डोळयांत पाणी का येते?

विवेक मराठी    16-Jan-2018
Total Views |

डॉक्टर हेडगेवार दोन स्वयंसेवकांच्या भांडणामुळे व्यथित झाले होते आणि त्यांच्या डोळयांतून अश्रू आले होते. हे अश्रू काही सुकले नाहीत. म्हणून आजही अनेकांच्या डोळयांतून वेगवेगळया कार्यक्षेत्रात गेलेल्या कार्यकर्त्यांची भांडणे बघून अश्रू येतात. त्यांना अतोनात दु:ख होते.

आज सकाळीच एका कार्यकर्त्याचा एसएमएस आला आणि एकदम समजले की आज 21 जून, पू. डॉक्टरांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनानिमित्ताने कार्यकर्ता एसएमएसमध्ये लिहितो, 'राष्ट्रभक्तीचा प्रदीप नित्य तेवणार ना? ईर्षा, हेवा, विकार दूर ठेवणार ना? वादळातही पथी अचल राहणार ना? परमवैभवी पुन्हा देश पाहणार ना? - प.पू. डॉ. हेडगेवार स्मृतिदिन प्रेरणादायी ठरो.'

एसएमएस वाचला, कार्यालयात आलो, नित्य कामात गुंतलो. परंतु अधूनमधून त्या एसएमएसची आठवण होत राहिली. कार्यकर्त्याने सर्व ठिकाणी प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. प्रश्नचिन्हे खूप काही सांगून जातात. प्रश्नचिन्हापूर्वीचे वाक्य प्रश्नचिन्ह काढून टाकून वाचले तर, राष्ट्रभक्तीचा प्रदीप नित्य तेवत ठेवला पाहिजे; ईर्षा, हेवा, विकार दूर ठेवले पाहिजे; वादळातही पथी अचल राहिले पाहिजे; देश पुन्हा परमवैभवाला पाहण्याचे भाग्य लाभले पाहिजे. या सर्वांविषयी जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होते तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या एकामागून एकेक घटना घडत गेलेल्या असतात, घडत असतात आणि त्या कार्यकर्त्याला वेदना देतात.

याच विचारात असताना मला पू. डॉक्टरांची एक आठवण आठवली. ही आठवण कै. श्रीपती शास्त्रींनी सांगितली होती. त्यांनी डॉक्टरांची ही आठवण पूज्य बाळासाहेबांकडून ऐकली. येरवडा कारागृहात मिसाबंदी होते. या कारागृहात एक स्वयंसेवक नेहमी सर्वांशी भांडत असे. भांडणासाठी त्याला कोणतेही कारण चालत असे. यामुळे त्याचे नाव 'भांडकुदळ' झाले.

एकदा स्वयंसेवकांचा बाळासाहेबांशी गप्पागोष्टी करण्याचा कार्यक्रम होता. गप्पागोष्टींच्या ओघात बाळासाहेबांनी पू. डॉक्टरांच्या खूप आठवणी सांगितल्या. अनेकांनी काही प्रश्न विचारले. शेवटी हा भांडकुदळ स्वयंसेवक उभा राहिला आणि त्याने बाळासाहेबांना प्रश्न विचारला, 'बाळासाहेब, तुम्ही डॉक्टरांना कधी रडताना पाहिले का?' अन्य सर्व स्वयंसेवकांना वाटले, 'किती बावळट प्रश्न आहे हा!' परंतु बाळासाहेबांना तसे वाटले नाही.

काही क्षण बाळासाहेब गंभीर झाले, भूतकाळात गेले. ते म्हणाले, ''होय, असा एक प्रसंग आहे. एका शिबिराची उभारणी चालू असताना नागपुरातील दोन ज्येष्ठ स्वयंसेवकांचे आपापसात कडाक्याचे भांडण जुंपले. त्यांना शांत करण्याचा बरोबरच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते ऐकेनात. शेवटी डॉक्टर त्यांच्याकडे गेले. त्यांनी भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना ते भांडणारे कार्यकर्ते म्हणाले, 'डॉक्टर, तुम्ही आमच्या भांडणात पडू नका. आमचे आम्ही बघून घेऊ.'

हे ऐकल्यानंतर डॉक्टर तेथून आले. एका झाडाखाली बसले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. ते म्हणाले, ''ज्यांनी पुढे संघ चालवायचा आहे तेच असे भांडण करू लागले, तर संघाचे काय होणार?''

