मधुमेही स्त्री

विवेक मराठी    02-Jan-2018
Total Views |

मधुमेही स्त्री असली की गर्भधारणेच्या संदर्भात विचार नक्कीच करावा लागतो. मधुमेह झाल्यावर औषधं टाळण्यासाठी काही स्त्रिया अल्प खाण्यात आणि व्यायामात अतिरेक करतात त्यांनी याची नोंद घ्यायलाच हवी. स्त्रियांमध्ये मूत्रपिंड, डोळे, न्यूरोपॅथी असे मधुमेहाशी निगडित प्रश्न दिसतात. मधुमेहात इतर स्त्रियांच्या मानाने पाळी लवकर बंद होते. अर्थात त्याची निश्चित वेळ सांगता येत नाही. मधुमेही स्त्रियांना सगळयात सतावतात ते हाडांचे प्रश्न. स्त्रियांना मधुमेह झाला की त्यांची हाडं ठिसूळ व्हायला लागतात. मधुमेही स्त्रियांमध्ये आढळणारा शेवटचा प्रश्न म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. याकडे पुरेसं गांभीर्याने पाहिलं जावं, यासाठी हे सांगणं आवश्यक आहे.

सध्या मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आपल्या देशात तर कमी वयात तो व्हायला लागलाय. कुठल्याही वयात मधुमेह होणं वाईटच, परंतु तरुणपणी तो झाल्याने काही विशिष्ट प्रश्नदेखील उभे राहू लागलेत. पुरुषांच्या बाबतीत गर्भधारणा वगैरे भानगड नसते. परंतु मधुमेही स्त्री असली की मात्र या संदर्भात विचार नक्कीच करावा लागतो. म्हणूनच मधुमेह झालेल्या तरुण स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल थोडं अधिक जागरूक राहणं आवश्यक असतं. रजस्वला झाल्यावर पाळी बंद होईपर्यंत स्त्रीचे प्रश्न आणि मधुमेह यांचा संबंध नेमका काय आहे, हे समजून घेतल्यास खूप फरक पडू शकतो.

पहिली गोष्ट, फार लवकर मधुमेहाला बळी पडणाऱ्या कोवळया वयातल्या मुलींमध्ये बहुधा टाइप वन प्रकारचा मधुमेह असतो. टाइप वन असल्याने त्यांच्यात इन्श्युलीन जवळजवळ बनतंच नाही. असं दिसून आलंय की जर इन्श्युलीनची कमतरता असेल, तर पाळी वेळेवर येणार नाही. साहजिकच अशा मुलींमध्ये एकतर पाळी उशिरा सुरू होते किंवा खूप कमी प्रमाणात अंगावरून जातं. अभ्यासातून सिध्द झालंय की इतर मुलींच्या मानाने या मुलींना पाळी यायला दोनेक वर्षे जास्त वेळ लागतो. आणि कर्मधर्मसंयोगाने पाळी वेळेवर सुरू झाली, म्हणजे सगळं काही आलबेल आहे असं समजण्यात अर्थ नाही.

प्रसंगी बरेच दिवस अजिबात पाळी न येणं किंवा वारंवार येणं मधुमेहात अनेकदा दिसतं. साधारण एक तृतीयांश स्त्रियांना पाळीचा कुठला ना कुठला प्रश्न जाणवतो. यामागे बहुधा शरीराची पाळीला उत्तेजन देणारी हॉर्मोन्सची बिघडलेली घडी असते. व्यवस्थित पाळी यायला थैली अथवा युटेरस, मेंदूतून निघणारे व थैलीला सिग्नल देणारे हॉर्मोन्स यांच्यात सुसूत्रता असणं गरजेचं असतं. मधुमेहात एखाद्या विशिष्ट हॉर्मोनवर बोट ठेवता येत नसलं, तरी या सगळया यंत्रणेत काहीतरी बिनसलेलं असतं इतकं नक्की. मधुमेह नियंत्रित असतो, ग्लायको हिमोग्लोबिन (HbA1c) खूप जास्त असलं, 10च्या वर असलं म्हणजे पाळीला प्रॉब्लेम व्हायची भीती वाढते. मधुमेह आटोक्यात आल्यावर दहाएक महिन्यात बराच फरक पडतो. पण प्रत्येक स्त्रीचा प्रश्न सुटेल आणि पाळी नॉर्मल होईल अशी खात्री देता येत नाही.

