उंबरठा

विवेक मराठी    02-Jan-2018
Total Views |

पौगांडावस्था ही फुलण्याची, बहरण्याची अवस्था. मात्र हा उंबरठा ओलांडताना मुलांना आणि त्यांच्या अनुषंगाने पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी आवश्यकता असते ती सुसंवादाची. यापूर्वी 'क्षितिज रंग' सदरात विविध भावनिक, मानसिक प्रश्ांचा तळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अल्पविरामानंतर नवीन वर्षात नव्या स्वरूपात हे सदर सुरू करत आहोत. त्यात या उमलत्या कळयांच्या समस्यांचा वेध घेऊ या.

 ''ही आजकालची पोरं... काही विचारू नका मॅडम. त्यांना नुसता मोबाइल, बाहेरचं खाणं, गाडया उडवणं एवढंच सांगा. आता आमचेच चिरंजीव बघा ना! आठवीपर्यंत 80-85च्या घरातली यांची गाडी नववीमध्ये एकदम खाली आली. नामवंत क्लास लावले, जे जे म्हणेल ते ते देतो, पण यांचं लक्षण नाही. अभ्यासात सतत तंद्री लागलेली. विचारलं की तोंडातून शब्द फुटत नाही. मित्रांबरोबर मात्र तासन्तास बोललं तरी संपत नाही.'' एका वैतागलेल्या वडिलांची ही प्रतिक्रिया.

खरं तर मुलं 10-12 वर्षांची होईपर्यंत 'आपली मुलं आपल्या आज्ञेत आहेत. आपल्याला अपेक्षित वागणं हाच त्यांचा आनंद' अशा धारणा पालकांच्या मनात पक्क्या झालेल्या असतात. पण हळूहळू असे काही बदल मुलामुलींच्या वागण्यात, बोलण्यात येऊ लागतात आणि मग या धारणेला तडा जातो.

पालक नेहमीप्रमाणे काही सांगू लागतात खरे, पण समोरून काही स्वीकृती येत नाही. ''वेदू, अगं तू घे ना वक्तृत्व स्पर्धेत भाग. मी घेते ना तुझी तयारी करून, नेहमीप्रमाणे. काय झालं तुला नाही म्हणायला?'' दोन दिवस वेदूची आई तिची मनधरणी करत राहिली, पण वेदू काही तयार होईना. हो-नाही फुल्यांनी घरातलं वातावरण चांगलच तापलं आणि मग कावलेल्या आईने सुरुवात केली. ''बरेच दिवस बघतेय मी, आम्ही सांगितलेलं काहीच पटेनासं झालंय तुला. आठवीत गेलीस तर काय शिंग फुटली का तुला? ते काही नाही. बघतेच कसं करत नाही भाषण... मला काही ऐकायचं नाहीये. मी सांगते तेच करायचं, नाहीतर सगळया स्टाफ रूममध्ये येते सांगायला.''

अशा प्रकारचे सूर बहुतांश घरातून कधी ना कधी लागतातच.. आपल्या पंखांच्या सावलीत विसावणारी, आपला शब्द हवेतल्या हवेत झेलण्यातच आनंद मानणारी लेकरं एकदम स्वतंत्रपणे काही वागू-बोलू लागतात, हा एक मोठा धक्काच तर असतो पालकांसाठी...

पण खरं तर हा सुखद धक्का असतो. कळी उमलून फुलामध्ये तिचं रूपांतर होण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया...

वाढ आणि विकासातील पौंगडावस्थेत मूल येऊन पोहोचल्याची ही खूण आहे. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहरून येण्यास सुरुवात झाली आहे. बाल आणि तारुण्य याच्या उंबरठयावर मूल उभं आहे. पण कोणताही बदल हा घर्षण निर्माण करतोच नाही का? त्यामुळे मुलातील/मुलीतील वर्तन बदल याबद्दल पालकांना जास्त त्रास होताना दिसतो आणि मग अशा मुलांसाठी शिष्ट, उध्दट, अतिशहाणा, घुमा (कमी बोलणारा), अविचारी, आई-वडिलांची किंमत नसलेला अशी विशेषणं लावली जातात. वास्तविक शरीर, मन आणि वर्तन यात होणारे लक्षणीय बदल हा विकासाच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. पण हे बदल घडताना मुला/मुलींनादेखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

अनेक प्रश्न, शंका, भीती, अनामिक भावभावना, आतून येणारी स्वतःची नवी जाणीव यांच्या गलक्यातून मार्ग काढताना मुलांना हवी असते आई-वडील, पालक यांची भक्कम साथ.. शरीर, मन आणि वागणं या तिन्ही पातळयांवर अनुभवास येणारे बदल, त्यातून मुलांमध्ये येणारी अस्वस्थता हे अगदी स्वाभविकच आहे. पण या वेळीच जर पालक मुलांच्या पाठीशी उभे राहिले, तर या वादळवाऱ्याच्या प्रवासातून दोघंही सुखरूप पुढे जातील. पण या झंझावातात त्यांचा दीपस्तंभ न होता सतत चिडचिड, नाराजी, संशय, शंका, तुलना यांचा मारा केला, तर त्यांचं 'तारू' मग रामभरोसेच म्हणावं लागेल.

