जिग्नेश मेवानीः लाल सलाम

विवेक मराठी    01-Jan-2018
Total Views |

 

जिग्नेशला संघ संपवून टाकायचा आहे. संघ संपविण्याचे काम पं. नेहरू यांनी केले, दुर्दैवाने ते गेले. संघ मात्र वाढतच राहिला. दुसरा प्रयत्न इंदिरा गांधीनी केला, त्याही गेल्या. संघ संपविण्याची माय-लेकरांची इच्छा अपूर्ण राहिली. आता जिग्नेश याने राहुल गांधी यांना बरोबर घेऊन माय-लेकरांची इच्छा पूर्ण करू शकतील का? 

 जिग्नेश मेवानी यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तसे पाहू जाता 1 जानेवारी हे माझे नवीन वर्ष नाही. माझ्या नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुध्द प्रतिपदेला - म्हणजे गुढीपाडव्याला होते. परंतु जिग्नेश मेवानी लालभाईंच्या घोळक्यात असल्यामुळे 1 जानेवारी त्यांच्या दृष्टीने नवीन वर्ष असायला हवे. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा संघसंस्कार माझ्यावर झालेला असल्यामुळे मी जिग्नेश मेवानी यांना मनापासून शुभेच्छा देतो.

जिग्नेश मेवानी यांनी सरत्या वर्षाच्या शेवटाला काही संकल्प केले आहेत. या संकल्पात त्यांना यश प्राप्त होवो, अशी मी माक्र्सकडे प्रार्थना करतो. आता तुम्ही विचाराल, माक्र्सकडे कशासाठी? त्याचे उत्तर असे की, लालभाई ईश्वर मानत नाहीत. त्यांचा ईश्वर माक्र्स किंवा लेनिन, म्हणून माक्र्सकडे प्रार्थना करायची.

जिग्नेश मेवानी यांचा पहिला संकल्प त्यांच्याच भाषेत -''जात-धर्म बाजूला ठेवून देशाची जनता कामगार, शेतकरी आणि युवा म्हणून मतदान करेल, तेव्हा 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा दोन आकडयांवर येईल.'' भाजपाला दोन आकडयांवर आणण्याचा मेवानी यांनी संकल्प केला आहे. हा त्यांचा संकल्प तडीस जावो, अशी पुन्हा माक्र्सकडे आपण प्रार्थना करू या. त्यांचा दुसरा संकल्प - ''14 एप्रिल रोजी नागपूरला येऊन मी 'संघसमाप्ती'ची घोषणा करेन.'' संघसमाप्तीची त्यांची घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी माक्र्स आणि लेनिन यांनी जिग्नेश मेवानी यांना बळ द्यावे.

जिग्नेश मेवानी यांचे भाषण वाचल्यानंतर मला खूप बरे वाटले. माझ्या मनावरचे एक ओझे उतरल्यासारखे वाटले. 2019 साली भाजपा पुन्हा सत्तेवर यावा, असे मनापासून वाटणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि त्यामुळे कधीकधी काही घटना-प्रसंगामुळे मला उगाचच आपली चिंता वाटू लागते. जिग्नेश मेवानीने ही चिंता थोडी कमी केली, म्हणून त्यांना लाल सलाम.

