अडचणींवर मात करा

विवेक मराठी    17-Jan-2018
Total Views |

 व्यवसायात अडचणी येतातच. पण म्हणून त्यांची धास्ती घेऊन चालत नाही. अडचणींचा मुकाबला करणे आणि परिस्थिती अनुकूल होईपर्यंत संयम बाळगून वाट बघणे, हाच त्यावरील उपाय असतो. मी अनुभवांतून एक महत्त्वाचा धडा शिकलो, तो म्हणजे आपल्याला आलेल्या अडचणींमधील केवळ दहा टक्केच अडचणी शांत राहिले तर आपोआप सुटतात. उरलेल्या नव्वद टक्के अडचणी मात्र अनुभवी फलंदाज जसा प्रत्येक चेंडू लक्षपूर्वक खेळून काढतात, तशा आपल्याला तटवाव्या लागतात.

 'विवेक'चे वाचक ही लेखमाला आत्मीयतेने वाचतात, याचा खरोखर आनंद आहे. गेल्या आठवडयातील लेख वाचल्यानंतर डॉ. राजश्री जाजू यांनी विचारले आहे, ''सर! तुमचा लेख छान आहे, पण एखादी गोष्ट सध्या करायची असेल तर बऱ्याच अडचणी येतात. त्या कशा सोडवायच्या? तुम्ही तुमच्या दुकानांचे रूपांतर सुपर स्टोअरमध्ये केलेत. ते करताना तुम्हालाही अडचणी आल्या असतील. त्यांना कसे तोंड दिलेत? गोष्टी कशा मॅनेज कराव्यात, याबद्दल काही सांगा.''

हा प्रश्न महत्त्वाचा आहे. व्यवसायात पाऊल टाकताना आणि स्थिरावताना मला खूप अडचणींना, आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. एक तर आमच्या घराण्यात कुणी व्यवसायाच्या वाटेला गेले नव्हते. सगळे नोकरदार होते. माझ्या वडिलांनी स्वत:च्या नोकरीत साठवलेली पुंजी गुंतवून निवृत्तीच्या उंबरठयावर असताना परदेशात एक लहानसे दुकान सुरू केले. ते मोठे धाडसच होते, कारण त्यांना मार्गदर्शन करायला कुणीच नव्हते. दुकान चालले नसते, तर ते गाशा गुंडाळून भारतात आले असते. मी तेव्हा इयत्ता बारावीत होतो. मला नोकरी लागेपर्यंत आमच्या कुटुंबाला बाबांच्या तुटपुंज्या निवृत्तिवेतनात दिवस काढावे लागले असते. मीसुध्दा व्यावसायिक न होता नोकरी केली असती. 'धंदा करणे हे तुम्हा लोकांचे काम नव्हे' ही कुचेष्टा मला खूप वर्षे सहन करावी लागली, पण मी त्याला कधी प्रत्युत्तर दिले नाही. शांतपणे पुढे जात राहण्याचा फायदा होतो.

सुदैवाने आमचे दुकान चांगले चालू लागले. पण पहिल्याच वर्षी आम्हाला जबरदस्त नुकसान झाले. फेरविक्रेत्यांनी उधारी थकवल्याने आम्ही तोटयात गेलो. आईचे दागिने, घरातील फर्निचर विकून आम्ही पैसे उभे केले आणि नवा माल भरून दुकान सुरू ठेवले. जेवढी उधारी वसूल झाली, ती जमेत टाकून कानाला खडा लावला. नंतर दुकान हातून जाण्याची आणखी एक वेळ लगेच आली. बाबांनी दुकानाचा विस्तार करण्यासाठी भागीदारी केली. त्या भागीदाराने बाबांना कोंडीत पकडले आणि 'एकतर माझे भांडवल लगेच परत करा, किंवा दुकान मला विका' अशी अट घातली. बाबांनी जमेल तेथून उधार-उसनवारी करून पैसे जमा करून त्या भागीदाराचे भांडवल चुकते केले आणि जोखडातून मान सोडवून घेतली. या दोन्ही प्रसंगांत आमच्यापुढील मुख्य अडचण पैशाची होती, जी आम्हालाच धावपळ करून सोडवावी लागली.