मुलांच्या या प्रवासात पालक म्हणून काही गोष्टी आपण समजून घेणं अगत्याचं वाटतं.

l मुलींचा पौगंडावस्थेचा काळ 11 ते 16 वर्षं, तर मुलांचा 13 ते 17 वर्षं असतो. या दरम्यान मूल वयात येण्याची प्रक्रियासुरू होते.
l या काळात त्यांची शारीरिक वाढ झपाटयाने होते. मुला/मुलींच्या स्वभावात चढउतार (mood swing) दिसू लागतात. 
l आई-वडिलांकडील ओढ कमी होऊन ती स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडींकडे अधिक जाते.
l ती कल्पनांमध्ये रममाण होऊ  लागतात. विचारशक्ती कल्पनांचे पंख लावून बागडू लागते. स्वतःच्या कोषात मूल सुखावू लागतं. l स्वतःच्या मतांची जाणीव होऊ  लागते. परलिंगी व्यक्तीबद्दल कुतूहल निर्माण होतं. वागण्यातून-बोलण्यातून ते व्यक्त होतं.
l स्वतःच्या शरीराबाबत जागरूकता येते. आपलं शरीर हीच आपली ओळख आहे असं वाटून त्याकडे जास्त लक्ष पुरवलं जातं.
l अधिक सुंदर दिसावं, सर्वांच्या नजरांचा केंद्रबिंदू व्हावं असं वाटून नवनव्या गोष्टी करण्याकडे कल असतो. फॅशन, स्टंट इत्यादी. 
l घरातील व्यक्ती, भावडं यांच्या भावनांबाबत काही प्रमाणात बेफिकिरी दिसू लागते. l यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधणं मुश्कील होतं. l मित्र-मैत्रिणींवर जास्त विश्वास/जवळीक दाखवली जाते.
l बरेचदा logical thinkingचा अभाव दिसतो. 
l पालकांचा विरोध शब्दांनी वा कृतीने केला जातो - उलट बोलणं, पाय आपटणं, वस्तूवर राग काढणं, रडणं व जेवण्यास नकार देणं, शाळेतील उपक्रमात भाग न घेणं इ.
l पालकांनी दिलेले सल्ले पटत नाहीत. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य द्यावं अशा आशयाची मागणी होताना दिसते.
l टी.व्ही.शी, मोबाइलशी सलगी वाढू लागते. l समाजमान्य रूढींची, नियमांची फारशी पर्वा वाटेनाशी होते.
l काही मुलांमध्ये स्वत:मधील बदलांबाबत भीती, संकोच, शंका निर्माण होतात. कधी अज्ञानाची कोंडी फोडण्यासाठी मॅगझीन्स, इंटरनेट याचा आधार घेतला जातो.
l प्रत्येकाचा वाढीचा वेग व पौगंडावस्थेचा काळ भिन्न असल्याने ज्यांची पौगंडावस्था उशिरा येते, त्यांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते.

खरं तर ही यादी खूप मोठी होईल. पण माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली-जे पालक मुलांच्या विविध समस्या घेऊ न येतात, त्यांनी मुलांच्या या 'वादळी काळात' मुलांशी संवाद साधला नव्हता. त्यांना अद्भुतरम्य अशा स्वत्वाच्या उंबरठयावरून सुजाणतेच्या जगात आणताना त्यांचा हात हळुवारपणे पकडला नव्हता. किंबहुना या बदलांबाबत आक्रस्ताळेपणा, चिडचिड बहुतांश पालकांमध्ये दिसून आली. या काळात पालकांची अनुकूलता अनेक संभाव्य समस्या bypass करू शकते. यासाठी ज्या पालकांची मुलं किशोरवयात पर्दापण करत आहेत - अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर अडनिडया वयात आहेत, त्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी - मूल आपली संपत्ती नाही, तर आपली गुंतवणूक आहे. एकदा हे पटलं की पुढची पायरी अगदी सोपी. मुला/मुलीच्या वागण्या-बोलण्यातील बदलांबाबत त्याच्या/तिच्यासमोर 36च्या आकडयात उभं न राहता आई-वडील दोघांनी मुलाच्या बाजूला जाऊन उभं राहा. त्याच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवा आणि त्याच्या नजरेने या विकास अवस्थेकडे पाहा.   

9273609555