मन करा रे प्रसन्न

विवेक मराठी    22-Jan-2018
Total Views |

मनाचा उल्लेख झाला की हमखास आठवते ती बहिणाबाईची कविता -

मन वढाय वढाय

उभ्या पिकातलं ढोर|

अशाच अर्थाचं

बालक, मन और वानरा, कबहुं न रे निचंत |

बाल और वानर सोत है, यह सोवत में भी उडन्त ||

लहान मूल, मन व वानर हे कधीच चूपचाप बसत नाही. बालक व वानर झोपल्यानंतर तरी गप्प होतात, पण मन झोपेतही उड्या मारत असतं.

मनावर सगळ अवलंबून आहे, मनाच्या हातात आपली किल्ली आहे हे लक्षात घेऊनच


 

तुकाराम म्हणतात,

आपल्याला ईस्पित साध्य करायचं असेल, तर मन प्रसन्न अर्थात पॉझिटिव्ह हवं.

आयुष्य म्हणजे मनाचा खेळ आहे. एक गंमत सांगतात - एकदा एका हत्तीला बांधायला साखळी सापडेना, तेव्हा त्या हुशार माहुताने साखळी बांधल्याचा अभिनय केला आणि बाजूला गेला. मनाचे खेळ सारे - आपल्याला बांधलेलं आहे ह्या हिशोबाने हत्तीसुद्धा जागेवरून हलला नाही.

तसं आपणच आपल्याला बंधन घालून घेतो किंवा त्यांना बंधन मानतो .

मुक्तता आणि बंधन हे विचारांवर ठरतं, तेव्हा आपल्या जाणिवा प्रगल्भ होणं हे सुदृढ मनाचं लक्षण.

मनाची ताकद फार मोठी आहे,  मनाने - अर्थात पूर्णपणे अधीन होऊन - केलेली पूजा,  मानलेलं दैवत, मनाचा आनंद खरा आनंद!

एखाद्या मातेप्रमाणे मन तुमच्या इच्छा पुरवीत असतं.

ह्या अभंगातलं हे कडवं विशेष आहे, कारण एक जगण्याची मेख सांगितली आहे.

मन गुरू, मन शिष्य - क्या बात है

आपल्याला उत्तम शिकवणारा गुरू जर कोणी असेल, तर आपणच; कारण आपण आपल्याला जितके जवळून आणि चांगले ओळखतो, तेव्हढं दुसरं कोणीच नाही. इथे आपणच आपले मालक आणि दाससुद्धा. यामागे सद्सद्विवेकबुद्धी कार्यरत असायला हवी, अन्यथा प्रगतीऐवजी अधोगती होऊन आपणच त्याचे धनी होऊ.

साधक, वाचक आणि पंडित सर्व स्तरातील जनसामान्यांना तसंच विद्वानांना तुकोबाराय सांगू इच्छितात, मनासारखं दुसरंं दैवत नाही.

मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं. ही गोष्ट सोपी नक्कीच नाही, परंतु कर्मकांड, अभ्यास, हटतट याहूनही या कलियुगी सोपा उपाय कोणता असेल, तर मनावरील नियंत्रण, त्यासाठी सोपा उपाय ‘रामकृष्णहरी’ जप करा, स्वतःला सावध ठेवा.

मन सगळ्या इंद्रियांचा ताबेदार आहे,  त्याला काबूत आणलं की तो मोक्षच.

||मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण |

मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।

मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।

मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।२।।

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।

प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।३।।

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।

नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।