महासत्ता अमेरिका आणि  अरब जगत

विवेक मराठी    22-Sep-2017
Total Views |

 

सौदी अरेबियाने तेल अमेरिकेलाच द्यावे आणि त्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी, असे ठरले. हा करार अजूनपर्यंत कायम आहे. इस्रायलचे करायचे काय? असा प्रश्न या काळात उत्पन्न झाला. विल्सन यांना अरबस्तानातील राजकीय नेत्यांनी सांगितले होते की, जर्मनांच्या एका वसाहतीत ज्यूंचा देश निर्माण करावा. त्याला विल्सन यांनी मान्यता दिली नाही. 1948साली इस्रायल अस्तित्वात आले.

हासत्ता अमेरिकेचा मध्यपूर्वेतील राजकारणातील प्रवेश तसा अलीकडचा. पहिले महायुध्द 1918 साली संपले. या महायुध्दात अमेरिका सहभागी झाली. हे महायुध्द अमेरिकेच्या भूमीत लढले गेले नव्हते. त्याचे रणांगण होते युरोप. परंतु जर्मन नौदलाने अमेरिका जहाजांवर हल्ले केले आणि जहाजे बुडविली. अमेरिकेला युध्दात उतरावे लागले. त्यामुळे जर्मनीचा आणि जर्मनीच्या दोस्तांचा पराभव झाला. ऑटोमन साम्राज्याचादेखील पराभव झाला. 1919ला पॅरिस येथे शांतता परिषद घडविण्यात आली. त्यात 22 देशांनी भाग घेतला. युध्दसमाप्तीनंतर जर्मनीशी तह, जर्मनीला शासन, ऑटोमन साम्राज्याचे विभाजन, युरोपमधील शांतता असे विषय या शांतता परिषदेपुढे होते.

या शांतता परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आले होते. अमेरिका वसाहतवादी देश नाही. युरोपीय महासत्तांप्रमाणे तेव्हा तो साम्राज्यवादी देश नव्हता. स्वतः राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन साम्राज्यवाद, वसाहतवाद याचे कडवे विरोधक होते. कोणत्याही देशावर तेथील लोकांच्या इच्छेविरुध्द अन्य कुणी राज्य करता कामा नये. राज्य कुणाचे असावे आणि राज्याची पध्दती कोणती असावी हे ठरविण्याचा अधिकार त्या-त्या देशातील लोकांनाच आहे, परक्यांनी त्या देशावर आपल्या इच्छा लादता कामा नये. पॅरिसच्या शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वीअमेरिकेचे हे धोरण त्यांनी जाहीर केलेले होते. अमेरिकन काँग्रेसने जगापुढे चौदा कलमी कार्यक्रम ठेवला.

वुड्रो विल्सन हे भविष्यवेधी राष्ट्राध्यक्ष होते. शांतता परिषदेसाठी ते सहा महिने फ्रान्समध्ये राहिले. या काळात त्यांनी लीग ऑफ नेशन्स स्थापन करण्यात मोठा पुढाकार घेतला. युनो हे आजचे तिचे सुधारित स्वरूप आहे. देशादेशाने आपापसात लढाया करून प्रश्न सोडविण्याऐवजी आपापसात चर्चा करून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, ही त्यामागची भूमिका होती. लीग ऑफ नेशन्स ही जगातील सर्व राष्ट्रांची संघटना असावी आणि तिने जागतिक शांतता निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा. अशा आंतरराष्ट्रीय विषयासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला काँग्रेसची (अमेरिकन संसदेची) अनुमती लागते. अमेरिकन काँग्रेसला युरोपीय भानगडीत पडायचे नव्हते, म्हणून अमेरिकन काँग्रेसने लीग ऑफ नेशन्समध्ये सामील होण्यास अनुमती दिली नाही. म्हणून लीग ऑफ नेशन्स त्या काळात दुर्बळ संघटना राहिली.

ऑटोमन साम्राज्यात येणारे सीरिया, सौदी अरेबिया, जॉर्डन वगैरे भूभागांना स्वायत्तता पाहिजे होती. आपल्यावर इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी आपल्याला नको असलेली राजवट लादू नये, असे त्यांचे म्हणणे होते. 1920 साली या सर्व देशात अमेरिका अत्यंत लोकप्रिय होती. वुड्रो विल्सन आपले प्रश्न सोडवतील अशी या प्रदेशातील लोकांची समजूत झाली. हेजाजच्या प्रमुखाला संपूर्ण अरबस्तानात सत्ता हवी होती. कुणालाही इस्रायल अरब भूमीत नको होता. सीरियन लोकांचे म्हणणे असे होते की लेबनॉन आणि पॅलेस्टाइन सीरियातच राहावेत. सीरिया अखंड असावा, त्याचे विभाजन केले जाऊ नये. विल्सन यांनाही तसेच वाटत होते. लोकांच्या इच्छा जाणण्यासाठी त्यांनी क्रेन ऍंड किंग कमिशन नेमले होते. या कमिशनने सीरिया, पॅलेस्टाइन, इजिप्तचा प्रवास केला. लोकांच्या इच्छा काय आहेत हे जाणून घेतल्या. इंग्लंड आणि फ्रान्सने त्यापूर्वीच गुप्त करार करून ऑटोमन साम्राज्याचे तुकडे करण्याचे ठरविले होते. इजिप्त, सीरिया, पॅलेस्टाइन, लेबनॉन, जॉर्डन, इराक इत्यादी देश त्यांनी 1916 सालीच तयार करून ठेवले होते. विल्सन यांना त्याची जाणीव नव्हती. त्यांचा आदर्शवाद कागदावर राहिला. धूर्त आणि लबाड इंग्रजांनी मध्यपूर्वेत त्यांना जे करायचे होते ते केले.

