मसणजोगी समाजाची सावित्रीमाई

विवेक मराठी    22-Sep-2017
Total Views |


रमा अल्लम

आजही भारतीय  समाजव्यवस्थेतला एक मोठा वर्ग श्ािक्षणापासून वंचित आहे. मसणजोगी हा त्यातील एक समाज. स्मशानात राहून आयुष्य जगणाऱ्या मसणजोगी समाजाचे जीवन आजही अस्थिर स्वरूपाचे आहे. या समाजात ना शिक्षणाची परंपरा, ना स्थिरतेची. अंधारात चाचपडत असलेल्या मसणजोगी सामाजातील एका जिद्दी महिलेने समाजातील मुला-मुलींना एकत्र्ाित करून ज्ञानाची ज्योत पेटवली आहे. रमा हुसेन अल्लम असे त्या आधुनिक सावित्रीमाईचे नाव आहे.

 मा अल्लम हे सोलापूरच्या मसणजोगी वस्तीतील परिचित नाव. साधारण पंचवीस वर्षांच्या रमा अल्लम यांच्या डोळयात शैक्षणिक ध्यास दिसून येतो. ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजासाठी काहीतरी करून दाखवायाचे, अशी रमा यांची मनोमनी इच्छा आहे. रमा अल्लम यांची कहाणी जशी दर्दभरी आहे, तशीच प्रेरणादायी आहे. रमाच्या आई जयश्री विभूते सांगत होत्या, ''रमा तीन वर्षांची होती, त्या वेळी तिचे वडील वारले. सासर नळदुर्गचे होते, तिथे भावकी त्रास देऊ लागली. त्यामुळे माझ्या तीन लेकरांना घेऊन माहेरी सोलापुरात आले. भावांनी जागा दिली. इथेच मिळेल ते काम करून लेकरांना जगवू लागले. रमाचे चौथीपर्यंतचे शिक्षण नळदुर्गमध्ये झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील अक्कलकोट नाक्याजवळील आंध्र-भद्रावती हायस्कूलमध्ये झाले. तिला लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. आमच्या घरात कुणी शिकलेले नसल्याने तिचा घरात अभ्यास घेता आला नाही. ती स्वत: अभ्यासाला बसे. तिला बाहेरच्या शिकवण्या देणे ही आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही, तिला जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून ती कॉलेजला जाऊ शकली नाही. तिच्या बरोबरच्या मैत्रिणी कॉलेजला जाऊ लागल्या, पण ही मात्र चार वषर्े उलटून गेली तरी कॉलेजला जाऊ शिकली नाही. तिची एक प्रकारे शैक्षणिक परवड झाली. चंद्रकांत गडेकर गुरुजी व उमाकांत मिटकर यांच्या प्रयत्नाने तिला सोलापूरच्या शिवाजी नाईट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. बारावीपर्यंत ती तिथेच शिकली. परिस्थितीमुळे तिला पुढचे शिक्षण घेता आले नाही.

अठराव्या वर्षी तिचे लग्न केले. आमच्या समाजात जास्त शिकलेला मुलगा मिळणे अवघड आहे. त्यामुळे तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या हैदरबरोबर तिचे लग्न झाले. हैदर हा खेकडे पकडून घर चालवतो. सोलापूर, हिप्परगा, नळदुर्ग, सावरगाव, तामलवाडी, खडकी व आजूबाजूच्या गावांतील तलावांत व ओढयांत जाऊन खेकडे पकडून बाजारात विकतो. यावरच रमाचे कुटुंब चालते. आपला समाज व कुटुंब शिक्षणामुळे मागे पडला आहे, आपल्या समाजातील मुले-मुली शिकली-सवरली तर समाज पुढे जाईल असा विश्वास रमाला वाटू लागला. समाजातील मुलांना शिकवले पाहिजे, त्यांना दिशा मिळाली पाहिजे यासाठी ती प्रयत्न करू लागली. मुलांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, जागा मिळणे हा एक मोठा प्रश्न होता. त्यासाठी हा मार्ग खडतर होता. त्यासाठी उमाकांत मिटकर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचा चांगला रस्ता करून दिला.''

रमा अल्लम मसणजोगी वस्ती व शैक्षणिक कामाविषयी सांगू लागल्या. ''सोलापूर हे बहुभाषिक शहर म्हणून परिचित आहे. कन्नड, तेलगू, मुस्लीम, जैन, गुजराती हा मिश्रभाषिक समाज इथे अनेक वर्षांपासून स्थिरावला आहे. त्यामुळे या शहरात भाषेच्या गुणवैशिष्टयासह समाज-संस्कृतीचे दर्शन घडते. या स्थिर समाजाबरोबर पारधी, भिल्ल, कतारी, नंदीबैल, बरूड, लमाण, वडार आणि मसणजोगी समाजांच्या अस्थिर वस्त्या आहेत. शहराचे जीवनमान उंचावले असले, तरी भटका समाज विकासापासून कोसो दूर आहे. गटारीच्या किंवा मोठया नाल्याच्या बाजूला पाल टाकून आयुष्य जगताना हा समाज नजरेस पडतो. 'मिळेल ते काम करायचे, मिळेल ते दाम घ्यायचे, दारोदारी भीक मागून मिळालेल्या अन्नातून पोटाची खळगी भरायची' असा अनेक वर्षांपासून या समाजाचा दिनक्रम सुरू आहे. संवेदनशील नजरेने शहराच्या अंतरंगाकडे पाहिल्यावर हे चित्र नजरेस पडते.

