करून करून भागले...

विवेक मराठी    13-Jan-2018
Total Views |

राजकारणात काहीही होऊ शकते. कायम कडवे विरोधक असणारे जेव्हा हातात एकतारी घेऊन भक्तिगीते गाऊ लागतात, तेव्हा राजकारणात काहीही घडू शकते यावर विश्वास बसू लागतो. गुजरात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक मंदिरांचे उंबरठे झिजवले, त्याच्या पाठीराख्यांनी तर त्यांना 'जानवेधारी' घोषित करून टाकले. काल-परवा रॉबर्ट वड्रा हेही एका मंदिरात जाऊन आल्याचे समाजमाध्यमातून प्रसिध्द झाले. मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीनंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसची साधुसंतांची सेल सुरू करून पक्ष कोणत्या दिशेला जात आहे याची चुणूक दाखवली होती. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मंदिरात जाऊन, आपण हिंदूंच्या जवळचे आहोत, आपण मवाळ हिंदुत्वाचा अंगीकार केला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यशही मिळाले. या यशाने अन्य राजकीय पक्ष आणि संघटना यांचे डोळे दिपले नसतील तर नवलच. राजकारणातील या तथकथित मवाळ हिंदुत्वांचा परिणाम इतका झाला की बंगालमध्ये साम्यवाद्यांच्या एका कार्यक्रमाची सुरुवात कृष्णभक्तीने झाली. आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून कर्नाटकात सिध्दामय्या यांना हिंदुत्वाची आठवण झाली.  या साऱ्यांनी धर्म, धर्मश्रध्दा आणि संस्कृती यावर नेहमीच टीका केली आणि आपल्या कृतीतून वरील बाबींना अवरोध उत्पन्न केला आहे. पण मताच्या राजकारणात, सत्तेचा सोपान चढण्यास या मवाळ हिंदुत्वाची मदत होते हे लक्षात आल्यावर या मवाळ हिंदुत्वाचा स्वीकार करण्याची ज्यांनी होड लावली, त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी अग्रेसर आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने प. बंगालच्या वीरभूम जिल्ह्यात ब्राह्मण संमेलन आयोजित केले होते. सुमारे आठ हजार पुजाऱ्यांना आणि ब्राह्मणांना गीता हा धर्मग्रंथ आणि शारदेची प्रतिमा भेट दिली. विशेष म्हणजे मागच्या वर्षी शारदोत्सवाच्या - म्हणजेच नवरात्रीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे पुण्यकर्म ममता बॅनर्जी यांनी केले होते. परवानगी नाकारण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी मोहरमचे कारण पुढे केले होते. ममता बॅनर्जींना तेव्हा मोहरमची - म्हणजेच मुसलमानांची, मुस्लीम मतपेढीची काळजी होती. मुस्लीम तुष्टीकरण करताना आपण हिंदू धर्मीयांच्या भावना पायदळी तुडवत आहोत, एका मोठया समाजाला दुखवत आहोत यांची खंत ममता बॅनर्जी यांना वाटली नव्हती. हिंदू समाजाला गृहीत धरल्यामुळे ममता बॅनर्जी अशा प्रकारच्या तुष्टीकरणात मश्गुल होऊ शकत होत्या. मग आताच एकदम ममता बॅनर्जींना आणि त्याच्या तृणमूल काँग्रेसला ब्राह्मण महासंमेलन घेण्याचे आणि ज्या गीतेचा स्पर्श आणि उच्चारही अपवित्र वाटत होता, ती भगवद्गीता वाटप करण्यामागे काय कारण असावे? केवळ राहुल गांधींनी या मवाळ हिंदुत्वाच्या मार्गाचा अवलंब केला, म्हणून ममता बॅनर्जींना त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नव्हती, तरीही ममता बॅनर्जीही त्या मार्गाने जात आहेत... असे का झाले? इतके दिवस मुस्लीम तुष्टीकरणाची कास धरून हिंदू समाजाला पायदळी तुडवण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या ममता बॅनर्जी आता मवाळ हिंदुत्वाचा राग आळवून आपलेच हिंदुत्व खरे असून भाजपाचे हिंदुत्व हे समाजात फूट पाडणारे व राष्ट्रविघातक आहे असे सांगू लागल्या आहेत. यामागे काय गौडबंगाल आहे? हे समजून घेतले पाहिजे. ममता बॅनर्जी म्हणतात की,''हिंदुत्व ही केवळ भाजपाची मक्तेदारी आहे काय??'' अगदी बरोबर आहे. हिंदुत्व ही केवळ भाजपाची मक्तेदारी नाही. पण मग इतके दिवस ममता बॅनर्जी त्या हिंदुत्वाला अस्पृश्य मानून दूर का राहात होत्या? आणि ममता बॅनर्जी यांना आताच हिंदुत्वाचा इतका पुळका का आला आहे? या प्रश्नांची उत्तरे आता शोधायला हवीत. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या अस्तित्वरक्षणासाठी देवा-धर्माचा आधार घेतला आणि मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला आणखी काही दिवसांसाठी जीवदान मिळवले. पण ममता बॅनर्जी या मार्गाचा स्वीकार का करत आहेत?

