अवीट गोडीची खिचडी

विवेक मराठी    05-Sep-2017
Total Views |

 

गंगापूर गावातील श्री बालाजी मंदिरातील सेवाव्रती इलाबेन राजेंद्र जोशी उर्फ काकू  दीर्घ आजाराने निधन झाले. श्री बालाजी मंदिरात अखंड सेवा करीत होत्या. महिला वर्गाकडून केल्या जाणाऱ्या सेवा कार्याचे नेतृत्व इलाकाकू करीत असत. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हसतमुखाने सेवा दिली. त्यांचे समाजिक कार्य, समरसतेचे विचार,  आदर्श गृहिणी अशा त्यांच्यातील विविध गुणांविषयी रमेश पतंगे यांनी श्रध्दांजलीपर लेखात दिलेला उजाळा...

 धुळे येथे अनुसूचित जनजाती प्रकल्पावर 17-18 ऑगस्टला जाण्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम ठरल्यानंतर नाशिकहून नाना बच्छाव यांचा फोन आला की, कैलासवासी भीमराव गस्ती यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम नाशिक येथे करायचा आहे, आणि त्यासाठी मी यावे. मी त्यांना म्हटले, ''16 ऑगस्टला कार्यक्रम तुम्ही ठेवल्यास मी येईन.'' त्यांनी ते मान्य केले आणि मी 16 ऑगस्टला दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिकला पोहोचलो. नाशिकला सामान्यतः मी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात मुक्काम ठेवतो. वयोवृध्द प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचा निवास तेथे असतो. अणीबाणीत ते आणि मी ठाणे कारागृहात एकत्रच होतो. ते चतुरस्र वाचन करणारे संघप्रचारक आहेत. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी भरपूर विषय असतात. गप्पा मारणारा अशी माझी ख्याती नाही, परंतु बाळासाहेबांबरोबर गप्पा मारताना तास कसे निघून जातात, ते समजत नाही.

निवांत वेळ भरपूर असल्यामुळे मी गंगापूर येथे असलेल्या बालाजी मंदिरात गेलो. तसा मी फार मोठा देवभक्त नाही, परंतु त्या देवळाचे मुख्य पुजारी राजेंद्र जोशी आणि त्यांची पत्नी इलाबेन यांचे दर्शन करावे, हा माझा मुख्य उद्देश होता. त्याला कारणही तसेच होते. 1972 ते 75 साली मी पार्ले नगरचा कार्यवाह होतो. माझ्या कार्यक्षेत्रात पार्ले-अंधेरी-जोगेश्वरी अशी तीन नगरे येत असत. या नगरात शाखांची संख्याही चांगली होती आणि कार्यकर्त्यांचा समूहदेखील चांगला होता. राजेंद्र जोशी तेव्हा जोगेश्वरी पश्चिमेला राहत. तेथील एका वैष्णव मंदिरात त्यांचे वडील पुजारी होते. त्यांना दोन भाऊ, तेदेखील वडिलांना पुजारी कामात मदत करीत असत. राजेंद्रदेखील या कामात गुंतलेले असत.

गुरुवार हा माझा जोगेश्वरी पश्चिमेचा दिवस असे. पटेल इस्टेट येथे त्यांचा निवास असे. तेव्हा पटेल इस्टेटमधील शाखासुध्दा उपस्थितीने भरगच्च असे. परिसरातील सर्व गुजराती मुले शाखेत येत. मंदिर पुजारी म्हणून सर्व वस्तीशी जोशी परिवाराचा घनिष्ठ संबंध होताच. त्यामुळे मुलेही शाखेत फारसा प्रयास न करता येत. शाखाभेट, कार्यकर्ताभेट, बैठक असा ठरलेला कार्यक्रम संपल्यानंतर राजेंद्र जोशींच्या घरी मी जेवायला जात असे. तसा त्यांचा आग्रहच असे. गुरुवारचा त्यांचा दिवस कढी आणि खिचडीचा असे. गुजराती खिचडी ज्यांनी खाल्ली आहे, तो त्या खिचडीचा स्वाद विसरू शकत नाही. राजेंद्र आणि त्यांची पत्नी इलाबेन, आई-वडील, बहीण असे सर्व जण आग्रह करून जेवायला वाढीत. हा उपक्रम साधारण तीन वर्षे चालू राहिला.

नंतर माझे कार्यक्षेत्र बदलले. संघकामाच्या जबाबदाऱ्यादेखील बदलत गेल्या. विवेकची आणि समरसता मंचाची जबाबदारी आली. जोशी परिवाराशी माझा संबंध संपला. पण तो मानसिकदृष्टया कधी संपला नाही. भेटीगाठीची वारंवारतादेखील कमी झाली. दोन-तीन वर्षांतून कुठल्यातरी कार्यक्रमात भेट होत गेली आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळत गेला. वयाच्या पन्नाशीनंतर राजेंद्रने सर्व कामातून निवृत्त होऊन सेवा कार्यात स्वतःला सपत्नीक गुंतवून घेतले. यमगरवाडीला त्यांचा काही वर्षे निवास राहिला. नंतर ते नाशिकला गंगापूर रोडवरील बालाजी मंदिरात मुख्य पुजारी म्हणून रुजू झाले.

