सौ सुनार की  ...एक स्वराज की

विवेक मराठी    29-Sep-2017
Total Views |

 

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचा बुरखा टरकावला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा स्वैर वापर करू दिला नाही, तर सर्वच जनता दहशतवादातून मुक्त होईल,  पाकिस्तानकडून नृशंसतेचे नवनवे धडे घालून दिले जात असतानाच तो जगाला शांततेचे पाठ द्यायचाही प्रयत्न करत असतो, हे किती हास्यास्पद आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. काही देश हे दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे असे न म्हणता तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असे सांगतात आणि मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी मानायलाही तयार होत नाहीत, असे म्हणून त्यांनी चीनलाही चांगल्यापैकी चिमटा काढला.

ला, कोणत्याही कारणाने का असेना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानावेसे वाटले, हे काय कमी आहे! आजच्या जमान्यात हे दृश्यही तसे विरळेच आहे. सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानचा बुरखा टरकावला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 'आयआयटी', आयआयएम', 'ऑॅल इंडिया इन्स्टिटयूट ऑॅफ मेडिकल सायन्सेस' यासारख्या संस्था भारताने निर्माण केल्या; पाकिस्तानने काय केले? तर लष्कर ए तैयबा, जैश ए महमद, हिज्बुल मुजाहिदीन आणि हक्कानी नेटवर्क यांना जन्माला घातले. माणसाला डॉक्टरकडून जीवदान दिले जाते, तर या दहशतवादी संघटनांकडून त्याची नृशंस हत्या केली जाते, अशी टीका स्वराज यांनी केली. त्यावर राहुल गांधी यांनी गेल्या सत्तर वर्षांत झालेल्या प्रगतीचा उल्लेख केल्याबद्दल स्वराज यांचे आभार मानले आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द सुषमा स्वराज अशी लढत उभी करायची इच्छा झाली असणार, हे स्वाभाविक आहे.

