नवी ओळख

विवेक मराठी    24-Jan-2018
Total Views |

आपण मोठे होतो म्हणजे नेमकं काय? आपल्यात दिसणारी शारीरिक वैशिष्टयं, स्वभावात होणारे बदल, त्या साऱ्याला जबाबदार शरीरांतर्गत घटक, या काळात घेण्याची काळजी ही मुलाला किंवा मुलीला जर सुरुवातीलाच कळली तर हा झंझावाती काळ मुलं लीलया पार पाडू शकतात. खरं तर स्वत:बाबत-या किशोरवयातील बदलांबाबत माहिती मिळवणं हा त्यांचा अधिकारच आहे, असं मला वाटतं.

 ''चांगली माहिती दिली आमच्या पोरींना. 'का नि कसं' सगळं व्यवस्थित सांगितलं. आमच्या वेळी असं कुणी सांगणारं नव्हतं. आई नाहीतर आजी, काकी कुणीतर सांगायच्या. तुझी पाळी आली. सगळयाच बायकांना होत तसं... तू आता मोठी झालीस. समजुतीनं वागायचं, जोरजोरानं खिदळायचं नाही. खेळायचं नाही. मैदानात... तेव्हा एकदम घाबरून जायला व्हायचं.''

ग्रामीण भागात किशोरी विकास प्रकल्पांतर्गत घेतलं जाणारं हे सत्र संपल्यावर सर्वसाधारण अशाच प्रतिक्रिया मला उपस्थित महिलावर्गांकडून मिळायच्या.

आज उंबरठयावर उभ्या असलेल्या किशोरवयीन मुलामुलींबाबत विचार करताना डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाची आवर्जून आठवण होते.

आपण मोठे होतो म्हणजे नेमकं काय? आपल्यात दिसणारी शारीरिक वैशिष्टयं, स्वभावात होणारे बदल, त्या साऱ्याला जबाबदार शरीरांतर्गत घटक, या काळात घेण्याची काळजी ही मुलाला किंवा मुलीला जर सुरुवातीलाच कळली तर हा झंझावाती काळ मुलं लीलया पार पाडू शकतात. खरं तर स्वत:बाबत - या किशोरवयातील बदलांबाबत माहिती मिळवणं हा त्यांचा अधिकारच आहे, असं मला वाटतं.

या विषयात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या.

वाढीची आणि विकासाची माहिती मुलाला/मुलीला पालकांकडून विस्तृतपणे आणि पुरेशा गांभीर्याने दिली जात नाही.

अशी माहिती देणं हे पालकांनाच संकोचाचं वाटतं. मुलांशी अशा विषयात बोलणं 'कसंतरी' वाटतं, असं बरेच पालक सांगतात.

मुलींसाठी 'कळी उमलताना', 'वयात येताना' असे कार्यक्रम होतात, पण मुलांसाठी अशा जाणीवजागृतीच्या कार्यक्रमांचं प्रमाण नगण्यच असतं. बऱ्याच गोष्टीची माहिती मुलं मित्रांकडून, समवयस्कांकडून मिळवतात.

मुलं पौगंडावस्थेत प्रवेश करतात, तेव्हा त्याच्या स्वभावात, भावभावनांमध्ये बदल होऊ लागतात. शारीरिक बदल घडतात. प्रजनन संस्था विकसित होऊ लागते. त्या अनुषंगाने शारीरिक, मानसिक बदल घडतात. आपल्याला नेमकं काय होतंय हे लक्षात न आल्याने सुरुवातीला मुलं पुरती गोंधळून जातात.

नव्या अनुभवांचा अर्थ लावतानाची, त्यांच्याशी जुळवून घेतानाची ही वेळच कठीण असते. याच काळात जागृत राहून पालकांनी त्याचं/तिचं तारू भरकटणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतात.

Counselling दरम्यान किंवा Parents Workshopमध्ये ही गोष्ट जेव्हा मी पालकांसमोर मांडते, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, 'पण नेमकं कसं सांगायचं?'

इथे मला अर्पिताची आठवण झाली. पाहा ना तिने तिच्या 12 वर्षाच्या लेकीला कसं समजावलं -

''बाळा, आज मी तुला तुझीच एक नवी ओळख करून देणारे.''

