पेरू

विवेक मराठी    20-Jan-2018
Total Views |

दोन निरागस पोरं, एक सातवीला, एक पाचवीला. शनिवारी एक प्लान असायचा त्या दोघांचा. सारसबागेपाशी टोपली घेऊन बसणाऱ्या म्हातारबाबाकडे पेरू घ्यायला जायचे.  दोघंही आता मोठे झालेत, बाप झालेत. खिशात नोटा वाढल्या, किंमत कमी झाली.रस्त्यात उकिडवा बसून कल्हई लावतात ते तासंतास पाहिलं नाहीये. पेरू साले फ्रूट स्टॉलला आले. एखादा म्हातारबाबा दिसत नाही. कुठलाही आरडाओरडा न करता तो पांढऱ्या मिशात कौतुकाने हसायचा तसा हसत नाही.

पंधरा पैसे तिकीट होतं बसचं तेव्हा. भिकारदास ते पर्वती दर्शन. दोघांचे तीस पैसे व्हायचे. दोन निरागस पोरं... तुम्हांला सांगतो, एक सातवीला, एक पाचवीला. शनिवारी एक प्लान असायचा त्या दोघांचा. ते आणि आणखी दोघं-तिघं. चालत यायचं घरी. बस मिळाली नाही, निघताना लेट झाला, खेळत होतो अशी कित्येक कारणं तोंडपाठ होती. खपून जायची उशीर झाला तरी. मुळात कुणी विचारायचं नाही. तसंही पंधरा-वीस मिनिटात पोहोचायचे ते चालत.

सारसबागेपाशी टोपली घेऊन बसणाऱ्या म्हातारबाबाकडे साइज लहान असेल तर पाच पैशाला एक आणि मोठा असेल तर दहा पैशाला एक पेरू मिळायचा. (तेव्हाचा लहान पेरूसुध्दा आत्ताच्या मधल्या साइजएवढा असायचा आणि मोठ्ठा म्हणजे खरंच मोठ्ठा.) आधी मागच्या नवलोबाच्या देवळात नळाला तोंड लावून ढसाढसा पाणी प्यायचं. तोंड पुसलंच पाहिजे असं काही नव्हतंच तेव्हा. हात पुसायला खाकी चड्डी मळखाऊ  रंगाला जागायची आणि बाही होतीच की तोंड पुसायला. शनिवार म्हणून गेल्यावर धुवायला तर टाकायचाय शर्ट. मग म्हातारबाबाकडे घासाघीस करून मॅक्झिमम साइजचा पेरू पदरात पाडून कापून घ्यायचा, चिक्कार तिखट-मीठ घालून परत हातावर वेगळं घ्यायचं. पेरू खात खात घर कधी यायचं कळायचंच नाही. तोंडावरून हात फिरवून झाले की पुरावा गायब. दोघं साळसूद घरात.

एकदा नेहमीप्रमाणे प्लान पार पडला. दोघं खूश. दुपारी वडील घरी आले जेवायला. जेवताना लव-कुशांची चौकशी झाली. बापाला माया फार. ''काय रे, आज चालत आलात का उन्हाचे?'' तत्पर माउली म्हणाली, ''छे, बसनी आलेत.'' लव-कुशांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. हातातला घास हातात, तोंडातला तोंडात आणि डबल जेवतील इतका मोठा खड्डा पोटात पडलेला. दोघांचे चिमुकले मेंदू 'यांना कसं कळलं?', 'बसने आलो'ची थाप कंटिन्यू ठेवावी का?', 'कितपत कानफटतील?' असल्या गहन प्रश्नांची उत्तरं शोधण्यात दंग झाले. तेवढयात एक पचकलाच - ''बसनेच आलो.''

दशरथ राजाने जेवढया प्रेमाने राम-लक्ष्मणाकडे पाहिलं नसेल, एवढया प्रेमाने त्यांनी दोघांकडे बघितलं. ''तुम्ही चालत आलात. सारसबागेपाशी रस्त्याचं काम चालू आहे आणि तुमच्या दोघांच्या चपलेला डांबर आहे. काय केलंत पैशाचं?'' ''पेरू खाल्ले.''  हे म्हणताना जो नाजूक, अस्पष्ट आवाज आला ना, तसा काढायला स्किल लागतं बघा, तुम्हांला सांगतो. ''अरे, मग खोटं कशाला बोलायचं? सांगायचं की पेरू खाल्ले म्हणून.'' ''हो, घाबरून नाही सांगितलं. परत नाही असं करणार.'' हा आवाज मात्र थोडा बोर्नव्हिटा खाल्ल्यासारखा ताकदवान होता.

तुम्हांला सांगतो, दोघंही आता मोठे झालेत, बाप झालेत. खिशात नोटा वाढल्या, किंमत कमी झाली. रणरणत्या उन्हात रस्त्याच्या कामावर ते उभं राहून बघण्यातही मजा होती. डांबराचा वास मस्त यायचा. दारात अंगण करतात तसा तो खर टाकलेला रस्ता रोलर फिरल्यावर कसा बेसनाच्या लाडवासारखा गुळगुळीत व्हायचा. त्यातला मोठा परवा भेटला, म्हटलं, ''आठवतंय का रे?'' म्हणाला, ''हो तर, सगळं आठवतंय. पण ती मजा गेली बघ. कित्येक वर्षांत रस्त्याचं काम चालू असताना डांबराचा वास घ्यायला थांबलो नाहीये. रस्त्यात उकिडवा बसून कल्हई लावतात ते तासंतास पाहिलं नाहीये. पेरू साले फ्रूट स्टॉलला आले. एखादा म्हातारबाबा दिसत नाही. हा घेऊ का तो घेऊ असं होत नाही. कुठलाही आरडाओरडा न करता तो पांढऱ्या मिशात कौतुकाने हसायचा तसा हसत नाही. 'अरं पोरा, दोन्हीबी सारख्येच हाईत, घे कंचा बी' म्हणत नाही.''

''तुला सांगतो, मी वाट बघतोय... असंच रस्त्याचं काम चालू असावं. माझी पोरगी म्हणेल, 'बसने आले.' जेवण झालं की मी बाहेर जाईन आणि शिग घेऊन डांबर खरडता खरडता तिला हाक मारेन. सगळी पापं धुतली जातील बघ...''

9823318980