ज्या स्त्रियांमध्ये पाळी आली की नाही इतकं थोडया प्रमाणात अंगावरून जातं, मोठी मोठी फोडवजा मुरुमं येतात त्यांनी सावध व्हावं. आपले हॉर्मोन्स तपासून घ्यावे. काही स्त्रिया वजनाच्या बाबतीत खूप हळव्या होतात. वजन कमी करायला अत्यंत कमी खातात, प्रमाणाबाहेर व्यायाम करण्याचं घाटतात, त्यांना असे प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. याला वैद्यकीय भाषेत हायपोथॅलॅमिक अमेनोरिया असं म्हणतात. अशांना गर्भधारणा कठीण जाते. मधुमेह झाल्यावर औषधं टाळण्यासाठी काही स्त्रिया असा अल्प खाण्यात आणि व्यायामात अतिरेक करतात त्यांनी याची नोंद घ्यायलाच हवी. चांगलंच वजन राखून असलेल्या स्त्रियांना जर पाळी नियमित येत नसेल, तर त्यांनी आपल्या अंडाशयात छोटया छोटया गाठी नाहीत ना? याची निश्चिती करून घेण्यासाठी सोनोग्राफी करायला हवी. त्यांना पी.सी.ओ.डी. असण्याची शक्यता असते.

पाळी यायच्या अगदी सुरुवातीच्या काळात कित्येकदा ग्लुकोज लो होण्याची शक्यता तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. हे माहीत नसल्याने ग्लुकोज कमी झाल्यावर निष्कारण हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेल्याची उदाहरणं ऐकिवात आहेत.

मधुमेही स्त्रियांमध्ये मधुमेही पुरुषांप्रमाणे कामेच्छा कमी होते असं सरसकट विधान करणं अवघड आहे. कारण दोन्ही लैंगिकतेकडे एकाच चश्म्यातून पाहत नाहीत. आणि लज्जेच्या कारणास्तव स्त्रियांच्या लैंगिकतेचा हवा तितका अभ्यास झालेला नाही. परंतु मधुमेह अनियंत्रित असला की अनेक जणींना खाजगी जागी कंड सुटतो. ती जागा लाल होते. काही स्त्रियांना त्या जागी प्रचंड कोरडेपणा जाणवतो. यामुळे त्यांना संबंध करत असताना दुखतं. केवळ दुखण्याच्या भीतीपायी एकमेकांपासून दूर राहायचं प्रमाण मधुमेहात अधिक आहे, इतकं मात्र सांगता येईल. ज्या मधुमेही स्त्रियांना नियमित पाळी येते, त्यांना गर्भार होण्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, हे अभ्यासात सिध्द झालं आहे.

गर्भधारणा होऊ नये म्हणून घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळयांबद्दल थोडं स्पष्टीकरण व्हायला हवं. या गोळयांनी ग्लुकोज वाढतं, रक्तदाब वाढतो असा बऱ्याच लोकांचा समज आहे. हा विचार काही वर्षांपूर्वीपर्यंत सत्य होता. त्या वेळी गर्भ टाळायला ज्या गोळया घेतल्या जायच्या, त्यामध्ये असलेलं औषध - जे मुळात स्त्रियांमध्ये असलेल्या नैसर्गिक हॉर्मोन्सचंच कृत्रिमरित्या बनवलेलं रूप असतं, ते - मोठया प्रमाणात असायचं. त्यामुळे त्या वेळी असे दुष्परिणाम व्हायचे. आता या गोळयांमधलं औषधांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. म्हणून दुष्परिणामदेखील खूप कमी झालेले आहेत. किंबहुना कितीतरी शोध प्रकल्पांची निराशा झालीय. या गोळयांनी सामान्य स्त्रियांसोबत मधुमेही स्त्रियांनासुध्दा काहीच त्रास होत नाही, त्यांचं ग्लुकोज वाढत नाही असं आढळून आलं आहे. एक प्रकारे गर्भनिरोधनाचं काम तितकंच प्रभावी, परंतु दुष्परिणाम अत्यंत अल्प असा सगळा फायद्याचा सौदा व्हायला लागला आहे. फक्त ज्यांच्या पायाच्या रक्तवाहिन्या चोंदलेल्या आहेत, ज्यांना डीप व्हेन थ्रोम्बोसिस झालेलं आहे, त्यांच्या बाबतीत काहीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. त्यांच्यात रक्ताच्या गुठळया रक्तवाहिनीतून निसटून इतरत्र पसरण्याची भीती गर्भनिरोधक गोळया घेतल्यावर बरीच जास्त असते, हे आढळून आलं आहे. अर्थात गर्भनिरोधाचे तोंडी घ्यायच्या औषधांव्यतिरिक्त इतर मार्ग अत्यंत सुरक्षित आहेत. त्यांचा मधुमेहींमध्ये कुठलाच प्रश्न नसतो. 

