इस्लामी इराण 

विवेक मराठी    04-Sep-2017
Total Views |

 

इराणी साम्राज्याच्या प्रवासातील सफावित साम्राज्य (1501-1736) त्यानंतर नादिरशाह याचे अफशरीद साम्राज्य आणि त्यानंतर कज्जर घराण्याचे राज्य अशी तीन साम्राज्ये महत्त्वाची समजली जातात. यातील नादिरशहाचे साम्राज्य अल्पजीवी होते. कज्जर साम्राज्य 1796 ते 1925पर्यंत टिकले आणि या साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर पहलवी राजघराण्याचा अंमल इराणमध्ये 1925 ते 1979 सालापर्यंत राहिला. इराणी साम्राज्याचा इतिहास स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. अभ्यासाच्या विषयात साम्राज्य कसे उभे राहते? साम्राज्य उभे राहाण्यासाठी अनुकूल परिस्थिती कशी उभी राहते? साम्राज्याचा विस्तार कसा होतो? आणि अखेर साम्राज्याचा नाशही कसा होतो? साम्राज्याचा उदय आणि अस्त मनुष्यजातीच्या इतिहासातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकतात. आणि त्याचा अभ्यास करणाऱ्याला ज्ञानसंपन्न करतो. साम्राज्याच्या उदय-अस्तानंतरही देश, राष्ट्र नावाची संकल्पना फार थोडया देशांत टिकून राहिली आहे. इजिप्शियन लोकांचेदेखील प्राचीन काळी साम्राज्य होते, इटालियन लोकांचेदेखील होते, ग्रीकांचेदेखील होते. नकाशात आज हे देश आहेत, परंतु त्यांची प्राचीन संस्कृती, प्राचीन जीवनमूल्ये यांचा मागमूसही त्या देशांत सापडत नाही.

ध्यपूर्वेतील सर्व इस्लामी देशांत इराण हा अगदी वेगळा मुस्लीम देश आहे. एक तर तो अरब नाही, इराणमधला इस्लाम सुन्नी नाही. इराण शिया मुसलमान आहे. अरबांच्या राज्यांचा इतिहास (मॉडर्न स्टेट) प्रेषित महम्मदांच्या उदयापासून सुरू होतो. इराणचा इतिहास पाच हजार वर्षे जुना आहे. प्राचीन काळातील त्याचे नाव 'परशिया' असे आहे आणि पर्शियन साम्राज्य शेकडो वर्षे मध्य आशियातील बहुतेक सर्व देशांत आणि उत्तर आफ्रिकेतील देशांत पसरलेले होते. इ.स.पूर्वी 650 ते 330 या काळात इराणच्या साम्राज्याचे नाव होते 'अकिएमेनिड साम्राज्य'. सायरस द ग्रेट हा त्या काळातील आहे. तसा दुसरा सम्राट होता डॅरियस. या साम्राज्याच्या काळात युरोपच्या भूमीवरदेखील इराणची सत्ता निर्माण झाली. दुसऱ्या साम्राज्याचा कालखंड आहे इ.स. 1312 ते 248. याला 'सेल्युसीड साम्राज्य' असे म्हणतात. तिसऱ्या साम्राज्याचे नाव आहे 'ससानियन साम्राज्य'. त्याचा कालखंड 224 ते 651 असा आहे. ससानियन साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांच्यात निरंतर युध्द चालू राहिले. यामुळे हे साम्राज्य दुर्बळ झाले आणि मुस्लीम आक्रमणाला ते बळी पडले. इ.स. 633 साली याझडेगर्ड हा ससानियन सम्राट राज्यावर होता. त्या वेळी अरब मुसलमानांचे इराणवर आक्रमण झाले, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इराण मुस्लीम आक्रमणासमोर कोसळला. 674पर्यंत संपूर्ण इराण अरब मुसलमानांच्या ताब्यात गेला आणि त्याबरोबर झोरास्ट्रियन धर्माचादेखील अंत झाला. झोरास्टि्रयन धर्मीयांना आपण पारशी असे म्हणतो. मुंबई आणि गुजरातमध्ये असलेले पारशी हे मूळचे इराणचे आहेत. आपला धर्म वाचविण्यासाठी ते गुजरातच्या किनाऱ्याला लागले. गुजरातच्या राजाने त्यांना आश्रय दिला. आज पारशी जमात दुधात साखर जशी विरघळून जावी तशी भारतीय समाजात एकरूप झालेली आहे.

