लहानसुध्दा महान असती...

विवेक मराठी    02-Jan-2018
Total Views |

रामायणात एक गोष्ट आहे. लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी वानरसेना दगडांचा सेतू बांधत असताना एक छोटीशी खार ते बघत होती. प्रभू रामचंद्रांच्या कार्यात आपलाही हातभार लागावा, या इच्छेने ती खार तोंडात चिखल आणून तो दगडांच्या फटीत भरू लागली. श्रीरामांचे लक्ष तिकडे गेले आणि त्यांनी कुतूहलाने खारीला त्याचे कारण विचारले. त्यावर खार नम्रपणे म्हणाली, ''देवा, माझा जीव छोटासा आहे. माझ्याच्याने हे जड दगड उचलणे शक्य नाही. पण दगडांमधील फटी चिखलाने बुजवल्या, तर पूल भक्कम राहील, म्हणून मी मला जमणारे काम करते आहे.'' खारीचे ते काम खरोखर महत्त्वाचे होते. 'लहानसुध्दा महान असती' हा मोलाची शिकवण देणारा धडा मीसुध्दा माझ्या व्यावसायिक वाटचालीत शिकलो.

 अल अदील ट्रेडिंग कंपनी लिमिटेडचा कारभार माझ्याकडे आल्यानंतर मी प्रयत्नपूर्वक आमच्या दुकानांची, ग्राहकांची आणि उत्पादनांची संख्या वाढवण्यावर लक्ष दिले. बघता बघता त्याचे रूपांतर एका मोठया कंपनीत झाले. हा व्याप माझ्या एकटयाने पेलवेना. माझी पत्नी गृहिणी म्हणून समर्थ होतीच, तसेच आर्थिक नियोजनातही तितकीच पारंगत होती. त्यामुळे मी तिलाही व्यवसायात सहयोगी करून घेण्याचे ठरवले. तिच्या कौशल्याचा आमच्या अल अदील समूहाला पुढे खूप फायदा झाला, पण ती वेगळी गोष्ट. मला येथे एक आगळा अनुभव आला आणि त्यातून खूप शिकायलाही मिळाले.

कंपनीत नव्या भागीदाराला सामावून घ्यायचे, तर मेमोरँडम ऑॅफ पार्टनरशिप या कागदपत्रात बदल करावा लागतो. माझा आतापर्यंत सरकारी कामांशी फारसा संबंध आला नव्हता. हे करारातील बदलाचे काम सहज होईल, अशा अपेक्षेने मी सर्व कागदपत्रे सादर केली. पण त्याला बराच वेळ लागला. दर खेपेस मला बोलावणे येई आणि माझ्याकडून गरजेच्या कागदपत्रांची मागणी केली जाई. मी वारंवार हेलपाटे मारून कंटाळलो होतो आणि कामही होण्याची चिन्हे दिसत नव्हती. तरीही मी आपला बोलावणे आल्यावर न चुकता सरकारी कार्यालयात जाण्याचा शिरस्ता चुकवत नसे.

एक दिवस मी सकाळपासून त्या कार्यालयात बसलो होतो. साहेब आलेले नाहीत, या माहितीने माझे स्वागत झाले. मी त्यांची वाट बघत त्यांच्या कक्षाबाहेर बसून राहिलो. दुपारी उशिरा साहेब आले. माझा क्रमांक आला, तेव्हा साहेबांनी मला मोठा धक्का दिला. माझी कागदपत्रांची फाइल माझ्या पुढयात सरकवून ते म्हणाले, 'मिस्टर दातार, तुम्ही अद्याप खूपशी कागदपत्रे दिलेली नाहीत. माहितीही अपुरी दिली आहे. हे बदल करेपर्यंत आम्हाला तुमची फाईल  क्लिअर करता येत नाही. एक काम करा. ही फाइल घेऊन जा. नव्याने अर्ज करुन संपूर्ण कागदपत्रे त्याला जोडा आणि मगच क्लिअरन्स घ्यायला या.'' माझ्या डोळयापुढे तारे चमकले. नव्याने अर्ज करणे इतके सोपे नव्हते. एकतर इतक्या दिवसांच्या मेहनतीवर पाणी पडणार होते आणि नव्याने अर्ज करायचा म्हणजे पुन्हा ते सव्यापसव्य आलेच. पुन्हा नव्या फाइलमध्येही शंका निघणार नाहीत कशावरून? माझ्यावर एकदम दडपण आले.