काही स्त्रियांना स्तनाचा एक प्रश्न मात्र जाणवतो आणि तो बराच मानसिक छळ करतो. याला मॅस्टोपॅथी म्हणतात. केवळ टाइप वन किंवा इन्श्युलीन घेणाऱ्या टाइप टू मधुमेहींमध्ये आढळणारी ही गोष्ट आहे. म्हणजे इन्श्युलीनचा या प्रश्नही संबंध असावा हे नक्की. यात स्तनात गाठ येते. स्तनातली ही गाठ नुसतं तपासून कॅन्सर नाही हे सांगणं खूप अवघड असतं. शिवाय या गाठी कॅन्सरमध्ये परिवर्तित होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्यामुळे बराच मानसिक त्रास भोगावा लागतो. महत्त्वाची बाब ही की बहुधा अशा स्त्रियांमध्ये मूत्रपिंड, डोळे, न्यूरोपॅथी असे मधुमेहाशी निगडित प्रश्न दिसतात. अशांना मॅस्टोपॅथीबद्दल माहीत हवं, म्हणजे प्रत्येक वेळी बायोप्सी करून स्वत:ला त्रास करून घेण्याची गरज उरणार नाही. 

मधुमेहात इतर स्त्रियांच्या मानाने पाळी लवकर बंद होते. अर्थात त्याची निश्चित वेळ सांगता येत नाही, कारण प्रत्येकीच्या मेनोपॉझचं वय हे त्या त्या व्यक्तीच्या हॉर्मोन्सप्रमाणे बदलतं असतं. इतर स्त्रियांमध्ये पाळी सुरू असताना सहसा हृदयरोग होत नाही. निसर्गाने त्यांना ते संरक्षण दिलेलं आहे. एखाद्याला मधुमेह होतो, तेव्हाच त्याने हे संरक्षण गमावलेलं असतं. मध्यंतरी एक फॅड निघालं होतं. आपलं तारुण्य अबाधित राहावं म्हणून काही स्त्रियांना हॉर्मोन्स द्यायचे. याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणायचे. परंतु याने बरेच साईड इफेक्ट होतात व मधुमेहींमध्ये ते जास्तच होतात, हे लक्षात आल्याने सध्या हे मागे पडलं आहे.

मधुमेही स्त्रियांना सगळयात सतावतात ते हाडांचे प्रश्न. स्त्रियांना मधुमेह झाला की त्यांची हाडं ठिसूळ व्हायला लागतात. हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं. फ्रॅक्चर व्हायची, विशेषत: कमरेची, पायाची हाडं मोडायची शक्यता वाढते. मुळातच स्त्रियांना घरात काम असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात त्यांचं तितकंसं जाणं होत नाही. साहजिकच हाडांना त्यांचं कॅल्शियम धरून ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन डी पुरेसं मिळणं नैसर्गिक मार्गाने मिळणं कठीण होतं. व्हिटॅमिन डी मिळवायला सकाळचं कोवळं ऊन अंगावर घ्यावं लागतं हा समज चुकीचा आहे. त्यासाठी कडक ऊन लागतं. आपल्यासारख्या फार उष्ण कटिबंधात असलेल्या देशात कडक उन्हात गेल्यावर त्वचा काळी पडण्याची असलेली भीती स्त्रियांना पसंत नसते. परिणामी हाडं कमजोर पडतात. सुदैवाने व्हिटॅमिन डी सहज उपलब्ध आहे. म्हणून स्त्रियांनी हाडं दुखतात तेव्हा नुसतं कॅल्शियम घेत बसू नये, सोबत व्हिटॅमिन डीसुध्दा घ्यावं.

मधुमेही स्त्रियांमध्ये आढळणारा शेवटचा प्रश्न म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. गर्भाशयाचं आतलं अस्तर किंवा एंडोमेट्रियम, कॅन्सरला बळी पडण्याचं प्रमाण मधुमेहात अधिक आहे हे लक्षात ठेवून या वेळी होणारा अल्प-स्वल्प रक्तस्रावदेखील नजरेआड केला जाऊ नये, त्याकडे पुरेसं गांभीर्याने पाहिलं जावं यासाठी हे सांगणं आवश्यक आहे.

9892245272