इराण आणि भारत यांचा संबंधदेखील अतिशय प्राचीन आहे. हे संबंध पारशी जमातीपुरते मर्यादित नाहीत. पारशी लोकांचा मुख्य ग्रंथ आहे झेंदअवेस्ता. त्याची भाषा आणि ॠवेदातील भाषा यातील साम्य विद्वान मंडळी दाखवितात. महाभारतात शुक्राचार्य, देवयानी आणि शर्मिष्ठा यांची कथा येते. शुक्राचार्य असुरांचे गुरू होते. हे असुर म्हणजे इराणी लोक. अहुरमझ्द असा शब्द आहे. असुर हे त्याचे रूपांतर आहे. हा इतिहास जर खरा मानला, तर देवयानीचे माहेर इराण ठरते. शुक्राचार्यांची माहिती अशी मिळते की, त्यांचे खरे नाव कवी उशांत असे होते. पर्शियामध्ये कवी कउस या नावाने ते प्रसिध्द होते. पर्शियाचे ते मुख्य धर्मगुरू होते. भृगू ॠषींपासून जी टोळी तयार झाली, तिला असुर असे संबोधले गेले. देव आणि असुर यांच्या संघर्षात शुक्राचार्य असुर पक्षाचे राजगुरू होते, असा मनोरंजक इतिहासही विद्वान लोक सांगतात.

पर्शियन लोक स्वत:ला आर्य मानत असत आणि आर्यत्वाचा त्यांना विलक्षण अभिमानही होता. जुनी पर्शियन भाषा आणि संस्कृत यांच्यामध्ये भरपूर शब्दसाधर्म्य आहे. उदा. संस्कृतमधला हिरण्य (सोने) पर्शियन भाषेत झरण्य होतो. सेना -अहेना होते, असुराचे अहुरा होते, यज्ञाचे यक्ष्ण होते, सोमचा अहोमा होतो, देवाचे दायेवा होते. इराण जरी मुसलमान झाला, तरी इजिप्तप्रमाणे त्याने आपल्या प्राचीन संस्कृतीला आणि इतिहासकाळातील महापुरुषांना अलविदा केलेले नाही. इराणमध्ये मुलांची नावे काही मुस्लीम वळणाची असली, तरी आपली जुनी प्राचीन नावे त्यांनी सोडलेली नाही. नुरी, फरासानी, मझांददारानी, कोर्देस्थानी, तेहरानी, इश्फाहानी, गिलानी, हमेदानी, आर्देशीन, अफशिन, बशीर, फरहाद, हमीद, हसन, होरमुझ्द, जमशेद, कामरान, मेहदी, रमीनरेझा, रोस्तम इत्यादी नावे इराणच्या प्राचीन संस्कृतीशी नाळ जोडणारी आहेत.

इराणी साम्राज्याच्या प्रवासातील सफावित साम्राज्य (1501-1736) त्यानंतर नादिरशाह याचे अफशरीद साम्राज्य आणि त्यानंतर कज्जर घराण्याचे राज्य अशी तीन साम्राज्ये महत्त्वाची समजली जातात. यातील नादिरशहाचे साम्राज्य अल्पजीवी होते. कज्जर साम्राज्य 1796 ते 1925पर्यंत टिकले आणि या साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर पहलवी राजघराण्याचा अंमल इराणमध्ये 1925 ते 1979 सालापर्यंत राहिला. इराणी साम्राज्याचा इतिहास स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. अभ्यासाच्या विषयात साम्राज्य कसे उभे राहते? साम्राज्य उभे राहाण्यासाठी अनुकूल परिस्थिती कशी उभी राहते? साम्राज्याचा विस्तार कसा होतो? आणि अखेर साम्राज्याचा नाशही कसा होतो? साम्राज्याचा उदय आणि अस्त मनुष्यजातीच्या इतिहासातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकतात. आणि त्याचा अभ्यास करणाऱ्याला ज्ञानसंपन्न करतो. साम्राज्याच्या उदय-अस्तानंतरही देश, राष्ट्र नावाची संकल्पना फार थोडया देशांत टिकून राहिली आहे. इजिप्शियन लोकांचेदेखील प्राचीन काळी साम्राज्य होते, इटालियन लोकांचेदेखील होते, ग्रीकांचेदेखील होते. नकाशात आज हे देश आहेत, परंतु त्यांची प्राचीन संस्कृती, प्राचीन जीवनमूल्ये यांचा मागमूसही त्या देशांत सापडत नाही.