दुकान नफ्यात आणण्यासाठी मला साडेतीन वर्षे रोज दिवसाचे सोळा तास कष्ट करावे लागले. व्यवसायाचा एक नियम मी यातून शिकलो, तो म्हणजे 'तुम्ही स्वत:चा धंदा कष्टाने व कौशल्याने पहिले हजार दिवस चालवलात, तर नंतर तो आपोआप चालू लागतो.' मुला-मुलींना शिशुवयात चमच्याने भरवावे लागते आणि हाताला धरून चालवावे लागते, पण दोन-अडीच वर्षांचे झाल्यावर ती स्वत:च्या हाताने खाऊ-पिऊ लागतात, पायांवर चालू लागतात, अगदी तसेच हे. दुकाने चालवण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत, कारण ग्राहकांचा मोठा पाठिंबा. त्यांनी आमच्यावर नेहमी विश्वास ठेवला आणि आम्हीही कधी त्यांना दुखावले नाही. अगदी लहानशी तक्रार आली तरी त्याकडे लक्ष द्यायचे, ग्राहकांशी कायम सौजन्याने बोलायचे आणि त्यांना उत्तम सेवा द्यायची, ही शिस्त सांभाळल्याने व्यवसाय वाढत गेला.

उत्पादनांचा दर्जा आणि शुध्दता जपल्याने आम्हाला हॉटेल्स, हॉस्पिटल्स, विमानतळ, केटरिंग कंपन्या यांच्याकडून ऑॅर्डर्स मिळू लागल्या. सगळयात पहिली मोठी ऑॅर्डर दुबई एअरपोर्ट ऑॅथॉरिटीच्या फ्लाईट केटरिंग विभागाला सुकामेवा पुरवण्याची मिळाली. त्या वेळी माझ्या खिशात मालखरेदीसाठीही पैसा नव्हता. आता ही ऑॅर्डर वेळेत कशी पूर्ण करायची, हा प्रश्न माझ्यापुढे होता. पण रस्त्यापलीकडील बँकेचा व्यवस्थापक मदतीला धावला. त्या ऑॅर्डरच्या आधारे बँकेने मला कर्ज दिले आणि माझी अडचण दूर झाली. एक उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो, की माझ्यावर विश्वास टाकणारा हा व्यवस्थापक पाकिस्तानी होता. पूर्वी मला नफ्याची पहिली संधी मिळवून देणारे मुल्लाचाचा बांगला देशी होते, माझ्यातील भाषेचा न्यूनगंड काढून टाकणारा पहिला माणूस अरब होता, मला निराशेतून ओढून काढणारी वृध्द समुपदेशक ब्रिटिश होती, रस्ता चुकल्याने भांबावलेल्या माझ्या लहान मुलाला काळजीने सांभाळून ठेवणारा मुलगा फिलिपिनो होता. दुबईत कित्येक मराठी, पंजाबी, केरळी, सिंधी माणसांनी मला आपुलकीने मदत आणि मार्गदर्शन केले आहे. आपण माणुसकीने वागलो तर आपल्याही वाटयाला माणुसकी येते. मला इतकेच सांगायचे आहे की पैसा आणि माणसे जोडून ठेवल्यास ते आपल्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात.

 

भविष्यातील योजना उघड करू नका!

 
काही वेळा माझ्यापुढील अडचणींमागे माझाच अतिउत्साह कारणीभूत ठरला. आमच्या 'अल अदील' कंपनीची वाटचाल समाधानकारक सुरू असताना मी व्यवसाय विस्ताराची योजना हाती घेतली. व्यापारी वर्तुळातील मेजवान्यांतील गप्पांत मी सहज त्याची माहिती देऊ लागलो. काही दिवसांनी लक्षात यायला लागले की माझी नियोजित कामे वेळेवर न होता रखडू लागली आहेत. त्यामागील कारण शोधताना मला बाबांचा सल्ला आठवला. ते पूर्वीच म्हणाले होते, ''तू बिझनेस मीटिंग्जमध्ये अघळपघळ बोलू नकोस. विचारले तेवढे सांगत जा.'' मी त्यातून बोध घेतला. बरेच छुपे स्पर्धक साध्या चौकशांमधून तुमचा अदमास घेतात आणि मग नकळत पाय खेचतात. तेव्हापासून कुणी विचारले, की ''धंदा कसा काय चाललाय?'' तर ''ठीक है, दाल-चावल निकलता है'' असे संक्षिप्त उत्तर देऊन मी गप्प राहू लागलो. त्यामुळेही खूपशा अडचणी कमी झाल्या.