होते काय की, सत्ता हाती आल्यानंतर कार्यकर्ते थोडे ढिले होतात आणि त्यातही एकापाठोपाठ एक विजय मिळत गेले की ''आपला अश्वमेधाचा घोडा अडविण्याची ताकद कुणातच नाही'' अशी भावना होते. भावी पराभवाचे बीज ही भावना पेरून जाते. त्यामुळे जिग्नेश याने भाजपाला दोन खासदारांवर आणण्याचा संकल्प सोडला आहे, हे वाचून बरे वाटले. जिग्नेश तरुण आहे, सगळी डावी फलटण त्याच्या मागे उभी आहे, विशिष्ट जात त्याच्यामागे उभी आहे. उद्या लालूप्रसाद, मुलायम सिंग, ममता बॅनर्जी यादेखील त्याच्यामागे उभ्या राहतील. भाजपाला दोन जागांवर आणायचे तर एवढी मोठी मोट बांधायलाच पाहिजे. जिग्नेश तरुण असल्यामुळे त्याच्याकडे ऊर्जा भरपूर आहे आणि भडक भाषणांची स्क्रिप्ट लिहून देणारे डावे लोकही भरपूर आहेत. म्हणून माझे जिग्नेशला मनापासून सांगणे आहे की, पहिला संकल्प अमलात आणण्यासाठी त्याने जिवाचे रानच केले पाहिजे.

दुसरा संकल्प तर त्याहूनही मोठा आहे. जिग्नेशला संघ संपवून टाकायचा आहे. संघ संपविण्याचे काम पं. नेहरू यांनी केले, दुर्दैवाने ते गेले. संघ मात्र वाढतच राहिला. दुसरा प्रयत्न इंदिरा गांधीनी केला, त्याही गेल्या. संघ संपविण्याची माय-लेकरांची इच्छा अपूर्ण राहिली. आता जिग्नेश याने राहुल गांधी यांना बरोबर घेऊन माय-लेकरांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. 

संघ संपविण्याची अभिलाषा डाव्या लोकांच्या मनात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. ते ज्या राज्यांत सत्तेवर आले, त्या राज्यांत त्यांनी संघकार्यकर्त्यांच्या हत्येचे सत्र चालविले आहे. आज त्रिपुरा आणि केरळ या दोन्ही राज्यात संघाचे आणि भाजपाचे कार्यकर्ते ठार मारले जातात. डाव्यांनादेखील संघाला संपवून टाकण्याचे यश मिळालेले नाही. भारतीय जनता इतकी अडाणी आहे की, तिला डाव्यांचा हा आक्रोश लक्षातच आला नाही आणि या जनतेने भारतीय जीवनातून कम्युनिस्टांनाच हद्दपार करून टाकले. महाराष्ट्रात त्यांना कुणी विचारत नाही, मध्य प्रदेशात त्यांना थारा नाही आणि दिल्लीत त्यांना जागा नाही. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे काम जिग्नेश मेवानी यांना करायचे आहे. आपण असे मानतो की, इच्छा अपूर्ण ठेवून कुणी मेल्यास त्याचा आत्मा भटकत राहतो किंवा त्याचे भूत होते. जिग्नेश यांनी त्यांना मुक्ती द्यावी.

संघ संपविण्याचा जिग्नेशचा संकल्प वाचूनही मला बरे वाटले. मी असे मानतो की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक साधना आहे. या साधनेचे यम-नियम आहेत. त्याचे काटेकोर पालन संघ करतो आहे. साधना केली की सिध्दी प्राप्त होते. संघाला अशा अनेक सिध्दी प्राप्त झाल्या आहेत, परंतु लक्ष्यप्राप्तीच्या वाटेवर सिध्दी अधःपतन घडवून आणतात. म्हणून मला संघाविषयीदेखील उगाचच आपली चिंता वाटत असते. आपले काम पूर्ण झाले, सत्तेवर आपले लोक आले, हिंदुराष्ट्र झाले, अशा भ्रमात जर संघकार्यकर्ते गेले तर संघ आपल्या लक्ष्यापर्यंत जाणे अवघड आहे. म्हणून जिग्नेश मेवानी यांनी सर्व शक्ती पणाला लावून संघमुक्त भारत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या कामी त्यांनी श्री. प्रकाश आंबेडकर यांची मदत घ्यायला पाहिजे. कारण अधूममधून तेदेखील संघमुक्त भारत करण्याच्या घोषणा करीत असतात. त्यांच्याकडेदेखील संघमुक्त भारत करण्याचा ब्ल्यू प्रिंट असेल. त्याबद्दल जिग्नेशने श्री. प्रकाशजींशी चर्चा केली पाहिजे. संघमुक्त भारत करायचा असेल तर काय करायला पाहिजे? हे मी जाता जाता सांगतो. संघ म्हणजे कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांना 'संघकाम करू नका, ते अतिशय वाईट काम आहे, आपला वेळ आणि पैसा तुम्ही नाहक खर्च करता हे पटवून द्यायला लागेल.' दर वर्षी पदवीप्राप्त तरुण शेकडोच्या संख्येने प्रचारक निघतात. त्यांनाही जिग्नेशला समजावून सांगायला लागेल, 'प्रचारक कसले जाता? त्यापेक्षा आपले करिअर करा, देशाला त्याची गरज आहे.' संघाला समाजाचे जबरदस्त समर्थन प्राप्त होते. जिग्नेशला समाजात जाऊन म्हणजे स्वजातीच्या पलीकडे जाऊन अन्य जातींना सांगावे लागेल की, संघाला पाठिंबा देऊ नका. पाठिंबा देणे देशघातक आहे.

