एकला चलो रे...

विवेक मराठी    25-Sep-2017
Total Views |

****धनंजय दातार****

व्यवसाय हा एकटयाने (प्रोप्रायटरशिप), भागीदारीत (पार्टनरशिप) किंवा सहकारी (को-ऑॅपरेटिव्ह) अशा तीन पध्दतीने करता येतो. मार्ग कोणताही अवलंबला, तरी व्यवसायाच्या यशासाठी एकच गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे 'विश्वास'. तुम्ही एकटयाने उद्योग करत असाल, तर तुमचा स्वत:वर विश्वास असावा लागतो. भागीदारीत असाल, तर दोघांचा एकमेकांवर विश्वास असावा लागतो आणि सहकारी उद्योग असेल, तर सर्वांचा परस्परांवर विश्वास असावा लागतो. आम्हाला व्यवसायाच्या सुरवातीलाच विश्वासघाताचे दु:ख सहन करावे लागल्याने मी पुढे कधीही भागीदारी किंवा सामूहिक उद्योगाच्या वाटेला गेलो नाही. 'एकला चलो रे' या तत्त्वानुसार वाटचाल करत आहे.

कोणताही व्यवसाय सुरू करताना तो एकटयाने करायचा, भागीदारीत करायचा की सामूहिक (सहकारी) पध्दतीने करायचा, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रत्येक पध्दतीचे स्वतंत्र फायदे-तोटे आहेत. एकटयाने व्यवसाय करताना सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीच्या खांद्यावर पडते. धंद्याच्या यशापयशाला तोच जबाबदार असतो. त्याला स्वत:चा पैसा ओतावा लागतो. अतिरिक्त भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. निर्णय एकटयाने घ्यावे लागतात. एका अर्थी ती 'वन मॅन आर्मी' ठरते. दुसरीकडे भागीदारीत व्यवसाय केला, तर मदतीला आणखी एक सहकारी लाभतो. जबाबदाऱ्यांची विभागणी होते आणि भांडवलही निम्मेच घालावे लागते. दोघांकडे वेगवेगळे कौशल्यसंच असतील, तर त्याचा फायदा होतो. म्हणजे एक भागीदार उत्पादन प्रक्रियेकडे लक्ष देत असेल, तर दुसरा विक्री व विपणन सांभाळू शकतो. पण दोघे भागीदार एकमताने चालत नसतील किंवा एकाच्याही मनात स्वार्थ, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली, तर मात्र तेथे विसंवाद निर्माण होतो आणि ती नुकसानीची ठिणगी ठरू शकते.

अनेक लोकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर उद्योग स्थापन करता येतो. यात प्रत्येकाचा भांडवली वाटा कमी असतो आणि जबाबदाऱ्या सांभाळायला खूप माणसे मिळतात. नफा वाटून घ्यावा लागला, तरी असा व्यवसाय टिकाऊ असतो हेही खरेच. पण 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नता' या न्यायानुसार प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. असे मतभेद धंद्याच्या हिताच्या आड आले, की तेथेही गटबाजी सुरू होते. मग उद्योगाचा मूळ हेतू बाजूला राहून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. एकीकडे 'विना सहकार, नाही उध्दार' म्हणताना अखेर 'टू मेनी कुक्स स्पॉइल द केक' ही म्हण खरी ठरण्याची वेळ येते.

मला व्यक्तिश: ही भागीदारीची किंवा सामूहिक व्यवसायाची कल्पना फारशी रुचत नाही. त्याचे कारण भागीदारीचा अत्यंत कटू अनुभव आम्हाला व्यवसायाच्या अगदी सुरुवातीलाच सहन करावा लागला. एक प्रकारे प्रथमग्रासे मक्षिकापात झाला. माझ्या वडिलांना व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे सर्व आयुष्य नोकरीत गेले होते. अखेरची नोकरी ते दुबईत एका परदेशी कंपनीत करत होते. ती नोकरी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. बाबांपुढे विचार पडला, की पुढे कसे करावे. त्यांची हवाई दलात नोकरी झालेली असल्याने थोडेफार पेन्शन मिळणार होते, पण त्यात त्यांचे आणि आईचे भागले असते. मी व माझा धाकटा भाऊ यांचे शिक्षण पूर्ण व्हायचे होते. अशा वेळी बाबांना व्यवसायाची एक संधी अकस्मात चालून आली.

