पोटनिवडणुकांचे संकेत

विवेक मराठी    04-Sep-2017
Total Views |

 

या निवडणुकीतून भाजपाने धडा घ्यावा वगैरे म्हणणे अतिशयोक्तीकडे जाणारे राहील. पण कोणीही आला व त्याला भाजपाने आपले म्हटले की तो पवित्र झाला असे म्हणणेही सत्याला धरून नाही, हे भाजपाला समजून घ्यावे लागेल. स्थानिक नेतृत्वाचा विचार न करता, त्यांची मते विचारात न घेता कुणीही 'दगड' उमेदवार म्हणून लादणे याची परिणती अखेर पराभवात होत असते, हे जाणावे लागेल. विशेषत: काँग्रेसमुक्त भारताचा संकल्प करताना तर अधिक जागरूक राहावे लागेल. हाच बवानाचा संदेश आहे. भाजपा हा संदेश कसा घेतो, किती गांभीर्याने घेतो, हे भविष्यकाळच सांगणार आहे.

सामान्यत: पोटनिवडणुका जेव्हा होतात, तेव्हा त्याचा कौल सत्ताधाऱ्यांविरुध्दच असतो. सामान्य मतदारही विचार करतो, नाही तरी सत्ताधारी पक्ष सत्तारूढ झाला आहे. एखाददुसरी जागा पुन्हा सत्ताधाऱ्यांना देऊन काय फरक पडणार आहे? पण जर विरोधकांना संधी दिली, तर त्यांचे बळ वाढून सत्ताधाऱ्यांना आवर घालता येईल. पण हा नियम उलट होतो, जेव्हा मुख्यमंत्री-पंतप्रधान पोटनिवडणुकीत कौल घेतात तेव्हा. त्या वेळी त्यांचा विजय नक्की असतो. जिथून मुख्यमंत्री-पंतप्रधान कौल घेतात, त्या मतदारसंघाला माहीत असते की आपण मुख्यमंत्र्यांचा वा पंतप्रधानांचा मतदारसंघ ठरणार आहोत. त्यामुळे ते त्या व्यक्तीला मतदान करतात. त्यामुळेच विक्रमी मतांनी पंतप्रधान वा मुख्यमंत्री ही व्यक्ती विजयी होत असते.

भारतीय राजकारणात अनेकदा मुख्यमंत्री पोटनिवडणुकीत विजयी होत असतात. पण पंतप्रधान मात्र विजयी उमेदवारातूनच एकाला केले जाते. फक्त राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जी निवडणूक झाली होती, त्यात निवृत्तीच्या पंथाला लागलेल्या पी. व्ही. नरसिंहरावांना काँग्रेसने सत्तेवर बसविले होते. नरसिंहराव पंतप्रधान तर झाले, पण संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे निर्वाचित सदस्य नव्हते. त्यांनी पंतप्रधानपदी असताना नंद्याल या आंध्र प्रदेशातील लोकसभा मतदारसंघातून लोकसभा गाठली होती. नंद्यालच्या पोटनिवडणुकीत नरसिंहराव विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांच्या त्या मताधिक्यामुळे त्यांची निवडणूक अडचणीत येते की काय अशी स्थिती झाली होती.

या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत एकूण 4 ठिकाणी मतदान झाले होते. गोव्यात सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसच्या सुस्त नेतृत्वाने विजयी होऊनही गोवा गमावले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने अधिक आमदारांची जुळवाजुळव करून आपली संख्या 22वर नेली होती. गोवा विधानसभेत 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागा लागतात. त्यामुळे भाजपा गोव्यात सत्तेवर आली. मात्र ज्यांनी पाठिंबा दिला होता, त्या पक्षाने अट घातली होती की, जर मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ. त्यामुळे खासदार व संरक्षण मंत्री असलेले पर्रिकर गोव्यात परतले. त्यांनी पणजीतून निवडणूक लढविण्याचा र्निणय घेतला, तर त्यांच्या मंत्रीमंडळातील विश्वजित राणे यांनी वालपोई मतदारसंघाचा कौल घेण्याचा र्निणय घेतला. गोव्यातील मतदारसंघ खूप लहान आहेत. त्यामुळे हजार-बाराशेचा फरकही मोठा मानला जातो. मनोहर पर्रिकर यांनी आपले प्रतिस्पर्धी ग्ािरीश चोडणकर यांच्यावर 3803 मतांनी मात केली. हे निर्विवाद वर्चस्व आहे, तर वालपोईमधून विश्वजित राणे 10 हजारावर मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांना पराभूत केले. या दोघांच्याही विजयामुळे पोटनिवडणुकीतील एक सिध्द नियम पुन्हा अधोरेखित झाला.

आंध्र प्रदेशातील नंद्याल निवडणुकीत टीडीपीचे भूमा ब्रह्मा रेड्डी 27 हजारावर मतांनी विजयी झाले. भूमा नेगी रेड्डी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 2014 साली भूमा ब्रह्मा रेड्डी हे वाय.एस.आर. यांच्या पक्षातर्फे विजयी झाले होते. पुढे त्यांनी टीडीपी-तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला होता.