या प्रश्नाचे उत्तर आहे, मतांची पेढी. प. बंगालमध्ये नुकत्याच काही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत भाजपाचा मतांचा टक्का मोठया प्रमाणात वाढलेला दिसला. प. बंगालमध्ये भाजपाच्या वाढत्या जनाधाराची ती चुणूक होती आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटी होती. प. बंगालमध्ये पुढील काळात आपली सत्ता राहावी असे वाटत असेल, तर मवाळ हिंदुत्वाचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही, हे ममता बॅनर्जी यांनी चाणाक्षपणे ओळखले आणि आपली इतक्या वर्षांची प्रतिमा भंग करत ममता हिंदुत्व आले आहे असे म्हणू लागल्या. वीरभूम येथे घेतलेल्या ब्राह्मण संमेलनासारखीच राज्यभरात वेगवेगळया ठिकाणी संमेलने घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी ब्राह्मणांना आणि पुजाऱ्यांना गीता आणि शारदेची मूर्ती भेट देऊन हिंदू समाजाला चुचकारण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात प. बंगालमध्ये अशा प्रकारे अनेक कार्यक्रम होतील आणि त्यातून हिंदू समाजाच्या श्रध्दा जपण्यापेक्षा हिंदू मतपेढी बळकट करण्यावर भर असेल.

ममता बॅनर्जी यांनी हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा नक्कीच अंगीकार करावा; कारण त्यांनी आजवर हा धर्म आणि संस्कृती कितीही नाकारली असली, तिचा तिरस्कार केला असला तरी हिंदू धर्म आणि संस्कृती ही ममता बॅनर्जींचा खरा आधार आहे. तीच त्यांची जीवनपध्दती आहे. आजवर ममता बॅनर्जी यांनी मतांसाठी, तुष्टीकरणासाठी हिंदूंवर आघात केले, पण आता मतांच्या जोगव्यासाठी त्यांना हिंदूंची आठवण होते आहे. ममता बॅनर्जींची ही कृती म्हणजे 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले' अशा सदरातील आहे. यापुढचा काळ हा हिंदुत्वाचाच असणार आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषांची गरज नाही. देशात हिंदुत्वाचा वाढता प्रसार आणि स्वीकृती पाहता या वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेण्यासाठी - आपल्या मतांच्या बेगमीसाठी ममता बॅनर्जी आणि तत्सम मंडळी पुढे येत आहेत ही जरी आनंदाची बाब असली, तरी ममता बॅनर्जी आणि इतर मंडळींचा कावा हिंदूंनी वेळीच ओळखायला हवा.