इराणचे तसे झाले नाही. प्रथम अरबी इस्लामने इराणची वाताहत केली. त्यानंतर 13व्या शतकात चेंगीझखानचे इराणवर आक्रमण झाले. मंगोल आक्रमणाचा कालखंड इ.स. 1219 ते 1221 असा आहे. चार वर्षांत चेंगीझखान, त्याचा मुलगा अल्लादिन मोहम्मद आणि नातू अलाखू खान यांनी इराणचे वाळवंट करून टाकले. इतिहासकार सांगतात की, 1220 साली इराणची लोकसंख्या 25 लाख होती, 1258 साली ती 2 लाख 50 हजार राहिली. चेंगीझखान आणि त्यानंतर आलेले इतर खान यांची लढाई करण्याची एक पध्दती होती. जिंकलेला मुलूख ते बेचिराख करीत आणि कोणालाही जिवंत ठेवीत नसत. तुम्ही शरण या नाहीतर शस्त्रे खाली टाका. मोघलांनी सर्वांच्या कत्तली केल्या. जे दिसेल त्याला आगी लावण्याचा सपाटा त्यांनी लावला. हलाखू खानने बगदादचा विध्वंस कसा केला, हे यापूर्वी आपण पाहिलेले आहे. पुढे हे मंगोल स्वत: मुसलमान झाले आणि त्या त्या प्रदेशात स्थायिक झाले. एवढया भयंकर विध्वंसातूनदेखील इराण पुन्हा उभा राहिला आणि यापूर्वी दिल्याप्रमाणे वेगवेगळी राजघराणी उदयाला आली. यातील सफाविद राजघराण्याची राजवट ही आजच्या इराणचा पायाभरणी करणारी ठरली आहे.

सफाविद राजघराण्याच्या काळात शिया इस्लाम हा इराणचा मुख्य धर्म झाला. अरबांचा सुन्नी इस्लाम त्यांनी सोडून दिला. शियातील एक पंथ बारा इमामांना मानण्याचा आहे. इराणमध्ये 12 इमामी पंथाचे राज्य आले. 1501 ते 1722 एवढया प्रदीर्घ काळात त्यांचे राज्य इराणमध्ये होते. इराणचे वैशिष्टय असे आहे की, राजघराणे स्थापन करणारा आपल्या नावापूर्वी शाह अशी उपाधी लावतो, मग तो सफाविद असो, की कज्जर असो की पहेलवी असो. या राजघराण्यातील पहिला शहा अब्बाज याची राजवट अतिशय महत्त्वाची समजली जाते. जॉर्जियन, आर्मेनियन, सिर्काशियन, कॉकेशियन्स अशी वेगवेगळी ओळख असणारे जनसमूह इराणमध्ये राहू लागले. शिया मुस्लीम, इराणी किंवा पर्शियन अशी हळूहळू त्यांची ओळख होत गेली. या राजवटीच्या अखेरच्या काळात नादिरशहाचा उदय झालेला आहे. आपल्या भारताच्या दृष्टीने नादिरशहा हे महत्त्वाचे नाव असल्यामुळे त्याच्याविषयी थोडक्यात लिहिणे आवश्यक आहे.

नादिरशहा हा सफाविद राजघराण्यातील नव्हता. त्याने सफाविद साम्राज्याची राजगादी बळकावली. राज्यावर आल्यावर त्याने राज्यविस्तारास प्रारंभ करून अफगाणिस्तान जिंकून घेतला आणि भारताच्या सरहद्दीवर येऊन तो धडकला. या काळात दिल्लीत मोघलांचे राज्य होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेबाच्या कर्तृत्वामुळे मोघलांची राजवट अत्यंत दुर्बळ झाली होती. मराठयांनी तिचे लचके तोडण्यास प्रारंभ केला होता. अनेक मुसलमान सरदारांनी स्वतंत्र सुलतानशाही सुरू केली होती. मोघल बादशहा मोहम्मद शहा याला ही बंडाळी कशी थांबवावी काही समजेना. भारतीय संपत्तीच्या वार्ता नादिरशहाच्या कानावर गेल्याच होत्या. काही तरी कुरापत काढून त्याने भारतावर आक्रमण केले. गझनी, काबुल, पेशावर जिंकत तो लाहोरला आला. 24 फेब्रुवारी 1739ला पंजाबातील कर्नाल येथे मोघल सेना आणि नादिरशहाची सेना यांच्यात युध्द झाले. मोघलांची सेना संख्येने मोठी असली, तरी तिचा पराभव झाला. महम्मद शहा शरण गेला. दिल्लीच्या चाव्या महम्मद शहाने नादिरशहाला दिल्या. नादिरशहा मयुर सिंहासनावर जाऊन बसला.