भूमा ब्रह्मा रेड्डी विजयी झाले खरे, पण या निवडणुकीसाठी 28 लाख रुपयांची जी खर्चमर्यादा होती, त्यापेक्षा त्यांनी जास्त खर्च केला. विरोधात पराभूत झालेल्या वाय.एस.आर. पक्षाच्या श्ािल्प चंद्रमोहन रेड्डी यांनी आपला पराभव तर स्वीकारला, पण त्यांनी भूमा ब्रह्मा रेड्डी यांच्या विरोधात निवडणूक याचिका करण्याची तयारी चालविली आहे. या याचिकेत अर्थातच भूमा ब्रह्मा रेड्डी यांना अपात्र ठरवून रेड्डी यांना विजयी घोषित करावे, अशी त्यांची मागणी राहणार आहे. भविष्यात काय होणार ते दिसेलच. पण तेलगू देसमच्या या विजयामुळे वाय.एस.आर. यांना जबर धक्का बसला आहे. वाय.एस.आर.ला आपली एक जागा गमवावी लागली आहे.

दिल्लीतील बवाना मतदारसंघाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला आहे. केंद्रात भाजपा व रालोआची सत्ता आल्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत आपच्या म्हणजे आम आदमी पार्टीच्या विजयाचा रथ पुढे निघाला होता. दिल्ली विधानसभेत 70 मतदारसंघ आहेत. त्यात आम आदमी पार्टीला अक्षरश: राक्षसी बहुमत मिळाले होते. 70पैकी 67 जागी आम आदमी पार्टी विजयी झाली होती, तर तीन जागा केंद्रातील सत्ताधारी भाजपाला मिळाल्या होत्या. त्यामुळे बवानाचा - पोटनिवडणुकीचा कौल वरील नियमाप्रमाणे भाजपाला जायला हवा होता. तो कौल पुन्हा आम आदमी पार्टीच्या बाजूने लागला आहे. वास्तविक या मधल्या काळात दिल्ली महापालिका निवडणुका झाल्या होत्या आण्ाि त्या निवडणुकीत सर्व महापालिकांत भाजपाला दणदणीत विजय मिळाला होता. ही निवडणूक आपमधील फुटीर आमदाराच्या राजीनाम्यामुळे झाली होती. या वेळी भाजपाने आप पार्टीतील त्या विजयी पण फुटून भाजपात आलेल्या उमेदवाराला विजयी करण्याचा चंग बांधला होता. त्याला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता. पण आपमधून पक्षात आलेल्या वेदप्रकाश यांना भाजपाने उमेदवारी दिली. मागील विधानसभा निवडणुकीनंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्राशी पंगा घेतला. ते बेताल झाले होते. त्यांना पंजाब व गोवा विधानसभेने त्यांची जागा दाखवून दिली होती. ही दोन्ही राज्ये आप जिंकेल अशी स्वप्ने बघणाऱ्या केजरीवालांची पार निराशा झाली होती. आपला जनाधार फक्त दिल्लीत आहे व इतरत्र आनंदीआनंद आहे, याची त्यांना जाणीव झाली.

जोमात असताना भाजपा नेत्यांवर केलेले आरोपही त्यांना महाग पडले होते. भाजपा नेते नितीन गडकरींवर केलेल्या आरोप प्रकरणात त्यांना माफी मागून तडजोड करावी लागली, तर अरुण जेटली बदनामी खटलाही त्याच र्मागाने जात आहे. अरविंद केजरीवालांची बाजू राम जेठमलानी मांडत होते. पण त्यांच्या मुखातून पुन्हा बदनामीकारक शब्द काढण्याचा प्रयास केजरीवालांनी केला, तेव्हा जेठमलानी यांनी केजरीवालांना त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यांचे वकीलपत्र तर सोडलेच, तसेच वकिलाची फी म्हणून तीन कोटी रुपयांचे बिल पाठविले. या सगळयातून केजरीवाल यांचा फुगविला फुगा फुटला होता. ते बऱ्यापैकी जमिनीवर आले होते. त्यामुळे त्यांनी बवानाला अगदीच अननुभवी उमेदवार देऊन जणू नांगी टाकली होती. या उमेदवाराने साधी ग्रामपंचायत निवडणूकही लढविली नव्हती. पण तो विजयी झाला. त्याने भाजपा उमेदवाराचा 24 हजार मतांनी पराभव केला. 2015 साली या बवाना मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला जेमतेम 14 हजार मते पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने 31 हजारावर मते घेतली. आपचे रामचंदर विजयी झाले.

या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर असला - पहिल्या 11 फेरीत तो आघाडीवर होता - तरी त्याच्या मतातील वाढ 'काँग्रेसमुक्त भारताची' घोषणा करणाऱ्या भाजपाला विचार करायला लावणारी आहे. काँग्रेस उमेदवार सुरेंद्रकुमार यांच्या मतांत 100 टक्क्यांनी वाढ होणे हे काँग्रेसचे यश मानायचे की भाजपाचे अपयश? एका मतदारसंघाचा कौल हा सर्ंपूण देशभरासाठी इशारा ठरू शकत नाही. तसे मानणे हे मूर्खाच्या नंदनवनात वावरणे ठरेल.

यातून भाजपाने धडा घ्यावा वगैरे म्हणणे अतिशयोक्तीकडे जाणारे राहील. पण कोणीही आला व त्याला भाजपाने आपले म्हटले की तो पवित्र झाला असे म्हणणेही सत्याला धरून नाही, हे भाजपाला समजून घ्यावे लागेल.

स्थानिक नेतृत्वाचा विचार न करता, त्यांची मते विचारात न घेता कुणीही 'दगड' उमेदवार म्हणून लादणे याची परिणती अखेर पराभवात होत असते, हे जाणावे लागेल. विशेषत: काँग्रेसमुक्त भारताचा संकल्प करताना तर अधिक जागरूक राहावे लागेल. हाच बवानाचा संदेश आहे. भाजपा हा संदेश कसा घेतो, किती गांभीर्याने घेतो, हे भविष्यकाळच सांगणार आहे.

8888397727