मुलगी उत्सुकतेने ऐकू लागली. अर्पिताने दोन चित्रं आणली होती बरोबर. एक छोटया मुलीचं आणि एक स्त्रीचं. तिने मुलीला विचारलं, ''सांग बरं यात काय फरक आहेत?'' मुलगी कोडी सोडवावी तसं सांगू लागली. मुलगी जिथे संकोचली तिथे अर्पितानेच तिला मदत केली. ती म्हणाली, ''आपण लहानपणी या मुलीसारखे असतो. पण हळूहळू आपण मोठे होऊ लागतो. मोठं होण्याचा हा काळ म्हणजेच 'किशोरावस्था'. तू आता आहेस ना, तेच हे वय... आता तुझी उंची वाढू लागली की नाही? तसं हळूहळू आणखीही काही बदल घडतील हं बाळा... तू सांग बरं तुला काही बदल जाणवतात का?''

अर्पिताने हुशारीने लेकीला बोलतं केलं. मग अर्पिताने बाह्य आणि अंतर्गत शारीरिक विकास, शरीरवैशिष्टयं यात होणारा बदल का आणि कसा घडतो हे अन्य चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितलं.

थोडक्यात, स्त्रीत्वाचा सुंदर आणि शास्त्रीय अर्थ तिने आपल्या मुलीला समजून सांगितला, पण तेवढं सांगून ती थांबली नाही.

ती म्हणाली, ''या सगळया बदलांना कारणीभूत Pituitary Gland आपल्या मेंदूमध्ये असते, बरं का बाळा... आणि या ग्रंथीमुळे अन्य स्राव रक्तात मिसळतात. याचे जसे शारीरिक परिणाम मी तुला सांगितले ना, तसे काही भावनिक परिणामही होतात. जसं आपले मूड खूप बदलतात. पटकन राग येतो, कधी एवढयाशा कारणानेही रडायला येतं, तर कधी खूप आनंदही होतो. छान दिसावंसं वाटतं. मुलांना काही साहसी करून लोकांच्या नजरांचा केंद्रबिंदू व्हावंसं वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं. हे अगदी नॉर्मल असतं. पण इथे थोडं सांभाळून राहावं लागतं हं बाळा... अगं, या आकर्षणालाच प्रेम समजून बरीच मुलंमुली फसतात.

खरं तर हा सगळा प्रभाव या संप्रेरकांचा. पण मला सांग, हे वय कसलं असतं गं? 14-15 वर्षांचं? लग्न करण्याचं?'' ''नाही गं आई. काहीतरीच काय! शिक्षण घेण्याचं, करिअरची पूर्वतयारी - तूच सांगितलं होतंस मागे.''

''हं, खरं आहे. म्हणूनच बाळा, या वयात मनात उठणाऱ्या विचार, भावना यांना पारखून घ्यायला हवं. आता मला सांग, तुम्ही आपला प्रोजेक्ट चांगला व्हायला काय काय करता गं?''

''आई, सर्वात आधी Content एकदम जबरदस्त निवडतो. मग त्याला छान Colouring आणि Designing करतो.''

''छान. एकदम बरोब्बर... तसंच आपलं जीवन सुंदर करण्यासाठी किंवा सोप्या भाषेत आपलं Character चांगलं करण्यासाठी आपल्याला आपल्या चांगल्या/वाईट विचारांना, चांगल्या/वाईट वर्तनाला ओळखायला हवं. तात्पुरता फायदा करून कायम नुकसान करणाऱ्या गोष्टी हद्दपार करायला हव्या. बरोबर ना? म्हणूनच तू आता या मोठं होण्याच्या टप्प्यावरच स्वत:ला अशी सवय लावावीस असं मला वाटतं. पण तरीही तुला कसलीही अडचण आलीच तर मी कायम आहे हं तुझ्यासाठी... तुझी जवळची मैत्रीण...''

नकळतच अर्पिताची लेक तिच्या कुशीत शिरली... नव्या ओळखीने 'स्वत:च्या आणि आईच्या...'

9273609555