मातृ वैद्यक

विवेक मराठी    13-Jan-2018
Total Views |

आपलं दुर्दैव म्हणजे आयुर्वेदाच्या जन्मभूमीतच त्याला ‘पर्यायी वैद्यक’ म्हटलं जातंय. वास्तविक वैद्यकात प्रधान आणि पर्यायी असा भेदभाव करणं म्हणजे वडिलांना प्रधान पालक आणि आईला पर्यायी पालक म्हणण्यासारखं आहे. आज विश्वातल्या ज्या देशांना स्वतःची प्राचीन वैद्यक परंपरा आहे, ते देश प्राधान्यानं त्याच वैद्यकाचा व्यवहारात उपयोग करताना दिसतात. (उदा. चीन.) आपल्याच  भूमीतील वैद्यकाला म्हणजेच आपल्या ‘मातृवैद्यकाला’  अश्या प्रकारे दुय्यम स्थान देणारा भारत हा जगातला एकमेव देश असावा.

    या सर्वांचा विचार करून आयुर्वेदाबद्दलचे गैरसमज घालवून, त्याबद्दल योग्य जागर करण्यासाठी आपण ही लेखमाला सुरू करत आहोत. आजच्या समस्यांवर आयुर्वेद कधी, कसा आणि किती उपयुक्त ठरतो हे आपल्याला यातून नक्की कळेल. आज या उपचारपद्धतीला ज्या मर्यादा दिसतात, त्या वस्तुतः शास्त्राच्या नसून ‘वैद्य’ या मनुष्याच्या आहेत.

   ठाण्यातील जुन्या सिंघानिया रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगाला काही जर्मन डॉक्टर्सना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ठाण्यातल्या एका ज्येष्ठ  डॉक्टरांनी, त्या जर्मन डॉक्टरांच्या भाषणातील एक सल्ला मला सांगितला होता. ते जर्मन डॉक्टर आपल्या भाषणात म्हणाले होते, “भारताला एक प्राचीन आणि संपन्न वैद्यक परंपरा आहे. तेव्हा इथल्या डॉक्टर्सनी उपचार करताना त्या परंपरेचा उपयोग आधी करावा. उपचारांमध्ये ८०% प्रमाण स्थानिक वैद्यकाचं असावं. गरज लागली तरच परदेशी वैद्यकाचा विचार करावा. कारण ते वैद्यक वापरण्यात आम्ही तुमच्या पुढे आहोत आणि त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत.”

   सिंघानिया हॉस्पिटल सुरू झालं, काही वर्ष चाललं आणि कालौघात नष्ट देखील झालं. पण त्या जर्मन हितचिंतकांचा सल्ला आपण अजून फारसा मनावर घेतलेला नाही. वास्तविक लहान मुलाला ठेच लागली की त्याला आईची आठवण येते, त्याप्रमाणे आजारी पडल्यावर आपल्याला सर्वप्रथम आयुर्वेदाची आठवण यायला हवी. (आयुर्वेदाचं स्मरण ठेऊन त्याच्या मार्गावरून गेलं तर आजारी पडायची वेळ सहसा येणार नाही हा मुद्दा आहेच म्हणा!) नाईलाज होईपर्यंत वाट बघत बसू नये.

  योग्य वेळी आयुर्वेदाकडे वळून आपलं आरोग्य राखण्याची बुद्धी, या लेखांद्वारे आपल्याला सर्वांना  लाभो ही  श्रीधन्वंतरी चरणी प्रार्थना.