जिग्नेश याने प्रत्यक्ष मैदानात उतरून हे सर्व प्रयत्न करायला पाहिजे. व्यासपीठावर जाऊन भाषणे केली की प्रसिध्दी मिळते. प्रसिध्दीसाठी बोलावे लागते. प्रसिध्दीच्या भाषणाने समाजात काहीही बदल होत नसतो. समाजात बदल करण्यासाठी रणांगणात उतरावे लागते. जिग्नेश हे करेल, अशी आशा करू या.

आपला देश धर्मप्रधान देश आहे. सामान्य जनतेला एक वेळ संविधान काय आहे हे समजणार नाही, परंतु धर्म काय आहे, हे जनतेला बरोबर समजते. सामान्य जनता सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला आणि न्यायाने वागणाऱ्याला धर्म मानते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली नव्वद वर्षे हेच काम करीत आला आहे. संघाचे अंतिम लक्ष्य अधर्माचा विनाश आणि धर्माची संस्थापना हे आहे आणि धर्माची संस्थापना व्हायची असेल, तर अधर्माच्या शक्ती तेवढयाच प्रबळपणे वाढाव्या लागतात. त्या वाढल्याशिवाय लोकांना धर्म समजत नाही.

कल्पना करा की, रावण झालाच नाही तर काय झाले असते? राम निर्माण झाला नसता. रामाची मंदिरे झाली नसती. दुर्योधन, दुःशासन, शकुनी झाले नसते तर भीम, अर्जुन, कृष्णाला कुणी विचारले असते? म्हणून धर्माचा विजय होण्यासाठी आणि तोही अंतिम विजय होण्यासाठी जिग्नेश, कन्हैय्या आणि सगळी डावी फलटण एकवटून उभी राहिलीच पाहिजे. शंभर अपराध झाल्याशिवाय श्रीकृष्ण आपले सुदर्शन चक्र शिशुपालावर सोडत नाही. तेव्हा जिग्नेशभाई आपण सर्व शक्तिनिशी या लढयात उतरा, सगळया राज्यांत प्रवास करा आणि सगळे जातवादी, भारत तेरे तुकडे हाेंगे म्हणणारे, भारत एक राष्ट्र नसून अनेक राष्ट्राचा समूह आहे म्हणणारे, हिंसेला जीवननिष्ठा मानणारे, एकत्र करा आणि भाजपाला दोन जागेवर आणण्याच्या संकल्पसिध्दीसाठी कंबर कसा. संघमुक्त भारत करण्यासाठीदेखील आकाश-पाताळ एक करा.

या लढयानंतर शेवटी तुम्हाला एक तर आकाशात जावे लागेल किंवा पाताळात तरी जावे लागेल. या दोघांशी आतापासून दोस्ती केलेली बरी.

रमेश पतंगे

9869206101