हा किस्सा आठवल्यानंतरच माझ्या मनात विचार आला स्वयंसेवकांच्या भांडणामुळे मला एसएमएस पाठविणारा कार्यकर्ता जसा आज व्यथित झाला आहे, तसेच डॉक्टर हेडगेवार दोन स्वयंसेवकांच्या भांडणामुळे व्यथित झाले होते आणि त्यांच्या डोळयांतून अश्रू आले होते. हे अश्रू काही सुकले नाहीत. म्हणून आजही अनेकांच्या डोळयांतून वेगवेगळया कार्यक्षेत्रात गेलेल्या कार्यकर्त्यांची भांडणे बघून अश्रू येतात. त्यांना अतोनात दु:ख होते.

लहान-मोठया संस्थांपासून ते राजकीय संस्थांपर्यंत सर्वच ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते कधी ना कधी भांडत राहतात. असे भांडण कार्याची हानी करणारे आहे, कार्याच्या गतीला खीळ घालणारे आहे, बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे, हे त्यांना समजत नाही असे नाही. भांडण करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एखाद्याने कधीतरी 'आदर्श कार्यकर्ता' या विषयावर एखादा बौध्दिक वर्गही दिलेला असतो. तो मोठया गर्वाने प.पू. गुरुजींची 'मैं नही, तू ही' ही आठवण सांगत असतो. कार्य करीत असता श्रेयासाठी भांडू नये. आत्मविलोपी वृत्तीने काम करावे. प्रसिध्दीची हाव धरू नये. श्रेयासाठी काम करू नये. आपला आपण उदोउदो करून घेऊ नये, असे त्यांनी अनेक वेळा सांगितलेले असते. पण तोच जेव्हा ईर्षा, हाव, महत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊन भांडण करतो तेव्हा त्याला काय म्हणावे? असे प्रसंग डॉक्टरांप्रमाणेच असंख्यांच्या डोळयात पाणी आणणारे ठरतात.

सभोवताली अशी परिस्थिती पाहात असतानाही आपले मन शांत ठेवून मनात उद्वेग, संताप, निराशा निर्माण होऊ न देता आपल्या मार्गावरून कसे चालत राहायचे? हा प्रश्न निर्माण होतो.  संघ ही साधना आहे आणि या साधनमार्गावरून चालताना कसे अनुभव येतील आणि काय मिळेल? याचे उत्तर चक्रधर स्वामींनी एका दृष्टांतात दिले आहे. 'दृष्टांत हिरेखणीयाचा' असे या दृष्टांताचे शीर्षक आहे. काही जण मिळून हिऱ्याची खाण खणत होते. आधारासाठी त्यांनी खांब रोवले. खणता खणता एकाला षट्कोनी हिरा सापडतो, एकाला हिरकणी सापडते, एकाला काहीच सापडत नाही. तो रिता राहतो आणि एकावर दरड कोसळते. चक्रधर स्वामींना सांगायचे आहे की, 'चारजण साधना करीत आहेत त्यातील एकाला षट्कोनी हिरा सापडतो म्हणजे तो षड्रिपुंवर मात करतो, एकाला हिरकणी सापडते म्हणजे काही सिध्दी त्याला प्राप्त होतात, देहविद्या प्राप्त होते. एक कोरडा ठणठणीत राहतो त्याला काहीच मिळत नाही आणि एकावर दरड कोसळते.' एकाच साधनेत अशी फळं का मिळतात? त्याचे उत्तर असे की, ज्याचा जसा भाव आहे तसे त्याला फळ मिळते.

म्हणून संघरूपी साधना करीत असता शुध्द सात्विक भाव सोडून जे वेगळया वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचे कर्मफळ प्राप्त होते. सर्वांनी एकच शुध्द साधना करावी, ही अपेक्षा आहे, परंतु शेवटी माणूस हा माणूस आहे. त्याच्या डोक्यावर ईर्षा, असूया, महत्त्वाकांक्षा यांचे भूत केव्हा स्वार होईल हे कोणीही सांगू शकत नाही. साक्षात जगन्नायक भगवान श्रीकृष्ण दुर्याेधन-शकुनीला सुधारू शकले नाहीत तेथे आपल्या पामरांची काय कथा?

(सदर लेख २०११ साली प्रसिद्ध झाला होता..)