दुबईत त्या काळात नोकरीसाठी गेलेल्या प्रत्येक भारतीयाचे खाण्याचे हाल व्हायचे. आपल्याकडचे मसाले, चटण्या, लोणची, मुरंबे, पापड अशा गोष्टी तेथे सहजासहजी मिळत नसत. परदेशी वस्तूंनी मात्र दुकाने ओसंडून वाहत होती. त्यातही गंमत म्हणजे दाक्षिणात्य भारतीयांचे तितकेसे हाल होत नसत, कारण ते लोक भारतात गेल्यावर परत येताना जो मसाला आणत, तो एकाच वेळी आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ राज्यांतील लोकांना चालत असे. महाराष्ट्रीय, पंजाबी, उत्तर भारतीय, बिहारी या लोकांना मात्र त्यांच्या खाण्यातील वस्तू सहजतेने मिळत नव्हत्या. ही परिस्थिती लक्षात आल्यावर माझ्या बाबांच्या मनात भारतात परत येण्यापेक्षा दुबईतच किराणा मालाचे एक छोटेसे दुकान टाकण्याची कल्पना आली. त्यांनी त्यांच्या बिनधास्त धाडसी स्वभावाला अनुसरून बार दुबई भागात एक जागा भाडयाने घेऊन दुकान टाकलेसुध्दा. त्यासाठी साचलेली सर्व पुंजी गुंतवली. सुरुवातीला ते भारतातून वीस किलोच्या प्रमाणात वस्तू मागवत आणि किरकोळीत लोकांना विकत. भारतीयांची चांगली सोय झाल्याने हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. त्याचे नावही झाले.

एकदा गुडविल निर्माण झाले आणि भरवशाचा ग्राहकवर्ग मिळाला की धंद्याचा विस्तार हे दुसरे पाऊल उचलणे अपरिहार्य ठरते. बाबांच्या मनात दुकान वाढवण्याचा विचार सुरू झाला, पण त्यासाठी त्यांना भांडवल कमी पडत होते. ते कुणीतरी भागीदाराच्या शोधात होते. त्यांचा भागीदारीचा प्रस्तावही आकर्षक होता. म्हणजे भागीदाराने भांडवल पुरवायचे, दुकान बाबांनी चालवायचे आणि नफा निम्मा-निम्मा वाटून घ्यायचा. या प्रस्तावाला आफ्रिकेतील एका व्यापाऱ्याने प्रतिसाद दिला. बाबांनी त्याच्याशी भागीदारी करार केला आणि दुकानाचा विस्तार केला. पुढे त्या भागीदाराच्या मनात लोभ निर्माण झाला. तो धंद्यात मुरलेला आणि माझे बाबा नवशिके. दुकान चांगले चालते आहे, हे बघून त्याने ते बळकवण्याचा बेत आखला. बाबांकडची सगळी पुंजी दुकानात गुंतवल्याचे त्याला ठाऊक होते. त्याने एक डाव टाकला. दुकान बाबांनी सांभाळायचे व भागीदाराने सायलेंट पार्टनर राहायचे, हे करारातील कलम डावलून तो दुकानाच्या प्रत्यक्ष कामात हस्तक्षेप करू लागला. ते बाबांना आवडले नाही. त्यांच्यात मतभेद झाले. त्या साळसूद व्यापाऱ्याने बाबांना खिंडीत गाठले. भागीदारी संपवायची असेल तर माझे भांडवल एकरकमी परत करा, किंवा दुकान मला विकून स्वत:चे भांडवल काढून घ्या, असे त्याने सांगितले.