कार्यालयाची वेळ संपत चालली होती आणि मी हताश होऊन बाहेर बसून होतो. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका शिपायाचे लक्ष माझ्याकडे गेले. बरेच दिवस मी त्या कार्यालयात चकरा मारत असल्याने माझा चेहरा त्याच्या लक्षात राहिला असावा. माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तो म्हणाला, ''साहेब, काम आज होणार नाही असे ऐकल्यावर बहुतेक लोक लगेच निघून जातात, पण आपण तर सकाळपासून येथे बसून आहात. काही गंभीर अडचण आहे का?'' मी त्याच्याकडे बघितले. साहेब नकार देत असतील तेथे शिपायाला माझे काम तपशीलवार समजून सांगण्यात काय अर्थ? अशा विचाराने मी जुजबी बोलू लागलो. पण त्याने मात्र प्रश्न विचारून माझी नेमकी समस्या जाणून घेतली. माझ्या हातातील फाइल मागून घेतली. ''पंधरा मिनिटे थांबा'' असे सांगून निघून गेला. आश्चर्याचा धक्का म्हणजे पंधरा मिनिटांनंतर तो फाइल घेऊन बाहेर आला, तेव्हा ती क्लिअर झालेली होती. आवश्यक तेथे साहेबांच्या सह्या, शिक्के होते. ज्या कामासाठी मी दिवसभर थांबलो होतो, ते त्या शिपायाने पंधरा मिनिटांत करून दिले होते.

 

सामान्य लोकच आपल्याला शिकवतात 

माझे बाबा दुकानातील कर्मचाऱ्यांशी किंवा मी त्यांचा मुलगा असून माझ्याशीही मोजके बोलत, पण तेच दुकानातील ग्राहकांशी मात्र एकदम मोकळेपणे गप्पा मारत, प्रश्न विचारत, काय नवीन, अशी चौकशी करत. मला याचे आश्चर्य वाटे. एक दिवस मी त्याचे कारण विचारले. त्यावर बाबा म्हणाले, ''दादा, लक्षात ठेव. ग्राहक हा आपला आरसा असतो. खरा प्रतिसाद त्यांच्याकडूनच मिळतो आणि त्यातच धंद्याच्या यशाचा फर्ॉम्युला असतो. कुठल्या गावात कोणत्या वस्तू चांगल्या-वाईट मिळतात, याची माहिती मला ग्राहकांकडून जितकी तपशिलाने मिळते, तितकी आपल्या समव्यावसायिकांकडूनही मिळत नाही. अखेर सर्वसामान्य माणसेच आपल्याला शिकवत असतात.''

 

मला याचे फार नवल वाटले. मी तसे त्याला बोलूनही दाखवले. त्यावर तो हसत म्हणाला, ''साहेब! मी शिपाई असल्याने माझा या कार्यालयातील सगळया विभागांत रोज वावर असतो. इतकी वर्षे काम केल्याने येथे कोणत्या खुर्चीतील माणूस काय काम करतो, त्याचे अधिकार काय असतात येथपासून ते त्याची मानसिकता काय आहे, या सगळयांची बारकाईने माहिती माझ्याकडे असते. तुमची फाइल एका तांत्रिक मुद्दयामुळे परत केली गेली, तरी त्यावरही दुसऱ्या नियमानुसार उपाय असू शकतो. गंमत म्हणजे हे मार्गदर्शन दुसरे साहेब करू शकतात. मला हे ठाऊक असल्याने मी तुमची फाइल घेऊन त्या दुसऱ्या साहेबांकडे गेलो. त्यांच्याकडून काही कागदपत्रे विशिष्ट मुदतीत सादर करायची मुभा असल्याचा शेरा घेतला. त्यानंतर तुमची फाइल लगेच क्लिअर झाली. सकाळपासून मी तुम्ही तणावाखाली असल्याचे बघतो आहे, म्हणून तुम्हाला मदत करावेसे वाटले.'' एवढे बोलून तो निघूनही गेला. तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता.