 

दुकानांचा विस्तार करताना मात्र मला फारशा अडचणी आल्या नाहीत. सुरुवातीची एक-दोन दुकाने मी बँकेच्या कर्जाच्या आधाराने उभारली, पण नंतर मला कर्जाचे दडपण येऊ  लागल्याने पुढे मी माझ्याच गंगाजळीतून गुंतवणूक करून नवी दुकाने उघडू लागलो. झटपट यशाची घाई नसल्याने मी वर्षातून एखादेच दुकान नव्या भागात सुरू करत असे, पण त्याआधी काळजीपूर्वक नियोजन करत असे. दुकानांचे रूपांतर सुपर स्टोअरमध्ये करताना मला आधुनिक तंत्रज्ञान व अंतर्रचना सजावट यावर थोडाफार खर्च करावा लागला तेवढाच. आजही मी नवे स्टोअर सुरू करतो, तेव्हा सर्व खर्च विचारात घेऊन त्याची तरतूद आधीच करून ठेवलेली असते.

अडचणींतून सुटण्यासाठी किंवा संधीसाठी थांबण्याची चिकाटी आपल्याकडे हवी. दुकान तोटयात होते, तेव्हा एकदा बाबांबरोबर मी दुबईच्या एका भागातून चाललो होतो. वाटेत एका जागेकडे निर्देश करून माझे बाबा म्हणाले, ''दादा! ही जागा दुकानासाठी उत्तम आहे.'' त्यावर मला हसू आले. मी म्हणालो, ''बाबा! आपण तोटयात आहोत. इथे राहू की नाही, याची खात्री नाही. हातात पैसा नाही. नवे दुकान कशाच्या जोरावर टाकणार?'' बाबा शांतपणे म्हणाले, ''अरे! 'सब दिन जात न एकसमान'. तोटा आहे तेथे नफा आहेच. हेच तर व्यवसायाचे चक्र आहे.'' बाबांचे शब्द खरे झाले. नंतर आम्हाला नफा होऊ लागला, पण तोपर्यंत बाबांना आवडलेली ती जागा गेली होती. मी मात्र तो विचार मनातून कधीच काढून टाकला नाही. अगदी बाबांचे निधन झाल्यानंतरही मी त्यांचे शब्द विसरलो नाही. नुकतीच तीन महिन्यांपूर्वी ती जागा पुन्हा रिकामी झाली असल्याचे कळल्यावर मी ती दुकानासाठी मिळवलीच. बाबांचे स्वप्न साकारण्यासाठी मी 33 वर्षे संधीची वाट बघितली.


 

सगळयाच अडचणींना स्वत: भिडायला जाऊ नये. आपण सगळी दुखणी अंगावर काढत नाही किंवा प्रत्येक वेळी केमिस्टला विचारून औषधे घेत नाही. आजार बरा होत नसेल तर त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल घेतो. मी व्यवसायात हेच तत्त्व अवलंबतो. एखादी अडचण सोडवण्यासाठी त्या विषयातील व्यावसायिक सल्लागाराला शुल्क देऊन त्याची मदत घ्यायलाही माझी हरकत नसते. पण प्रथमपासून व्यवसाय सचोटीने केल्याने माझ्यापुढे आज तितक्याशा अडचणी येत नाहीत.

आव्हानांना घाबरू नका. त्याच्यावर आक्रमकपणे चालून जा आणि मात करा. अडचणी आणि संघर्षातच आपल्यातील गुणांचा खरा कस लागतो. समुद्रात वादळे उठतात आणि लाटांचे तांडव असते, पण म्हणून जहाज हाकारायचेच नाही का? आपण प्रवास सुरूच ठेवायचा. मी एक छान वाक्य ऐकले आहे.

'जहाज बंदरात उभे असताना खरे तर सर्वांत सुरक्षित राहते, पण तो काही त्याच्या निर्मितीमागील हेतू नसतो.'