पायाची काळजी   - 3

विवेक मराठी    05-Sep-2017
Total Views |


पायाचा आकार लक्षात घेणं ही पुढची पायरी. पावलाचा एखादा भाग अवास्तव वाढलेला असणं, बोटांची रचना बदललेली असणं, बोटं एकमेकांवर चढलेली असणं याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तसंच पाऊल सरळ एका रेषेत पडतंय का, तेही महत्त्वाचं आहे. पाऊल सरळ रेषेत नसल्यास वजन एकाच बाजूला अधिक होतं. मधुमेहात हे बरोबर नाही. नखं वाढवणंही योग्य नाही आणि अगदी मांसाच्या लगोलग कापणंही चुकीचं आहे. वाढलेल्या नखाने बूट घातल्यावर पाऊल दाबलं जाऊ शकतं, तर लगोलग कापलेल्या नखाने नखुरडं होऊ शकतं.

पाय वाचवण्याच्या दृष्टीने रोज फक्त तळवा पाहून थांबणं योग्य नाही. पायाच्या त्वचेच्या आत कुठलेही रोगजंतू - म्हणजे बॅक्टेरिया शिरणार नाहीत, याचा पुरेपूर बंदोबस्त व्हायला हवा. आपल्या हाताच्या पंजाची आणि पावलांची रचनाच अशी आहे की त्यात रोगजंतू शिरले की ते झपाटयाने पुढे पुढे वर वर जाऊ  लागतात. म्हणून कित्येकदा थोडा थोडा करत आख्खा पाय कापण्याची वेळ येते. मुळात मधुमेहींची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे रोगजंतूंना शरीराकडून फारसा प्रतिकार होत नाही. शिवाय रक्तात ग्लुकोज जास्त असल्याने त्या रोगजंतूंना आयता भरपूर खुराक मिळतो. या दोन्ही कारणांनी जंतुसंसर्ग झाल्यावर झटपट परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात होते. माझ्या जखमा लवकर बऱ्या होतात, मी कशाला काळजी करू? अशी फुशारकी पुढे खूप भारी पडू शकते. यासाठी रोगजंतूंना आत शिरायला वावच मिळणार नाही असा बंदोबस्त करायला हवा.

त्यातली पहिली पायरी म्हणजे त्वचा अखंड राखणं. तिला भेगा पडू न देणं. आणि भेगा झाल्याच, तर त्या लवकरात लवकर बुजतील अशी व्यवस्था करणं. मधुमेहात ऑॅटोनॉमिक न्यूरोपॅथी झाली तर त्वचेला पुरेसा घाम येत नाही, तैलग्रंथींतून पुरेसं तेल बाहेर पडत नाही. या दोन्ही गोष्टी त्वचा मऊ  मुलायम राखण्यासाठी आवश्यक असतात. त्यांचा पुरवठा कमी झाला की त्वचा कोरडी होणार हे नक्की ठरलेलं असतं. बराच काळ पाऊस न पडल्यावर जमिनीला भेगा पडतात, त्याप्रमाणे त्वचेलाही भेगा पडणं साहजिक असतं. मग या भेगांमधून रोगजंतू आत शिरतात व पुढचा प्रकोप सुरू होतो.

कोरडया त्वचेला कंड सुटतो. खाजवल्यावर नखं लागणारच. नखांनी उठलेले ओरबाडे म्हणजे जखमाच. नुसत्या डोळयांनी दिसल्या नाहीत म्हणून काय झालं? आणि तुम्ही-आम्ही काही सूक्ष्मदर्शकाखाली पाय ठेवून बघणार थोडेच? यासाठी मधुमेहींनी त्वचा कोरडी पडत असेल तर त्यांनी पायाला नियमित क्रीम लावायला हवं. अगदी खोबरेल लावायलाही हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी - खोबरेलच्या वासाने उंदीर आकृष्ट होतात. त्यांनी चावा घेतला, तर वेगळी जखम व्हायची. मी रुग्णांना कोकणात मिळणाऱ्या कोकम तेलाच्या मुठी वापरायला सांगतो. स्वस्त आणि मस्त उपाय. महागडी मलमं पाहिजेतच कशाला!