दिल्लीत वेगवेगळया अफवा पसरल्या. नादिरशहाचा खून झाला अशी अफवा पसरली. नादिरशहाच्या सैनिकांच्या हत्या झाल्या. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, हे लक्षात येताच नादिरशहाने दिल्लीत कतलेआम करण्याचा हुकूम सोडला. 22 मार्च 1739. सशस्त्र सैन्याने दिल्लीची लूट आणि कत्तल करायला सुरुवात केली. सैन्याने मुसलमान, शिख, हिंदू स्त्रिया-मुले, रस्त्यांवर प्रेतांचा खच पडला. एका दिवसामध्ये 30 हजार दिल्लीवासी ठार झाले. नादिरशहाने दिल्लीची प्रचंड लूट केली. शहा यांचे मयुर सिंहासन तो घेऊन गेला. कोहिनूर आणि दर्यानूर हे दोन हिरेही तो घेऊन गेला. नादिरशहाच्या स्वारीनंतर मोघल राजघराण्याला शेवटची घरघर लागली.  ब्रिटिशांच्या राज्याचा पाया याच स्वारीने रचला असे म्हणायला काही हरकत नाही. कारण अत्यंत दुर्बळ झालेल्या दिल्लीच्या मोघल सम्राटांना बंगाल आपल्या हाती ठेवण्यात यश आले नाही. नादिरशहा याला लूट आणि कत्तल करता आली, परंतु इराणमध्ये राजकीय स्थैर्याची घराणेशाही करता आली नाही. त्याच्या मुलांनीच त्याच्याविरुध्द बंड केले आणि शेवटी नादिरशहाची हत्या झाली. इतिहासात अशी अनेक उदाहरणे वाचायला मिळतात की, सम्राट अतिशय सामर्थ्यसंपन्न आहे, धनदौलत अफाट आहे, सैन्यदेखील प्रचंड आहे, परंतु त्याचा कधी खून होईल, काही सांगता येत नाही. ऑटोमन साम्राज्याचा इतिहास असा खुनाखुनीनेच भरला आहे.

इराणचा हा परिचय तसा लांबला म्हणायला पाहिजे. परंतु तो आवश्यक एवढयासाठी आहे की, इस्लामी जगतात इराण पूर्वीदेखील स्वतंत्र ओळख असलेला देश होता आणि आजदेखील आहे. विनाशकारी जिहादी, सुन्नी, इस्लामला थोपविण्याची ताकद फक्त इराणमध्ये आहे. म्हणून सद्यकालीन मध्यपूर्वेतील संघर्षात इराणचे स्थान कोणते आहे आणि इराण आज ज्या स्थितीला आहे तिथपर्यंत तो कसा आला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. नादिरशहानंतर आपण एकदम एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात गेले पाहिजे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय राजकारणात इराणच्या भौगोलिक स्थानामुळे इराणला अनन्यसाधारण महत्त्व आले.

सतराव्या शतकापासून इंग्लंड आणि युरोपमध्ये पुनरुज्जीवनवाद, सुधारणावाद, नवनवीन वैचारिक संकल्पना, नवीन शास्त्रीय शोध, समाजरचनेचे नवीन विचार, संघटित राज्याची संकल्पना, प्रशिक्षित व्यावसायिक सैन्यदल, नवनवीन शस्त्रांचा शोध, श्रमशक्तीऐवजी यांत्रिक शक्तीवर उत्पादने घेण्यास प्रारंभ, नवीन व्यापारी मार्गांचा शोध, वसाहतवाद अशा एकापेक्षा एक एक नवनवीन संकल्पना पुढे येत गेल्या. युरोपातील अनेक देश झपाटयाने या सर्व संकल्पना स्वीकारून आर्थिकदृष्टया आणि सैनिकी सामर्थ्याच्या दृष्टीनेदेखील प्रबळ होत गेले. वर्चस्व मिळविण्यासाठी त्यांची आपापसात युध्दे होऊ लागली. सतरावे शतक ते विसावे शतक युरोपची भूमी ही सतत युध्दभूमी राहिली आहे. युध्दामुळे जसा विनाश होतो, तसे प्रत्येक युध्द नवीन नवीन शोधांची जननी ठरते. या युध्दांमुळेच राष्ट्र-राज्य ही संकल्पना अधिक स्पष्ट होत गेली आणि राष्ट्रीय भावना प्रबळ होत गेल्या.