नाशिकच्या प्रवासात राजाभाऊ मोगल मला मंदिरात घेऊन गेले आणि तेथे राजूभाई यांची माझी भेट झाली, खूप आनंद झाला. इलाबेन यांना भेटण्यासाठी मी घरी गेलो. त्यांची भेट तर कैक वर्षांनंतर होत होती. खिचडीची आठवण निघाली आणि ''खिचडी खायला कधी येणार?'' असे त्यांनी मला विचारले. मी म्हणालो, ''लवकरच येईन.'' त्यानंतर मी अनेक वेळा नाशिकला गेलो आणि न चुकता त्यांना भेटून आलो. परंतु त्यांच्या हातची खिचडी खाण्याचा कधी योग आला नाही. कार्यक्रमांची व्यग्रता आणि वेळेची कमतरता यामुळे निवांतपणे त्यांच्या घरी जाणे मला शक्य झाले नाही.

इलाबेन गेली काही वर्षे आजारीच होत्या. मी 17 तारखेला जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्या अंथरुणावरच पडून होत्या. पोटात काही अन्न जात नव्हते, खाण्याची काही इच्छाही नव्हती. परंतु आजारीपणाची कोणतीच छटा चेहऱ्यावर नव्हती. जी प्रसन्नता 1972-73 साली होती, तीच आताही तशीच होती. पतीकार्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित करून टाकले होते. माहेरकडून त्या संघाशी संबंधित होत्या की नाही मला माहीत नाही, तसे असण्याची शक्यता नव्हती. परंतु पतीच्या संघकार्यात मात्र त्या हिंदू परंपरेप्रमाणे पूर्णपणे एकरूप झालेल्या होत्या. व्यवसाय सोडून सेवा कार्यात जाऊन राहण्याचा पतीने निर्णय केला, या निर्णयाला त्यांनी मान्यता दिली. पतीबरोबरच त्या बालाजी मंदिरात आल्या आणि तेथेच आठ-दहा वर्षे त्यांचे वास्तव्य होते. सर्वांशी हसत-खेळत संबंध ठेवत, आल्या-गेल्याची चौकशी करीत, आत्मीयतेने त्या सर्वांची विचारपूस करीत असत. पुजारीपणाचे सोवळे सोडले, तर कोणतेही सामाजिक सोवळे त्यांनी पाळले नाही. संघस्वयंसेवकाचे घर सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असते, तेथे जातीपातीचा संबंध येत नाही.

याच बालाजी मंदिरात हिंदू समाजातील वेगवेगळया जातींच्या तरुणांचा पुजारी प्रशिक्षणाचा वर्ग दर वर्षी होतो. या वर्गात भाग घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्ह्यांतून मुले येतात, त्या सर्वांची व्यवस्था येथे होते. 'पुजारी ब्राह्मण हवा' अशी हिंदू समाजाची मानसिकता असते, आणि येथे तर अब्राह्मण वर्गाचे पुजारी प्रशिक्षण चालते. राजूभाई आणि इलाबेन यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि वर्गाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले. आजच्या सामाजिक परिभाषेत सांगायचे, तर ही एक सामाजिक क्रांती आहे आणि संघाच्या परिभाषेत सांगायचे तर समाजात होणारा हा स्वाभाविक बदल आहे. त्यासाठी फक्त प्रयत्न आणि परिश्रम करावे लागतात.

दिल्लीला चिंतन बैठकीसाठी 26-27 ऑगस्टला गेलो असता, विवेकचे खान्देश प्रतिनिधी प्रदीप निकमचा संदेश आला - 'श्री बालाजी मंदिर, गंगापूरचे व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांची पत्नी इलाबेन यांना आज सायंकाळी (दि. 27 ऑगस्ट 2017) देवाज्ञा झाली.' इलाबेन फार दिवसांच्या सोबती नाहीत, हे मला 17 ऑगस्टच्या भेटीतच लक्षात आले होते. समर्पित जीवन जगून त्या गेल्या. म्हटले तर एक सामान्य गृहिणी होत्या. पण थोडा सूक्ष्म विचार केला, तर त्या हिंदू जीवन जगणाऱ्या आदर्श स्त्री होत्या. 

यासाठी इलाबेन यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची ठसून राहणार आहे. संघकार्यकर्त्याच्या घरातील महिला ही संघशक्तीचे एक रूपच असते. आपण तसे आहोत हे तिला माहीत नसते आणि अनेकांच्याही ते लक्षात येत नसते. संघसंस्कार समरसतेचा असतो. आपण सर्व एक, एकाच परिवाराचे घटक, आपल्यात कोणी उच्च नाही नीच नाही, एकमेकांची सुख-दुःखे वाटून घ्यायची हा समरसतेचा संस्कार असतो. त्याची अनुभूती इलाबेनसारख्या, एका अर्थाने अबोल भगिनी, आपल्या व्यवहाराने करून देत असतात. अनेकदा मला एक प्रश्न विचारला जातो की, तू एवढे लिहितोस, तुला हे सगळे सुचते कसे काय? त्याचे उत्तर देणे फार अवघड असते. लेख लिहीत असताना फक्त विषय डोक्यात असतो. शब्द आणि वाक्य आपोआप येत जातात. ती कुठून आणि कशी येतात, हे मलाही समजत नाही. इलाबेनसारख्या भगिनींनी निर्मळ अंतःकरणाने दिलेल्या सात्त्वि खिचडीत हे शब्दसामर्थ्य दडलेले असावे, असे कधी कधी मला वाटते. जे अन्न आपण खातो, ते सूक्ष्मरूपाने आपल्या बुध्दीत आणि मनात जाऊन बसते, असे आपले शास्त्र सांगते. इलाबेनसारख्या सोज्ज्वळ भगिनी त्याची प्रत्यक्ष अनुभूती घडवितात. त्या हयात असताना त्यांचे चरणवंदन करण्याचा प्रसंग कधी आला नाही. ते त्यांनी मला करू दिले नसते, परंतु आज मी त्यांना मनोमन चरणवंदन करीत आहे.

vivekedit@gmail.com