पायाच्या बोटांमधली पेरं नियमित तपासायला हवीत. कित्येकदा पेरांच्या मधल्या भागात फंगल इन्फेक्शन असतं. ते कित्येक दिवस तसंच राहतं. तिथेही त्वचेला भेगा पडू शकतात. जी मंडळी दिवसभर पायात बूट-मोजे घालून असतात, त्याच्या बोटांच्या पेरांमध्ये अनेकदा फंगल इन्फेक्शन असतं. पायाला खूप घाम येत असेल, तर सकाळी पायात मोजे चढवण्याआधी पावडर वापरता येईल. किमान काही काळासाठी तरी तो भाग कोरडा राहील. अर्थात संध्याकाळी घरी परत आल्यावर, लावलेली पावडर नीट काढून टाकली पाहिजे, इतकं लक्षात ठेवलं म्हणजे झालं. नाहीतर त्या पावडरीतच फंगस रुजायचा!

पायाच्या संवेदना संपल्या की अनवाणी चालताना, अगदी देवळात जातानादेखील, शंभर वेळा विचार करणं आवश्यक आहे. आपल्या देशासारख्या उष्ण कटिबंधात मोडणाऱ्या जागी उन्हाळयात रस्ते तापलेले असतात. संवेदना संपलेल्या पायांना गरम रस्त्यावरून जाताना भाजलेलं समजत नाही, म्हणून हे सांगणं. जर अनवाणी चालणं अपरिहार्य असेल, तर निदान भल्या पहाटे जायला हवं आणि कमीत कमी वेळ पाय पादत्राणाविना राहतील हे पाहिलं पाहिजे. गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्या व्यक्तींनी प्रथम हात घालून पाणी फार कढत नाही ना, याचा अंदाज घेतला पाहिजे किंवा घरातल्या इतर कुणालातरी आंघोळीचं पाणी काढण्याची विनंती केली पाहिजे. उष्णतेने जखमा होण्याचं प्रमाण आपल्याकडे विलक्षण आहे. गरम कुंडात पाय सोडून बसल्यावर प्रचंड भाजलेली व्यक्ती मी पाहिलेली आहे.

पायाचा आकार लक्षात घेणं ही पुढची पायरी. पावलाचा एखादा भाग अवास्तव वाढलेला असणं, बोटांची रचना बदललेली असणं, बोटं एकमेकांवर चढलेली असणं याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तसंच पाऊल सरळ एका रेषेत पडतंय का, तेही महत्त्वाचं आहे. पाऊल सरळ रेषेत नसल्यास वजन एकाच बाजूला अधिक होतं. मधुमेहात हे बरोबर नाही. नखं वाढवणंही योग्य नाही आणि अगदी मांसाच्या लगोलग कापणंही चुकीचं आहे. वाढलेल्या नखाने बूट घातल्यावर पाऊल दाबलं जाऊ शकतं, तर लगोलग कापलेल्या नखाने नखुरडं होऊ शकतं.

निसर्गाने दिलेल्या गोष्टीचं आपण काही करू शकत नाही हे मान्य असलं, तरी थोडीबहुत काळजी घेऊन आपल्याला पुढे होऊ  शकणारा त्रास निश्चितच कमी करू शकतो. योग्य प्रकारची पादत्राणं वापरून पायात असलेला छोटा-मोठा दोष नक्कीच घालवू शकतो. सुदैवाने आता मधुमेहात वापरता येतील अशा पादत्राणांचा सुकाळ आहे. तरीही काही प्रकारची पादत्राणं मधुमेहींसाठी बाद करायला हवीत. स्लिपर्स, हवाई किंवा अंगठा आणि पायाचं दुसरं बोट यामध्ये दंडा असलेल्या चपला नकोत. संवेदना संपलेल्या पायांना त्या पायात आहेत की नाहीत काही जाणवत नाही. कधी कुठे सांडल्या याचा पत्ता लागत नाही. म्हणून मागे पट्टे असलेल्या सँडलना अथवा फ्लोटर्सना पसंती द्यायला हवी. सँडल्स वा बूटदेखील पुढे निमुळते नसावेत. त्याने पावलाचा पुढचा बोटांचा भाग आवळला जातो. पावलांचा आकार बिघडतो. उंच टाचेच्या चपला, बूट शरीराचं वजन पावलामार्फत सर्वत्र समान पसरवत नाहीत. पावलांच्या पुढच्या भागाला जास्त वजन पेलावं लागतं. साहजिकच प्रेशर पॉइंट्स बदलतात आणि त्याचा पुढे उपद्रव होतो.

