वेगळं व्हायचं मला...

विवेक मराठी    24-Jan-2018
Total Views |


  राजकारणात आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी सातत्याने काही ना काही करावे लागते. कधी दबावतंत्र तर कधी गळाभेट घेत आपण आहोत हे दाखवून द्यावे लागते. महाराष्ट्रात गेली तीन वर्षे असाच अस्तित्वरक्षणाचा पराकोटीचा प्रयत्न चालू होता. पण मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत '2019 स्वबळावर' अशी घोषणा देऊन पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रातील सरकार आपली पाच वर्षांची राजवट यशस्वीपणे पूर्ण करेल यावर शिक्कामोर्तब करून टाकले. महाराष्ट्रात 2014 साली सत्तांतर झाले आणि भाजपाने सरकार स्थापन केल्यावर, आधी विरोधात लढलेली शिवसेना सत्तेत सामील झाली. 1995च्या युती शासनाच्या काळात मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल होता, तसाच आपणही रिमोट कंट्रोल होऊ आणि आपल्याला हवे तसेच सरकार चालवू असे पक्षप्रमुखांना वाटत होते. पण आपणास प्रती-बाळासाहेब होणे शक्य नाही, आता संख्याबळाने आपण धाकटे आहोत आणि आपला सहकारी थोरला होऊन पक्ष संपूर्ण भारतव्याप्त होतो आहे हे लक्षात येताच, त्यांना सत्तेत राहून सत्तेबाहेर पडण्याचे डोहाळे सुरू झाले होते. सेनेच्या मंत्र्यांनी आपापले राजीनामे लिहून पक्षप्रमुखांच्या चरणांशी रुजू केले, पण ते राजीनामे काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपर्यंत मातोश्री ते मंत्रालय असा प्रवास करू शकले नाहीत. आणि आता तर 2019च्या निवडणुकीपर्यंत राजीनामे देण्याचा प्रश्नच येणार नाही. आता जे काही करायचे ते 2019च्या निवडणुकीतच. पंचवीस खासदार आणि दीडशे आमदार निवडूण आणायचे लक्ष्य पक्षप्रमुखांनी आपल्या सैनिकांसमोर ठेवले आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्व राज्यांतही निवडणुका लढवण्याचा निर्धार राष्ट्रीय कार्यकारणीत झाला. 2019च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका होतील, तेव्हा सेना भाजपाशी काडीमोड घेईल, अशा प्रकारचा मुहूर्त काढून घटस्फोट घेणारा शिवसेना हा एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेची नोंद नक्की घेतली जाईल. घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या दोन्ही पक्षांना किमान काही दिवस वेगळे राहून मग घटस्फोट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. शिवसेनेला भाजपाकडून घटस्फोट हवा, पण सत्तेची ऊब आणि लाभ मात्र  सोडायचे नाहीत. 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत सत्तेत राहून मग सेनेला स्वबळाचा प्रयोग करायचा आहे.

गेल्या वर्षी पक्षप्रमुख म्हणाले होते, ''गेली पंचवीस वर्षे युतीत राहून आम्ही सडलो.'' पंचवीस वर्षे सडलेल्या सेनेने आता स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेची आजवरची वाटचाल पाहता राजकीय पटलावर यांचे फार परिणाम होतील असे वाटत नाही. कारण सर्वसामान्य जनतेचे सोडून द्या, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ताही या घोषणेवर विश्वास ठेवायला तयार होणार नाही. कारण आता शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. विद्यमान पक्षप्रमुख स्वबळाची भाषा करताना देशभर निवडणुका लढवण्याची घोषणा करतात, तेव्हा गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षप्रमुखांनी केलेली भाषणे आणि त्याला मिळालेले यश पाहता जनता आणि पक्ष कार्यकर्ते पक्षप्रमुखांच्या घोषणेला किती गंभीरपणे घेतील याबाबत शंका वाटते. 2014च्या सत्तातरानंतर सातत्याने आपल्या सहकारी पक्षासमोर अडचणी निर्माण करून  सेना नेतृत्वाने आपले उपद्रवमूल्य दाखवण्यास सुरुवात केली होती. भाजपाच्या सोबत सत्तासुख उपभोगताना 'आम्ही केवळ मतदाराच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठीच भाजपासोबत आहोत' असा कांगावा करणारी सेना शासनाच्या समोरच्या अडचणी वाढवण्यात अग्रेसर राहिली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कर्जमाफी आणि शेतकरी संप. आपल्या सहकारी पक्षाला शह देण्यासाठी तेव्हा सेनेने घेतलेली भूमिका जनतेच्या लक्षात आहे. तीच शिवसेना आणि तिचे पक्षप्रमुख जेव्हा आम्ही ''सत्तेत आल्यावर स्वामीनाथन आयोग लागू करू'' अशा घोषणा करतात, तेव्हा केवळ सत्तेसाठी ही मंडळी किती उतावीळ झाले आहेत हे लक्षात यायला वेळ लागत नाही. 2014 साली जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तेव्हाही शिवसेना स्वबळावर लढली होती. पण सत्तेत सहभागी होता येत आहे हे पाहताच विरोधी पक्षनेतेपद सोडून शिवसेना भाजपासोबत गेली होती. आणि आता पुन्हा 2019च्या निवडणुकीत पक्षप्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील पक्षप्रमुखाचे भाषण हे मोदींवर आणि भाजपावर टीका करून स्वबळाची घोषणा होते, मात्र पक्षाचे विकासाचे धोरण, पक्षबंाधणी या विषयावर ते बोलले नाहीत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना भावनिक करण्यासाठी, मागच्या प्रयोगात शिवबंधनाचा आणि आता अंगठीचा उपयोग केला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अशा गंडा-दोऱ्यांवर कधी विश्वास ठेवला नाही, तर प्रबोधनकारांनी अशा विषयावर सडकून टीका केली. पण मग पक्षप्रमुख उध्दव ठाकरे असे वागतात, तेव्हा यामागे काय उद्देश आहे हा प्रश्न कुणाला पडत नाही. कारण मोदीद्वेषाची कावीळ झाल्यामुळे आपल्या पक्षाच्या बांधणीपेक्षा भाजपावर व मोदींवर टीका हाच पक्षप्रमुखांचा राष्ट्रीय अजेन्डा झाला आहे.

2019मध्ये शिवसेना स्वबळावर लढणार याचा अर्थ आता तोपर्यंत सेना भाजपाला शांतपणे काम करू देणार की मागच्या पानावरून पुढे चालू म्हणत राजीनाम्याच्या आणि स्वाभिमानाच्या धमक्या देणार, हे येणाऱ्या काळात आपण पाहूच. पण स्वबळाच्या घोषणेमुळे पक्षप्रमुखांच्या मनात साचून असलेली वेगळं होण्याची मळमळ बाहेर पडली असली, तरी या वेगळं होण्याच्या प्रयोगास सेनेचे कार्यकर्ते आणि जनता किती प्रतिसाद देते, हे आगामी काळात अनुभवता येईल. स्वबळाची ही घोषणा पावसाळी बेडकांची गर्जना आहे की खरोखरच त्यामागे जनाधार आणि जमिनीवरचे वास्तव आहे, हे आपल्याला 2019 सालच्या निवडणुकीत पाहता येईल. तोपर्यंत सध्या चालू असलेल्या पक्षप्रमुखांच्या राजकीय नाटकाचे नाव आपण स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करू. या नाटकाचे नाव आहे 'वेगळं व्हायचं मला!'