रशिया हा अर्ध युरोप आणि अर्ध आशिया खंडात विभागलेला देश आहे. त्याचा विस्तार अवाढव्य आहे. सतराव्या-अठराव्या खंडापर्यंत तो अत्यंत मागासलेला देश होता. परंतु पीटर दि ग्रेटने रशियाला आधुनिक बनविण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, रशिया या महासत्तांचा उदय हळूहळू होत गेला. त्यात इंग्लंड आपल्या आरमारी सामर्थ्याच्या जोरावर आणि इंग्रज माणसाच्या राष्ट्रीय गुणांच्या जोरावर सर्व महासत्तांना वरचढ ठरला. कारखान्यात उत्पादन होणाऱ्या मालासाठी हुकमी बाजारपेठांची गरज निर्माण झाली. त्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, फ्रेंच यांनी आशिया खंडातील अनके देश जिंकून घेण्याचा सपाटा लावला. या चढाओढीत बेल्जियम, पोर्तुगाल असे छोटे देशही उतरले. जगाच्या नकाशातील इराणचे स्थान अतिशय महत्त्वाचे ठरले. इराणच्या डोक्यावर कॅस्पियन समुद्र आहे, खाली इराणची खाडी (पर्शियन आखात) आहे. उत्तरेची सीमा रशियाला लागून आहे, पूर्वेकडची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे आणि पश्चिमेकडची सीमा इराकला आणि इतर अरब देशांना लागून आहे. जमिनीवरचे सर्व व्यापारी मार्ग इराणच्या भूमीतून जातात. त्याचे पूर्वीचे नाव आहे 'सिल्क रूट'. इराणमध्ये तेल आहे, याचा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत शोध लागलेला नव्हता. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात तो लागला. त्यामुळे तेलावर मालकी मिळविणे हा महासत्तांच्या विषयसूचीवरील अग्रक्रमांकाचा विषय झाला.

मध्य आशियातील युरोपीय महासत्तांच्या राजकारणाला 'दि ग्रेट गेम' असे म्हटले जाते. ब्रिटिशांचे धोरण रशियाला इराणमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. जर रशिया अफगाणिस्तानात शिरला, तर तो भारतावर आक्रमण करील. तेव्हा भारत इंग्रजांच्या ताब्यात होता. त्याच वेळी इराणमध्ये रशियाला जर फार घुसू दिले, तर युरोपमध्ये येणाऱ्या व्यापारी मार्गांवर रशियाचा अंकुश राहील. रशियाला पर्शियन आखातात प्रवेश मिळू देता कामा नये. अफगाणिस्तानातील राजवट आपल्या अंकित राहावी यासाठी  इंग्रजांनी 1838, 1843, 1848 आणि 1878 अशी चार युध्दे खेळलेली आहेत. 'दि ग्रेट गेम' या शब्दाच्या जनकत्वाचे श्रेय कॅप्टन ऑर्थर कोनोली याला देण्यात येते. त्याची नेमणूक कंदाहरमध्ये झालेली होती.

रशियाने ऑटोमन साम्राज्याशी आणि इराणशी 1828मध्ये आणि 1829ला स्वतंत्र तह केले. या तहामुळे तुर्कस्तान आणि इराण रशियाचे मित्र झाले. या तहामुळे ब्रिटिश सावध झाले आणि आपल्या व्यापाराला हे तह धोका निार्मण करू शकतात, असे त्यांना वाटून भारत आणि रशिया यांच्यामध्ये मोठे बफर स्टेट उभे करण्याची रणनीती त्यांनी आखली. अफगाणिस्तान आणि इराणचा काही भाग मिळून हे बफर स्टेट करण्याचे इंग्रजांनी ठरविले. 1854पर्यंत रशियाने संपूर्ण कजागस्थान व्यापून टाकला. त्यानंतर बोखारा आणि कीव या प्रदेशावर ताबा मिळविण्याचा या देशाने प्रयत्न केला. या ग्रेट गेमच्या राजकारणात इराणमध्ये ब्रिटनने आणि रशियाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली. या दोन महासत्तांनी अनेक दशके इराणची कशी पिळवणूक केली आणि इराणच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जीवनावर त्याचे कसे कसे परिणाम होत गेले, आणि 1979 साली इराणमधील इस्लामिक क्रांतीत या परिणामांची अखेर कशी झाली, हा इतिहास खूप काही शिकविणारा आहे.

vivekedit@gmail.com