍंटीबायोटिक्स वेळेवर सुरू करायला हवीत. ज्यांना न्यूरोपॅथी आहे, त्यांनी तर आपल्या पायाच्या जखमेकडे बारीक लक्ष ठेवून राहायला हवं. कारण त्यांच्या संवेदना संपलेल्या असतात. पिकलेल्या, पू झालेल्या जागी होणाऱ्या वेदना त्यांना जाणवणं शक्य नसतं. कित्येकदा वर अत्यंत लहानशी वाटणारी जखम आतपर्यंत खोल पसरलेली असते. दुखत नसल्याने लोक त्यावरच चालत राहतात. शेवटी पाय कापावा लागतो, इतकं त्याचं नुकसान झालेलं असतं. यासाठीच एक वेळ चेहरा आरशात पहिला नाही तरी चालेल, पण पायाकडे मात्र रोजच्या रोज निरखून पाहावं, हे बरं.

यापुढची एक गंभीर समस्या मुद्दाम इथे सांगितली पाहिजे. चारको फूट (Charcot Foot) हे त्याचं नाव. पायाची रचना तशी गुंतागुंतीची असते. त्यात विशिष्ट प्रकारे नेमलेल्या जागी हाडं आणि त्यांचे सांधे असले तरच पाऊल एका स्प्रिंगसारखं काम करू शकतं. आपली गाडी खड्डयात गेल्यावर स्प्रिंग असलेला शॉक ऍब्सॉर्बर कसा गाडीला सांभाळून घेतो, तसेच पावलाचे सांधे आपल्या शरीराचं वजन अलगद पेलून धरतात. परंतु मधुमेहात काही वेळेला ही हाडं कमकुवत होतात. वजन उचलताना कधी मोडतात. संवेदना संपल्याने रुग्णाला दुखत नाही. मोडक्या हाडांच्या सांध्यांची स्प्रिंगसारखी काम करण्याची शक्ती संपून जाते. मोडक्या हाडांवरच रुग्ण चालत राहतो. अधिक अधिक हाडं मोडत जातात आणि कालांतराने पावलांच्या सांध्यांच्या जागी निव्वळ भुगा उरतो. वरच्या बाजूला असलेली पावलाची कमान सपाट होते. पावलाची स्प्रिंग कोसळत जाते. मग व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने त्या पावलाचा कुठलाच उपयोग शिल्लक राहत नाही. एवढयावरून चारको फूट ही किती गंभीर गोष्ट आहे, हे लक्षात यायला कठीण पडू नये.

आता प्रश्न राहतो की आपल्याला चारको फूट झालाय हे ओळखायचं कसं? वैद्यकात त्यासाठी दंडक घालून देण्यात आलाय. ज्यांना मधुमेह होऊन अनेक वर्षं झालीत, अशांना केवळ एका पावलाला सूज आली असेल आणि तिथे जराही दुखत-खुपत नसेल, तर त्याला चारको फूट समजलं जावं. किमान तिथे चारको फूट झालेला नाही हे सिध्द करावं. परंतु काही वेळेला निव्वळ एक्स रेमध्ये निदान करणं खूप अवघड जातं. बहुधा चारको फूटची सुरुवात असताना एक्स रे निदान पटकन होत नाही. अशा वेळी एमआरआय करणं हाच मार्ग उरतो. एमआरआयची तपासणी एकदम खात्रीची समजली जाते.

चारको फूट झाल्यावर तो पाय 'चालता' होण्यासाठी कित्येक महिने प्लास्टरमध्ये ठेवावा लागतो. कधीकधी शस्त्रक्रिया करून सांधे पूर्ववत करावे लागतात. हे सगळं तसं बरंच खर्चीक काम आहे. म्हणून चारको फूट होऊ  नये यासाठी प्रयत्न करणं सर्वात चांगलं ठरतं.

एकंदरीतच मधुमेहात पायाची काळजी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एक वेळ ग्लुकोज तपासणं पुढे-मागे झालं तरी हरकत नाही, परंतु पाय मात्र रोजच्या रोज तपासले गेले पाहिजेत, हे नक्की.

9892245272