सांगायचा मुद्दा हा की, सुषमा स्वराज यांचे खरोखरच अभिनंदन केले जायला हवे. याची कारणे दोन. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मिळालेल्या वेळात त्या रोखठोक बोलल्या हे त्याचे एक कारण आहेच; पण त्या आता नाममात्र परराष्ट्रमंत्री आहेत, बाकी सारे काम नरेंद्र मोदीच करत असतात, या टीकेलाही त्यांनी आपल्या आमसभेतल्या भाषणाने परस्पर उत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सर्वसाधारणपणे सदस्य देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष यांची भाषणे होत असतात. त्यांना ठरावीक वेळेत बोलावे लागते. दर वर्षी एखादा विषय या आमसभेसाठी निश्चित केला जात असतो. या खेपेला 'शांततेसाठी धडपडणारी जनता आणि वैश्विक आधाराने सर्वांसाठी अनुरूप जीवन' हा विषय निवडण्यात आला होता. प्रत्येक जणच आपापल्या देशाच्या प्रश्नांना त्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असतो. नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आणि त्या आधीच्या वर्षी आमसभेत भाषण केले आहे. या खेपेला ते अधिवेशनासाठी न्यूयॉर्कला गेले नाहीत. त्यांच्याऐवजी सुषमा स्वराज यांनी तिथे भाषण केले आणि पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी भारतावर दोनच दिवस आधी केलेल्या अत्यंत खोडसाळ आरोपांना उत्तर दिले. अब्बासी यांनी पहिल्यांदाच या व्यासपीठावरून भाषण करताना अमेरिका आणि भारत यांच्यावर टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या अफगाणिस्तानविषयक धोरणाकडे अब्बासी यांचा टीकेचा रोख होता, हे तर खरेच. पण या धोरणात भारताला प्राधान्य देऊ  केल्याबद्दल त्यांची मळमळ अधिक होती. मात्र हे करताना त्यांना स्वत:लाच इतक्या वेळा घाम फुटला होता की पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी किमान दहा वेळा खिशातून रुमाल काढून तो टिपल्याचे दृश्य अनेकांना अनुभवायला मिळाले. ट्रम्प यांनी ''अफगाणिस्तानच्या प्रश्नावर भारताला अधिक सक्रिय भूमिका बजावावी लागेल'' असे म्हटले असल्याने त्यांचा तिळपापड झाला, हे उघड आहे, पण त्यांनी पाकिस्तानमध्ये तालिबानांचा तळ नाही, असेही धडधडीत खोटे सांगून टाकले. त्यांनी म्हटले की, गेल्या चार दशकांपासून अफगाण जनतेसह पाकिस्तानी जनतेला परकीयांचा हस्तक्षेप सहन करावा लागतो आहे, त्यामुळे तिथे यादवी माजलेली आहे. हे परकीय कोण याविषयी त्यांनी सांगितलेले नसले, तरी ऐंशीच्या दशकात तेव्हाच्या कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानमध्ये आक्रमण केल्यानंतरची दहा वर्षे तिथे यादवी होती, पण तिचा जास्तीत जास्त फायदा पाकिस्ताननेच करून घेतला. सोव्हिएत युनियनविरुध्द लढण्यासाठी त्यांनी अमेरिकेला आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करू दिला. त्यातच अल कायदा आणि अफगाण तालिबान जन्माला आले आणि त्यांना पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीवर पोसले. त्यानंतर अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबानांनी पाकिस्तानच्या साह्याने त्या देशाचे पुरते वाटोळे केले. दुसरा हस्तक्षेप हा थेट अमेरिकेचाच होता. 11 सप्टेंबर 2011च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर पाकिस्ताननेच पुन्हा स्वत:साठी ती संधी मानली आणि अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात पैसा आणि साधनसंपत्ती उकळली. याच अब्बासींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीपूर्वी मॅनहॅटनमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारविषयक वैचारिक पीठाच्या (थिंक टँकच्या) बैठकीत बोलताना पाकिस्तानकडे किती संहारक अण्वस्त्रे आहेत आणि त्यांनी कोणत्या प्रकारचा विनाश होऊ  शकतो, ते सांगितले. त्यावर काही वृत्तपत्रांनी हे अब्बासी आहेत की उत्तर कोरियाचे किम जाँग, असा प्रश्न केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्याकडे पाहिले पाहिजे. अब्बासी यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा प्रश्न उकरून काढला नसता आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून 'अत्याचार घडत असल्या'चा कांगावा केला नसता, तर स्वराज यांना त्याला उत्तर द्यायची गरजच पडली नसती. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा स्वैर वापर करू दिला नाही, तर सर्वच जनता दहशतवादातून मुक्त होईल, असे त्या म्हणाल्या. पाकिस्तानकडून नृशंसतेचे नवनवे धडे घालून दिले जात असतानाच तो जगाला शांततेचे पाठ द्यायचाही प्रयत्न करत असतो, हे किती हास्यास्पद आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. काही देश हे दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे असे न म्हणता तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असे सांगतात आणि मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी मानायलाही तयार होत नाहीत, असे म्हणून त्यांनी चीनलाही चांगल्यापैकी चिमटा काढला. शाहीद खाकन अब्बासी यांच्या भाषणाचा प्रतिवाद करताना 'पाकिस्तान नव्हे टेररिस्तान' अशी टीका भारताने केली होती, तोच सूर सुषमा स्वराज यांच्या खणखणीत भाषणातही होता. अब्बासी यांच्या वक्तव्याला उत्तराच्या अधिकारात भारताच्या वतीने एनम गंभीर या भारतीय प्रशासकीय सेवेतल्या 2005च्या तुकडीतल्या अधिकारी महिलेने आक्षेप घेतला होता. गेल्या वर्षी तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणावर त्यांनीच आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या कायम प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी स्वराज यांच्या भाषणावर आक्षेप घेत 'भारत हीच दहशतवादाची जननी' असल्याचे प्रतिपादन केले. विशेष हे की, असा आक्षेप कोणीही घेऊ  शकतो; पण सर्वसाधारणपणे त्या देशाच्या वतीने परराष्ट्र खात्यातल्या पण न्यूयॉर्कमध्ये असलेल्या एखाद्या दुय्यम अधिकाऱ्यालाही तो घेता येऊ  शकतो. आपले कायमचे प्रतिनिधी सैयद अकबरुद्दिन यांनी आपल्या दुय्यम अधिकाऱ्याला तो घेऊ  दिला. लोधी यांनी वापरलेला शब्दप्रयोगही भारताकडूनच उसना घेतलेला होता. नरेंद्र मोदी यांनी 17 ऑॅक्टोबर 2016 रोजी गोव्यात ब्रिक्सच्या बैठकीत 'पाकिस्तान ही दहशतवादाची जननी आहे' अशी टीका केली होती. मलीहा लोधी यांनी आपल्या अधिकृत 'बॉस' असणाऱ्या 'आयएसआय'कडून आलेल्या सूचनेनुसार टीका केली आणि भारताकडूनच काश्मीरमध्ये किती 'टोकाचा अत्त्याचार' केला जातो, हे सांगताना एक चित्र दाखवले. ते काश्मीरमधले नव्हते, तर गाझा पट्टीत पेलेट गनच्या माऱ्यात 2014मध्ये जखमी झालेल्या रव्या अबू जोमा या अठरा वर्षांच्या तरुणीचे होते. जागतिक कीर्तीच्या हेदी लेविन या छायाचित्रकाराने टिपलेले हे चित्र तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन यासारख्या वृत्तपत्रांनी प्रसिध्द केले होते.

