काठावर किती काळ असं बसायचं?

विवेक मराठी    04-Sep-2017
Total Views |


आजचा ग्रामीण तरुण आळशी झालाय, तो शेती करत नाही, बायकोला मस्तपैकी कामाला लावून आपण मात्र स्टँडवर गप्पा मारत पत्ते खेळत बसतोय, अशी सध्या सोशल मीडियात साधकबाधक चर्चा होताना दिसतेय. यामध्ये ग्रामीण युवकांविषयी काही आशेची, विश्वासाची चार-सहा वाक्यंही वाचायला मिळतात. सारेच तरुण आळशी, चैनी, व्यसनी आहेत असं नाही. आज लाखो तरुण स्वतःच्या पायवर उभं राहून शेती-मातीच्या प्रश्नांना भिडताहेत, दुधासारख्या जोडधंद्यात चार पैसे कमवून आपलं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे असंख्य तरुण कमालीचे आळशी बनत चालले आहेत, त्यांना शेती कामाची लाज वाटतेय. आजचा ग्रामीण युवक मोबाइल युगात आकंठ बुडालाय असं चित्र जरी असलं, तरी वास्तव मात्र वेगळंच आहे.

त्रिं.ना. अत्रे यांचा 'गाव-गाडा' हा महाराष्ट्रीय ग्रामीण जीवनाचा समाजशास्त्रीय दस्तऐवज असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्याला आता शतकभराचा काळ लोटून गेलाय. या ग्रंथातला गावगाडा आज राहिला नाही. बदलत्या काळानुसार गावगाडयात राजकारण, शेती व्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राहणीमान यात स्थित्यंतरं होत गेली. पूर्वीची आलुतदार, बलुतेदार मंडळी आता दिसत नाहीत. जागतिकीकरणामुळे शेती व्यवसाय तोटयात येऊ लागला. शहरातली व्यापारी मंडळी गावात येऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून नफा मिळवून देणारी शेती करताहेत. काही तरुण गावगाडयात राहून शेती करताहेत, काही तरुण शहरांकडे धाव घेऊ लागलेत, तर काही तरुण आळशी होत चालले आहेत. या तरुणाचं टोळकं सदोदित स्टँडवर, पारावर बसून बाष्कळ गप्पा मारतानाचं चित्र नजेरस पडतं.

सोशल मीडियातला ग्रामीण आळशी युवक

लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून सोशल मीडियाकडे अर्थात समाज माध्यमांकडे पाहिलं जातंय. अनेकांना वेगवेगळया विषयांवर अभिव्यक्त होण्याची संधी मिळतेय, अभिव्यक्त झालेल्यांना चटकन प्रतिसादही मिळतोय, ही एक सकारात्मक बाब आहे. सोशल मीडियातून ग्रामीण तरुणांवर चर्चा होताना दिसते आहे. ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चालला असून तो फक्त फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर रात्रंदिन पडीक असतो, तोंडात तंबाखू, मावा, डोक्यात नुसतं राजकारण, हातात कुणाचातरी झेंडा, बॅनरवरची पब्लिसिटी आणि नेत्याचा खांद्यावर हात असावा याला ग्रामीण युवक भविष्य म्हणून पाहतोय, घरातील स्त्री शेतावर राबत असताना हा आत्मा स्टँडवर उभा राहून आपल्या मानसन्मानाच्या गप्पा झोडत असतो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या यात तो गुंग असतो, शेतात काम कर म्हटलं की नाक मुरडायला लगेच तयार असतो, अशा पोस्ट्स वाचायला मिळताहेत. यावरून ग्रामीण भागातील तरुण पिढी कशी बिघडत चालली आहे, हे लक्षात येतं. खरंच, ही पोस्ट सुसंगत आहे. सध्या गावगाडयात असंच काहीसं चित्र आहे. आज अनेक तरुण स्वतःचं सत्त्व हरवून बसलेत, व्यसनी बनले आहेत, शिवाय नेतेमंडळी तरुणांचा चांगला उपयोग करून घेताना दिसताहेत. ग्रामीण तरुणांची होणारी वाताहत चिंताजनक आहे. तरुणांच्या आळशीपणाला कोण जबाबदार आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, यांचा संशोधनात्मक अभ्यास करताना कोणी नजरेस पडत नाहीत.