मसणजोगी समाज हा त्यातील एक भाग. गावातल्या कोणाच्याही मृत्यूची बातमी कळताच,आपल्या खास वेषात हे मृताच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन रात्री प्रेताचे रक्षण करणे, त्याबदल्यात मृताच्या वारसदारांकडून भिक्षा मागून घेणे ही पध्दत आहे. काळाच्या ओघात अशा प्रकारे जीवन जगणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. मसणजोगी समाज हा मूळचा आंध्र-तेलंगणातला. तेलगूचा प्रभाव असलेली परंतु उर्दू, हिंदी, कन्नड व मराठी भाषांतील शब्दांचे मिश्रण असलेली भाषा ते बोलतात. सोलापूर-हैदराबाद मार्गावरील मुळेगाव रोडच्या डाव्या बाजूला मसणजोगी समाजाची पाले आहेत. भुतांसारखा वेष धारण करून भिक्षा मागताना हा समाज गावात व शहरात नजरेस पडतो. हा समाज 'सुडगाडसिध्द' या नावाने ओळखला जातो. मसणजोगींची 38 ते 40 कुटुंबसंख्या आहे. या समाजाबरोबर बुडगा जंगम समाजाची काही घरे आहेत. हा समाजही आंध्र-तेलंगणातलाच. पोटापाण्यासाठी हा समाज आज इथे तर उद्या तिथे असे स्थलांतर करतो.

सध्या या समाजाच्या जगण्याच्या पध्दतीत बदल झाला असला तरी शैक्षणिक प्रगती मात्र झाली नाही. अनेक कुटुंबांत मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. जीवन बदलण्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी कुटुंब-समाज स्थिर असावा लागतो. मसणजोगी समाजातील मुले-मुली शिक्षणापासून दूर आहेत. या समाजात ज्ञानजागृती निर्माण करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मी 'खडू आणि फळा' हाती घेतला.

वस्तीतील उघडया जागेवर मुलांना एकत्र करून शिकवू लागले. पहिल्यांदा मुलांची संख्या कमी होती. नंतर हळूहळू वाढू लागली. मुलांना शिक्षणाची गोडी लागली. शाळेला संस्कार वर्ग हे नाव देण्यात आले. वर्गात दररोज 33 जण नियमित येतात. त्यात 23 मुली आणि 10 मुले आहेत. मुलांना शिकवताना वेगवेगळे अनुभव मिळतात. अनेक मुले हुशार असूनही त्यांना परिस्थितीमुळे चांगल्या शाळेत प्रवेश घेता येत नाही. मराठी, गणित, इंग्लिश या विषयांबरोबर व्यावहारिक व योग शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. बहुतांश घरात तेलगू भाषेतून संवाद होत असतो. त्यामुळे लहान मुलांना मराठी भाषा कळत नाही, म्हणून त्यांच्या मातृभाषेत शिकवते. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते, हे माझ्या लक्षात आले. मुलांची शिक्षणाविषयीची भीती मोडून काढण्यासाठी बाराखडी व अंकगणित तेलगू भाषेतून शिकवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलाची संख्या हळूहळू वाढू लागली. या मुलांची आकलन क्षमता वाढली आहे. अनेक मुले चांगले गायन करतात. उत्तम चित्रे काढतात. काही मुले जवळच्या महापालिका शाळेत जाऊ लागली आहेत. रात्री वर्गात येऊन अभ्यास करत असतात. विशेष अभिमानाची बाब म्हणजे आमच्या मसणजोगी वस्तीत मुलींची संख्या जास्त आहे. संस्कार वर्गात 33पैकी 23 मुली आहेत. सर्वच मुली खूप हुशार आहेत. प्रत्येक मुलीमध्ये एक आयकॉन दडलेला आहे. या मुलींच्या भावी शिक्षणासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांमधील इंग्लिशची भीती दूर करण्यासाठी दररोज इंग्लिश शब्दांच्या भेंडया, शब्द पाठांतर, इंग्लिश कवितांचे वाचन घेत असते. अनेक विद्यार्थी शाळेच्या विविध उपक्रमात सहभागी होत असतात. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांना वर्गात आणून त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. दररोज संध्याकाळी वस्तीतील उघडया जागेवर हा वर्ग चालतो. पावसाळयात हा वर्ग चालवणे अवघड आहे. पावसाळयाचे चार महिने आमच्यासाठी खडतर. सध्या पत्र्याच्या शेडचा फळा म्हणून उपयोग करते. त्यावर अक्षरही नीटसे उमटत नाहीत. विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे मुले वैयक्तिक घरी येऊन अभ्यासातील शंका विचारतात. उघडया जागेवर वर्ग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे आजूबाजूला लक्ष जाते. त्यामुळे मसणजोगी वस्तीत पत्र्याची शेड उभारून संस्कार वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी दानशूरांचा मदतीचा हात पुढे आला पाहिजे,'' अशी रमा अल्लम यांची अपेक्षा आहे. मुलांना उत्कृष्ट अध्यापन करता यावे यासाठी डी.एड.चे शिक्षण घेण्याची इच्छा रमा यांनी व्यक्त केली.

शिक्षक होण्यासाठी डी.एड., बी.एड.ची पदवी घेणे आवश्यक आहे. एवढे असूनही चालत नाही. त्यासाठी उत्कृष्ट अध्यापन करता आले पाहिजे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सावित्रीबाई फुले यांनी देशात शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांनी कोणतेही मोठे शिक्षण घेतले नाही, तरीही त्यांनी देशात मोठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली. देशातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. आजच्या 21व्या शतकात मसणजोगी समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ध्यास घेत असलेल्या व आधुनिक सावित्रीबाई फुले वाटाव्यात अशा रमा हुसेन अल्लम यांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

9970452767