या सगळया प्रकरणात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सर्वाधिक अपमानजनक अवस्था जर या खेपेला कोणी ओढवून घेतलेली असेल, तर ती पाकिस्तानने आणि त्या देशाच्या पंतप्रधानांपासून ते त्यांच्या कायम प्रतिनिधीपर्यंत सर्वांनी. मलीहा लोधी यांना बसलेली चपराक कमी पडली म्हणून की काय, त्यांच्या त्या छायाचित्राच्या प्रकरणाला आणखी एकदा डांबर फासले गेले ते भारताच्या अगदी कनिष्ठ प्रतिनिधीकडून दिल्या गेलेल्या उत्तराने. पौलोमी त्रिपाठी यांनी लोधी यांच्या उत्तराला प्रत्युत्तर द्यायच्या अधिकारात आपला हक्क बजावला आणि पाकिस्तानी दहशतवादाचा खरा चेहरा साऱ्या जगाला दाखवून दिला. बनावट चित्र दाखवून आणि 'आयएसआय' पुरस्कृत खोडसाळ कहाणी ऐकवून स्वत:चे हसे करवून घेणाऱ्यांना थोबाडले होते. चेहऱ्यावरचे बुरखे त्रिपाठींनी टरकावून टाकले. त्यांनी पाकिस्तानी दहशतवादाचा खरा चेहराच आमसभेपुढे सादर केला. त्रिपाठींनी लोधी यांनी दाखवलेले ते चित्र 22 जुलै 2014 रोजी गाझा पट्टीत अमेरिकन छायाचित्रकाराने घेतलेले असल्याचे सांगितलेच, पण त्यांनी लेफ्टनंट उमर फैयाझ या 2 राजपुताना रायफल्सच्या भारतीय अधिकाऱ्याचे छायाचित्र दाखवून पाकिस्तान्यांचे दात त्यांच्याच घशात घातले. या अधिकाऱ्याला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कुलगाममधल्या हार्मेनमधून कसे पळवले आणि त्याच्या देहाला छिन्नविच्छिन्न करून कशा पध्दतीने ठार केले, त्याची शोककथाही ऐकवली. त्रिपाठी यांनी उमर फैयाझ याचे ते छायाचित्रही आमसभेपुढे दाखवले. स्वाभाविकच पाकिस्तानचा प्रचार किती हीन दर्जाचा असतो, तेही सर्व जगासमोर आले. त्या वर असेही म्हणाल्या, ''हे खरे चित्र आहे, पाकिस्तानी दहशतवादाचा हा निष्ठुर आणि शोकात्म चेहरा आहे आणि तो दडवायचा प्रयत्न पाकिस्तानच्या कायम प्रतिनिधीने केला आहे.''