विल्सन गेल्यानंतर त्यांच्यामागून जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांची धोरणे बदलत गेली. पहिल्या महायुध्दाप्रमाणे दुसऱ्या महायुध्दातही अमेरिकेला सहभागी व्हावे लागले. या वेळी निमित्त झाले पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्याचे. दुसरे महायुध्द फँ्रकलिन रुझवेल्ट आणि ट्रूमन यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले. याल्टा येथील परिषद आटपून रुझवेल्ट अमेरिकेला परत जात असताना मध्यपूर्वेतील अनेक राजप्रमुखांना भेटले. त्यातून सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचा करार झाला. सौदी अरेबियाने तेल अमेरिकेलाच द्यावे आणि त्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी, असे ठरले. हा करार अजूनपर्यंत कायम आहे. इस्रायलचे करायचे काय? असा प्रश्न या काळात उत्पन्न झाला. विल्सन यांना अरबस्तानातील राजकीय नेत्यांनी सांगितले होते की, जर्मनांच्या एका वसाहतीत ज्यूंचा देश निर्माण करावा. त्याला विल्सन यांनी मान्यता दिली नाही. 1948साली इस्रायल अस्तित्वात आले.

इस्रायल अस्तित्वात आल्याबरोबर अमेरिकेने इस्रायलला मान्यता देऊन टाकली. इराक, सीरिया, इजिप्त, जॉर्डन या देशांनी 1948 साली इस्रायलवर आक्रमण केले. इस्रायलने या चारही देशांचा दारुण पराभव केला. पॅलेस्टाइनची भूमी जिंकून घेतली. इस्रायलला अमेरिकेने सर्व प्रकारचे साहाय्य केले. 1967 साली अरब-इस्रायल दुसरे युध्द झाले आणि तिसरे युध्द 1973 साली झाले. 1967 साली इस्रायलने जेरुसलेम जिंकून घेतले आणि सीरियाच्या गोलान टेकडया जिंकून घेतल्या. जिंकलेला प्रदेश इस्रायल सोडायला तयार नाही. अमेरिका इस्रायलला हा प्रदेश सोडण्यास भाग पाडत नाही. इस्रायलला सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे अमेरिका पुरवीत राहते. इजिप्त आणि सीरिया यासारखे देश शस्त्र मिळविण्यासाठी रशियन गोटात गेले. अमेरिकेला ते आवडले नाही. म्हणून त्यांच्या सत्ता उलथून पाडण्यासाठी सीआयएने अनेक कटकारस्थाने त्या काळात केली आहेत. इस्रायलला सततचा पाठिंबा, कटकारस्थाने यामुळे अमेरिका आज अरब जगतात सर्वाधिक घृणेचा विषय झालेली आहे. अमेरिका नष्ट करून टाकली पाहिजे, हा प्रत्येक दहशतवादी संघटनेचा नारा असतो.

ओसामा बीन लादेन याने 2001 साली अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढविला. न्यूयॉर्क शहरातील दोन टॉवर जमीनदोस्त केले. त्यानंतर अमेरिकेने दहशतवादविरोधी युध्द सुरू केले. प्रथम अफगाणिस्तानमध्ये आणि नंतर इराणमध्ये अमेरिकन सैन्य घुसले. मुस्लीम देशात गैरमुस्लीम सैन्य ही गोष्ट कट्टरपंथी मुसलमानांना रुचत नाही. हे कट्टरपंथी जिहादी बनत गेले. अल कायदा ही संघटना राज्य निर्माण करण्यासाठी झालेली नव्हती. राज्य निर्माण करण्यासाठी अल कायदातून इसिसचा जन्म झाला. इसिसने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली. इस्लामी खिलाफत म्हणजे इस्लामची भूमी, इस्लामचे सैन्य, इस्लामचे राज्य आणि इस्लामचा खलिफा असा होतो. या सर्व संघटनांच्या जन्मास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अमेरिका जबाबदार आहे. अमेरिकेचा लढा इस्लामविरोधी नाही असे अमेरिका जरी म्हणत असली तरी, कट्टरपंथी मुस्लीम तसे मानीत नाहीत.

अमेरिकेने केवळ अरबांचे शत्रुत्व ओढवून घेतले आहे असे नसून इराणलाही शत्रुराष्ट्र करून टाकले आहे. इराण हा अरब देश नाही, तो पर्शियन देश आहे. त्याची संस्कृती अरबी नाही. त्याचा स्वतंत्र इतिहास आहे. त्याचा इस्लाम अरबी इस्लाम नाही. अमेरिकेने इराणवर दीर्घकाळ आर्थिक निर्बंध लादले. सध्या ते शिथिल केले आहेत. इराणी माणूसदेखील अमेरिकेचा कट्टर दुश्मन झालेला आहे. आताच्या सीरिया आणि लिबियातील गृहयुध्दात अमेरिकेने तुफानी बाँबफेक केली आहे. सीरियन आणि लिबियन माणूस अमेरिकेचा समर्थक नाही. मध्यपूर्वेतील रक्तपाताला अमेरिकेने वेगवेगळया प्रकारे खतपाणी घातले, आजही घालीत आहे. अमेरिकेची भाषा शांततेची आहे, परंतु शांतता आज तरी परग्रहावर आहे. 
vivekedit@gmail.com