पादत्राणं विकत घेताना साधारण संध्याकाळची वेळ निवडावी. या वेळी आपल्या पावलांचा आकार सूक्ष्म का होईना, मोठा झालेला असतो. सायंकाळी सात वाजल्यानंतर पादत्राणं विकत घेणं चांगलं. खिळे नसलेले, चारही बाजूंना शिलाई असलेले बूट किंवा सँडल निवडावेत. ते पायात घालून चालून पाहावं. पायात घातल्यावर दुखत खुपत व घट्ट होत असतील, तर डिझाइन कितीही आवडलं तरी ते घेऊ नये. पायात घातल्यावर बोटं व्यवस्थित हलवता आली पाहिजेत. म्हणजे पादत्राणांच्या दुनियेत ज्याला 'टो स्पेस' म्हणतात, ती भरपूर पाहिजे. जसे फार घट्ट बूट घेऊ नयेत, तसे अतिसैलदेखील घेण्यात अर्थ नाही. कधी पायातून निसटतील... कळणारही नाही.

आताशा मधुमेहींसाठी वेगळे पायमोजे मिळतात. शिवाय शरीराचा पायावर पडणारा ताण सर्वत्र सारखा पडेल अशी योजना करणारे बुटात घालायचे शू इन्सर्टसुध्दा मिळतात. आपल्या गरजेप्रमाणे बूट बनवून घेण्याची सोय असतेच. नाही म्हणायला स्पोर्ट्स शूज दिमतीला आहेतच. इतर कुठलीही सुविधा नसेल, तेव्हा योग्य मापाचे स्पोर्ट्स शूज घालून पायाची बऱ्यापैकी चांगली काळजी घेता येऊ शकते.

पायाच्या संवेदना आणि पावलांची रचना यांच्याइतकंच महत्त्व पायाच्या रक्तपुरवठयाला दिलं गेलं पाहिजे. चालताना पायात गोळे येणं आणि थांबल्यावर ते जाणं हे पायाचा रक्तपुरवठा कमी झाल्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण मानता येईल. याला 'पायाचा अंजायना' किंवा 'क्लॉडिकेशन सिंड्रोम' म्हणता येईल. पण असं कुठलंही लक्षण दिसेपर्यंत थांबू नये. वेळोवेळी पायाच्या नाडया तपासून पाहणं फारच उत्तम. ना त्याला खर्च, ना फारसा वेळ लागत. फक्त असं काही असतं याची जाणीव असणं आणि पायाचा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबायची वाट ना पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. रात्री निजल्यावर पाय ओढल्यासारखे होत असतील किंवा पाय खाली सोडून बसल्यावर पाय पांढरेफट्ट पडत असतील, तर पायाच्या रक्तपुरवठयाची काळजी करणं आवश्यक आहे. 

अशा वेळी ताबडतोब ती गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आणून द्या. ते तुमच्या पायाच्या नाडया लक्षपूर्वक तपासतील. त्यात काही अडचण वाटली तर डॉप्लर नावाची तपासणी करून घेतील. आताशा ऍंकल ब्रँकियल इंडेक्स नावाची तपासणी उपलब्ध आहे. तीदेखील पायाच्या रक्तपुरवठयावर चांगला प्रकाश टाकू शकेल. त्यातही रक्तपुरवठा कमीच असल्याचं आढळलं, तर डॉक्टर तुम्हाला पायाच्या रक्तवाहिन्यांची ऍंजियोग्राफी करायचा सल्ला देतील.

शक्यतो इथपर्यंत पाळी येणार नाही याकडे लक्ष द्या. रात्री पाय दुखायला किंवा ओढल्यासारखं व्हायला लागल्यावर अनेक जण ते दाबत, पाय गच्च बांधून ठेवत वा पायाला कुठलं तरी मलम लावत बसतात. हे नक्कीच टाळता येईल. काही होण्याआधीच पायाची पुरेशी काळजी घेता येईल. मधुमेहात हृदयाइतकाच पाय महत्त्वाचा, हे मनात ठामपणे नोंदून ठेवता येईल.

9892245272