भारतीय प्रतिनिधीच्या या उत्तरावर लोधीच काय पण 'आयएसआय'लाही निरुत्तर व्हावे लागेल अशी ही अवस्था आहे. पण जित्याची खोड अशी तशी जात नाही. आता लोधी यांच्याविषयी अधिक सविस्तर सांगता येईल असे बरेच काही आहे. त्या पत्रकार होत्या आणि एकेकाळी बेनझीर भुट्टो यांच्या जवळच्याही मानल्या गेल्या. तथापि प्रत्येक राजवटीबरोबर त्याही बदलल्या. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत त्या वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानच्या राजदूत होत्या. 11 सप्टेंबर 2001 रोजी त्यांच्या निवासस्थानी जे पाहुणे न्याहरीसाठी आले होते, त्यांचे नाव जनरल मेहमूद अहमद. ते त्या वेळी 'आयएसआय'चे प्रमुख होते. त्यांनी आदल्याच दिवशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला भेट दिलेली होती. तिथल्या अभ्यागत वहीत त्याची नोंद आहे. हे गृहस्थ लोधी यांच्या घरी टीव्हीवर 11 सप्टेंबरचे ते अग्निकांड आणि अर्थातच हत्याकांड पाहत होते. अहमद उमर सईद शेख या दहशतवाद्याच्या हस्ते महमद अट्टा याला एक लाख डॉलर्सची बॅग पोहोचवणारे हेच ते. महमद अट्टा हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिल्यांदा विमान धडकवणारा इजिप्शियन दहशतवादी. सईद शेख आणि जनरल मेहमूद अहमद यांना आपल्या स्वाधीन करावे, अशी मागणी अमेरिकेकडून पाकिस्तानकडे करण्यात आली होती, पण ते तेव्हा मानले गेले नाही. त्याऐवजी पाकिस्तानने दहशतवादाविरुध्दच्या लढयात आपण अमेरिकेबरोबर आहोत, असे सांगून अमेरिकेलाही हातोहात फसवले. पाकिस्तानचा हाही एक चेहरा जगासमोर तेव्हा आला. 'गिरे तो भी टांग उपर' असे म्हणण्याची पाकिस्तानी नियत काही चुकलेली नाही. त्यांनी त्रिपाठींना उत्तर द्याायच्या मिषाने आणखी एका प्रतिनिधीला बोलते केले. टिपू उस्मान यांनी काश्मीरमध्ये जनतेचे काय हाल चालले आहेत त्याची माहिती दिली आणि नक्राश्रू ढाळले. अमेरिकेने समजा पाकिस्तानची मदत थांबवली तर काय बिघडले? आमच्या पाठीशी चीन आहे हे लक्षात घ्या, असे अब्बासींनी एका मुलाखतीत न्यूयॉर्कमध्येच सांगितले आहे. चीनही फार काळ तुमच्या मागे मागे करेल असे नाही. सुषमा स्वराज यांच्या आमसभेतल्या भाषणावर चीनच्या अधिकृत 'ग्लोबल टाइम्स'ने टीका केली, पण पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अभयारण्य आहे हे मान्यही केले आहे. (खुद्द पाकिस्तानच्या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या मुख्तार अहमद शाहजाद या अधिकाऱ्याने इस्लामाबाद उच्च न्यायालयात अर्ज करून 'आयएसआय' हीच दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा थेट आरोप केला आहे.) उत्तर कोरियापासून चीन दूर होऊ  लागला आहेच, तर तो पाकिस्तानपासून वेगळा व्हायला वेळ थोडाच लागणार आहे? सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावले आणि पाकिस्तानी चपापले. त्यांच्या हे लक्षात आले की, यापुढे आपली डाळ शिजणारच नाही, म्हणून शब्दांचे बुडबुडे उडवायचा हा धंदा त्यांनी चालू केला आहे.

खोटे छायाचित्र दाखवून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या अब्रूचा पंचनामा करवून घेतला असला, तरी त्यांची गुर्मी जराही कमी झालेली नाही. अशा बनावट असलेल्या चित्रामागे भारत फार काळ दडू शकणार नाही, असे त्या देशाने म्हटले आहे. इस्रायलपेक्षा भारत जास्त दुष्ट आहे, असेही त्याचे म्हणणे आहे. एवढी बेअब्रू झाल्यानंतरही, अफगाणिस्तानने दहशतवाद्यांना आपल्या देशात थारा दिला तर ते सहन केले जाणार नाही, अशा चोराच्या उलटया गोष्टी सांगायचा लोधी यांनी प्रयत्न केला आहे.

सुषमा स्वराज यांच्या भाषणाचा परिणाम म्हणा, किंवा पाकिस्तानची दहशतवादी देश अशी झालेली ओळख म्हणून म्हणा, अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी नवी दिल्लीत नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊ न दहशतवाद्यांना कोणत्याही देशाचे दिले जाणारे संरक्षण सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वाासन दिले. ट्रम्प प्रशासनातले ते भारताला भेट देणारे पहिले वरिष्ठ मंत्री आहेत, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचीही भेट घेतलेली आहे.

जाता जाता एका विषयावर माझे मत मांडणे मी आवश्यक मानतो. सुषमा स्वराज उत्तम बोलल्या. पण त्यांनी आपले हे महत्त्वाचे भाषण इंग्लिशमधून करण्याची आवश्यकता होती. आमसभेत त्यांच्या हिंदी भाषणाची तातडीने अनुवाद करून देण्याची व्यवस्था असली, तरी इंग्लिशमध्ये असलेली पोच जागतिक पातळीवर हिंदीत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

या खेपेच्या आमसभेत स्वराज यांनी जी टीका केली, त्याबद्दल मात्र पाकिस्तानी वृत्तपत्रे कडवट बनली आहेत. एरवीचा आपला जरा बरा असलेला सूर टाळून आपल्या अग्रलेखातून आणि बातम्यांमधून आपल्या सरकारचाच हेका चालवत असल्याचे स्पष्ट झाले. केवळ पाकिस्तान टाइम्सने मलीहा लोधींनी केलेल्या चुकीचा उल्लेख केला आहे. असो, पाकिस्तानने स्वत:च खणून ठेवलेल्या खड्ड्यात पडायचे ठरवले असेल, तर त्यास अडवणारे आपण कोण?

9822553076