आयुर्वेद जाणण्याची पहिली पायरी

विवेक मराठी    20-Jan-2018
Total Views |

नव्याने येणाऱ्या रुग्णांनी काही मूलभूत गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

  • मनुष्याची शरीरक्रिया समजून घेण्याची, रुग्णाचा आजार ठरवण्याची (diagnosis) आणि त्यात झालेले शरीरातील बदल ठरवण्याची (pathology) आयुर्वेदाची स्वतःची एक स्वतंत्र पद्धत आहे. म्हणून ते सांगण्याची भाषादेखील वेगळी आहे. ती समजून घ्यायची तयारी ठेवावी. सगळी उत्तरं पाश्चात्त्य वैद्यकाच्या भाषेत मिळत नसतात.

  • ‘सगळे असाध्य आजार आयुर्वेदाने बरे होतात’ हा गैरसमज आहे. असाध्य आजार म्हणजे केवळ बरे न होणारे आजार नव्हेत, तर मृत्यूकडे नेणारे आजार. जर ते बरे होत असते, तर मनुष्य अमर झाला असता. पण असाध्य आजारांमध्ये रुग्णाच्या वेदना कमी करून त्याला राहिलेलं आयुष्य त्यातल्या त्यात सुखपूर्वक जगायला आयुर्वेद खूप मदत करू शकतो.

  • पाश्चात्त्य वैद्यकाच्या मते असाध्य असलेले काही आजार आयुर्वेदाच्या मते याप्य (औषधावर अवलंबून राहावं लागेल असे) किंवा कष्टसाध्य (कष्टाने बरे होऊ शकतील असे) असतात.

  • काही आजारांसाठी अधिक उपयुक्त आणि दुष्परिणाम न करणारे उपचार आयुर्वेदात उपलब्ध आहेत.

  • कोणताही आजार एक वर्षापेक्षा जुना झाला, तर तो आयुर्वेदाच्या दृष्टीनेदेखील कष्टसाध्य होतो. त्यामुळे त्यापूर्वी आयुर्वेदाकडे वळणं रुग्णासाठी फायदेशीर ठरू शकतं.

  • इतर औषधांचे काही दुष्परिणाम झालेले असतील तर ते घालवायला वेगळा वेळ द्यावा लागतो.

  • आयुर्वेदाच्या औषधांवर रुग्ण जितका लवकर विश्वास ठेवेल, तेवढा चिकित्सेचा उपयोग लवकर होतो असा अनुभव आहे. भीतीमुळे इतर औषधांच्या कुबड्या सोडायला रुग्ण तयार नसेल, तर दोन्ही मिळून औषधांचं प्रमाण जास्त होतं, रुग्णाला त्यांचा कंटाळा येतो आणि शेवटी जी औषधं सोडायची असतात, तीच (फार उपयोगी नाहीत आणि त्रास देताहेत हे दिसत असून) चालू ठेवली जातात.

  • आयुर्वेद म्हणजे अमक्या आजाराला अमुक एक औषध अशा ‘जोड्या जुळवा’ नसून, ती एक उपचार पद्धत आहे. यात औषध, पथ्यापथ्य, झोप, व्यायाम, पंचकर्म, अन्य घरगुती उपक्रम (उदा. नस्य, अंजन, अभ्यंग, नाभिपुरण इ.) आणि योग उपक्रम यांचा समावेश होतो. रुग्णाने या सर्वांचा सकारात्मकरित्या अंगीकार केला, तर रुग्णाला त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

  • अनेक तपासण्या करूनदेखील निदान न झालेल्या आजारांवर, बरेच वेळा आयुर्वेदाच्या पद्धतीने सम्प्राप्तीचा विचार करून उपचार करता येतात. जिथे प्रत्यक्षाला मर्यादा येतात, तिथे अनुमान / तर्क / युक्ती उपयुक्त ठरते.

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न

आजकाल जीवनशैलीजन्य गुंतागुंतीच्या आजारांचं वाढलेलं प्रमाण, त्यांचे त्याहून गुंतागुंतीचे उपचार, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे जाणवणारी मनुष्यशक्तीची कमतरता या सगळ्या कारणांमुळे आजारपण ही गोष्ट माणसाला परवडत नाही. म्हणून वैद्यक साक्षर होण्याकडे सामान्य मनुष्याचा कल वाढतो आहे. काही सजग डॉक्टर्स त्याला हातभारदेखील लावत आहेत. पण यात गंमत अशी आहे की, साधारणतः १९४७नंतर, पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र हे आपल्याकडील ‘राजमान्य वैद्यकशास्त्र’ बनवलं गेलं आहे. आजचे काही आजार बरे करायला त्याशिवाय पर्याय नाही हे खरं आहे. (अर्थात अशा आजारांमध्ये अन्य वैद्यकाचा उपयोग करून बघितल्याशिवाय त्यांना निरुपयोगी ठरवणं चुकीचं आहे.) तरी पाश्चात्त्य शास्त्रालादेखील काही मर्यादा आहेत, हे निश्चित. शालेय अभ्यासक्रमात मुलांना आपल्या एतद्देशीय वैद्यकशास्त्राची - म्हणजे आयुर्वेदाची माहिती अजिबात दिली जात नाही. त्यामुळे आयुर्वेदाबद्दल आपलं ज्ञान शून्य असतं. साहजिकच आयुष्यात पुढे कधी पाश्चात्त्य वैद्यकातले उपाय थकले आणि चिकित्सेसाठी आयुर्वेदाचा विचार करावा लागला, तर लोक सैरभैर होतात. नवीन शास्त्राची नवीन / वेगळी परिभाषा असते, ही साधी बाब त्यांच्या पचनी लवकर पडत नाही. प्रश्न पाश्चात्त्य वैद्यकाच्या भाषेत विचारले जातात आणि आयुर्वेदाकडून त्याच भाषेतल्या उत्तराची अपेक्षा केली जाते. वैद्यांसाठी तर हा पेपर प्रत्यक्ष उपचार करण्यापेक्षाही कठीण असतो.

अशा गोंधळलेल्या आणि अविश्वास असलेल्या रुग्णांचे प्रश्न नुसते ‘अवघड’च नाही, तर ‘खास आयुर्वेदासाठी’  असतात. उदाहरणादाखल ही बघा एक नमुना प्रश्नपत्रिका -

  • ‘तुमच्या आयुर्वेदात’ या आजारावर काही उपाय आहेत का? (म्हणजे गरज असून अजून आयुर्वेदाला आपलं मानायची तयारी झालेली नसते.)

  • शंभर टक्के बरं वाटेल अशी तुम्ही खातरी देत असाल तरच औषधं चालू करू. (नाहीतर आमची बरं न करणारी जी औषधं चालू आहेत तीच बरी.)

  • खूप दिवस लागतील ना आयुर्वेदाने बरं व्हायला? (याआधी आयुर्वेदाचं औषध चालू नव्हतं. मग कोणी वेळ घालवला?)

  • तुमच्या औषधात पारा किंवा भस्म नसतात ना? त्यांचे साइड इफेक्ट्स असतात ना फार? (कोणी सांगितलं? आजपर्यंत साइड इफेक्ट करणारी औषधं मुकाट कशी गिळली? ते दुष्परिणाम आयुर्वेदालाच निस्तरायचे आहेत ना?)

  • तुम्ही लहान मुलांनासुद्धा औषध देता? (लहान मुलं आयुर्वेदात बसत नाहीत का?)

  • तुम्ही कडू चूर्ण किंवा काढे देणार का? ते नकोत हं मला. (हे हवं-नको प्रकरण इतर डॉक्टरांकडे चालवलं होतं का?)