ग्रामीण युवकांची दुसरी बाजू

जागतिकीकरण, शेतीवरचं अस्मानी संकट, शेतीमालाचे घसरलेले दर आदी कारणांमुळे गावगाडा ठप्प होतोय. यामुळे छोटा शेतकरी नव्हे, तर अगदी मोठा शेतकरीही अडचणीत येतोय. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठया प्रमाणावर बेरोजगार होतोय. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागलेत. त्यामुळे खेडयापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनत चाललीय. गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून वेळेवर न पडल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या. मान्सून ठीक तर गावगाडा नीट असतो. मात्र काही दशकांपासून असं काही घडताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण गावगाडयाचं स्वरूप बदलून गेलंय. काही शेतकरी काळया आईची इमानेइतबारे सेवा करताना दिसताहेत. पण पेरणीसाठी जेवढे पैसे खर्च झाले, तेवढे पैसे त्याच्या पदरात पडत नाहीत. त्यामुळे शेती हा आतबट्टयाचा व्यवहार झालाय. मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, घर-संसार कसा सांभाळायचा म्हणून असंख्य जीव झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करताहेत. हे दुःख उरात ठेवून आजचा तरुण वाममार्गाला लागतोय. स्टँडवर गप्पा मारणारे तरुण बहुतांशी सधन घरातले आहेत. प्रादेशिक भागाचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडयात गावंच्या गावं ओस पडलेली दिसतील. पोटासाठी सर्वांची धाव शहराकडे लागली आहे. जिथे मोठी धरणं आहेत, तेथे आणि साखरपट्टा समजल्या जाणाऱ्या प. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आळशी तरुणांचं टोळकं नजरेस पडेल. याच भागात आटपाडी, माण, खटाव, जत, सांगोला व मंगळवेढा भागात दुपारी गेला तर माणूसही नजरेस पडणार नाही. शेतकऱ्याचं सहा-सात वर्षाचं पोरगंसुध्दा शाळेच्या वेळेपर्यंत रानात बापाबरोबर राबताना दिसतं. शेर्डीकर्डीला गवत काडी आणतं. या सगळया गोष्टी बघायला गावात जावं लागतं. शहरात बसून चार-दोन टाळक्यांचं वर्णन करून संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोराचं वर्णन करणं चुकीचं आहे. खेडयातला कोंबडा शहरात आरवत नसतो. तसं करायचं झालं, तर शहरातील पोरांबाबतही करावं लागेल. त्यामुळे सगळीच पोरं आळशी आहेत असं नाही. आजचा तरुण शेतकरी निसर्गाशी झुंज देत डाळिंब, द्राक्ष, संत्रे, आंबा अशा फळबागा पिकवत आहे. मात्र बाजारात बसलेल्या चोरांमुळे त्यांच्या घामाचा दाम चोरला जातोय. उधारीवर आणलेल्या कीडनाशकांचे व खतांचे पैसे देण्याइतपत त्याला या बागेतून मिळत नाहीत, तरीही तो आलेल्या संकटांशी सामना करतोय.

आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून

दुष्काळी नव्हे, तर बागायती भागातही तरुणांची परवड होते आहे. आज अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन नोकरीअभावी गावगाडयात खितपत पडताहेत. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्यांना खात्री आहे. त्यांना शेती करणं कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला? अशी त्यांची मानसिकता बनत चाललीय. मराठवाडयातल्या माझ्या एका मित्राची शेती आणि त्याचं शिक्षण बघून त्याला शेजारच्या गावातील मुलगी दिली, पण शेतीत त्याचं मन रमत नव्हतं. नोकरीसाठी सगळीकडे अर्ज करत होता. प्रत्येक वेळी संस्थाचालकांकडून डोनेशनची मागणी होत होती. शेवटी सततचा दुष्काळ, द्रारिद्रय आणि बेरोजगारी यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. अशा असंख्य तरुणांच्या व्यथा आहेत. नोकरी लागत नाही म्हणून हताश झालेल्या चांगदेव गित्ते या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी इथल्या तरुणाने चक्क फार्मसीची पदवी विकायला काढल्याची बातमी मध्यंतरी प्रसिध्द झाली होती. त्याची घरची परिस्थिती जेमतेम होती. शेतीही निसर्गावर अवलंबून असल्याने ती तोटयात आली होती. तरीही शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च केला. मात्र शिक्षण घेऊन घरचा भार उचलता येत नाही, म्हणून हताश झालेल्या चांगदेवने डिग्री विकायला काढल्याची बातमी वाचनात आली होती. आजच्या घडीला असंख्य ग्रामीण तरुणांना नोकरी मिळत नाही. अनेक युवक आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करताहेत. परंतु एवढं शिकूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांची समाजात अवहेलना होते. त्यामुळे तरुणांमधील व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय. काही तर जीवनयात्रा संपवताहेत. ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण शिकलेल्या मुलींना जोडदार मात्र खेडयातला तरुण शेतकरी नकोय. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय आतबट्टयाचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. त्यामुळे गावगाडयातल्या मुलीला शेतकरी नवरा नकोसा झालाय. आपला नवरा एखाद्या कंपनीत कमी पगारात काम करत असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशी मुलींची आणि पालकांची मानसिकता बनत चालली आहे. एका सर्वेक्षणाच्या पाहणीतून सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात शेकडो तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावात तिशी उलटलेल्या तरुणांनी विवाहाची आशाच सोडून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये तब्बल 3 हजारांपेक्षा जास्त तरुणांचे विवाह रखडले आहेत. हे सर्व तरुण शेतीसंबंधित काम करताहेत आणि खेडयात राहतात म्हणून मुलींनी त्यांना नकार दिल्याचं समोर आलंय. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही दिसून येतंय. यातील अनेक तरुणांच्या कहाण्या काळजाच्या चिंध्या करणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य काय? या तरुणांचा आयुष्याचा बारोमास निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि सरकारी व्यवस्था यांनी साथ नाही दिली, तर असंख्य ग्रामीण तरुणांची कशी वाताहत होतेय, याचं वास्तव चित्र यावरून स्पष्ट होते.

नवनवीन शिकाल तरच टिकाल

सरकार रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप यासारख्या नवीन उद्योग प्रणाली तरुणांना आकर्षित करताहेत. प्रत्येक ग्रामीण तरुणाने काळाप्रमाणे बदल करून बदलत्या जगाप्रमाणे आपणही अपडेट राहायला शिकलं पाहिजे, नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तरच आपला निभाव लागणार आहे. आज नवनवीन कन्सेप्ट्स उदयाला येताहेत, त्या आत्मसात करायला शिकलं पाहिजे. गावात बसून शेतीपूरक व्यवसाय करता येतो, अशीही उदाहरणं आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांनी आळस झटकून नवा इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे की, 'काठावर किती काळ असं बसायचं? त्यापेक्षा पोहणं शिकून घ्या. होडीचं कुणी सांगावं? ती परतेल, न परतेल....' ग्रामीण तरुणांनो, आळसाच्या काठावर किती काळ बसणार आहात? आता जागतिकीकरणाच्या समुद्रात पोहायला शिका, नाहीतर संकट आ वासून उभं राहील.

99970452767