या प्रसंगामुळे मला एका गोष्टीची जाणीव झाली की आपण ज्यांना लहान समजतो, तेच लोक आपल्या समस्येवर उत्तम प्रकारे खरे मार्गदर्शन करतात. साहेबापेक्षा शिपायाचे सामान्य ज्ञान आणि मनुष्यस्वभावाची पारख चांगली असते. उच्चशिक्षित अभियंत्याला यंत्रातील जी समस्या सुटत नाही, ती मेकॅनिक चुटकीसरशी सोडवून दाखवतो. कारण ते शहाणपण निरीक्षणातून आणि अनुभवांतून आलेले असते. मी या प्रसंगातून योग्य तो बोध घेतला आणि नंतर माझ्या समस्या विनासंकोच अशाच लहान लोकांपुढे मांडू लागलो. त्यांच्या शहाणपणाच्या सूचनांमुळे त्या समस्या सहजपणे सुटत गेल्या.

व्यवसायातही मला असाच अनुभव येत गेला. तेथे पाठीवर हात ठेवणारा कुणी गुरू नसल्याने मी शहाणपणाचे सल्ला देणाऱ्या प्रत्येकाला गुरू मानले. सुरुवातीला मी उद्योगात मोठी भरारी घेणाऱ्या नामवंतांकडून काही मार्गदर्शन मिळेल, म्हणून त्यांची भेट घ्यायला आवर्जून धडपडायचो, पण नंतर अशा मुलाखतींतून निराशाच पदरी पडू लागली. बडे लोक आपलेच गुणवर्णन करत असत. व्यवसायातील यशाचे मंत्र किंवा कौशल्ये याबाबत फारसे बोलत नसत. त्यातून माझ्यासारख्या होतकरू व्यावसायिकांना पुढे जाण्याची दिशा गवसत नसे. मग मी लहान व्यावसायिकांकडे व उद्योजकांकडे वळलो. त्यांनी मात्र माझी मुळीच निराशा केली नाही. चातुर्याच्या इतक्या गोष्टी सांगितल्या आणि शिकवल्या की तसे शिक्षण कुठल्याही पुस्तकातून किंवा बिझनेस स्कूलमधून मिळाले नसते. ते लक्षात ठेवून मी उद्यमाची आकांक्षा असणाऱ्या तरुणांना आज व्यवसायाची सगळी व्यूहतंत्रे मुक्त ज्ञान पध्दतीने उकलून सांगतो. पूर्वी किमयेची विद्या गुरू आपल्या लाडक्या शिष्याला शिकवत असे आणि पिढयानपिढया ती गुप्त राखली जात असे. व्यवसायाचे असे काही नसते. येथे कोणतेही सूत्र गुप्त नसते. एकाने नाकारले तरी दुसरा गुरू ते शिकवतोच. आपली फक्त शिकण्याची तयारी हवी.

मित्रांनो! व्यवसाय करताना तुम्हाला मार्गदर्शन करणारे कुणी आसपास नसेल, तर निराश होऊ  नका. अनुभवाला गुरू करून वाटचाल सुरू ठेवा. उंटावरच्या शहाण्यापेक्षा वाटसरूच अधिक चांगल्या प्रकारे उपाय सुचवू शकतो. व्यक्तीचा दर्जा, जात, शिक्षण न बघता त्याचा अनुभव बघा आणि त्याच्याकडून मार्गदर्शन घ्या. व्यक्ती लहान असली तरी तिचा उपदेश किंवा मदत महान असू शकते.

'बालादपि सुभाषितं ग्राह्यम्।'

(जरी लहान मुलाने सांगितलेले असले, तरी सुवचन आदराने स्वीकारावे.)

vivekedit@gmail.com