जे रोप घाम गाळून वाढवले, त्याला फळे आल्यावर इतर कुणी त्यावर हक्क सांगणे बाबांना पसंत नव्हते. त्यांच्या हातात पैसे नव्हते तरीही त्यांनी पुन्हा एकदा धाडस दाखवले. मिळेल तेथून कर्ज काढून, उधार-उसनवाऱ्या करून त्यांनी रक्कम जमा केली आणि ती भागीदारी एकदाची संपवून टाकली. या प्रकाराचा आम्हाला फार मनस्ताप झाला. तेव्हापासून बाबांनी आणि पाठोपाठ मी कानाला खडा लावला. यापुढे भागीदारीच्या फंदात पडायचे नाही, असा निर्णय घेतला. मी अंथरूण बघून पाय पसरण्याचा धोपटमार्ग निवडला. सुरुवातीला एका दुकानाची दोन दुकाने करताना मी बँकेचे कर्ज घेतले, पण त्यानंतर कधीही कर्ज काढले नाही. नफा बाजूला टाकून त्या गंगाजळीतून नवी दुकाने सुरू करत गेलो. 'घडायचे ते आपल्या हातांनी, पडायचे तर आपल्या पायांनी' हा विचार नेहमी समोर ठेवला.


भागीदारी ही संसारासारखी...

 माझे बाबा गंमतीने म्हणत, ''भागीदारी म्हणजे संसारासारखी असते.'' संसार सुखाचा व्हायचा असेल, तर जोडीदारांनी परस्परांवर कुरघोडी करता कामा नये. परस्परांवरचा गाढ विश्वास, प्रामाणिकपणा आणि हातात हात घालून केलेली वाटचाल यावर संसार अवलंबून असतो. व्यवसायातील भागीदारीचेही तसेच असते. पण मी पाहिले आहे की फार कमी लोक अशी भागीदारी निभावतात. बालपणापासून एकत्र वाढलेले किंवा एकाच परिस्थितीतून गेलेले मित्र भागीदारी यशस्वी करून दाखवू शकतात. कारण त्यांना ते जुने दिवस आठवतात, पण एरवी भागीदारी अगदी भावाभावांनाही लाभदायक ठरत नाही.
  भागीदारांच्या आपापसातील डावपेचांमुळे चांगला उद्योग कसा मातीमोल होतो, याचे उदाहरण मी डोळयाने बघितले आहे. दोन भागीदारांनी सुरवातीला एकमताने चालून मेहनतीने व्यवसाय चांगला नावारूपाला आणला. नफा वाढला, सुबत्ता आली, कंपनीतील कर्मचारिवर्गही वाढवण्याची गरज भासू लागली. नेमकी इथेच स्वार्थाची ठिणगी पडली. एका भागीदाराने पत्नीच्या आग्रहामुळे आपल्या मेव्हण्याला कंपनीत कामाला लावून घेतले. हळूहळू मेव्हणोबांनी कमाल दाखवायला सुरुवात केली. त्याने कर्मचारिवर्गातच फूट पाडली आणि काहींना आपल्या बाजूला वळवून घेतले. त्याला कंपनीची सूत्रे आपल्या बहिणीच्या नवऱ्याकडे असायला हवी होती. पहिल्या भागीदाराला या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. एकदा कर्मचाऱ्यांतील भांडण फार चव्हाटयावर आल्याने सगळयाचा उलगडा झाला. परिणामी दोघा भागीदारांत जोराचे भांडण झाले. कंपनीत इतके हेवेदावे सुरू झाले की अखेर दोघांनी ती कंपनी तिसऱ्याला विकून टाकली. 'दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ' ही म्हण खरी ठरली. संधी मिळताच कर्मचारीही भागीदारांत भांडणे लावण्यास कमी करत नाहीत. म्हणून भागीदारांनी हलक्या कानाचे राहू नये आणि चहाडखोरीला उत्तेजन देऊ नये.

vivekedit@gmail.com